“मुझे अच्छी तरह पता है कि वह (हिंदुवादी) हिंदू रियासत नही चाहते. बल्कि यह इस मुल्क मे सब हिंदुस्थानियोंकी हुकूमत चाहते है. और अगर वे हिंदू रियासत चाहते भी है तो मुझे अंग्रेजो के मुकाबले में हिंदूओंकी हुकूमत पसंद होगी, क्योंकि हिंदू हैं तो आखिर अपनेही भाई हैं, अंग्रेज कब मुसलमानों के खैंरख्वाह रहे है?’’
अशफाकउल्लाह खान वारसी यांचे हे विधान आहे. या महान स्वातंत्र्य सेनानीचा जन्म २२ ऑक्टोबर १९०० रोजी मध्यप्रदेशच्या शाहजहाँनपूर येथे एका प्रतिष्ठित घराण्यात झाला.
वारसी कुटुंबातील बरेचसे सदस्य लष्करात होते. आपला पुत्र अशफाक परंपरेनुसार एक सेनाधिकारी व्हावा अशी त्यांच्या माता-पित्याची इच्छा होती. परंतु त्यांचा सुपुत्र भविष्यातील एक लष्करी अधिकारी नव्हे; तर ब्रिटिश साम्राज्याला हादरा देणारा एक क्रांतिकारी म्हणून उदयास येणार होता.
महान व्यक्ती होऊन अमर होण्याची दृढ इच्छा बालपणापासून अशफाकच्या मनात वास करत होती. असाच एका बैठकीच्या वेळी रामप्रसाद बिस्मिल आणि अशफाकउल्लाह खान यांची भेट झाली. अशफाकच्या मनातील इच्छाशक्ती आणि क्रांतिकारी विचार पाहून बिस्मिल अतिशय प्रभावित झाले. त्यांनी अशफाकला सांगितले की, “मातृ भूमिको आजाद कराने के अलावा मुझे ना तो कोई काम पसंद है, ना कोई काम आता है, ना कोई काम सूझता है।”
अशफाकउल्लाहमधील तेज, तडफदार आणि दृढ इच्छाशक्ती पाहून पंडित रामप्रसाद बिस्मिल जाणत होते की भविष्यात अशफाकउल्लाह खान त्यांचा वारस (उत्तराधिकारी) आणि एक महान क्रांतिकारी होणार आहे.
पुढे रामप्रसाद यांच्या सल्ल्यानेच अशफाकउल्लाहनी क्रांतिकारी चळवळीसंबंधी लिखित साहित्याचा अभ्यास केला. क्रांतीशिवाय स्वातंत्र्य नाही, हे त्याच्या लक्षात आले. अशफाक पूर्णपणे मानसिक दृष्टीने तयार झाल्याची खात्री झाल्यानंतर रामप्रसाद यांनी स्वातंत्र्य चळवळीत त्यांना सामील करून घेतले.
वाचा : मौलाना आजाद यांनी भारतरत्न का नाकारला?
वाचा : इकबाल यांची कविता म्हणजे कामगार हिताचा एल्गार
मैत्रीशी दगा कदापि नाही
अशफाखउल्लाह यांचे सहकारी व क्रांतिकारी मन्मथनाथ गुप्ता सांगतात की, “अशफाकउल्लाह खान वारसी एक मुसलमान होते. परंतु त्यांनी कधी हिंदु-मुस्लिम असा भेदभाव मानला नाही. त्यांचा विश्वास होता की, हिंदू मंदिरात हिंदू आहेत आणि मुसलमान मस्जिदीत मुसलमान! बाहेर तर ते दोघेही भारतीय आहेत.”
भारतातील ब्राह्मणी इतिहासात अदृष्य झालेल्या एका घटनेबद्दल मन्मथनाथ गुप्ता लिहितात की, “अशफाकउल्लाह खान यांना काकोरी कांडमध्ये अटक झाल्यानंतर त्यांना माफीचा साक्षीदार (सुलतानी गवाह) बनविण्यासाठी सरकारी पक्षाकडून बरेच प्रयत्न झाले. या कामासाठी खान बहाद्दूर तस्सदुक हुसेन नावाचे पोलीस कमिशनर यांस नेमण्यात आले होते.
