बाबरचा पिता उमर शेख मिर्झा हा फरगणाचा सुलतान होता. ८ जून १४९४ रोजी त्याचे निधन झाले. त्यामुळे वयाच्या ११ व्या वर्षी बाबरला राजसुत्रे हाती घ्यावी लागली. बाबरला सत्ता मिळाली, पण चुलत्यांनी आणि नातलगांनी केलेल्या आक्रमणापुढे ती सत्ता टिकली नाही. काही दिवसातच बाबर पदच्युत झाला.
सत्ता गेल्यानंतर त्याच्या नशिबी भटकंती आली. तो निर्वासितांसारखा भटकत राहिला. पित्यानंतर बाबरला कुणी मार्गदर्शक मिळाला नाही. परिस्थितीने पदरात टाकलेला प्रत्येक अनुभव पाठीशी बांधत बाबर प्रगल्भ होत गेला. त्याने अनेक संकटे झेलली.
राजवंशात जन्मलेल्या बाबरने उपासमारही सहन केली. डॉ. एस. एल. नागोरी आपल्या ‘बाबर’ या पुस्तकात लिहितात, स्वकियांनी दगा दिल्यानंतर आल्या परिस्थितीशी तो झगडत राहिला. इसवी १४९७ ते १५०४ पर्यंत त्याने भटकंतीत आयुष्य काढले. त्याचे सर्व सहकारी त्याला सोडून गेले. इसवी सन १५०४ मध्ये त्याच्याजवळ फक्त दोन सैनिक शिल्लक होते. बाबर त्याच्या एका कवितेत म्हणतो,
भाग्याने पदरी बांधलेले कोणती संकटे मी झेलेली नाहीत?
कोणती हानी सहन केली नाही?
या हृदयाने सर्व काही सहन केले.
हाय, असे कोणते संकट आहे जे मी भोगले नाही.
अशा दयनीय अवस्थेतून तो पुन्हा उभा राहिला. इसवी सन १५०४ मध्ये त्याने काबूल ताब्यात घेतले. बाबरचे चरित्रकार लेनपुल यांनी काबूल जिंकण्याआधीची त्याची परिस्थिती वर्णिली आहे, ते म्हणतात, “तो बागेत मृत्युच्या प्रतिक्षेत पडला होता. पण त्याच्या नशीबाने नवे वळण घेतले.”
काबूल जिंकल्यानंतर बाबर इसवी सन १५२४ पर्यंत तेथे राज्य करत राहिला. काबूलचा प्रादेशिक विस्तार अत्यंत कमी होता. त्यामुळे तुटपुंज्या महसुली उत्पन्नात गुजराण करणे अशक्य झाले होते. नवा प्रदेश साम्राज्याला जोडणे गरजेचे होते. त्याचा साम्राज्यविस्ताराचा विचार सुरू होता.
पित्याचे राज्य पुन्हा जिंकण्याचा पर्याय समोर होता. पण याच काळात त्याला राणा संगा आणि दौलतखाँ लोदी यांनी भारतावर हल्ल्यासाठी आमंत्रित केले. त्यानंतर बाबरने इसवी सन १५१९ ते १५२४ पर्यंत भारतावर हल्ल्याचे चार प्रयत्न केले.
या हल्ल्यामध्ये तो काहिसा अपयशी ठरला. मात्र २१ एप्रिल १५२६ रोजी झालेल्या पानिपतच्या युद्धात त्याने इब्राहिम लोदीचा पराभव करुन दिल्लीत आपल्या साम्राज्याची स्थापना केली. असा रितीने बाबर भारतात स्थायिक झाला.
