सामाजिक-सांस्कृतिक वातावरण ढवळून काढणाऱ्या दलित पँथरची ५० वर्षे!

जातीय वर्चस्वाच्या जाणिवेला सत्ताधाऱ्यांची साथ मिळते, कामगार वस्तीतल्या बेरोजगार तरुणांना भडकावून दलितांवर हल्ले घडवले जातात, ही स्थिती ५० वर्षांपूर्वीसुद्धा होतीच. फक्त तेव्हा दलित पँथर निर्माण झाली, त्या संघटनेने साहित्य, कविता यांमधून अभिव्यक्ती करत, लेखी भूमिका घेत संघर्षांचा पवित्रा घेतला. ही संघटना आज नाही म्हणजे काय काय नाही, हे शोधण्याचा प्रयत्न आता केला जाणार आहे..

“बोल, दलिता, हल्ला बोल,

बोल श्रमिका हल्ला बोल!

जातीयवाद्यांवर हल्ला बोल,

ब्राह्मणशाहीवर हल्ला बोल,

भांडवलशाहीवर हल्ला बोल!”

ही आक्रमक घोषणा आपल्या बुलंद आवाजात देत, सत्तरच्या दशकातील दलित तरुण महाराष्ट्र व देशभर त्या काळी दलितांवर जे माणुसकीला काळिमा फासणारे अन्याय-अत्याचार जातीयवाद्यांकडून होत होते त्याच्या निषेधार्थ ‘दलित पँथर’ या जहाल संघटनेचा झेंडा घेऊन रस्त्यावर उतरला होता.

पण एकीकडे रस्त्यावर उतरलेला हाच तरुण दुसरीकडे आपल्या कविता, कथा, लेखातून, भाषणातून आपल्या वेदना जळजळीत शब्दांत व्यक्त करीत होता. प्रस्थापित जात-वर्गीयांवर, तथाकथित सांस्कृतिक ठेकेदारांवर व धर्माच्या मुखंडांवर तो आसूड ओढत होता.

त्या काळातील सामाजिक-सांस्कृतिक पर्यावरण त्यांनी ढवळून काढले होते. त्या काळी महाराष्ट्रात ज्या-ज्या ठिकाणी दलितांवर अत्याचार व्हायचे तेथे हे संतप्त तरुण समूहाने पोहोचून अत्याचार करणाऱ्याला धडा शिकवून व पीडिताला लढण्याचे बळ देऊन परतायचे. दबलेल्या दलित तरुणांना त्यामुळे लढण्याची प्रेरणा मिळाली व नवी संघटनात्मक ताकद उभी राहू शकली. अशा या दलित पँथर संघटनेचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे.

भारतातील समाजपरिवर्तनाच्या चळवळीत ‘दलित पँथर’ या संघटनेच्या स्थापनेचे व त्यांनी केलेल्या चळवळीचे मोठे महत्त्व आहे. आंबेडकरोत्तर कालखंडातील ती मोठी चळवळ होती.

वाचा : गुगलने डूडल बनवून गौरव केलेल्या फातिमा शेख कोण आहेत?

वाचा : भीमा कोरेगावमधील जयस्तंभ – राजकारण, जात आणि ब्रिटिशसत्तेची स्मृती

वाचा : मुरुगन ते मुनव्वर : द्वेषाचा विजयोत्सव आणि कलावंताचा मृत्यू

काय होती पार्श्वभूमी?

स्वातंत्र्योत्तर कालखंडात व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ मध्ये बौद्ध धम्म प्रवर्तन केल्यानंतर तत्कालीन दलित समाजाने हिंदू धर्मातील रूढी, परंपरा, अंधश्रद्धा झुगारून दिल्या. ते नवी अस्मिता घेऊन स्वाभिमानाने जगण्याचा प्रयत्न करू लागले.

ग्रामीण व शहरी भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती व स्मृतिदिन मोठ्या प्रमाणात साजरे होऊ लागले. त्या कार्यक्रमांतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक-आर्थिक समतेचा विचार, भारतीय संविधानाचे मूल्य आणि मूलभूत हक्कांची भाषा कार्यकर्ते भाषणातून मांडू लागले.

