पूर्वी लिहिणाऱ्यांना व्यासपीठ नव्हते. वर्तमान पत्रात प्रस्थापित लेखकांनाच फक्त स्थान होतं. नवोदित लेखकांच्या गुणवत्तेची कदर करणारी काही मासिके होती, तिथे एखादी कथा छापून येण्याची शक्यता असायची. वाचकांच्या पत्रामध्ये आपलं पत्र छापून येणे म्हणजे लॉटरीच लागण्यासारखं होतं. हजारो पत्रांमधून दोन चार पत्रे छापली जायची.
कधी रविवारच्या पुरवणीमध्ये आपली एखादी कथा छापून आली तर त्या वर्तमानपत्राचे कात्रण जपून ठेवण्यात भलताच अवर्णनीय आनंद होता. पण नवीन लिहिणाऱ्या धडपड्यांना जागा नव्हतीच. दहा-बारा वर्षापूर्वी फेसबूक आलं. नवोदित लिहित्या वर्गाला एक नवीन व्यासपीठ मिळालं.
लिहून फेसबूकवर पोस्ट करायचं. आवडेल तो वाचेल, प्रतिक्रिया देईल. दर्जेदार सकस लेखनाच्या शोधात रसिक वाचक असतातच. अशातूनच लेखक भेटत राहिले, त्यांचा एक हक्काचा वाचकवर्ग निर्माण झाला. यातूनच नवीन लिहणारे घडत गेले.
पण पुस्तक छापून आल्याशिवाय लेखक म्हणून मान्यता मिळत नाही. पूर्वी लिहिलेलं छापणारं कुणी नव्हतं म्हणून अनेकांच्या कथा कादंबर्या वहीत, डायरीत बंदिस्त होऊन पडल्या होत्या. आत्तासुद्धा अनेक सकस, दर्जेदार लिहिणारे नवोदित लेखक, कुणीतरी प्रकाशक आपलं पुस्तक छापेल या आशेवर आपल्या कथा कादंबर्या फेसबूकवर पोस्टत असतात. पण नवोदित लेखकाचं कोण छापणार? अगदी ओळखीचा प्रकाशक जरी असला तरी तो पदरमोड करुन एखाद्या नवख्याचे पुस्तक का छापेल?
नोकरदार, पगारदारांचं एक बरं असतं. रिटायर्ड झाल्यावर खूप पैसे मिळतात. पैसे मिळाल्यावर लाखभर रुपये खर्च करुन ते स्वतःचं पुस्तक छापू शकतात. पण बाकिच्यांचं काय? त्यांनी पुस्तक प्रकाशित करण्याचं स्वप्नच बघायचं नाही का? बरं पुस्तक छापूनच नाही आलं तर ते वाचकांच्या हातात पडणार कसं ? त्याची समीक्षा कोण करणार ? सकस निकस कसं ठरवणार ?
वाचा : मराठी ज्ञान, रोजगाराची आणि अभिजात होण्याची त्रिसूत्री!
वाचा : ‘औरंगाबाद समाचार’ : निजाम राजवटीतले उर्दू-मराठी द्वि-भाषी वृत्तपत्र
वाचा : मुस्लिमांच्या माणुसकीची मोडतोड सांगणारा ‘वर्तमानाचा वतनदार’
पुस्तक प्रकाशनाच्या दोन पद्धती
एक, ट्रॅडीशनल पब्लिशिंग. यात मराठीत मेहता, राजहंस, मॅजेस्टिक, कॉन्टिनेन्टल यासारख्या मान्यवर प्रकाशन संस्था असतात. त्यांच्याकडे आपलं हस्तलिखित पाठवलं तर ते त्यावरचा निर्णय नंतर आपल्याला कळवतात. यात वर्ष दोन वर्षेसुद्धा जाऊ शकतात. बहुतांशी त्यांचा नकारच येतो.
