मौलाना आजाद यांनी भारतरत्न का नाकारला?

मौलाना आजाद भारतातील हिंदु-मुस्लीम एकतेच्या प्रयत्नांसाठी ओळखले जातात. भारताचा सर्वोच्च सन्मान ‘भारतरत्न’ नाकारणारा हा अवलिया आज अनेकांच्या (काँग्रेसच्याही) विस्मृतीत गेला आहे. लाख विरोध करूनही देशाची फाळणी रोखू शकलो नाही याची खंत घेऊन उरलेला वेळ त्यांनी काढला.

फाळणीनंतरही हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रयत्न त्यांनी कायम ठेवले. स्वातंत्र्यानंतर काही भागात दंगली सुरू झाल्या, त्यामुळे मौलाना आजाद खूप व्यथित झाले. प्रयत्न करुनही दंगली रोखत नव्हत्या, त्यावेळी त्यांनी मुस्लिमांना उद्देशून प्रबोधन केले. पण हिंदूचे प्रबोधन करायला महात्मा गांधीच्या सर्व शक्ती कमी पडली. अखेर त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला. पण मौलाना आजाद असह्य वेदना झेलत रोष करत राहिले.

भारत-पाक फाळणीबद्दल त्यांनी ‘इंडिया विन्स फ्रीडम’मध्ये या आत्मकथेत सविस्तर लिहिले आहे. या पुस्तकाचे 30 पाने त्यांच्या निधनाच्या 30 वर्षानंतर खुली करण्यात आली. त्यात मौलाना आजादांनी 1930 ते 1950 पर्यंत विविध मुद्द्यावर तत्कालीन राजकीय नेत्याशी झालेले मतभेद नोंदवले आहेत. या पानात त्यांनी भारत-पाक फाळणीला कोण-कोण जबाबदार होते, याची सविस्तर चर्चा केली आहे.

वाचा : बादशाह खान होते अखंड भारतासाठी झटणारे योद्धे

वाचा : यूसुफ मेहेरअली ‘चले जाव’ घोषणेचे जनक

मौलाना आजादांनी भारताच्या फाळणीला थेटपणे नेहरू व पटेलांना जबाबदार ठरवले आहे. ‘इंडिया वीन्स फ्रीडम’च्या या 30 पानाशिवाय खरे मौलाना आजाद उलगडू शकत नाही, असे असगरअली इंजिनिअर म्हणतात. धर्माच्या आधारावर दोन राष्ट्राची मागणीची उत्पत्ती आणि त्याची कारणे समजून घेण्यासाठी ही 30 पाने खूप महत्त्वाची आहेत.

भारत-पाक फाळणीची वेदना मौलाना आजादांच्या मनावर खोलवर जखमा करून गेल्या. केवळ याच एक कारणामुळे त्यांनी भारताचा सर्वोच्च सन्मान ‘भारतरत्न’ नाकारला असे मानले जाते. आजादांचे अनेक चरित्रकार मौलानांच्या या भूमिकेशी सहमती दर्शवतात.

मौलाना आजाद यांच्या भारतरत्न नाकारण्याबद्दल अजून एक मतप्रवाह आहे. हा पुरस्कार नाकारण्याचे एक वेगळे कारण आजादांचे नातू (भावाचे नातू) व ज्येष्ठ पत्रकार फिरोज बख्त अहमद देतात.

ते म्हणतात, ‘‘पंडित नेहरूंनी 1956 साली ज्यावेळी स्वत: नेहरूंना भारतरत्न पुरस्कार मिळाला होता त्यावेळी त्यांनी मौलानांसमोर प्रस्ताव ठेवला की, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी तुमचे योगदान मोठे राहिलेले आहे, हिंदू-मुस्लीम ऐक्यासाठी तुमचे प्रयत्न लाखमोलाचे आहेत, शैक्षाणिक नीती ठरविण्याच्या तुमच्या बहूमूल्य योगदानाबद्दल तुम्हाला ‘भारतरत्न सन्मान’ देण्याची इच्छा आहे तुम्ही तो स्वीकारावा.’’

यावर मौलाना आजाद म्हणाले,  ‘‘पंडितजी हा सन्मान मी यासाठी स्वीकारणार नाही की, मी त्या कमिटीचा सदस्य आहे जी इतरांना हा पुरस्कार देते. मग मी तो स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही, दुसरे म्हणजे आपण सर्वजण मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तींनी या पुरस्कारापासून स्वत:ला वेगळे ठेवावे तरच या पुरस्काराचे मूल्य व आदर कायम राहील, नसता आपणच सर्वजण स्वत:लाच हा पुरस्कार देऊ करतील, त्यामुळे मी असे म्हणतो की तुम्हीही तो पुरस्कार स्वीकारू नये’ (राज्यसभा टीव्ही, 18 नोव्हेबर 2015)

वाचा : बिस्मिल आणि अशफाकउल्लाह उत्कट मैत्रीचे प्रतिक

वाचा : नेताजी, नेहरू आणि ब्रिटिशविरोधी लढा

32 वर्षानंतर 1992 साली मौलाना आजादांना ‘भारतरत्न’ सन्मान पोस्टाद्वारे पाठवण्यात आला. विषेश म्हणजे काँग्रेसशी जोडून घेण्यास मुस्लीम समुदायाला त्यांनी धर्माचरणाचा भाग म्हटले होते, त्याच काँग्रेसने मौलानांना भारतरत्न पुरस्कार पोस्टाने पाठवून त्यांची अवहेलना केली होती. यावर त्यांच्या कुटुंबीयांनी तत्कालीन काँग्रेस सरकारवर नाराजी दर्शवली होती. मौलानांचे नातू फिरोज अहमद बख्त यांनी तो पुरस्कार घेण्यास नकार दिला होता.

