‘शेख’ आडनावामुळे घडले असेही काही प्रताप !

सात-आठ वर्षांपूर्वीचा प्रसंग, डेक्कन क्वीननं आम्ही दोघं पुण्याला येत होतो. आम्हाला दोघांनाही खिडकी जवळच्या समोरासमोरच्या जागा मिळाल्या होत्या.

बाहेरची दृश्यं पाहण्यात माझं मन गुंतलं होतं. रेल्वे लाइनच्या बाजूनं वाढलेली झोपडपट्टी, सांडपाणी वाहून नेणारी तिथली उघडी गटारं वाऱ्यानं सर्वभर उडणाऱ्या प्लास्टिक पिशव्या, उकिरड्यावरचा ओंगळ, शिसारी आणणारा कचरा… मनात अनेक प्रश्न गर्दी करत होते. माणसाची अगतिकता! गलिच्छ वस्तीत नाइलाजानं राहणारी, जगणारी माणसं, हेच वास्तव स्वीकारून त्यातच समाधान मानत असतील?

त्याच घाणीत खेळणारी, बागडणारी त्यांची उघड़ीनागडी मुलं सारंच दृश्य मन उदास करणारं होतं, उद्विग्नता आणणारं होतं. बाहेर पाहण्यापेक्षा रेल्वेच्या डब्यात आपल्या अवतीभोवतीची माणसं पाहणं, जमल्यास एखाद्याशी संवाद साधणं बरं, असं वाटून मी माझी नजर आत वळवली.

इतक्यात माझ्या कानावर एका छोट्या मुलाचा आवाज आला – ‘मला खिडकीजवळ बसायचंय…’ माझ्या शेजारी बसलेल्या एका तरुण जोडप्याचा तीन-चार वर्षांचा मुलगा हट्ट करत होता, आई त्याला दटावत होती. माझ्या यजमानांचंही त्या मुलाकडे लक्ष गेल, त्यांच्या लक्षात आलं की, त्या मुलाला आम्ही अडवलेल्या एका खिडकीपाशी बसायचं आहे.

त्यांनी आपुलकीनं म्हटलं, “बेटा, इकडे ये. इथे बस.” त्यांनी थोडं सरकून त्याला खिडकीपाशी बसायला जागा दिली. हळूहळू त्या दोघांच्या गप्पा सुरू झाल्या. तो मुलगाही त्यांना ‘आजोबा’ म्हणू लागला. त्यांच्या प्रश्नाला तत्परतेनं उत्तरं देऊ लागला. मी पाहिलं तर तो मधेच त्याच्या मांडीवर बसे, मधेच खिडकीतून बाहेर गंमत बघे. दोघांची छान मट्टी जमली.

माझ्याजवळ त्या मुलाची आई बसली होती. कुठल्यातरी वर्तमानपत्रातलं शब्दकोड ती सोडवत होती. माझं लक्ष साहजिकच त्या शब्दकोड्याकडे गेलं. तिला एखाद्या शब्द अडला की ती थांबायची, विचार करायची. कोड्यातली तेवढी जागा रिकामी ठेवायची. दुसऱ्या शब्दाचा विचार करायची. ती एखाद्या शब्दावर अडली आहे हे ध्यानात आलं, की मी तिला शब्द सुचवायची.

असे चार-पाच शब्द मी तिला सांगितले. ती अगदी खूष झाली. तिला माझ्याविषयी आपुलकी वाटू लागली हे तिच्या माझ्याशी चाललेल्या गप्पांवरून माझ्या ध्यानात आलं. आपण कोण, कुठले, आपण पुण्याला का जात आहोत, आपला मुलगा किती हुशार आहे, तो कसे कसे प्रश्न विचारतो, असं बरंच काही ती मला मोकळेपणाने सांगत होती. मी सारं काही कौतुकानं ऐकत होते. माझीही छान करमणूक होत होती. आमच्या दोघींच्या गप्पाही चांगल्या रंगल्या. तास-दीड तास कसा गेला हे कळलंसुद्धा नाही.