लेखकाने लिहिलेलं पुस्तक बाजारात विकलं गेलं पाहिजे. विक्रीची शक्यता हा त्यांचा एकमेव निकष असतो. लेखकाकडून काही पैसे घेऊन पुस्तक छापणाऱ्या काही प्रकाशन संस्था आहेत. त्या चाळीस – साठ किंवा साठ- चाळीस असा खर्चाचा वाटा उचलण्यास तयार असतात. पण चाळीस टक्के खर्च तरी लेखकाने कुठून करायचा?
बरं पैसे घालवून लेखकाने खर्च केला तरी रॉयल्टी म्हणून लेखकाला १०० किंवा २०० अशा पुस्तकप्रती दिल्या जातात. पुस्तकांची झालेली विक्री अन देय रॉयल्टी याचं गणित लेखकाच्या डोक्यापलीकडेचं असतं. एखादं पुस्तक छापून झाल्यावर पुन्हा दुसरं पुस्तक छापायचा खर्च करण्याचं धाडस तो लेखक करू शकत नाही. मग त्यापेक्षा फेसबूक परवडलं.
इथं एक किस्सा सांगावासा वाटतो. माझ्या फेसबूकमधील मित्र यादीतील एका लेखक महोदयांनी एका मान्यवर प्रकाशन संस्थेकडे त्यांच्या पुस्तकाची संहिता पाठवली. साधारण ८०० पेजेसचं पुस्तक होत होतं. चाळीस – साठच्या हिशोबाने प्रकाशकांनी त्यांना दहा लाख रुपये जमा करायला सांगितले. ट्रॅडीशनल पब्लिशिंग संस्थेकडून पुस्तक प्रकाशित होण्यासाठी खूप दीर्घ कालावधी लागतो.
सेल्फ पब्लिकेशन
पुस्तकाचं ऑनलाइन पब्लिकेशन करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. त्यांची वेगवेगळी पॅकेजेस असतात. त्याप्रमाणे त्या कंपन्या पैसे घेऊन लेखकाला सुविधा देतात.
काही नवीन कंपन्या अगदी तीन हजारच्या पॅकेजमध्ये आपले पुस्तक तयार करुन देतात. वर लेखकाला पाच किंवा दहा पुस्तकांच्या भेटप्रती देतात. आपले पुस्तक विक्रीसाठी अमेझॉन, फ्लिपकार्ट, गुगल बूक व त्यांच्या स्वतःच्या वेब स्टोअरवर विक्रीसाठी ठेवतात.
लेखकाला तीस टक्के ते सत्तर टक्क्यांपर्यंत रॉयल्टी देतात. शिवाय लेखकाला जर काही पुस्तक प्रती हव्या असतील तर त्या प्रॉडक्शन कॉस्टमध्ये पाठवून देतात. लेखकाने त्या प्रती स्वतः विकल्या तर त्यातूनही लेखकाला पैसे मिळतात. पुस्तक विक्री, रॉयल्टीचा पारदर्शक व्यवहार दर्शवण्यासाठी ते लेखकाला ‘Author’s Dash board’ देतात. त्यावर ‘sales report’ बघता येतो.
पण आता यातही नवीन बोगस कंपन्या आलेल्या आहेत. ते लेखकाला कसलीही रॉयल्टी न देता त्याचे पुस्तक विक्रीसाठी ठेवतात. त्यामुळे Self-Publishing मध्ये रिस्क निर्माण झालेली आहे. ज्या प्रतिष्ठित कंपन्या आहेत त्यांचे पॅकेजेस महाग झालेले आहेत. पण निदान त्यात रिस्क तरी नाही. या पद्धतीने पुस्तक प्रकाशित करण्यासाठी पण काहीतरी खर्च होतोच.
वाचा : प्रा. यास्मिन शेख : सदाप्रसन्न वैयायोगिनी
वाचा : शासनाच्या मराठी मंडळावर मुस्लिम का नाहीत?
