प्रा. फकरुद्दीन बेन्नूर : संवेदनशील आणि विद्यार्थीप्रिय प्राध्यापक

जून 13, 1965 ही तारीख मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. कारण याच दिवशी मी आयुष्यात पहिल्यांदा नोकरीसाठी मुलाखत देत होतो व याच दिवशी माझी पहिल्यांदा प्रा. बेन्नुरांशी भेट झाली. पहिल्या मुलाखतीत माझी निवड प्राध्यापक म्हणून झाली व सदतीस वर्षे याच महाविद्यालयात मी प्राध्यापक म्हणून काम करीत राहिलो. तर याच दिवसापासून ते  बेन्नूर सरांच्या अखेरच्या श्वासापर्यंत आम्हा दोघांची मैत्री टिकून राहिली.

त्याचे असे झाले की 1961मध्ये लातूरच्या आर्यसमाजी मंडळींनी एकत्र येऊन दयानंद शिक्षण संस्थेचे व त्याअंतर्गत दयानंद महाविद्यालयाची (कला वाणिज्य व विज्ञान) सुरुवात 1961मध्ये केली. 1961 ते 1965 या कालावधीत प्राचार्य व काही प्राध्यापकांनी मिळून जे उद्योग केले त्यामुळे संस्थेने त्या सर्वांना काढून टाकून प्राचार्या सहित अनेक विषयांच्या जागेची जाहिरात दिली. त्या जाहिराती मुळे मी मुलाखत देण्यासाठी 13 जूनला लातूरला आलो होतो.

लातूर त्यावेळी जिल्हा नव्हता. 11 तालुक्याच्या जुन्या उस्मानाबाद जिल्ह्यातील हे दुसरे कॉलेज. पहिले उमरगा येथील. त्यावेळी लातूरची लोकसंख्या होती 30,000 आता ती आहे पाच लाखांच्या वर.

माझ्यासाठी लातूर हे तसे नावाने परिचित असे गाव होते. मी त्या वेळच्या हैदराबाद संस्थानच्या गुलबर्गा या गावचा. लातूर देखील हैदराबाद संस्थानात होते. त्यामुळे लातूर हे नाव मला ओळखीचे होते. मी त्याच वर्षी अलाहाबाद विद्यापीठातून एम. ए. हिंदी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले होतो.

निकाल लागल्यानंतर एका महिन्याच्या आत मी मुलाखतीसाठी निघालो होतो. घरची आर्थिक अवस्था खूपच वाईट होती. केंद्र सरकारच्या एका योजनेमुळे मला मॅट्रीक पासून ते एम. ए. पर्यंतची गुणवत्तेच्या आधारावर  शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे मी पदव्यूत्तरपर्यंत शिक्षण घेऊ शकलो होतो.

वाचा : दिलीपकुमार : मुस्लिम ओबीसी चळवळीचे ‘अर्ध्वयू’

वाचा : प्रा. फकरुद्दीन बेन्नूर : समन्वयाची संकल्पना प्रत्यक्षात राबवणारे सुधारक

मित्राने गुलबर्गा लातूर येण्याजाण्याच्या बस तिकिटाचे पैसे गोळा करून दिले होते. एका मित्राचा शर्ट व एकाने दिलेली पँट घालून मुलाखतीसाठी आलो होतो.

लोकांना विचारत-विचारत मी कॉलेजच्या इमारतीकडे निघालो होतो. लातूर बार्शी छोटी रेल्वे लाईन त्यावेळी शहरातून गेलेली होती. रेल्वे रूळ ओलांडून कॉलेजकडे जावे लागत होते. मी रूळ ओलांडत असताना आणखी तरुण त्याचवेळी तो रेल्वे रूळ ओलांडताना दिसला.

माझ्यापेक्षा थोडीशी कमी उंची असलेला, तेजस्वी डोळ्याचा, भव्य चेहऱ्याचा, सावळ्या रंगाचा असा तो होता. मी देखील तिकडेच निघालेलो आहे हे पाहून त्याने मला मराठीत विचारले, “तुम्ही देखील मुलाखत देण्यासाठी निघालात काय?” त्या काळात मी कन्नड हेल काढून मराठी बोलत होतो.

माझ्या मराठीचे उच्चारण हे त्याकाळी फारसे चांगली नसायचे. त्यामुळे मी हिंदीतूनच त्यांना उत्तर दिले, “होय.” त्यांनी विचारले विषय, ‘हिंदी’, मी म्हणालो.

