मुस्लिमविषयक पुस्तकांचा वानवा का आहे?

गेल्या दहा वर्षांपासून मुस्लिम विषयाचा अभ्यास करतोय. पण संदर्भ ग्रंथांच्या कमतरतेमुळे अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. गेल्या काही वर्षांत दिल्ली, वाराणसी, पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूरच्या अनेक पुस्तकालयात वारंवार गेलो आहे. बऱ्यात शोधानंतर एखादंच पुस्तक हाती लागतं.

अनेकवेळा दुकानदारांशी बोललो, सर्वांची तक्रार एकच की, अलीकडे प्रकाशक अशी पुस्तके छापत नाहीयेत. मुस्लिम विषयांना वाचक मिळत नाहीत, अशी दुकानदार व प्रकाशकांची नेहमीचीच तक्रार आहे. पण माझं निरिक्षण यापेक्षा फार वेगळं आहे.

२००१ नंतर मुस्लिम आणि इस्लामविषयक पुस्तकांची मागणी झपाट्याने वाढली. आजही ऑनलाईन खरेदीत ‘इस्लाम’ विषय बेस्ट सेलरमध्ये आहे. वर्ल्ड ट्रेंड सेंटर हल्ल्यानंतर जगभरात ‘इस्लाम फोबिया’चा नियोजनबद्ध पद्धतीने प्रसार करण्यात आला. त्या चार-दोन महिन्यात इस्लाम इतका बदनाम झाला की गेल्या कित्येक शतकात झाला नसावा, परिणामी इस्लाम काय भानगड आहे, हे जाणून घ्यायचा कल जगभरात अचानक वाढला. जागतिक स्तरांवर इस्लाम आणि मुस्लिमविषयक पुस्तकांची मागणी झपाट्याने वाढली.

‘पेंग्विन’, ‘ऑक्सफर्ड’ व तत्सम जागतिक प्रकाशकांनी अशा प्रकारच्या पुस्तकातून रग्गड कमाई केली. पेंग्विनने तर खास इस्लामविषयक लेखकच पोसले होते. अशा प्रकारचे लिखाण करणाऱ्या लेखकांना या प्रकाशन संस्थेने बक्कळ मानधन देऊ केलं. यातून रिडर मार्केटची गरज असलेलं बरेच ‘अँटी इस्लाम’ लेखन साहित्य गेल्या १५-२० वर्षांत मेनस्ट्रीममध्ये आलं.

यातला धर्मवर्चस्ववादी अजेंडा व राजकीय वाद बाजूला ठेवला तर मुस्लिमविषयक पुस्तकातून भारी कमाई प्रकाशकांना झाली. जागतिक स्तरावर मागणी वाढल्याने अनेक भाषांमध्ये ही पुस्तके अनुवादित झाली. भारतात हिंदी आणि विविध प्रादेशिक भाषेतही अशी अनुवादित पुस्तके भरमसाठ आली.

उपरोक्त पुस्तके वाचकांची वाढती गरज लक्षात घेऊन व जागतिक इस्लामद्वेष्टा अजेंडा घेऊन लिहिली गेली, अशी अनेक अभ्यासकांनी मांडणी केलेली आहे. महमूद ममदानी यांनी तर ‘गुड मुस्लिम बॅड मुस्लिम’मधून तर अशा प्रकाराच्या एकांगी मांडणीला खोडून काढणारा प्रतिवाद दिला आहे.

ममदानी सारखा एक विचार प्रवाह अलीकडच्या काळात वाढला आहे. पुन्हा संबंधित प्रकाशकांनी जागतिक स्तरांवर मार्केटची गरज ओळखून अशी पुस्तके प्रकाशित करणे सुरू केलं आहे. मूळ पुस्तके बऱ्याच भाषेत अनुवादित झाल्याने तिकडेही प्रतिवादाच्या भाषांतराची परंपरा सुरू झालेली आहे.

वाचा : पॉलिटिकल इस्लामप्रणित समाजपरिवर्तनाचा दस्तऐवज

वाचा : कोकणी मुसलमानांचे पूर्वज ब्राह्मण होते का?

जागतिक लेखकांना मागणी

तीन-एक वर्षांपूर्वी पाकिस्तानचे माजी डिप्लोमॅट हुसैन हक्कानी यांच्या ‘भारत-पाक’ मैत्री डिप्लोमसीवर एका अनुवादित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दिल्लीत पार पडला. या सोहळ्यात हक्कानी यांच्य़ा पुस्तकाची विक्रमी खरेदी झाली. अजूनही अमेझॉन व फ्लिपकार्टवर हे पुस्तक टॉपमध्ये आहे.