वाचा : साहित्य-संस्कृती व्यवहारातील पालखीवाहू ‘मुस्लिम’
ऑनलाईन बाजार
सध्या ई-बुक उपलब्ध करुन देणारी अमेझॉन ही एकमेव मोठी कंपनी आहे. यांच्या वेब साईटवर जाऊन लेखक एक पैसाही खर्च न करता अतिशय सोप्या पद्धतीने ई-बुक तयार करुन पब्लिश करू शकतो. ई-बुक बनवून अमेझॉन वर आणि Google play books वर टाकण्यासाठी काही संस्था पाचशे रुपये पासून ते पाच हजार रुपयांपर्यंत लेखकाकडून घेतात.
जसं एक रुपयाही खर्च न करता अमेझॉन तुमचं ई-बुक तयार करुन देतं ते त्यांच्या साईटवर, वेब स्टोअरवर विक्रीस ठेवतं. विक्री झालेल्या पुस्तकाच्या रकमेतून तीस ते सत्तर टक्के रॉयल्टी लेखकाला देतं अगदी तसाच प्रयोग पेपरबॅक (प्रिंट आवृत्ती) साठी अमेझॉनने सुरू केलाय. त्यांच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचे पेपरबॅक पुस्तक तयार करून प्रकाशित करू शकता. त्यासाठी अमेझॉन तुमच्याकडून एक पैसाही घेत नाही.
आता समजा तुमचं पुस्तक अमेझॉन वर लिस्ट झालंय. एखाद्या ग्राहकाने तुमच्या पुस्तकाची मागणी अमेझॉनकडे केली तर अमेझॉन ते पुस्तक ऑर्डर कन्फर्म झाली की छापायला घेतं. छापून झालं की लगेच ग्राहकाला पाठवून देतं.
रिटर्न पिरियड संपला की त्या पुस्तकाच्या रकमेतून तुम्हाला ठरल्याप्रमाणे रॉयल्टी देतं. अमेझॉनचा हा व्यवहार अतिशय पारदर्शी आहे. पूर्वी ही सुविधा फक्त इंग्रजी भाषेतील पुस्तकासाठीच उपलब्ध होती. आता ती हिंदी भाषेतील पुस्तकासाठी पण सुरू झाली आहे.
एकदा का अमेझॉन मराठी पेपरबॅक छापू लागलं की, मराठी प्रकाशन विश्वात कमालीची खळबळ माजणार आहे. कारण एका पुस्तकासाठी कमीत कमी पन्नास हजार रुपये खर्च करण्याऐवजी लेखक तेच पुस्तक अमेझॉनकडून शून्य खर्चात तयार करून प्रकाशित करणे पसंत करतील.
‘अमेझॉन’ आणि ‘फ्लिपकार्ट’ या दोन कंपन्या पुस्तक विक्रीसाठी फार प्रसिद्ध आहेत. ऑनलाइन मार्केटिंग पण आता सर्व सामान्यांना नवीन राहिलं नाही. पुस्तकाच्या दुकानात जाऊन पुस्तक शोधण्यापेक्षा घरी बसून ऑनलाईन खरेदी करुन पुस्तक घरपोहच मागवणारा एक मोठा ग्राहक वर्ग निर्माण झालाय.
सध्या अमेझॉन मराठी प्रिंट बुक छापत नाही म्हणून हे वादळ काहीकाळ थोपवलं गेलं आहे. पण येत्या काळात अमेझॉन ही सुविधा नक्की सुरू करणार यात शंका नाही.
पण आता ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही, किंवा जे पुस्तक छपाईसाठी खर्च करू शकत नाही, किंवा ज्यांचं पुस्तक मान्यवर प्रकाशन संस्था स्वीकारेल याची सुतराम शक्यता नाही, अशा लेखकाने काय करायचं ? त्यांनी फक्त फेसबूकवरच त्यांचं लिखाण पोस्टत राहायचं का ? त्यांनी लेखक व्हायचे नाही का ?
वाचा : प्रगतिशील कविंच्या उर्दू शायरीतून ‘नेहरू दर्शन’
वाचा : उर्दू इतिहासलेखनात शिवकालीन ग्रंथांचे महत्त्व
वाचा : मुस्लिमविषयक पुस्तकांचा वानवा का आहे?