गप्पा चालू असताना एकदम तिनं विचारलं, ‘तुमचं आडनाव काय?’ मी आडनाव सांगितलं आणि काय आश्चर्य! एकदम चित्र पालटलं – नाटकात Transfer Scene व्हावा तसं! बाईनं झटकन तोंड फिरवलं. इतका वेळ ती मला चिकटून बसली होती, ती थोडं अंतर ठेवून बसली. पलीकडच्या खिडकीतून ती बाहेर पाहू लागली. बोलणं एकदम थांबलं.

इतका वेळ माझ्याशी मनमोकळ्या गप्पा मारणारी ती बाई! माझा व तिचा काहीच संबंध नसल्यासारखं तिच्या वागण्यातून मला जाणवलं. खिडकीपाशी बसलेल्या मुलाला ती आपल्याकडे येण्यासाठी सांगू लागली. “पुरे झालं तुझं खिडकीजवळ बसणं. इकडे ये.” असं थोडं रागावल्यासारखं करून त्याला आपल्याजवळ बसण्याची तिनं खूण केली. तो ऐकेना तशी झटकन उठून तिनं त्याला अक्षरशः ओरबाडल्यासारखं उचललं आणि आपल्या मांडीवर बसवून “तुला किनई एक गंमत सांगते…” असं म्हणून त्याचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला.

वाचा : प्रा. यास्मिन शेख : सदाप्रसन्न वैयायोगिनी

वाचा : शासनाच्या मराठी मंडळावर मुस्लिम का नाहीत?

वाचा : साहित्य-संस्कृती व्यवहारातील पालखीवाहू ‘मुस्लिम’

‘शेख’ या आडनावाची ही किमया!

मघाशी रेल्वेलाइनच्या कडेनं पाहिलेलं मन उद्विग्न करणारं बाहेरचं जग आणि आता गाडीच्या डब्यात अनुभवलेली, मन विषण्ण करणारी, पूर्वग्रहदूषित मानसिकता! या दोहोंत अधिक दुःखदायक काय होतं?

अशा प्रकारचे बरेच अनुभव मला आले. मलाच नव्हे, अनेकांना आले. माझ्या परिचयातील एका प्राध्यापकानं सांगितलेला किस्सा ऐकल्यावर काय प्रतिक्रिया व्यक्त करावी हेच मला कळेना. त्यांच्या ओळखीच्या एका सद्गृहस्थानं त्यांची एका अपरिचित व्यक्तीशी ओळख करून देताना म्हटलं, “हे अमुक अमुक प्रोफेसर, मुस्लिम असले तरी सभ्य आहेत बरं का!” आणि असं म्हणताना आपण त्या प्राध्यापकाचा किती अपमान करत आहोत याची जाणीवही त्या सद्गृहस्थाला झाली नाही!

मला आलेले काही मजेदार अनुभव इथं सांगावेसे वाटतात. एखाद्या अपरिचित व्यक्तीशी बोलत असताना माझं आडनाव कळल्यावर अनेकांनी कौतुकाने उद्गार काढले आहेत, “अरे वा! तुम्ही मुसलमान असून किती सुंदर मराठी बोलता हो।”

‘मुसलमानांनी चांगलं मराठी बोलू नये की काय!’ माझ्या मनात येई. खरं म्हणजे, सुंदर वगैरे काही नाही. महाराष्ट्रीय (पुणेरी) मनुष्य जसं बोलतो, तसं मराठी मी बोलते. त्यात कौतुक कसलं? मी उत्तर देई, “त्यात एवढं आश्चर्य काय आहे! मी महाराष्ट्रीय आहे.” त्यावर कित्येक जणांच्या भाबड्या प्रतिक्रिया अशा – “तुम्ही मुस्लिम आहात ना? मग महाराष्ट्रीय कशा?”