या पुस्तकाची फेबमध्ये ऑर्डर केली होती, महिनाभरानंतर पुस्तक माझ्या हाती पडलं. दुसरं उदाहरण म्हणजे इरफान अहमद यांचं, इरफान अहमद हे माझे फेसबुक मित्र आहेत, ते जर्मनीच्या मॅक्स प्लेनक या धार्मिक विविधतेवर काम करणाऱ्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रोफेसर पदावर आहेत. त्याचे ‘रिलीजन एज क्रिटिक’ हे इस्लामी धर्मशास्त्राचे ३०० पानी समीक्षा ग्रंथ दोन वर्षांपूर्वी प्रकाशित झाला.

तब्बल तीन हजार रुपयाच्या या पुस्तकाचे कव्हर पेज फेसबुकवर टाकताच अनेक ऑर्डर इरफान अहमद यांच्याकडे आल्या. ऑक्सफर्ड प्रेसने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाला भारतातून प्रचंड मागणी आहे. त्यांचे अजून एक पुस्तक ऑक्सफर्डकडून प्रकाशित झालं आहे, त्यांनी याबद्दल फेसबुकवर माहिती दिली, पोस्ट अपलोड होताच, पुस्तकासाठी बुकींग सुरू झाली. बुकींग केलेले सर्वजणच खरेदी करतील असं नाही, पण हा प्रतिसाद वाचकांची मुस्लिमविषयक साहित्याची रुची जरूर दर्शवतो.

आज इस्लाम धर्मांवर अनेक पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. हीच बाब साहित्य व शायरीसंदर्भात आहे. पण सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय विषयावरची पुस्तके गायब आहेत. मुस्लिम विषयावर लिखाण करणाऱ्या जुन्या विचारवंताची अनेक पुस्तके आज बाजारात नाहीत. त्यामुळे मुस्लिम विषयक अभ्यासकांची अडचण होते.

मौलाना आजाद, सर सय्यद अहमद खान, जाकिर हुसैन, यूसुफ मेहेरअली, मुहंमद मुजीब, हुमायून कबीर, डॉ. रफीक जकारिया, मोईन शाकिर, असगरअली इंजिनियर यांची दर्जेदार पुस्तके आऊट ऑफ प्रिंट आहेत. ही गरज लक्षात घेऊन हिंदी-इंग्रजीत अशा प्रकारची पुस्तकं पुनर्प्रकाशित होणं गरजेचं आहे. मराठीत ही पुस्तके पुनर्प्रकाशित झाली तर नक्कीच मोठा आर्थिक लाभ प्रकाशकांना होऊ शकतो.

२०१८ साली ‘इंडियन एक्सप्रेस’ने मुस्लिम प्रश्नांवर ‘दी मॉयनॉरिटी स्पेस’ नावाची लेखमाला सुरू केली होती. यात सुमारे १८ ते १९ लेख एक्सप्रेसने प्रकाशित केले होते. या लेख सिरिजमधून बरेच वाचक एक्सप्रेसने मिळवले. अर्थातच एक्सप्रेस समूहाला यातून रग्गड उत्पन्नही प्राप्त झाले असावे. या व्यतिरिक्त विविध ठिकाणी जवळजवळ ५० लेखांमधून या विषयाची चर्चा झाली. या लेखांना संग्रहित करून पुस्तक काढले तर बरेच वाचक व खरेदीदार मिळतील. अशा संकलित पुस्तकातून समकालातील सकस लिखाण वाचकांसाठी उपलब्ध होऊ शकेल.

वरील  उदारहणे प्रातिनिधिक असली तरी मुस्लिमविषयक लिखाण वाचणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राणा अयूब यांच्या ‘गुजरात फाईल्स’चे उदारहण सर्वांसमोर आहे. मूळ इंग्रजीत प्रकाशित झालेलं हे पुस्तक हिंदी, मराठी, संस्कृत, तमिळ, मळयाली भाषेत अनुवादित झालं आहे. प्रकाशनाच्या चार वर्षांनंतरही गुजरात फाईल्सच्या मागणीत कुठलाही फरक पडला नाही.