कोंडी कशी फुटायची
प्रचंड ताकदीचं लेखन करणारा सर्वसामान्य लेखक, त्याने किती दिवस अंधारातच राहायचं ? कसा येणार तो प्रकाशकांच्या नजरेत, कसा नजरेत भरणार तो समीक्षकांच्या नजरेत ? कोण करणार त्याच्या लेखनाविषयी चर्चा, कसे होणार परिसंवाद त्याच्या अप्रकाशित साहित्यावर ?
हे दुखणं फक्त नवोदित लेखकांचंच नाही तर ते लेखक बनू पाहणाऱ्या प्रत्येक धडपड्या लिहित्या हाताचं आहे. बरं यात प्रकाशकांची काहीच चुकी नसते. पुस्तके काढायची अन ती जर नाही विकली तर मग तो भुर्दंड कोण सोसणार ? एक हजाराची आवृत्ती खपायला पाच वर्षे लागत असतील तर कधी त्या पुस्तकाचा खर्च निघणार ?
परंतु आता नवीन टेक्नॉलॉजी आलीय. ‘प्रिंट ऑन डिमांड’ हा ट्रेंड सुरू झाला आहे. मागणी प्रमाणे हवी तेवढीच पुस्तके छापता येतात. आता हजार पुस्तके एकाच वेळी छापायची गरज नाही. आता एका पुस्तकाचा निर्मिती खर्च तेवढाच आणि हजार पुस्तके छापली तरी प्रत्येक पुस्तकाची प्रॉडक्शन तेवढीच राहते. अशा पद्धतीने जेवढी ऑर्डर तेवढी पुस्तक छापाई करणे शक्य होते. परंतु पारंपरिक प्रकाशक अजूनही जुनी वाट सोडायला तयार नाहीत.
सामान्य लेखकाला मार्ग काय?
गरीब लेखक विनाखर्चाचं मराठी पुस्तक छापूच शकत नाही का ? तर याचं उत्तर आहे, होय! तो विनाखर्च मराठी प्रिंट बूक छापू शकतो. त्यासाठी त्याला अगदी एक रुपयाही खर्च करावा लागत नाही. प्रकाशक विनाखर्चात त्याचं पुस्तक तयार करून ते अमेझॉन, फ्लिपकार्टवर विक्रीसाठी ठेवू शकतो.
विक्री झालेल्या पुस्तकाच्या रकमेमधून तो लेखकाला ठरल्याप्रमाणे रॉयल्टीही देऊ शकतो. यात कसलीही रिस्क नाही. फसवणुकीची शक्यता नाही. सगळा व्यवहार एकदम चोख आणि पारदर्शी आहे.
आता विनाखर्च पुस्तक कसं छापायचं, ते कसं प्रकाशित करायचं ते जाणून घेऊ. ‘Notion Press’ या नावाची एक अंतरराष्ट्रीय पुस्तक प्रकाशन कंपनी आहे. आतापर्यंत तीस हजार पेक्षा जास्त लेखकांनी या कंपनीकडून पुस्तके छापून घेतली आहेत.
या कंपनीने पन्नास कोटी रुपये पेक्षा जास्त रकमेची पुस्तके आतापर्यंत विक्री केली आहेत. जगभरातील अनेक भाषांमधून ही कंपनी पुस्तके छापत असते. इथे प्रत्येक अर्ध्या तासाला एक पुस्तक प्रकाशित होत असतं. पुस्तक तयार होण्याचा कालावधी अर्ध्या तासापासून ते दोन दिवसांपर्यंत असतो. जास्तीत जास्त सात दिवस पुस्तक तयार व्हायला लागतात.