माझ्या हिंदीचे उच्चारण ऐकून त्यांनी विचारले तुम्ही हिंदी भाषिक आहात काय? मी हिंदीतूनच म्हणालो, “नाही मी पूर्णपणे मराठी भाषिक आहे. मातृभाषा मराठी आणि शिक्षण देखील मराठी माध्यमातून झाले आहे.”

आधी त्यांच्या विषयाची मुलाखत झाली. जेव्हा ते मुलाखत घेऊन आले त्यावेळी त्यांचा चेहरा खूपच उजळलेला दिसत होता. मी त्यांना म्हणालो, “खूप खुष दिसता, निवड झाली काय?” ते म्हणाले, “होय, सर्वांच्या मुलाखती संपल्यावर ऑर्डर देणार आहेत.”

सर्वात शेवटी माझ्या विषयाच्या मुलाखती झाल्या. कारण माझ्या विषयाचे जवळपास 30-32 उमेदवार होते. पहिल्यांदा मुलाखत झाली, त्यातून पाच जणांची निवड झाली. दुसऱ्या मुलाखतीत तिघांची निवड झाली. त्यात मी होतो या तिघांच्या मुलाखत संपल्यावर पुन्हा मुलाखत झाली व माझी निवड करण्यात आली. ज्यांची ज्यांची निवड झाली ते सर्व ऑर्डर घेण्यासाठी थांबले. ताण संपला होता. मन प्रसन्न होते. जमलेल्या पैकी फक्त एकाशीच माझे बोलणे झालेले होते. त्यामुळे आमच्यी दोघांत गप्पा सुरू झाल्या.

त्यांनी आपला परिचय दिला, नाव फकरुद्दीन बेन्नूर, राहणार सोलापूर, शिक्षण पंढरपूर येथे. त्यानंतर राज्यशास्त्र इंग्रजी माध्यमातून. नंतर पुण्यातल्या मिल्ट्री विभागात क्लार्क म्हणून काम. त्यावेळी त्यांच्यासोबत कांशीराम होते. वडील न्यायालयात नोकरी. त्यांची बदली सोलापूर येथे झाली. मराठी व इंग्रजी शिवाय कन्नड, हिंदी बोलता येत होते.

दखनी ही घरातली भाषा. त्यामुळे हिंदी अनोळखी भाषा नव्हती. मी ही माझा परिचय दिला. काय झाले ते माहीत नाही. दोघांच्या मन त्याच दिवशी असे जोडले गेले की ते त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत घट्ट राहिलो. दोघात कधीच विसंवाद झाला नाही. वाद-विवाद खूप झाले. पण आम्ही दोघे मनाने, विचाराने इतक्या जवळ जात होतो की जीवन विषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी चर्चा करत असू.

वाचा : डॉ. अक्रम पठाण : मुस्लिम मराठी साहित्याचे साक्षेपी अभ्यासक

वाचा : प्रा. यास्मिन शेख : सदाप्रसन्न वैयायोगिनी

वाचनप्रेमी

आम्ही दोघे मुळातच भयंकर वाचनप्रेमी. मला ते वैचारिक साहित्य वाचण्यास सांगत. मी त्यांना हिंदीतील श्रेष्ठ लेखकांची पुस्तके वाचावयास देत असे. उर्दू गज़ल, आधुनिक मराठी कवितेचे ते प्रेमी. मी त्यांना हिंदीतील प्रेमचंद, मंटो, कमलेश्वर यांची पुस्तके वाचावयास देऊ लागलो. मंटो वाचून ते रडायला लागले. खूपच हळव्या मनाचे होते ते. राही मासूम रजा यांची टोपी शुक्ला ही कादंबरी आम्हा दोघांची खूप आवडीची.

याच शैक्षणिक वर्षात कॉलेजच्या प्रांगणात एक अशी घटना घडली की त्याचा खोलवर परिणाम सरांच्या हळव्या मनावर झाला. झाले असे की 26 जानेवारी 1966च्या कार्यक्रमासाठी लातूरच्या तत्कालीन बीडीओ अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले. ते मुस्लिम होते हे नंतर कळाले. विद्यार्थ्यांपैकी काही जणांना त्यांच्या या धर्माची माहिती असावी. कॉलेजात त्यावेळी दोनशे-अडीचशे विद्यार्थी होते. त्या दिवशी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी 100-150 विद्यार्थी उपस्थित असावेत. विद्यार्थिनी एकही आलेली नव्हती.