तुटपुंज्या आरक्षणामुळे का होईना पण हक्काची नोकरी मिळाल्यामुळे लाचारीचे, अवलंबित्वाचे जिणे सोडून दलित माणूस समाजात ताठ मानेने व स्वाभिमानाने वावरू लागला होता. हे स्वाभिमानी जगणे समाजातील काही सरंजामी, जातीयवादी मानसिकता बाळगणाऱ्या मुखंडांना, बड्या धेंडांना खटकू लागले.

दलितांनी आपल्या ‘पायरीने’ वागावे या अपेक्षेमुळे, दलितांना जाच होऊ लागला. जुन्या अवमानकारक गोष्टींना दलितांनी नकार दिल्याने सामाजिक तणाव वाढू लागला, दलितांवर या जातीयवाद्यांकडून वाढते हल्ले होऊ लागले, परभणीच्या ब्राह्मणगाव नावाच्या गावात दलित महिलेची नग्न धिंड काढण्यात आली.

पुण्यातील इंदापूर बावड्यात दलितांवर सामूहिक बहिष्कार घालण्यात आला, अकोल्यातील धाकलीत गवई बंधूंचे जातीयवाद्यांनी डोळे काढले. अशा दलितांवरील अमानुष अत्याचारांच्या घटना वाढू लागल्या होत्या.

दुसरीकडे सत्ताधारी हेही उच्चवर्णीयच असल्याने ते जातीयवादी धेंडांना पाठीशी घालू लागले. त्याच वेळी सत्ताधाऱ्यांच्या भांडवली आर्थिक धोरणांमुळे पूर्वापार ज्यांना ‘उच्च जाती’ मानले गेले, त्याही जातींमध्ये विषमता, विशेषत: सुशिक्षितांची बेरोजगारी वाढू लागली होती.

दलितांपैकी ज्या अगदी थोड्यांना सरकारी नोकऱ्या आरक्षणामुळे मिळत होत्या, त्यांना उच्चवर्णीयांकडून ‘सरकारचे जावई’ म्हणून हिणवले जाई, अपमानित केले जाई. या अन्याय, अत्याचार, अपमानास्पद वागणुकीविरोधात स्वाभिमानाने संघर्ष करण्याची, लढण्याची भूमिका तत्कालीन रिपब्लिकन पक्षाचे नेतृत्व घेत नव्हते. ते तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला राहून स्वत:साठी सोयी-सवलती, पदे मिळवण्यात मश्गूल होते.

अशा नेतृत्वाच्या विरोधातील संताप, राग, असंतोष आंबेडकरोत्तर काळात जी तरुणांची नवी शिक्षित पिढी घडली त्यांच्यामध्ये खदखदत होता. याच संतप्त पिढीतील संवेदनशील कवी, लेखकांनी ‘दलित पँथर’ या लढाऊ संघटनेची स्थापना करण्यात पुढाकार घेतला. त्यांनी दि. ९ जुलै १९७२ रोजी मुंबईतील कामाठीपुरा येथे तरुणांचा पहिला जाहीर मेळावा घेतला.

वाचा : दंगलीतून सहिष्णुता अंगीकारण्याचा बोध घ्यावा

वाचा : मनावर आणि जिभेवर लादलेली बंधने म्हणजे स्वातंत्र्यहरणच!

वाचा : सलमान खुर्शीद यांच्या घरी जाळपोळ म्हणजे असहिष्णुतेचा नमुना

देशपातळीवर पडसाद

या मेळाव्याला संस्थापक नामदेव ढसाळ, ज. वि. पवार, राजा ढाले यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. याच मेळाव्यानंतर ‘साधना’ साप्ताहिकाच्या १५ ऑगस्ट १९७२च्या स्वातंत्र्याच्या रौप्यमहोत्सवी विशेषांकात राजा ढाले यांनी राष्ट्रध्वजाविषयी स्फोटक शब्दांत लिहिलेला वादग्रस्त लेख गाजला आणि राजा ढाले व दलित पँथरला अल्पावधीतच खूप प्रसिद्धी मिळाली.

याच चळवळीतून नवे तरुण नेतृत्व, साहित्यिक उदयास आले. नव्या रूपात जात-वर्ग संघर्षांचा विचार पुढे आला. आंबेडकरी विचारांची सांस्कृतिक घुसळण झाली. त्याचे पडसाद देशपातळीवर उमटले. गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू व दिल्ली, पंजाब व अन्य हिंदी भाषक राज्यांमध्येही संघटना उभ्या राहिल्या, नवे साहित्यिक घडले.