त्यांनी अशफाकउल्लाह यांचे मनपरिवर्तन करण्याचे पुष्कळ प्रयत्न केले. या ब्रिटिश अधिकाऱ्याने त्यांना सांगितले की, ‘अशफ़ाक या लोकांत तुझी फसगत झालेली आहे. हे तर सर्व हिंदू जातीचे आहेत आणि हिंदुराष्ट्र निर्माण करण्याची त्यांची मनोकामना आहे. तू आता सुद्धा त्यांच्यापासून विभक्त होऊ शकतोस.’
तुरुंगातील अंधार कोठडीला घाबरून, ब्रिटिश सरकारसमोर दयेची भीक मागून अशफाकउल्लाहना दुसऱ्याच्या गळ्यात फाशीचा फास सहज अडकवता आला असता. पण अशफ़ाकउल्लाहनी आपल्या सहकाऱ्यांशी दगा केला नाही.
त्यांनी त्या पोलीस अधिकाऱ्याला सडेतोड उत्तर दिले की, ‘‘मला फाशीची शिक्षा झाली तरी चालेल, परंतु पंडित रामप्रसाद बिस्मिल, चंद्रशेखर आजाद आणि अन्य क्रांतिकारी बांधवाविरुद्ध मी साक्ष देणार नाही.’’ या निर्भीड उत्तराने पोलीस अधिकाऱ्याला राग अनावर झाला. त्याने भयंकर शारीरिक त्रास देऊन त्यांना धमकावले.
वाचा : भिक मागून सर सय्यद यांनी जमा केला होता विद्यापीठासाठी निधी
वाचा : काय आहे अयोध्या-बाबरी मस्जिदीचा वाद?
रेल्वेतील खजिना लुटला
क्रांतिकारी चळवळ उभारण्यासाठी हत्यारे, दारुगोळा आणि इतर खर्चासाठी द्रव्य यांची अडचण भासू लागली. म्हणून पंडित रामप्रसाद बिस्मिल यांनी रेल्वेतून जाणारा सरकारी खजिनाच लुटण्याची योजना तयार केली.
या योजनेअंतर्गत बिस्मिल, चंद्रशेखर आजाद, मन्मथनाथ गुप्ता, सचिंद्रनाथ बक्षी, राजेंद्रनाथ लाहोरी आणि अशफाकउल्लाह आदी सहकाऱ्यांनी साथ दिली. दिनांक ९ ऑगस्ट १९२५ रोजी मध्यरात्री रेल्वेतील खजिना लुटला. तो खटला ‘काकोरी रेल डकैती’ नावाने प्रसिद्ध आहे.
या दरोड्यामुळे ब्रिटिश सरकार खडबडून जागे झाले. दिनांक २६ सप्टेंबर १९२५ पासून देशभरात अटक सत्र चालू झाले. सर्वप्रथम सूत्रधार म्हणून रामप्रसाद बिस्मिल यांना शाहजहाँपूरमध्ये अटक करण्यात आली. त्यानंतर देश सोडून अफगाणिस्तानला पलायनच्या बेतात असलेल्या अशफाकउल्लाहना दिल्ली रेल्वे स्टेशनवर अटक झाली. त्यानंतर सचिन्द्रनाथ बक्षी यांनाही अटक झाली. चंद्रशेखर आजाद तर पोलीस चकमकीत शहीद झाले होते.
सर्वांवर रेल्वे खजिना लुटीचा खटला भरण्यात आला. रामप्रसाद आणि अशफाकउल्लाह या दोघांना फाशीची शिक्षा, तर सचिंद्रनाथ बक्षी यांना काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली. कोर्टाच्या या निर्णयाविरुद्ध देशभर आंदोलने झाली. मोर्चे काढण्यात आले. परंतु काही उपयोग झाला नाही.