ध्वज वर गेला आणि चटकन लक्षात आले की तो उल्टा फडकत आहे. ही चूक सेवकाची. पण चूक लक्षात आल्यावर दंगा घडवून आणण्याच्या इराद्याने आलेले कोणीतरी ओरडले, “हे मुसलमान असतातच असे. पहा त्यांनी जाणून बुजून आपल्या राष्ट्रध्वजाचा अपमान केला आहे.”

झेंडा सुलटा करून फडकावला देखील आणि ध्वजवंदन देखील झाले. नंतर कोणतरी ओरडले, “राष्ट्रध्वजाचा अपमान सहन केला जाणार नाही.” आणि दगडांचा वर्षाव सुरू झाला. हे सर्व काही सेकंदात घडले. प्राचार्य व काही प्राध्यापकांनी प्रमुख पाहुण्यांना आपल्या घेर्यात घेऊन त्यांना प्राचार्याच्या ऑफिसकडे घेऊन जाऊ लागले.

माझ्या उजव्या बाजूला बेन्नूर होते. ताबडतोब मी त्यांच्या हात धरला आणि त्यांना ओढून घेऊन स्टाफ रूमकडे घेऊन गेलो. त्यांना आत बसवून बाहेरून कडी लावून दरवाजासमोर उभा राहिलो. बाहेर काय गोंधळ सुरू झाला होता याची कल्पना नव्हती. बाहेर शांत झाल्यासारखे वाटले. बहुतेक एका सेवकाने मला पाहिलं असावं.

तो प्राचार्याना माझ्याकडे घेऊन आला. मी त्यांना त्यावेळी मी जो निर्णय घेतला तो सांगितला. ते म्हणाले, “तुम्ही फार चांगला निर्णय घेतला.” स्टाफ रूमचा दरवाजा उघडला तर  बेन्नूर एका विमनस्क अवस्थेत दिसले. सिगरेट पीत बसले होते. प्राचार्य त्यांच्याशी बोलले. म्हणाले “चला, मी माझ्या मोटरसायकलवरून तुम्हाला तुमच्या खोलीवर नेऊन सोडतो.”

मी म्हणालो, “नको सर, आम्ही दोघे चालत जाऊ.”

नंतर आम्ही तिघे प्राचार्यांच्या केबिनकडे निघालो. तेथे घडलेल्या गोंधळाबद्दल प्राचार्यानी आम्हाला माहिती दिली. त्यांनी पोलिसांना फोन केला. पोलिसांच्या गाडीतून बीडीओना त्यांच्या घरी पाठवण्यात आले.

या दरम्यान बाहेर एक नाट्यमय घटना घडली. ते ऐकून मी माझ्या उपप्राचार्यांना मनातूनच दंडवत घातला. उपप्राचार्य भालचंद्र नाईक हे आम्हा सर्वाहून खूपच मोठे जवळपास पन्नास वर्षांचे. जुने स्वातंत्र्यसैनिक. वसंतदादा पाटलांचे सहकारी. नाना पाटलांच्या क्रांतिकारी संघटनेत सक्रिय. ज्यावेळी प्राचार्य प्रमुख पाहुण्यांना घेऊन ऑफिसकडे निघाले, त्यावेळी काही तरुणांनी घोषणा केली की “चला, समोर ईदगाह आहे, तो उद्ध्वस्त करुत.”

वाचा : मराठी ज्ञान, रोजगाराची आणि अभिजात होण्याची त्रिसूत्री!

वाचा : कथा मुस्लिम आरक्षणाच्या विश्वासघाताची!

नाईकसरानी ते ऐकले आणि 50- 55 चा जत्था ईदगाहकडे निघाल्याचे त्यांनी पाहिले. ते पळत तिकडे धावले. जत्था ईदगाहजवळ पोहोचण्यापूर्वीच नाईक सर जमिनीवर आडवे झाले व म्हणाले, “माझे शव ओलांडून तुम्हाला पुढे जावे लागेल.” हे ऐकल्यावर अनेक विद्यार्थी त्यातून बाजूला झाले आणि त्याचवेळी पोलिसांच्या सायरनचा आवाज ऐकू आला.

मी आणि बेन्नूर सर पायी निघालो. दोघेही गंभीर! निशब्द! जवळपास बारा साडेबारा वाजता वाजले होते त्यांच्या खोलीवर अर्धा एक तास काही वाचत बसल्या नंतर ते म्हणाले, “चला आता आपण जेवण घेऊत.”