दलित साहित्याचा इंग्रजीसह अन्य भाषांत अनुवाद झाला. दलित पँथर ही लढाऊ संघटना म्हणून प्रकाशात आली, ती मुंबईतील १९७४च्या वरळीतील शिवसेनेसोबत झालेल्या जातीय दंगलीनंतर. त्याला पार्श्वभूमी होती, १९७४च्या लोकसभा पोटनिवडणुकीची.

या निवडणुकीपूर्वी दलित पँथरने डाव्या युवा-विद्यार्थी व सामाजिक संघटनांसह जातीय अन्याय-अत्याचारापासून ते बेरोजगारी आदी प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात ‘काळा स्वातंत्र्य दिन’ पाळण्यापर्यंत उग्र आंदोलने केली होती, निषेध मोर्चे काढले होते.

पँथर्सनी गीतेचे जाहीर दहन केले, शंकराचार्यावर जोडा फेकला. त्यांच्या प्रखर भाषणांमुळे सामाजिक वातावरण ढवळून निघाले. अशा स्थितीत दलित पँथरने पोटनिवडणुकीची भूमिका जाहीर करण्यासाठी, वरळीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर ५ जानेवारी १९७४ला जाहीर सभा ठेवली.

याच सभेत दलित पँथर, वाढत्या जातीय अन्यायाविरोधात व सरकारच्या नाकर्तेपणाच्या निषेधार्थ ‘निवडणूक बहिष्कार’ अशी भूमिका घोषित करणार होते, ज्याचा सर्वाधिक फटका सत्ताधारी युतीच्या उमेदवारालाच बसणार होता आणि हक्काची ‘दलित मते’ न मिळाल्याने त्यांना आपला पराभव दिसत होता.

वाचा : काय आहे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा इतिहास?

वाचा : संघ-परिवाराने राज्यघटनेला विरोध का केला होता?

वाचा : वाजपेयींच्या काळात झाला होता राज्यघटना बदलण्याचा प्रयत्न

दलित पँथरची वाटचाल

या रागातूनच त्या सभेत नामदेव ढसाळ यांचे जहाल भाषण सुरू असतानाच मैदानाच्या शेजारच्या बीडीडी चाळींच्या गच्चीवरून शिवसैनिकांनी दगडफेक सुरू केली. त्याही स्थितीत ढसाळ यांनी भाषण सुरू ठेवले, पण पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत राहिले.

नंतर राजा ढाले यांनी दगडफेक करणाऱ्या गुंडांना आव्हान देत भाषण सुरू केले की, ‘हिंमत असेल तर समोर येऊन हल्ला करा!’ ढालेंच्या भाषणाने सभेतील वातावरण तापले. शिवसैनिकांनी सभेवर तुफान दगडफेक करून सभा उधळली आणि पोलिसांनी सभेतील लोकांनाच मारहाण सुरू केली.

एवढेच नव्हे तर राजा ढाले यांनाही मंचावरून खेचून बेदम मारहाण करून अटक केली. त्यानंतर वरळी, नायगाव, दादर, परळ, लालबाग, डिलाईल रोड, भायखळा या व मुंबईमधील दलित वस्त्यांमध्ये तीव्र पडसाद उमटले, काही ठिकाणी दंगलसदृश स्थिती निर्माण झाली.

वरळीत तर ज्या चाळीत दलित मोठ्या संख्येने राहात होते तेथे मोठ्या प्रमाणात दंगल पेटली होती आणि पोलीस शिवसैनिकांनाच पाठीशी घालत होते. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चर्मकार समाजातील तरुण रमेश देवरुखकर हा पँथर शहीद झाला.

तेव्हा दलित पँथर व डाव्या, पुरोगामी संघटनांनी मिळून दि. १० जानेवारी १९७४ला प्रचंड मोर्चा नायगाव, दादर येथून काढला होता. तो मोर्चा परळच्या रस्त्यावरून जात असतानाच एका इमारतीवरून शिवसैनिकांनी तुफान दगडफेक केली, यातच एक मोठा दगडी पाटा फेकला गेला, जो तरुण पँथर भागवत जाधवच्या डोक्यावर पडला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला.