वाचा : वेद आणि उपनिषदांचा अभ्यासक अल्-बेरुनी

वाचा : गुरुविना घडलेले महान संगीतज्ज्ञ अमीर खुसरो

मराठीत अनुवादाचा विस्तार

एस. एम. मुश्रीफ यांचे ‘हू किल्ड करकरे’ हे पुस्तकदेखील इंग्रजीसह मराठीतही बेस्ट सेलर ठरलं आहे. नुकतीच शब्द पब्लिकेशनने मराठी पुस्तकाची नववी आवृत्ती काढली आहे. फारोस मीडिया या दिल्लीच्या प्रकाशन संस्थेने अनेक मुस्लिम विषयक पुस्तके प्रकाशित केलेली आहे. मागणीमुळेच ते धडाधडा बाजारात पुस्तके आणत आहेत.

अलीकडच्या भाजपच्या मुस्लिमद्वेषी धोरणामुळेदेखील भारतात ‘मुस्लिम विषय’ अभ्यासण्याचा कल वाढला आहे. प्रागतिक संस्था-संघटनांकडून मिश्र संस्कृतीचा पुरस्कार करणारी अनेक पुस्तके बाजारात आली आहेत. खासगी वितरणासाठी असल्याने त्याचे वितरण पूर्ण क्षमतेने होऊ शकत नाही, ही एक खंत म्हणू या.

अण्ड्री ट्रश्की, हिलाल अहमद, सलमान खुर्शीद, एम. जे. अकबर, सबा नकवी, योगिंदर सिकंद यांची भरमसाठ महाग पुस्तके खरेदी करून वाचणाऱ्यांची संख्या वाढली आहे. साहित्य, इतिहास तर अभिजात विषय आहेत याशिवाय अलीकडे वैचारिक पुस्तकांची विविध शैलीबद्ध पुस्तके विक्रीचे साचेबद्ध आडाखे तोडताना दिसत आहेत. हिंदी, उर्दू, इंग्रजी व अन्य प्रादेशिक भाषांमध्ये मुस्लिमविषयक ग्रंथाचे अनुवाद होत आहेत.

फारोसने काढलेलं ‘बेगुनाह कैदी’ असेच एक बेस्ट सेलर पुस्तक आहे. त्याच्या मराठी अनुवादाचे काम सुरू आहे, तोही यथावकाश येईल. वाहिद शेख यांच्यासारख्या दहशतवादाच्या आरोपातून सुटून आलेल्या अनेक तरुणांनी छळवादाचे कथन करणारी पुस्तके लिहिली आहेत. ‘ग्यारह साल सलाखो के पीछे’, ‘फ्रेम्ड’ इत्यादी आत्मवृत्तांनी मुस्लिम समाजातील सामान्य व मध्यवर्गाला वाचनाकडे खेचले आहे.

चुकून पाकिस्तान बॉर्डरवर गेलेल्या व तिकडे अटक झालेल्या मुंबईच्या हमीद अन्सारी यांचे आत्मकथन नुसकत प्रकाशित झालं आहे. पुस्तकातून हमीदनी पाकिस्तानमधल्या यातनामय प्रवासाचे वर्णन केलं आहे. इंग्रजीतलं हे पुस्तक सध्या बेस्ट सेलर ठरलं आहे.

वास्तविक अशा विविधांगी पुस्तकांनी मुस्लिम समाजात वाचन संस्कृती नव्याने रुजवली आहे. दहशतवादाच्या आरोपातून दोषमुक्त झालेल्या दिल्लीच्या मुहंमद अमिर खान यांच्या ‘फ्रेम्ड’ या आत्मवृत्ताचा मराठी अनुवाद राजहंस प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे. शिवाय अलीकडे मराठीतही काही दर्जेदार पुस्तके, चिनार व रोहन प्रकाशनाने प्रसिद्ध केली आहेत.

रोहन प्रकाशनने जागतिक स्तरांवरील अनेक मुस्लिम भाष्यकारांची पुस्तके अनुवादित केली आहेत. मेहतानेदेखील काही निवडक पुस्तकाचे मराठी अनुवाद केले आहेत. साधनाने समग्र दलवाई पुनर्प्रकाशित प्रकाशित केला आहे.

वाचा : प्रा. यास्मिन शेख : सदाप्रसन्न वैयायोगिनी

वाचा : शासनाच्या मराठी मंडळावर मुस्लिम का नाहीत?