माझं उत्तर असं “अहो, मी महाराष्ट्रात जन्मले, वाढले. मराठी माध्यमाच्या शाळेत शिकले. मराठी घेऊन बी.ए., एम.ए. केलं. माझी मातृभाषा मराठी आहे.” माझं हे उत्तर ऐकल्यावर काहींच्या चेहऱ्यावर कौतुकमिश्रित आश्चर्य दिसायचं, काहींना माझं म्हणणं थोडंफार पटल्यासारखं वाटायचं, पण बहुतेक जणांच्या मुद्रेवर मी सांगतेय यांच्यातील खरेपणाबद्दल साशंकता उमटलेली स्पष्ट दिसायची.

कॉलेजमध्ये शिकवत असताना काही गमतीदार अनुभव मला आले. त्या वेळेला एफ.वाय.ची मुलं शाळेतून कॉलेजात आलेली असत. पहिल्या दिवशी एफ.वाय. च्या वर्गात मी प्रवेश करणार इतक्यात वर्गापाशी प्राध्यापकांची वाट पाहत उभे असलेले एक दोन विद्यार्थी यायचे, इंग्लिशमध्ये म्हणायचे, “Miss, this is not a French Class.” किंवा “This is not an English class.” त्यांना वाटायचं, ह्या बाई चुकून मराठीच्या वर्गाकडे आल्या आहेत.

कदाचित त्यांना माझं आडनाव कळल्यामुळे ह्या बाई मराठी विषयाच्या असणं शक्य नाही असं त्यांना मनापासून वाटत असावं किंवा कदाचित मराठी शिकवणाऱ्या बाईबद्दल त्यांच्या मनात जी प्रतिमा असेल, त्याहून मी वेगळी दिसत असली पाहिजे! मी हसून म्हणायची, “मला माहीत आहे. हा मराठीचा वर्ग आहे ना?”

मात्र व्याख्यानाला सुरुवात झाली की हळूहळू त्यांचे साशंक चेहरे बदलत जायचे. मला जाणवायचं त्यांच्या प्रतिक्रियांवरून ह्या आपल्यातल्याच विद्यार्थी अगदी सहजपणे माझा स्वीकार करायचे. माझ्या आडनावामुळे माझ्याविषयी काही प्रतिकूल प्रतिक्रिया माझ्या विद्यार्थ्यांनी (एक-दोन अपवाद वगळता) व्यक्त केली असं माझ्या वाट्याला आलं नाही. ते अपवादात्मक अनुभवही सांगितल्याशिवाय राहवत नाही.

१९६५चं युद्ध सुरू झालं त्यावेळची ही हकीकत. स्टाफरूममधून मी तळमजल्यावरच्या माझ्या वर्गावर जात होते. वाटेत कॉरिडॉरमध्ये विद्याथ्यांचा घोळका मला दिसला, माझ्या मराठीच्या वर्गात नसलेले ते विद्यार्थी होते मला पाहताच त्यातील दोन-तीन विद्यार्थी मला ऐकू येईल इतक्या मोठ्याने “पाकिस्तानी पाकिस्तानी!” मी चमकले. थबकले.

त्यांच्याजवळ जाऊन मी विचारलं, “तुम्ही कोणाला पाकिस्तानी म्हणताहात? सगळे गप्प. ते एकमेकांकडे पाहू लागले, जी मुलं पाकिस्तानी म्हणून कुजबुजली होती. तीही बोलेनात. मी थोडा वेळ थांबले, तरीही मूलं काही बोलेनात मी त्यांना म्हटलं, “हे बघा मी पाकिस्तानी नाही, तुम्ही जितके भारतीय आहात, तितकीच मी भारतीय आहे, समजलं?”

वाचा : नवीन लेखकांसाठी पुस्तके प्रकाशित करण्याची सोपी प्रक्रिया

वाचा : मराठी ज्ञान, रोजगाराची आणि अभिजात होण्याची त्रिसूत्री!