यांची पुस्तक तयार करायची पद्धत अगदी सोपी आहे. यांच्या वेबसाईटवर जायचं. रजिस्ट्रेशन करायचं (यासाठी कसलेही शुल्क नाही). त्यानंतर ‘Publish new book’ हा पर्याय निवडायचा. यात पुस्तकाचे नाव, लेखकाचे नाव, भाषा, प्रकार, साईज, कागद, कव्हर कागद, लॅमिनेशन प्रकार, सॉफ्ट कव्हर की हार्ड बाऊंड सगळी माहिती भरायची.
वाचा : शायर ए आजम ‘साहिर लुधियानवी’ स्त्रियांसाठी मसिहा
वाचा : समाजाची भाषा का आणि कशी बिघडते?
वाचा : ग़ज़ल समर्पणाची भावना आणि फुलांचा दरवळ
स्वत: करा डिझाईन
आता तुम्हाला पुस्तक कव्हर कसे बनवायचे याचे ज्ञान नाही. तुम्ही पैसे खर्च करुन व्यावसायिक तज्ज्ञ व्यक्तीकडून कव्हर बनवून घेऊ शकत नसाल तर तर त्यासाठी या कंपनीकडे कव्हर डिझाईनचे टूल आहे. त्यात जाऊन अनेक टेंपलेट्समधील हवे ते टेंप्लेट निवडून अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही हवे तसे कव्हर तयार करू शकता. त्यावर शीर्षक, लेखकाचे नाव, मलपृष्ठावरची माहिती टाईप करू शकता.
पुस्तकाचे कव्हर डिझाईन फायनल करेपर्यंत तुम्ही त्याचा ‘Preview’ बघू शकता त्यात हव्या तेवढ्या सुधारणा करू शकता.
एकदा कव्हर डिझाईन फायनल झाले की मग पुस्तकाचे इन्टेरिअर डिझाईन टूलच्या माध्यमातून तयार टेंप्लेट निवडून त्यामध्ये आपले वर्ड फाईलमध्ये सेव्ह करून ठेवलेले लेखन कॉपी पेस्ट करून हवे तसे इन्टेरिअर डिझाईन करुन तुम्ही पुस्तक बनवू शकता.
अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हास कोणतेही तांत्रिक ज्ञान नसताना तुमची कंटेन्ट फाईल तयार असेल तर फक्त अर्ध्या तासात तुमचे पुस्तक प्रकाशनासाठी तयार होते. काही चूका राहिल्या असतील तर सॉफ्टवेअर ते सुधारून देतं. पुस्तकाची किंमत तुम्ही ठरवायची. त्याप्रमाणात तुम्हाला किती रॉयल्टी मिळेल हे कॅल्क्युलेटर दाखवतो.
पुस्तक पब्लिशसाठी सबमिट केल्यानंतर दोन दिवसात आयएसबीएन, बारकोड सह तुमचे पुस्तक प्रकाशित होते.
‘Notion Press’च्या वेब स्टोअरवरुन तुमचे पुस्तक विकले तर तुम्हाला, ७० टक्के रॉयल्टी मिळते. अमेझॉन आणि फ्लिपकार्ट वरुन विकले गेले तर ३० टक्के रॉयल्टी मिळते.
इथे दिडशे पानाच्या 6×9 साईजच्या पुस्तकाची प्रॉडक्शन कॉस्ट फक्त ७० रुपये होते. तर ते पुस्तक लेखकाला सवलतीच्या दरात विना शिपिंग चार्जसह घरपोहच फक्त १२० रुपयाला मिळते.
त्या पुस्तकाची छापील किंमत तुम्ही जरी २०० रुपये ठेवली तरी लेखक ते पुस्तक सवलतीत अगदी १५० रुपयाला म्हणले तरी इतरांना विकू शकतो.
ज्या ग्राहकाने पुस्तक ऑर्डर केले आहे त्या ग्राहकाला पुस्तक हातात पडेपर्यंत दम निघत नसेल तर त्यासाठी नोशन प्रेस त्या पुस्तकाची डिजिटल कॉपी अनलॉक करून देतं. असं डिजिटल बुक मोबाईल वर, लॅपटॉपवर, कंप्युटरवर वाचता येतं.