त्यांना मुस्लिम वस्तीत एक खोली मिळाली होती. तेथे छोटू मियाचे प्रसिद्ध हॉटेल होते. अगदी साधे. तेथे आम्ही जेवलो. तेथे कळाले की संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शहरात संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. हे हॉटेल आतल्या भागात असल्यामुळे कसेबसे सुरू आहे. जेवल्यानंतर म्हणाले, “आता तुम्ही माझ्या खोलीकडे चला. तुम्ही तुमच्या खोलीकडे कसे जाल. आता माझ्याकडेच आराम करा. पाच नंतर निघा.”

रोजच्याप्रमाणे दोघे एक दीड तास झोपलो. नंतर गप्पा झाल्या व शेवटी संध्याकाळी सहा वाजता आम्ही दोघे बाहेर पडलो तर असा तो काळा दिवस एकदाचा संपला. पण ही घटना सरांच्या मनावर खोलवर जखम करून गेली.

15 जून 1966 शैक्षणिक वर्षासाठी म्हणून आम्ही सर्वजण आपापल्या गावावरून परत आलो. बेन्नूर सर त्यादिवशी मला भेटल्यावर म्हणाले, “मी राजीनामा देतोय. सोलापूरच्या संगमेश्वर महाविद्यालयात माझी निवड झालेली आहे.” मी त्यांना खूप समजावले की राजीनामा मागे घ्या. येथेच राहा प्राचार्यांनी देखील त्यांना खूप विनवले. एवढेच नव्हे तर संस्थेचे सरचिटणीसांनी देखील त्यांना खूप समजावले.

कारण एका वर्षात त्यांच्या अध्यापनाच्या हातोटी मुळे ते विद्यार्थ्यात विलक्षण लोकप्रिय झाले होते. ते सर्वाना एकच सांगत होते, माझ्या गावातील एका प्रतिष्ठित महाविद्यालयात माझी निवड झालेली आहे. मी ही सुवर्ण संधी सोडणार नाही. माझ्यावर काही कौटुंबिक जबाबदादाऱ्यादेखील आहेत. लातूरमधील त्या दिवशीची घटना या निर्णयाच्या मूळात आहे काय? 1948 पासून ते आजपर्यंत लातूरमध्ये कधी हिंदू-मुस्लिम दंगा झालेला नाही. पण त्यांचे हे म्हणणे एकच, त्या घटनेमुळे नाही तर सोलापुरात नोकरी मिळते म्हणून मी जातोय.

मी मात्र खूपच अस्वस्थ होतो. बहुतेक दुसऱ्या दिवशी ते निघाले. त्यांना निरोप देण्यासाठी मी बस स्टँडवर गेलो. दोघांच्या डोळ्यात अश्रू. मी मात्र आता खूप एकटा झालो होतो. आता आमच्या भेटी कशा होणार? ते म्हणाले, “मी येत जाईन. केवळ तुमच्या भेटीसाठी.” योगायोगाने नंतरच्या एक दोन वर्षात माझ्या लहान बहिणीचे लग्न सोलापूर येथील तरुणाबरोबर ठरले. त्यामुळे मला सोलापूर येथे जाण्यास निमित्त मिळाले. बहिणीकडे मी खूप थोडा वेळ थांबायचो तर बहुतेक वेळ मंगळवार पेठेतील ‘कुदरत’ येथे.

वाचा : कलीम खान : पुरस्कार नाकारणारे जगावेगळे वल्ली

वाचा : अनाथांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या फातिमा रफिक झकारिया

आम्हा दोघांच्या मैत्रीची कल्पना माझ्या वडिलांना आली होती. त्यावेळी ते ज्यावेळी काही कार्यक्रमानिमित्त बहिणीकडे जायचे त्यावेळी ते बेन्नुरांच्याकडे जाऊन गप्पा मारत. माझ्याबद्दलच्या त्यांच्या तक्रारी सांगत व म्हणत की तू तुझ्या मित्राला जरा समजून सांग.

माझे मेव्हणे जर काही अडचणीत आले की सरांना भेटायचे, त्यांचे मार्गदर्शन घ्यायचे, नंतरच्या काळात माझा लहान भाऊ देखील त्यांच्या बऱ्याच संपर्कात आला. तर एकूण काय तर आमच्या कुटुंबातील ते एक होऊन गेले. सोलापुरात जर काही विशेष असा शास्त्रीय संगीताचा, गज़लांचा किंवा विशेष व्याख्यानाचा कार्यक्रम रविवारी असेल तर ते मला कळवत. मी जायचा दोघेही त्या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचो.