पँथरचा हा आठवड्यात झालेला दुसरा शहीद होता. त्यानंतर पॅंथर खवळले व आंदोलन चिघळले, पँथर व शिवसैनिकांत तुफान हाणामारी झाली. नामदेव ढसाळ, ज. वि. पवार, भाई संगारे, प्रल्हाद चेंदवणकर, लतिफ खाटीक आदींना पोलिसांनी अटक केली, खोटय़ा केसेस टाकल्या, पण पँथर पुरून उरले.

वाचा : डॉ. गेल ऑम्वेट : भारतीय चर्चाविश्व समृद्ध करणाऱ्या लोकविचारवंत

वाचा : प्रा. फकरुद्दीन बेन्नूर : संवेदनशील आणि विद्यार्थीप्रिय प्राध्यापक

वाचा : जेव्हा कायदामंत्री डॉ. आंबेडकर उर्दूमधील कामकाज पाहण्यासाठी कोर्टात बसले

पडली फूट

पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला व कम्युनिस्ट पक्षाच्या कॉ. रोझा देशपांडे निवडून आल्या. तत्कालीन सत्ताधाऱ्यांसमोर दलित पँथरने मोठे राजकीय आव्हान उभे केले, त्यामुळे पँथरचा झंझावात सर्वदूर पसरला.

दलित पँथरच्या आंदोलनाच्या दबावामुळेच सरकारला सार्वजनिक उपक्रमात, महामंडळाच्या कार्यालयात दलित- आदिवासींच्या राखीव जागांचा बॅकलॉग भरणे भाग पडले, रोस्टरची अंमलबजावणी करावी लागली.

विधिमंडळातील ठरावाप्रमाणे मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यासाठी जो ‘नामांतर लढा’ झाला त्यामध्येही दलित पँथरचे मोठे योगदान होते. या लढ्यात पोचिराम कांबळे, जनार्दन मवाडे, चंदर कांबळे, गौतम वाघमारे ते सातारच्या विलास ढाणेसारखे समतावादी मराठा तरुणही आत्मबलिदान करून या आंदोलनात शहीद झाले आहेत.

चळवळीतूनच प्रेरणा घेऊन भटके विमुक्त, आदिवासी, स्त्रीवादी, मुस्लिम मराठी साहित्य, ग्रामीण बहुजनांच्या आणि विद्रोही साहित्य सांस्कृतिक चळवळी उभ्या राहिल्या.

मूळ दलित पँथरची वाटचाल १९७२ ते १९७७ पर्यंतची, नंतर ‘भारतीय दलित पँथर’ या नावाने १९७७ ते १९९० असा प्रवास प्रा. अरुण कांबळे, रामदास आठवले, गंगाधर गाडे, एस. एम. प्रधान, प्रीतमकुमार शेगावकर, दयानंद म्हस्के, अनिल गोंडाणे आदींसह झाला व नंतर ही संघटना बरखास्त झाली.

मात्र पँथरच्या विद्रोहाचे २०२२ साल हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. दलित पँथरचे अनुक्रमे रमेश देवरुखकर व भागवत जाधव हे पहिले दोन शहीद जानेवारी १९७४ मध्ये झाले. त्या दोघांच्या २०२२ मधील १० जानेवारी या ‘संयुक्त शहीद दिना’पासून पँथर सुवर्णमहोत्सवी वर्षांचा प्रारंभ महाराष्ट्रात व अन्य राज्यांत करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने ‘दलित पँथर सुवर्ण महोत्सव समिती’ स्थापनेच्या बैठका सुरू आहेत.

वाचा : भारतात धार्मिक स्वातंत्र्याची अवस्था बिकट का होतेय?

वाचा : धर्मवाद आणि सेक्युलर राष्ट्रवादात का होतोय संघर्ष?

वाचा : सेक्युलॅरिझम धर्मीय की राजकीय विचारधारा?

काय आहे नियोजन?

महाराष्ट्रभरातील २० शहरांमध्ये ज्येष्ठ पँथर्स, आंबेडकरी, समतावादी, पुरोगामी चळवळीतील प्रमुख कार्यकर्त्यां- नेत्यांच्या, साहित्यिकांच्या बैठकाही झाल्या आणि स्थानिक स्तरावर संयोजन समित्याही स्थापन झाल्या आहेत.