वाचा : मुस्लिमांच्या माणुसकीची मोडतोड सांगणारा ‘वर्तमानाचा वतनदार’

‘शेख’ आडनावाचा असाही एक प्रताप

दुसरा एक अनुभव – माझी कन्या रुकसाना नि अकरावी नंतर माझ्याच कॉलेजात आर्ट्सला प्रवेश घेतला होता. त्या वर्गावरचा माझा पहिलाच तास होता. ‘शेख मॅडम आपल्याला मराठी शिकवायला येणार हे विद्यार्थ्यांना कळलं होतं. माझी मुलगी ज्या बाकावर बसली होती, त्याच बाकावर एक मुलगी बसली होती. दोघींची ओळख नव्हती.

ती माझ्या मुलीला म्हणाली, “बाप रे! ही कोण मुसलमान बाई आपल्याला मराठी शिकवणार आहे! वैताग!!” यावर रुकसाना काहीच बोलली नाही. मात्र तिला वाईट वाटलं. तिचा चेहरा पडला पण ते त्या मुलीच्या लक्षातही आलं नाही. ‘ती मुसलमान बाई माझी आई आहे’ असं जर माझ्या मुलीने तिला सांगितलं असतं तर काय झालं असतं, कुणास ठाऊक! (हे सारं माझ्या मुलीनं घरी आल्यावर सांगितलं.)

माझ व्याख्यान त्या मुलीला आवडलं असावं. तसं तिनं रुकसानाजवळ बोलूनही दाखवलं, तरीही माझ्या मुलीनं, त्या बाई माझ्या आई आहेत’ असं तिला सांगितलं नाही, तसं तिला सांगावसं तिला वाटलं नाही, हेच खरं. मीही माझ्या वर्तनातून बोलण्यातून मला तिचं मत कळलं आहे असं सूचितही केलं नाही. तिला केव्हातरी आमचं नातं कळलं असणार. पण तिनं कधी बोलून दाखवलं नाही.

त्या वर्षाच्या शेवटी एक दिवस ती स्टाफरूममध्ये माझ्याकडे आली. पुढच्या वर्षाला ती दुसऱ्या गावाला जाणार होती आणि तिथल्या कॉलेजात ती नाव नोंदवणार होती. माझ्याकडे पाहून तो गोड हसली, म्हणाली, “बाई, मला तुमचा ऑटोग्राफ हवाय. मला आवडणाऱ्या सर्व प्रोफसरांचे मी ऑटोग्राफ घेणार आहे.”

मी नुसतीच सही करणार होते, हे तिच्या लक्षात आलं. ती झटकन म्हणाली, “बाई नुसती सही करू नका, संदेश द्या.” माझ्या कन्येनं मला तिचे पहिल्या दिवशी काढलेले माझ्याविषयीचे उद्गार सांगितले होते, त्याची मला आठवण झाली. मला हसू आलं.

तिच्या वहीत मी लिहिलं – “कुणाविषयीही मत बनवताना मन पूर्वग्रहदूषित ठेवू नका. आपल्याला आलेल्या अनुभवावरून आपलं मत निश्चित करा.” खाली सही केली. मी तिच्याकडे पाहिलं. ती किंचित लाजली. पण मी हसत होते. हस्तांदोलनासाठी मी हात पुढे केला. प्रेमानं तिनं माझा हात हातात घेतला. ती प्रसन्न हसली.

माझ्यावर खूप लोभ असलेली, बी.ए.ला मराठी स्पेशल विषय घेतलेली एक विद्यार्थिनी. खूप वर्षांनी मला भेटली. ती सांगत होती तिच्या घराबद्दल. खूप मोठी जमीन होती तिच्या नवऱ्याची. त्यातला बराचसा भाग त्यांनी विकला, वगैरे मी ऐकत होते.

तेवढ्यात ती म्हणाली, “आम्ही खरं म्हणजे हिंदू माणसालाच आमची जमीन विकली होती. पण त्यानं एका मुसलमानाला ती विकली यात आमचा काय दोष? लोक म्हणतात, “अशी कशी तुम्ही मुसलमानाला जमीन विकलीत?’

“आम्ही नाही हो बाई विकली. खरं सांगा, आम्ही कधीतरी मुसलमानाला जमीन विकू का?” हे सारं सांगत असताना तिला मुळीच जाणवलं नाही की आपण असं बोलायला नको, निदान या बाईजवळ तरी. मला राग नाही आला तिचा. पण जातिद्वेष किती रोमारोमांत भिनलाय हे जाणवून दुःख मात्र झालं.