वाचा : भारताच्या लोकजीवनाविषयी बाबरला होती आस्था
वाचा : शेतकऱ्यांकडून अधिक कर वसुलीस बाबरची होती मनाई
शब्दबद्ध केलेला भारत
‘बाबरनामा’ हे बाबरचे आत्मचरित्र. त्याला ‘वाकेआनामा’ किंवा ‘तुज्क इ बाबरी’ असेही म्हणतात. बालपण आणि तारुण्यातील काही वर्षे वगळता बाबरने दररोज घडलेल्या घटनांची माहिती या ग्रंथात दिली आहे.
प्रत्येक घटना प्रामाणिकपणे शब्दबद्ध करण्याचा त्याने प्रयत्न केला आहे. स्वतःच्या अनेक चुका त्याने प्रांजळपणे कबुल केल्या आहेत. स्वतःचा लाजरेपणा, पराभवाच्या वेदना, गाजवलेले शौर्य, भोगलेले दुःख अशा सर्वच नोंदी त्यात आहेत.
बाबर आयुष्यभर भटकत राहिला. तो ज्या प्रदेशात गेला, त्याविषयी त्याने बाबरनाम्यात लिहिले आहे. काही प्रदेशांवर त्याने कविता देखील केल्या आहेत. काबूलवर अधिकार जमवल्यानंतर बाबरने त्यावर एक शेर लिहिला आहे. त्यात बाबर म्हणतो,
गवत आणि फुलांमुळे श्रावणात
काबुल स्वर्गात रुपांतरीत होते.
त्याशिवाय बारान आणि
गुलबहारचा मौसम अद्वितीय आहे. (भाषांतर प्रस्तुत लेखकाचे)
याप्रमाणेच गजनी, खुरासान आणि भारतावर देखील त्याने काही शेर लिहिले आहेत. बाबरनामा हा ग्रंथ हजारो पानांमध्ये विस्तारलेला आहे. त्यामध्ये त्याने भारताविषयी केलेल्या लिखाणावर एक छोटेखानी पुस्तक होईल इतकी त्या लिखाणाची व्याप्ती आहे.
भारतावरचे त्याचे लिखाण कुतुहलाने व्यापलेले आहे. त्याने कुतुहलापोटी भारतातल्या लहान-सहान बाबींची दखल घेतली आहे. नद्यांची माहिती विस्ताराने दिली आहे. एखाद्या प्रदेशाची भौगोलिक वर्णनं नकाशा शब्दबद्ध केल्यासारखी आहेत.
प्रत्येक प्रदेशातील झाडांच्या, फळांच्या प्रजातींपासून प्राणी आणि पक्ष्यांची निरिक्षणे देखील त्याने नोंदवली आहेत. भारतीयांच्या जगण्यातल्या वेगळेपणाची त्याने दखल घेतली आहे. इथली निसंर्गसंपत्ती, जैवविविधता यांचा बाबर इतका अभ्यास मध्ययुगात अपवादानेच कुणी केला असेल.
बाबरनाम्यात ताड, लिंबू, नारळ, आक्रोड, आवळा, चिरोंजी, चिंच, जांभुळ, खिरनी, कमरख, फणस, महुवा, बडहल, बोर अशा पन्नासहून अधिक भारतीय फळांची माहिती दिली आहे. यातील बहुतांश फळांची नावे मध्ययुगीन फारसी भाषेत असल्यामुळे ती कोणती आहेत, याचा अंदाज बांधता येत नाही.
जी फळे बाबरच्या देशातही पिकत होती, त्यांच्या आणि भारतीय जातिच्या फळात कोणता फरक होता, हे सुद्धा त्याने सांगितले आहे. आंब्याविषयी तो म्हणतो, “अंबा भारताचे मोठे वैशिष्ट्य आहे. भारतीय लोक ‘ब’ चा उच्चार अशा प्रकारे करतात जणू त्यापुढे कोणता स्वर नसावा. उदा. ‘अम्ब’ त्यामुळे त्याचे उच्चार योग्य वाटत नाही, म्हणून काही लोक त्याला नगजक म्हणतात.”