आत्मवृत्ताला मागणी

मुस्लिमविषयक आत्मचरित्रांदेखील मराठीत मोठी मागणी आहे. सर सय्यद यांचे आत्मवृत्त दोन खंडात इंग्रजी व हिंदीमध्ये प्रकाशित झालेलं आहे. अलीगड प्रेसने ते प्रसिद्ध केलं आहे. शिवाय मौलाना आजाद यांचे ‘इंडिया वीन्स फ्रीडम’ तर आजही उर्दू हिंदी व इंग्रजीमध्ये वाचलं जाणारं एक महत्त्वाचं पुस्तक आहे. त्याचा मराठी अनुवाद ‘स्वातंत्र्याच्या जन्मकाली’ तसेच एम. सी. छागला यांच्या ‘रोझेज इन डिसेंबर’चा मराठी अनुवाद ‘शिशिरातील गुलाब’ सध्या आऊट ऑफ प्रिंट आहेत.

मराठीत अलीकडच्या काळातील आत्मचरित्रांना मागणी आहे. फ. म. शहाजिंदे यांची ‘मी-तू’, इब्राहिम खान यांचे ‘मुस्लिम महार’, हुसेन जमादार यांचे ‘जिहाद’, प्रा. गणी अत्तार यांचे ‘कोकरुड ते बर्हिंगम’, सय्यदभाई यांचे ‘दगडावरची पेरणी’, तसनीम पटेल यांचे ‘भाळ अभाळ’, मल्लिका अमर शेख यांचे ‘मला उद्ध्वस्त व्हायचंय’ आणि मेहरुनिस्सा दलवाई यांचे ‘मी भरुन पावले’ इत्यादी असे पुस्तके बाजारात आहेत.

जुनी दर्जेदार आत्मचरीत्रे आज आऊट ऑफ प्रिंट आहेत. तसेच प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांचीदेखील अनेक पुस्तके बाजारात उपलब्ध नाहीत. प्रकाशकांच्या उदासिन धोरणामुळे मुस्लिमविषयाची पुस्तके प्रकाशित होत नसल्याचे दिसून येते. अलीकडे मुस्लिमविषयक कथा-कादंबऱ्यांनादेखील मागणी आहे. साहिल कबीर यांचा ‘कथागत’ कथासंग्रह दिवाळीत प्रकाशित झाले. त्याला वाचकांनी चांगला प्रतिसाद दिला.

गेल्या काही वर्षांपासून मुस्लिमविषयक संदर्भ ग्रंथ संग्राह्य करतोय. दिल्लीचं दरियागंज, मुबंईचं पीपीएच, किताबघर, पुण्यात लकडी पुलावरून मी अनेक पुस्तके जमा केली आहेत. पुण्यातील भगतसिंह अकादमी, गोखले आणि डेक्कन कॉलेजमधील ग्रंथालयात अनेक पुस्तके आहेत. मी तिथं जाऊन अनेक पुस्तके चाळली आहेत. यामुळे माझा बराचसा वेळ वाया जातोय.

प्रकाशकांनी अशी दुर्मिळ पुस्तके उपलब्ध करून दिल्यास माझ्यासारख्या अभ्यासकांचा बराच वेळ वाचू शकतो. साहित्य संस्कृती मंडळीने ऐंशीच्या दशकात अनेक पुस्तके प्रकाशित केलेली आहेत. त्याची पीडीएफ उपलब्ध करून दिली आहे. प्रिंट स्वरूपात ती प्रकाशित करावी, असे निवेदन देण्याचा विचार आम्ही काही मित्र करत आहोत.

मुस्लिम विषयक पुस्तके प्रकाशित करण्यासंबंधी मी अनेक प्रकाशकांशी बोललो, काहींनी उदासिनता दाखवली तर काहीजण अशी पुस्तके नव्याने प्रकाशित करायला तयार झालेली आहेत.

सोलापुरच्या गाजियोद्दीन रिसर्च सेंटरने अलीकडे मराठीत काही इतिहासविषयक पुस्तके खासगीरीत्या प्रकाशित करून बाजारात आणली आहेत. ‘बाबरनामा’, ‘औरंगजेब’, ‘टीपू सुलतान’ यांची पुस्तके गाजियोद्दीन रिसर्च सेंटरने प्रकाशित केली आहे. या सेंटरकडून आगामी कळात डॉ. रफीक जकेरिया आणि मोईन शाकीर यांची सर्व पुस्तके पुनर्प्रकाशित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

शिवाय शब्द प्रकाशन व साधनाकडून येत्या काळात अनेक महत्त्वाची मुस्लिमविषयक ग्रंथे प्रकाशित होणार आहेत. त्याचा चांगला फायदा वाचकांना होऊ शकेल.

जाता जाता :