वाचलेली उत्कृष्ट पुस्तके हेच आमच्या चर्चेचे मुख्य विषय अनेक वर्षे होते. नंतर विषय बदलू लागले. आता सामाजिक प्रश्नावर आमच्या चर्चा सुरू झाल्या. याच काळात बहुतेक 70- 72 हमीद दलवाई नामक एक वादळ महाराष्ट्रात वेगाने घोंगावू लागले. मुस्लिमांच्या सामाजिक सुधारणांसाठी त्यांनी मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली.

बेन्नूर सरांनी त्यांची व्याख्याने सोलापुरात आयोजित केली. तर ते मंडळाशी संलग्न झाले. याच काळात मी फाळणीवर लिहिलेल्या हिंदी साहित्यावरचा अभ्यास सुरू केला. त्यामुळे हिंदु-मुस्लिम संबंधावर आमच्या भरपूर चर्चा व्हायच्या. याच काळात त्यांनी देखील याच प्रश्नाचा अभ्यास सुरू केला.

औरंगाबादचे आम्हा दोघांचे मित्र डॉ. मोईन शाकिर मी व बेन्नूर यांच्यात हिंदू-मुस्लिम संबंधाविषयी खूपच चर्चा होऊ लागल्या. डॉ. शाकिर सर तर या क्षेत्रातले आंतरराष्ट्रीय अभ्यासक होते. या अभ्यासामुळेच मुस्लिम सत्यशोधक मंडळ व दलवाईंच्या विचारांचा आमच्या विचारांशी कसलाच मेळ बसत नव्हता.

दलवाई टोकाची भूमिका घेत आहेत, अशी भूमिका घेऊन मुस्लिम समाजात सुधारणा करणे केवळ अशक्य या निष्कर्षापर्यंत सर आले व त्यांनी मंडळाशी असलेला आपला संबंध कायमचा तोडून टाकला. याच काळात महाराष्ट्रात कुमार सप्तर्षी यांच्या नेतृत्वाखाली ‘युवक क्रांती दल’ सक्रिय झाली आणि सोलापुरात सर युक्रांदशी निगडित झाले तर मी लातूर येथे.

बहुतेक याच काळात एकदा मी त्यांचा परिचय एकदा फ.म. शहाजिंदेशी करून दिला. हिंदीतून लिहिणाऱ्या मुसलमानांची संख्या भरपूर आहे. त्यापैकी अनेकांचे साहित्य बेन्नूरांना मी वाचायला दिले होते.

पण मराठीतून लिहिणारी मुसलमान मंडळी खूप कमी आहेत, असे मी त्यांना म्हणालो. तर ते म्हणाले, मराठीत 41 मुस्लिम संतकवी आहेत. पण अलीकडच्या काळात मराठीतून लिहिणारे किती आहेत, याचा शोध घ्यावा लागेल. जे काही दोन-चार होते, त्यात शहाजिंदे प्रमुख होते. त्यांनी त्या दृष्टीने अभ्यास सुरू केला. कदाचित त्यामुळेच त्यांना ‘मुस्लिम मराठी साहित्य परिषदे’ची कल्पना सुचली असावी.

एकदा एखादी गोष्ट त्यांच्या मनात भरली की ती पूर्ण केल्याशिवाय राहत नसत. झपाटून कामाला लागले. सोलापुरातील त्यांचे मित्र श्री. अजीज नदाफ या मित्रांच्या सहकार्याने त्यांनी ‘मुस्लिम मराठी साहित्य परिषदे’ची स्थापना केली. या संमेलनाचे पहिले अध्यक्ष म्हणून त्यांनी फ.म. शहाजिंदेची निवड केली.

वाचा : भारत-पाकमध्ये दोस्ती करू पाहणारे फिरोज अशरफ

वाचा : ‘औरंगाबाद समाचार’ : निजाम राजवटीतले उर्दू-मराठी द्वि-भाषी वृत्तपत्र

याच दरम्यान श्री. विलास सोनवणे त्यांच्या संपर्कात आले आणि त्यांना या कामी खूप साथ दिली. या सर्वांच्या सहकार्यामुळे त्यांचे एक स्वप्न पूर्ण झाले. याच काळात माझे वडील वारले. 1977मध्ये. त्यामुळे माझे सोलापूरला जाणे जवळपास बंद झाले. त्यामुळे पहिल्या तर जाऊ द्या नंतर कोणत्याही मुस्लिम साहित्य संमेलनात मी जाऊ शकलो नाही, फक्त कोल्हापूरच्या संमेलनाचा अपवाद. यामुळे ते माझ्यावर खूप नाराज होते.