प्रथम १९ डिसेंबर १८२७ रोजी फैजाबादमध्ये अशफ़ाकउल्लाहना फाशी देण्यात आली. फासाच्या सुळावर चढण्याअगोदर त्यांनी सांगितले, ‘‘मेरे हाथ इंसानी खूनसे कभी नही रंगे, मुझ पर जो इल्जाम लगाया गया है, वह सरासर झूठा है, खुदा के यहाँ मेरा इंसाफ होगा.’’
निर्मिकाचे नाव घेऊन स्वत: आपल्या हाताने फासाचे दोर गळ्यात घालून ते फासावर चढले. मातृभूमीसाठी अमर शहीद झाले.
वाचा : इतिहासाच्या भगवेकरणाचा प्रयत्न
वाचा : वाजपेयींच्या काळात झाला होता राज्यघटना बदलण्याचा प्रयत्न
भावासारखी मैत्री
क्रांतिकारी अभियानाचे सूत्रधार रामप्रसाद बिस्मिल यांची अशफाकउल्लाल्लाह यांच्यावर भावासारखी मर्जी होती. फासावर चढवण्याच्या काही दिवस अगोदर गोरखपूर जेलमध्ये बिस्मिल यांनी उर्दू भाषेत ‘आज़ादी के परवाने’ या नावाने आपले चरित्र लिहिले. या ग्रंथात ते सांगतात की,
‘‘माझ्याबरोबर या स्वातंत्र्याच्या लढ्यात जे माझे सहकारी सामील झाले होते आणि ज्यांच्या जीविताची जबाबदारी माझ्यावर होती या सर्वांमध्ये प्रथम क्रमांकावर अशफ़ाकउल्लाह खान वारसी हे आहेत. मी माझ्या अंतिम क्षणी अशफ़ाक विषयी लिहिणे माझे कर्तव्य समजतो.’’
आपल्या चरित्रग्रंथात ते अशफ़ाकउल्लाहबद्दल लिहितात, ‘‘मला आठवते की, सरकारने आम्हाला तुरुंगातून सोडण्याची घोषणा झाल्यानंतर मी शाहजहाँपूरला आलो होतो. तुझ्या हृदयातील देशसेवा करण्याची प्रकांड इच्छा पाहून तुझ्याविषयी माझ्या मनात आदरभाव निर्माण झाला. थोड्याच दिवसात तू मला माझ्या धाकट्या भावासारखा वाटू लागलास.
सर्वांना आश्चर्य वाटत असे की, एका आर्य (ब्राह्मण) आणि एका मुसलमानामध्ये सूत्र जुळले कसे? तू मुसलमान असल्यामुळे माझे मित्र तुझा तिरस्कार करत होते. परंतु अशफाक, तू सदैव हिंदू आणि मुसलमान ऐक्याचे प्रयत्न आणि समर्थन करत होतास. एक सच्चा मुसलमान आणि खरा देशभक्त होतास.
बऱ्याच मित्रांनी मला सावधानतेचा इशारा दिला, ‘मुसलमानांवर विश्वास ठेवू नकोस, ते धोका देतील.’ परंतु अशफाक, तू जिंकलास. आता तुझ्या आणि माझ्यामध्ये कसलाही भेदभाव राहिला नाही.
ब्रिटिशांकडून अटक झाल्यानंतर सुद्धा तू न डगमगता आपल्या सिद्धान्ताशी, आपल्या विचारांशी एकनिष्ठ राहिलास. तुला न्यायालयाने माझे कट्टर समर्थक आणि सहकारी म्हणून सिद्ध केले आणि तुझ्या गळ्यात विजयी माळ घालण्यात आली. माझ्याबरोबर राहून तू जे कार्य, कर्तबगारी केलीस त्याची कितीही स्तुती केली तरी ती कमीच आहे. तुझे विचार, तुझ्या भावना उच्च आणि विशाल होत्या.’’
जाता जाता :
लेखक सोलापूरस्थित इतिहासाचे अभ्यासक आहेत.