उर्वरित महाराष्ट्रातही आगामी काळात संयोजन समित्या बनणार आहेत. या राज्यव्यापी ‘दलित पँथर सुवर्ण महोत्सव समिती’तर्फे १० जानेवारी २०२२ हा ‘संयुक्त शहीद दिन’ राज्यात जाहीरपणे साजरा करण्यात येत आहे.

आगामी वर्षभर यानिमित्ताने विविध वैचारिक- प्रबोधनात्मक कार्यक्रम महाराष्ट्रातील विद्यापीठे, महाविद्यालये, सामाजिक संस्थांच्या साथीने ‘दलित पँथर सुवर्ण महोत्सव समिती’ करणार आहे. यानिमित्ताने जात- वर्गाच्या मुद्द्यांवर व सांस्कृतिक प्रबोधनात्मक कार्यक्रमातून कार्यकर्त्यांची सामाजिक जाणीव वाढण्यास मदत व्हावी,  फुले-आंबेडकरी, पुरोगामी विचार, संविधानाच्या मूल्यांचे जतन व सध्याच्या नव्या फॅसिझमविरोधात आवाज बुलंद करण्यास नवी ऊर्जा मिळावी, असा उद्देश आहे.

दमनाची परिस्थिती आजही निराळी नाही. आज खोट्या राष्ट्रवाद व खोट्या देशप्रेमाची चलती असताना, तरी महाराष्ट्रात व देशात दलितांवरील अत्याचारांत वाढच होत असताना, आजचे संवेदनशील तरुण राजा ढालेंसारखे शब्द वापरू शकत नाहीतच, पण नामदेव ढसाळ यांच्या शब्दात, ‘या शहरांना आग लावत चला..’ वा अर्जुन डांगळे यांच्या ‘छावणी हलू लागली आहे. भुकेकंगाल तू गात रहा..’ असे तरी म्हणू शकतात का, हा सवाल आहे. म्हणूनच तर आजही आठवण काढायची, दलित पँथरची!

वाचा : दिलीपकुमार : मुस्लिम ओबीसी चळवळीचे ‘अर्ध्वयू’

वाचा : कार्ल मार्क्सवर होता धर्म आणि विज्ञानाचा मोठा प्रभाव

वाचा : मुस्लिम असो की इस्लाम, त्याला कुणाचाच धोका नाही!

जाहीरनामा..

दलित पँथरच्या भूमिकेचा ‘जाहीरनामा’ महत्त्वाचा होता, त्यात सरंजामी, भांडवली सत्ताधाऱ्यांच्या विरोधात, साम्राज्यवादाच्या विरोधात स्पष्ट भूमिका घेतली होती.

त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात म्हटले होते की, “आम्हाला ब्राह्मण आळीत जागा नको. आम्हाला साऱ्या देशाचे राज्य पाहिजे. आमचे लक्ष केवळ व्यक्ती नसून व्यवस्था आहे.. हृदयपरिवर्तनाने.. आमच्यावरला अन्याय, आमचे शोषण थांबणार नाही, आम्ही क्रांतिकारक समूह जागे करू, संघटित करू.”

थोडक्यात पँथरला संपूर्ण क्रांतिकारी व्यवस्था परिवर्तन हवे होते. तसेच जगभरातील व देशातील सर्व शोषित, कष्टकरी जनतेच्या प्रश्नांवर झगडणाऱ्या डाव्या, पुरोगामी चळवळींसोबत भ्रातृभावाचे नाते असावे अशी प्रागतिक चळवळीला पूरक मांडणी त्यांनी केली होती.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील वर्णभेदांचा धिक्कार केला होता. पँथरने फुले-आंबेडकरी विचारांसोबतच, अमेरिकेतील ‘ब्लॅक पँथर’ या लढाऊ संघटनेच्या डाव्या विचारातूनही वैचारिक प्रेरणा घेतली होती. मात्र दलित पँथरने जात-वर्गीय शोषणाचा मुद्दा ठळकपणे पुढे आणला, हे त्यांचे भारतीय वैशिष्ट्य होते.

जाता जाता :