2008 साली औरंगाबाद येथे झालेल्या संमेलनानंतर त्यांच्या लक्षात आले की मु.सा.प.ची मंडळी आपल्याला टाळत आहेत. खूप हळव्या मनाचे असल्यामुळे ये खूप व्यथित झाले. काही मंडळींनी त्यांना दूर सारले होते. त्यामुळे त्यांना महत्त्व मिळेनासे झाले. हे लक्षात आल्यावर त्यांच्या मनावर खूप खोलवर जखम झाली. मी त्यांच्या भेटीसाठी गेलो तेव्हा मला ते हे सर्व सांगत होते.

त्यानंतर त्यांनी ‘मुस्लिम ओबीसी संघटना’ स्थापन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांच्या वैयक्तिक जीवनातील काही अनुभव याच्या मूळात आहेत. या कामाची सुरुवात त्यांनी अभिनेता दिलीप कुमार यांच्याशी भेटून केली. ते म्हणाले की, “हे गरजेचे आहे. आता तुम्ही पुढे व्हा.”

मग काय उत्तर भारतातील प्रमुख प्रमुख शहरातून त्यांची भ्रमंती सुरू झाली. मला पत्रातून ते याबद्दलची माहिती विस्ताराने देत असत. कारण आम्हा दोघांकडे फोन आलेले नव्हते. याच दरम्यान त्यांनी होटगी रोडवरील वडिलाकडून मिळालेल्या जागेत स्वतःचे घर ‘कुदरत’ बांधले. मी ही ह्या दरम्यान स्वतःच्या घरात गेलो.

आता दोघांकडेही लँडलाईन फोन आले. आता पत्रलेखन खूप कमी झाले. आठवड्यातून एक-दोनदा फोनवर बोलणे मात्र व्हायचे. याच काळात मुस्लिम प्रश्नावर त्यांच्या अभ्यासाला आणखीन वेग आला. कुरआन विषयावरील डझनावारी इंग्रजी पुस्तके ते मागवू लागले. ही पुस्तके वाचायचे, त्यावर दीर्घ टिपणे काढायची, स्वतःचे विचार नोंदवायचे, पण प्रकाशनासाठी मात्र कोठेच पाठवायचे नाही.

भारतातल्या सर्व बुद्धिजीवी मुसलमानांशी त्याचा संवाद सुरू झाला, ज्यात असगर अली इंजिनियर प्रमुख होते. मी त्यांना म्हणालो, “एवढा अभ्यास तुमचा आहे. याच विषयावर पीएचडी करा ना!” मोईन शाकिर तर म्हणायचे की, “तुम्ही लिहून ठेवलेल्या फायली मला द्या. मी स्वतः व्यवस्थित लावून घेऊन, टाईप करून, प्रबंध सादर करेन.” पण ह्या पठ्ठ्याने आपल्या फाईली कधीही कोणाला दिल्या नाहीत.

मुस्लिमातील तरुणांच्या मनाची अस्वस्थता ते पाहत होते. त्यांच्याशी चर्चा करीत होते. यातून मुस्लिम अस्वस्थेतेचा शोध घेणारा एक प्रदीर्घ लेख त्यांनी लिहिला. त्याचा हिंदी अनुवाद मी केला. त्या वेळच्या हिंदीतील सर्वाधिक प्रतिष्ठित व दोन लाखांपेक्षा जास्त खपाचा त्या. ‘धर्मयुग’ या हिंदी साप्ताहिकातून हा लेख प्रकाशित झाला. त्यामुळे भारतातल्या सर्व धर्माच्या तरुणापासून ते वृद्धापर्यंत त्यांचे विचार पोहचले. हा लेख वाचून हिंदीतील अत्यंत प्रतिष्ठित व वैचारिक अशा त्रैमासिकेच्या संपादकानी माझ्याशी संपर्क साधला. त्याना हा लेख थोडा मोठा करून हवा होता.

सांगितल्याप्रमाणे सरांनी लेख आणखी मोठा करून दिला. मग ‘पहल’ या त्रैमासिकातर्फे 1998ला ही पुस्तिका काढण्यात आली.  त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. संपादक ज्ञानरंजन त्यांना एवढे मानत होते की त्यानी पुढे त्यांच्या एका कार्यक्रमात सरांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले.

पुढचा भाग वाचा 

जाता जाता :