निवृत्त झाल्यावर पुण्याला स्थायिक व्हायचं आम्ही ठरवलं. पुण्यात घर शोधण्याची मोहीम हाती घेतली. पुण्यातील काही प्रतिष्ठित बिल्डर्सना आम्ही भेटलो. आपण बांधत असलेल्या सदनिकांची तत्परतेनं माहिती देणाऱ्या बिल्डर्सनी ‘शेख’ हे आडनाव ऐकताच, ‘आमच्याकडे सध्या एकही फ्लॅट शिल्लक नाही. सॉरी.’ असं म्हणून आमची बोळवण केली.

तुमच्या अधर्मामुळे आम्ही तुम्हाला फ्लॅट देऊ शकत नाही असं उघडपणे त्यांनी सांगितलं नाही, हा त्यांचा सभ्यपणा! अर्थात आम्हाला पुण्यात फ्लॅट मिळाला तो आमच्या बिल्डरच्या उदारमतवादामुळे, हेही इथं सांगायला हवं.

पुण्यात जनगणनेच्या वेळी आलेल्या अनुभवाचं तर हसूच येतं. जनगणना करायला आलेल्या गृहस्थाला आम्ही घरात बसायला सांगितलं. चहा देऊन त्याचं स्वागत केलं. तो म्हणालाही, “अहो, पुष्कळसे लोक घरातही घेत नाहीत. दारातच उभं करतात. उभ्याउभ्याच आम्हाला फॉर्म भरायला लागतो. चहा- पाणी तर सोडाच!”

माहिती सांगत असताना ‘शेख’ हे आडनाव सांगितल्यावर ‘धर्म, मुस्लिम’ असं म्हणून तो त्याच्याजवळच्या फॉर्मवर नोंदणी करू लागला. मी म्हटलं, “थांबा. मी ज्यू आहे. माझी नोंद करताना ‘ज्यू’ हा धर्म लिहा.” त्यानं चमत्कारिक दृष्टीनं माझ्याकडे पाहिलं. “असं कसं? तुम्ही नवरा-बायको आहात ना?”

वाचा : डॉ. दाऊद दळवी : एक व्यासंगी इतिहासकार

वाचा : डॉ. अक्रम पठाण : मुस्लिम मराठी साहित्याचे साक्षेपी अभ्यासक

वाचा : कलीम खान : साहित्यातील आधुनिक कबीर

मी त्याला समजावून सांगितलं, “शेख मुस्लिम आहेत, पण मी ज्यू आहे.” मी धर्मांतर केलं नसल्याचं सांगितल्यावर तो म्हणाला, “या फॉर्ममध्ये ‘ज्यू’ किंवा ‘इस्त्राएल’ धर्माचा उल्लेखच नाही. त्यामुळे त्यासाठी कोड नंबर नाही.” त्यानं असं म्हटल्यावर मी तो फॉर्म पाहिला, त्यात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन इत्यादी धर्माच्या नोंदीपुढे कोड नंबर होते. पण त्यात पारशी, ज्यू (इस्त्राएल) या धर्मांचा अंतर्भावच केलेला नव्हता! (भारतात कमी संख्येने का असेनात, पण ज्यू व पारशी असूनही!)

पुढे तो फॉर्म भरू लागला मातृभाषा, “उर्दू”. त्याला पुन्हा आम्ही दोघांनी अडवलं. “आमची मातृभाषा मराठी आहे.” असं आम्ही दोघांनी त्याला निक्षून सांगितलं. त्याच्या नजरेत अविश्वास ओतप्रोत भरला होता. तो उत्तरला, “असं कसं? तुम्ही मुस्लिम आहात ना? तुमची मातृभाषा उर्दूच आहे.”