तुम्हाला यांचे टेंप्लेटस वापरुन पुस्तक तयार करायचे नसेल तर तर तुम्ही स्वतः तयार केलेले किंवा एक्स्पर्टकडून तयार करुन घेतलेली Print ready PDF फाईल तुम्ही अपलोड करु शकता.
वाचा : ‘रेनेसां स्टेट’ लिहिणारे गिरीश कुबेर म्हणजे पुरंदरेंचा इंग्लिश अवतार
वाचा : विज्ञानयुग आणि विज्ञानसाहित्य
वाचा : कथा मुस्लिम आरक्षणाच्या विश्वासघाताची!
नोशन प्रेसला करा व्हिजिट
तुम्हाला मायक्रोसॉफ्ट वर्ड वापरता येत असेल तर त्यावरही तुम्ही पुस्तक इन्टेरिअर डिझायनिंग करुन त्याची पीडीएफ फाईल अपलोड करू शकता. किंवा पुस्तक अगदीच देखणं बनवायचं असेल तर Adobeचं InDesign हे सॉफ्टवेअर वापरुन हवं तसं पुस्तक कव्हर सह अचूक डिझाईन करू शकता किंवा एखाद्या प्रोफेशनल कडून तयार करून त्याची पीडीएफ अपलोड करु शकता.
किंवा तुम्हाला पुस्तक बनवायची कसलीच झंजट नको असेल तर त्यासाठीही पर्याय आहे पण तो खर्चिक आहे. तुम्ही पैसे भरुनही Notion Pressच्या एक्स्पर्टकडून हवे तसे पुस्तक बनवून घेऊ शकता.
नोशन प्रेसच्या वेबसाईटवरुन पुस्तक तयार करणे व ते प्रकाशित करणे अतिशय सोपे आहे. त्याचे हजारो व्हीडिओ यूट्यूबवर उपलब्ध आहेत. ‘गुगल बाबा’कडे भरपूर माहिती आहे.
पण… पण… पण…..
मोफत जेवण मिळत असेल पदार्थाच्या चवीबद्दल तक्रार करता येत नाही. नोशन प्रेसची मराठी पुस्तकासाठीची सुविधा ‘Beta version’ मोड मध्ये आहे. त्यामुळे पुस्तकातील अक्षराचा फॉन्ट निवडायचा पर्याय इथे नाही. इथे मराठीसाठी फक्त एकच Magal हा युनिकोड फॉन्ट डिफॉल्टमध्ये उपलब्ध आहे.
त्यामुळे तुमचे पुस्तक फक्त Mangal फॉन्टमध्येच प्रिंट होईल. हा फॉन्ट जरा कमी आकर्षक आहे. काही दिवसांनी Arial Unicode Ms Marathi हा व इतर आकर्षक युनिकोड फॉन्ट्स उपलब्ध होतील. पण तोपर्यंत तुम्हाला Mangal फॉन्टवरच कॉंप्रमाईज करावे लागेल. तेवढं तुम्हाला करता आलं तर तुम्हाला लेखक म्हणून कुणीही रोखू शकत नाही.
तुमचं प्रकाशित झालेलं छापील पुस्तक जगातल्या कोणत्याही प्रांतातला नागरिक ते ऑनलाईन खरेदी करू शकतो. त्याची जमा झालेली रॉयल्टी रक्कम तात्काळ तुमच्या Author’s dashboard वर दिसू लागते. तेव्हा, मग वाट कसली बघताय !
जाता जाता :
- सार्वजनिक मालमत्ता विक्रीचे गणित काय आहे?
- ‘ऑक्सफॅम अहवाल २०२१’ म्हणजे विषमतेचा विषाणू
- करोना महामारीचे सांप्रदायिकीकरण
लेखक ज्येष्ठ साहित्यिक असून त्यांची गूढ कथालेखक आणि कादंबरीकार म्हणून ते ख्यातकीर्त आहेत.