वेद आणि उपनिषदांचा अभ्यासक अल्-बेरुनी

देशात धर्मद्वेशी आणि विखारी प्रचाराला ऊत आलेला असताना हिंदू आणि मुस्लिम संस्कृतीचा संगम घडवू पाहणाऱ्या अल्-बेरुनी या विद्वान संशोधकाचे विशेषत्वाने स्मरण होते. अकराव्या शतकात भारतात आलेल्या या ज्ञानयोग्याचा ‘अल्-बेरुनीज इंडिया’ हा ग्रंथ आपल्याला विवेकबुद्धीची आणि सहिष्णुतेची प्रेरणा देतो.

‘अल्-बेरुनी’ हा अरब प्रवासी अकराव्या शतकात भारतात येऊन गेला होता. त्याचा ‘अल्-बेरुनीज इंडिया’ हा ग्रंथ भारतातील विविध सांस्कृतिक वारशांची महती सांगतो. त्या हा महान ग्रंथ योगायोगाने माझी हाती पडला. (इंग्रजी अनुवाद आणि संपादन एडवर्ड सॅको)

अल्-बेरुनी भारतात इ. स. ९७३ ते १०४८ या काळात आला होता. भारतातील प्रदीर्घ वास्तव्यात त्याने संस्कृत भाषेवर प्रभुत्व तर मिळविलेच पण त्याचबरोबर या भाषेतील प्रचंड ज्ञानभांडार पर्शियन व अरबी भाषेत अनुवादित करून ते आपल्या देशबांधवांपर्यंत पोचविले. हिंदू व मुस्लिम या दोन संस्कृतींना जवळ आणण्याचा तो प्रामाणिक प्रयत्न होता.

‘अल्-बेरुनीज इंडिया’ ग्रंथ वाचताना एकीकडे वरील राजकीय घटना आणि दुसरीकडे दोन भिन्न संस्कृतींचा संगम साधण्याचा अल्-बेरुनीचा प्रयत्न, यातील विरोधाभास मला सतत जाणवत होता.

वाचा : भारताच्या लोकजीवनाविषयी बाबरला होती आस्था

वाचा : मलिक अंबर महाराष्ट्राचे सांस्कृतिक राजकारणाचे प्रतीक

अल्-बेरुनी अनेक वर्षे भारतात विशेषतः उत्तरेत होता. या काळात त्याने प्रवासही खूप केला. पण त्याचा उपरोक्त ग्रंथ हे केवळ प्रवासवर्णन नव्हे. किंबहुना प्रवासवर्णनात्मक पुस्तक लिहिणे हा त्याचा हेतू नव्हताच. तो विद्वान संशोधक होता.

अरबी आणि पर्शियन भाषेवर त्याचे प्रभुत्व तर होतेच. पण भारतात आल्यानंतर त्याने संस्कृत भाषेवरही तसेच कमांड मिळविली. त्या भाषेतील प्रचंड ज्ञानभांडार त्याने साधकाच्या निष्ठेने आत्मसात तर केलेच पण त्याचबरोबर त्याचे पर्शियन व अरबी भाषेत अनुवाद करून त्याच्या समकालीन व भविष्यकालीन अभ्यासकांसाठी साधनसामग्रीच्या रूपाने त्याने एक समृद्ध वारसा मागे ठेवला.

अल्-बेरुनीला अनेक विषयांत रस होता. पण धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान, खगोलशास्त्र, फलज्योतिषशास्त्र हे त्याच्या विशेष अभ्यासाचे विषय होते. तो श्रद्धाशील मुसलमान होता. धार्मिक चालीरिती व कर्मकांडे यांचे तो निष्ठेने पालन करीत असे. पण तो कट्टर सनातनी नव्हता. त्याची श्रद्धा व्यापक आणि उदारमतवादी होती. म्हणूनच त्याच्या मनात दूषित पूर्वग्रह नव्हते किंवा कसलाही अभिनिवेश नव्हता. त्यामुळेच तो समृद्ध भारतीय संस्कृती समजून घेऊ शकला आणि त्याबरोबरच या संस्कृतीचे कालातीत महात्म्य मान्य करू शकला.