ख्वाजा खुसरो (अमीर खुसरो) लिहितात,
नगज के मा नगज कुने बुस्तां
नगज तरीन मेवये हिंन्दुस्तां
माझी सुंदरी, (आंबा) बागेचे सौंदर्य वाढवणारे फळ, हिंदुस्तानातील सर्वोत्तम फळ
वाचा : खुल्ताबादचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा
वाचा : औरंगाबादच्या नामांतरास पर्याय ‘संभाजीनगर’ नव्हे ‘अंबराबाद’!
बाबरने भारतीय समाजाची तिथल्या वैशिष्ट्यांची माहिती देताना अनेक विद्वानांचे संदर्भ दिले आहेत. त्यावरुन भारतीय समाजाच्या अभ्यासाठी त्याने कोणत्या ग्रंथांचा आधार घेतला होता हे स्पष्ट होते. खुसरोंसोबत, अल् बेरुनी, जियाउद्दीन बरनी वगैरेंच्या साहित्याचाही त्याने अभ्यास केला होता.
फळांसोबत फुलांविषयी देखील त्याने विस्ताराने लिहिले आहे. जास्वंदीच्या फुलाचे बारकावे त्याने सांगितले आहेत. गुलाबाच्या फुलाशी तुलना केली आहे. शेतीशी निगडीत वनस्पती आणि जनावरांची माहिती त्याने दिली आहे. त्यासोबतच हत्ती, घोडे, माकड, खारी, मोर आणि पोपटाच्या वेगवेगळ्या प्रजातींचे त्याने जवळून निरिक्षण केले होते.
शेतकऱ्यांचे जगणे, त्यांची जमीन कसण्याची पद्धती याची प्रत्यक्ष माहिती घेतली होती. प्रत्यक्ष माहिती घेउनच तो नवा विषय समजून घ्यायचा. कश्मीरचे वर्णन करताना ‘मी तेथील प्रदेशाची माहिती घेण्यासाठी काही स्थानिकांशी संवाद साधला, पण त्यांनी माहिती दिली नाही.’ म्हणत बाबरने दुःख व्यक्त केले आहे.
एकदा त्याला विहिरीवर पाणी काढण्यासाठी लावलेली रहाट दिसली, तर ती त्याने चालवून पाहिली होती. कित्येक वेळा त्याद्वारे पाणीही काढले. एखादे नवे तंत्र, जगण्यातील वेगळी पद्धत त्याला दिसली की तो त्याची खोलात जाऊन माहिती घ्यायचा. ती बाबरनाम्यात विस्ताराने नोंदवायचा.
संपूर्ण बाबरनाम्यात असेच लिखाण अनेक ठिकाणी आढळून येते. अनेक शहरांची माहिती येते. त्या शहरातील बोलीभाषा व त्यातील शब्द, भाषेचा हेल, लोकांचा पेहराव, स्त्रियांचे जगणे, खानपान, आहारातील बदल यासह अनेकविध विषयांवरचे बारकावे बाबरने टिपले आहेत. बाबरमुळे तत्कालीन भारतीय समाजाचा अभ्यास करण्यास भरपूर मदत होते. बाबर त्या अर्थाने भारतीय उपखंडातल्या वेगवेगळ्या प्रदेशातल्या मानवी जीवनाचा मध्ययुगीन अभ्यासक आहे. खुरासान, गजनी, काबूल मध्ये कैक वर्ष जगलेला बाबर भारतात आला. आणि भारतीय समाजात तो सामावून गेला. पण त्याला भारतीय समाज समजून घेताना बराच त्रासही सहन करावा लागला.
जात जाता :
लेखक डेक्कन क्वेस्ट मराठीचे संपादक असून मध्ययुगीन इतिहासाचे अभ्यासक आहेत. ‘सल्तनत ए खुदादाद’ या टिपू सुलतान वरील वेस्ट सेलर पुस्तकाचे लेखक आहेत. इतिहासावर त्यांची पाच पुस्तके प्रकाशित आहेत.