विषेश म्हणजे त्याच साली तो पुरस्कार आजादांसह जेआरडी टाटा, सत्यजित रॉय, अरुणा असफअली यांनी देण्यात आला होता. इतरांना सन्मानाने दिला पण मौलाना आजादांना मात्र पोस्टाने पाठवण्यात आला. भारतरत्नाचा सन्मान सोहळा हा राष्ट्रपती भवनमध्ये होत असतो. पण ज्या व्यक्तीने स्वातंत्र्यासाठी आपले आई-वडिल व पत्नीची काळजी केली नाही, आपले संपूर्ण आयुष्य भारताच्या स्वातंत्र्यासाठी वेचले त्या व्यक्तींचा सर्वोच्च सन्मान पोस्टाने पाठवून देण्यात आला.

वास्तविक पाहता त्यावेळी मौलाना आजाद यांचे पुतणे नुरुददीन अहमद हयात होते. ते मरणशय्येवर होते. सरकार त्यांना हा सन्मान प्रदान करू शकले असते. त्या सन्मानाचा हक्क त्यांचा होता.

मुळात मौलाना आजाद यांच्यासमोर भारतरत्न काय तर नोबलही फिका पडला असता. कारण आजादांची कीर्ती व ख्याती या पदकापेक्षा कितीतरी पटीने मोठी होती. खरे तर हा पुरस्कार देऊन काँग्रेसने मौलाना आजाद यांचा अवमान केला होता. 2016 साली सावरकर यांना भारतरत्न देण्यासाठी भाजपने हवा केली होती.

‘काँग्रेसने मौलाना आजाद व सरदार पटेल या नेहरूंच्या विरोधकांना भारतरत्न का दिला नव्हता?’ असा प्रश्न करत भाजपचे केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सावरकरांच्या भारतरत्नासाठी मौलानांचा राजकीय प्यादा म्हणून वापर केला होता. कदाचित भाजपला माहीत नसावे की मौलाना आजाद नेहरूंचे चांगले मित्र होते आणि त्यांनी भारतरत्न स्वीकारण्यास ठामपणे नकार दिला होता.

आजचे काँग्रेस व मुस्लीम राजकारण पाहता मौलाना आजादांचे दुर्दैव म्हणावे लागेल की त्यांना एका धर्मापुरते बंदीस्त करण्यात आले आहे. आज काँग्रेसने मौलाना आजाद यांना जयंती व पुण्यतिथीपर्यंत मर्यादित ठेवले आहे. तर मुस्लिमांनी संघटना व शहरातील चौकाच्या नामफलकापुरते बंदीस्त केले आहे.

वाचा : ‘स्वातंत्र्य आंदोलनातील मुसलमान’ बेदखल का झाले?

वाचा : स्वातंत्र्य चळवळीत मुसलमानांचा सहभाग

काँग्रेसच्या ‘मुस्लिम टोकनीझम’ धोरणामुळे आज भारतीय मुस्लीम काँग्रेसपासून दुरावला आहे. आजच्या सांप्रदायिक वातावरणात काँग्रेसची भूमिका पाहता प्रकर्षानं आजादांचे स्मरण होते. मुस्लीम समुदायाने काँग्रेसशी जुळवून घेणे हे धार्मिक कर्तव्य आहे, अशी भूमिका आजादांनी मांडली होती. दुर्दैवाने आज मुस्लीम समुदाय आणि काँग्रेस पक्ष याची तुलना करताना कमालीचा काँग्रेसविरोध सामान्य मुस्लिमांत शिरला आहे.

आज मुस्लिमासंदर्भात काँग्रेसची भूमिका पाहिल्यास काँग्रेस सोडून देण्यावर विचार करावा का, असे सर्वसामान्य मुस्लीम समुदायाला वाटते. काँग्रेसच्या राजकारणात मौलाना आजाद सारखे मुस्लीम नेतृत्व नाही. भाजपच्या असहिष्णू राजकारणामुळे मुस्लिमांना काँग्रेसशिवाय पर्याय नसल्याची मनोवृत्ती काँग्रेसमध्ये वाढली आहे. त्यामुळेच आज काँग्रेसचे मुस्लिमांसह सर्व नेते भाजपच्या मुस्लीमद्वेषी राजकारणावर गप्प आहेत.

असे हेटाळणीचे दिवस पाहण्यासाठी हजारो मुस्लीम स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणांची आहूती दिली होती का? ‘बाय चॉईस’ भारतीयत्व स्वीकारणारे मुस्लीम भाजपच्या द्वेषी राजकारणाचे बळ ठरले आहेत. अशा वेळी मौलाना आजादांनी सांगितलेल्या हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या प्रयोगाचा पुरस्कार इथल्या ‘एथॅनिक’ मुस्लिम सुमदायाला करावा लागणार आहे. अशा वातावरणात प्रेषितांनी सांगितलेला व मौलाना आजादांनी आचरणात आणलेला ‘उम्मतुल वहिदा’ हा सर्वधर्म समभावाचा मार्ग किती महत्त्वाचा आहे हे लक्षात येते.

जाता जाता :

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.