अल्-बेरुनी हा गझनीच्या महमूदाचा समकालीन होता. पण त्याचा महमूदाबरोबरचा सूर कधीच जुळला नाही. उलट तो त्याचा कठोर टीकाकार होता. त्याने असे लिहून ठेवले आहे की, ‘महमूदाने भारतीय संस्कृतीचा आणि समृद्धीचा नाश केला. त्याच्या विनाशकारी धोरणामुळे हिंदूंची स्थिती सर्वत्र विखुरल्या गेलेल्या धुळीकणांसारखी झाली आहे.’

वाचा : गुरुविना घडलेले महान संगीतज्ज्ञ अमीर खुसरो

वाचा : प्रेषितांच्या स्मृती जपणारे बिजापूरचे आसार महाल

अल्-बेरुनीच्या अनेक ग्रंथांपैकी भारताविषयीचा, ‘तहकीक-मा-लिल-हिंद’ हा अरबी भाषेतील ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहे. १०३० साली लिहिलेला हा ग्रंथ भारतीय विज्ञान, धर्मपरंपरा, संस्कृती यासंबंधीचा ज्ञानकोश समजला जातो. इस्लामी जगताला हिंदू धर्मपरंपरा, संस्कृती, तत्त्वज्ञान व विज्ञान या विषयांची तपशिलवार माहिती देणे हे त्याच्या या विषयांवरील लेखनाचे विशेष प्रयोजन होते. ‘तहकीक-मा-लिल-हिंद’ या ग्रंथाच्या सुरुवातीस बेरुनीने हिंदू समाजाची वैशिष्ट्ये, त्यांची भाषा, त्यांचे ग्रह-पूर्वग्रह इत्यादींचे तपशिलवार वर्णन करून हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील साम्य आणि फरक दाखवून दिला आहे.

हिंदू धर्मपरंपरांचे विश्लेषण करताना बेरुनीने वेद आणि पुराणांचा विशेष अभ्यास केल्याचे आढळते. एकूण १८ पुराणांपैकी त्याने विष्णु पुराण, वायु पुराण, मत्स्य पुराण, विष्णु धर्मोत्तर पुराण आणि आदित्य पुराण, यांचा विशेषत्वाने अभ्यास केला होता. उपनिषदांतील एकेश्वरवादाची दखल घेत असतानाच भगवद्गीतेतील आत्म्यासंबंधीच्या विवेचनाची विशेष स्तुती केली आहे.

आत्म्याच्या चिरंतनाची संकल्पना त्याला विशेष भावलेली आढळते. याबरोबरच पतंजलीचे योगशास्त्र, सांख्यतत्त्व प्रणालीतील आध्यात्मिक संकल्पना इ. विषयींचे उल्लेखही त्याच्या प्रस्तुत ग्रंथात आढळतात.

अल्-बेरुनी हे एक विलक्षण रसायन होते. ‘अल्-बेरुनीज इंडिया’ या ग्रंथाच्या अनुक्रमणिकेवर ओझरती नजर टाकली तरी त्यावरून त्याच्या बुद्धीचा आवाका आणि त्याची अमर्याद ज्ञानलालसा या दोहोंची कल्पना येऊ शकते. या सहाशेहून अधिक पृष्ठे असलेल्या ग्रंथात एकूण ८० प्रकरणे असून पाच भागात त्यांची विभागणी केली आहे.

यातील प्रत्येक भाग म्हणजे एकेका विषयावरचा स्वतंत्र ग्रंथ आहे. या लेखाच्या मर्यादेत त्यांचा फक्त ओझरता उल्लेख करणेच शक्य आहे. पण त्याहीपेक्षा विद्वेषाने भारलेल्या आजच्या तणावपूर्ण वातावरणात विवेकबुद्धीची आणि सहिष्णुतेची प्रेरणा देण्याचे सामर्थ्य मात्र या ज्ञानयोग्याच्या विचारात निश्चित आहे, याची जाणीव या ग्रंथावरून होते व ते अधिक महत्त्वाचे आहे.

म्हणूनच हिंदू आणि मुस्लिम या दोन संस्कृतींचा संगम साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या या ज्ञानयोग्याचे पुन्हा पुन्हा स्मरण करीत त्याला सलाम करावासा वाटतो. सलाम अल्-बेरुनी! तुला चिरंतन शांती लाभो.

जाता जाता :

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.