आम्ही दोघांनी पुन्हा एकदा त्याला समजावण्याचा प्रयत्न केला की, “आम्ही महाराष्ट्रीय आहोत. आमची मातृभाषा ‘मराठी’ आहे.” यावर त्याने काय उत्तर द्यावं? “मी जर मातृभाषा मराठी असे लिहिले तर आमचे साहेब माझ्यावर रागावतील.” मी त्याला ठामपणे सांगितलं, “तुमचे साहेब रागावण्याचा इथे प्रश्नच नाही. आणि ते रागावले तर रागावले. आम्ही जी माहिती सांगतो आहोत, ती खरी आहे, आणि तुम्हाला या फॉर्मवर आमची मातृभाषा ‘मराठी’च नोंदवायला हवी.”

आमच्या घराबाहेर पडल्यावर त्या गृहस्थानं ‘साहेबा’च्या भीतीने काही बदल केला किंवा काय हे कळलं नाही. उर्दू भाषा आपल्याला काही प्रमाणात समजते. उर्दू भाषकांशी आपण संवाद साधू शकतो तो हिंदीच्या द्वारा, पण महाराष्ट्रात जन्मलेल्या, तेथेच सगळी हयात काढलेल्या मराठीतच व्यवहार करणाऱ्या आम्हा दोघांची मातृभाषा उर्दू कशी? महाराष्ट्रातल्या मुस्लिमानं  “मी महाराष्ट्रीय आहे, मराठी माझी मातृभाषा आहे’ असं मानलं तर त्याला विरोध का व्हावा?

आम्ही लग्न केलं नोंदणी पद्धतीनं धर्मांतर करण्याचा प्रश्नच नव्हता. माझ्या सासरच्या लोकांनीही आग्रह धरला नाही. लग्नापूर्वी आम्ही नाशिकला होतो. लग्नानंतरही आम्ही नाशिकला होतो. तिथे कधीही धर्मभेदामुळे आमच्या वाट्याला उद्वेगजनक अनुभव आले नाहीत.

त्या काळी सामान्य समाजाच्या मनात जातीय तेढ आजच्या इतकी तीव्र नव्हती. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन इत्यादी एकमेकांच्या धर्मभावना जपण्याचे प्रयत्न करत. ‘परधर्मसहिष्णुता’ हा शब्द लोकांना त्या काळी माहीतही नव्हता, पण त्याच्या कृतीतून परधर्मसहिष्णुता व्यक्त होत असे. आजच्याप्रमाणे जातीयवादाला राजकीय गोटातून खतपाणी घातलं जात नव्हतं.

मला आठवतं, नाशिकच्या माझ्या एका हिंदू मैत्रिणीची आजी सांगायची, “मोहरमच्या दिवशी आमच्या मुसलमान शेजाऱ्यांप्रमाणे आम्ही ‘खिचडा’ करायचो. फरक एवढाच की आमचा खिचडा बिनमटणाचा असायचा.” या तिच्या उद्गारातून त्या काळात समाजात धार्मिक सलोखा कितीतरी अधिक प्रमाणात होता हे लक्षात येतं.

आजही कित्येक जण आमच्याशी वागताना कोणताही दुजाभाव दाखवत नाहीत हे मला सांगायलाच हवं. आमच्या दोन्ही कन्यांचे विवाह हिंदू तरुणांशी झाले आणि पराकोटीचं सामंजस्य त्यांच्या आणि आमच्याही अनुभवाला आलं.

मी कॉलेजात शिकवत असताना माझ्या सहकाऱ्यांकडूनही मोलाचा स्नेह मला लाभला.

आज जेव्हा मी माझ्या मित्रपरिवाराचा विचार करते, तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की त्यात हिंदू स्नेहीच अधिक आहेत. आणि माझ्या स्नेह्यांनी, परिचितांनी जातिद्वेषानं मला नाकारलं, डावललं असं कधीच घडलं नाही. व्यक्तिगत पातळीवर अनुभवायला येणारं सौहार्द सार्वजनिक पातळीवरही जाणवायला हवं असं मला मनापासून वाटतं.

(सौजन्य: अंतर्नाद, ऑगस्ट २००२)

जाता जाता: