प्रा. फकरुद्दीन बेन्नूर : समन्वयाची संकल्पना प्रत्यक्षात राबवणारे सुधारक

थळ व सवंग भाष्यकारांच्या कंपूत राहण्यापेक्षा उपेक्षित आणि एकटं राहिलेलं बरं, तसंच वादग्रस्त विधाने करून चर्चेत राहण्यापेक्षा विस्मृतीत असणं चांगलं, या विचारांना साजेसं प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांचं जगणं होतं. ज्येष्ठ विचारवंत व राजकीय विश्लेषक म्हणून महाराष्ट्रात आणि देशात ख्यातकिर्त असेलेले प्रा. बेन्नूर १७ ऑगस्ट २०१८ला काळाच्या पडद्याआड गेले.

प्रा. बेन्नूर गेल्या सहा दशकांपासून राजकारण, समाजवाद, राष्ट्रवाद, सांप्रदायिकता, गांधी विचारांवर सातत्याने लिहित होते. ते वेगवेगळ्या प्रागतिक विचारसमुहांचे वाहक होते, पण त्या विचारांची अंधभक्ती करण्याऐवजी त्यांनी वेळेप्रसंगी त्याची कठोर चिकित्सादेखील केली.

‘इस्लाम’ आणि ‘अरब वर्ल्ड’ सरांचा आवडता विषय. त्यांना साम्राज्यवादी अरब इतिहास तोंडपाठ होता. समाजिक प्रश्नांचादेखील त्यांनी सखोल अभ्यास केलेला होता. पुरोहित वर्ग आणि धर्मवाद्यांनी लादलेल्या रुढी-परंपरा झुगारून दिल्याशिवाय कुठल्याही समाजाचा विकास शक्य नाही, असं त्यांचं ठाम मत होतं.

धर्मवाद्यांनी व हिंदुत्ववाद्यांनी उभा केलेला मुस्लिम एकजिनसीपणाचा भ्रम त्यांनी आपल्या लेखनातून वेळोवेळी खोडून काढला. कुठल्याही धार्मिक दहशतवादामागे साम्राज्यवाद आणि त्याचं अर्थकारण दडलेलं असतं, त्याला जाणून घेतल्याशिवाय ती समस्या समजून घेणं शक्य नाही, असा विचार त्यांनी लेखनातून सातत्यानं मांडला.

वाचा : मुस्लिमांच्या माणुसकीची मोडतोड सांगणारा ‘वर्तमानाचा वतनदार’

वाचा : मराठी ज्ञान, रोजगाराची आणि अभिजात होण्याची त्रिसूत्री!

वाचा : साहित्य-संस्कृती व्यवहारातील पालखीवाहू ‘मुस्लिम’

प्रबोधन चळवळीत सक्रियता

१९७० पासून त्यांनी सुधारणावादी लेखनाला सुरुवात केली. सोलापूर न्यायालयात कारकून ते पुढे पुणे लष्करात क्लार्क अशा छोट्या-छोट्या नोकऱ्या केल्या. त्यानंतर १९६६मध्ये राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून ते लातूरच्या दयानंदमध्ये रुजू झाले.काहीच अवधीत ते महाविद्यालयातील विद्यार्थीप्रिय प्राध्यापक झाले. वर्षभरानंतर सोलापूरच्या संगमेश्वर महाविद्यालयात त्यांनी प्रस्थान गेले.

२५ नोव्हेंबर १९३८ साली सातारा शहरात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडिल शासकीय सेवेत असल्याने विविध ठिकाणी त्यांची बदली होत. अशा बदलेल्या शहरात प्रा. बेन्नूर यांचे शिक्षण झाले. आपल्या स्मरणात त्यांनी लिहिलं,

“मॅट्रिकनंतर मी सोलापूर कोर्टात नोकरीला लागलो. त्यावेळी सुशीलकुमार शिंदे माझे सहकारी होते नंतर ते खास मित्र झाले. वडिल आधीपासून कोर्टात असल्याने दोघांना फारसा त्रास झाला नाही. नोकरी करता करता मी शिक्षण घेत होते. ही बाब माझ्या अन्य सहकाऱ्यांना खटकत असे.”

राज्यशास्त्रात एम.ए. करून त्यांना प्राध्यापक व्हायचं होतं. त्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू असे. तसं त्यांना यशही लाभलं. प्राध्यापक म्हणून स्थिर होताच चार-एक वर्षात त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. सोलापूरच्या सांप्रदायिक दंगलीत त्यांनी रस्त्यावर उतरून मदत कार्य केले. इतकेच नाही तर शंकर पाटील, पन्नालाल सुराणा सारख्या सहकाऱ्यांना घेऊन दंगल रोखली.

पुढे ते मुस्लिम सामाजिक प्रबोधन चळवळीत मोईन शाकीर, असगरअली इंजिनिअर, ए.ए. फैजी यांच्यासोबत सक्रिय झाले. याच काळी ते हमीद दलवाईंच्या संपर्कात आले. याविषयी बेन्नूर लिहितात, “अल्पकाळ होईना मी दलवाईंच्या कार्यात सहभागी होता, पण त्याचे मोठं नुकसान सहन करावं लागलं.”

पुढे त्यांच्या मुस्लिमविषयक धोरणे, कार्यपद्धती व विचारांची फारकत घेऊन साथसंगत सोडली. दुर्दैवाने १९७७ला दलवाईंचे निधन झाले व बेन्नूर यांच्या जीवनातला एक वादग्रस्त चॅप्टर कायमचा बंद झाला.

वाचा : रफिक झकारिया : एक समर्पित राजकारणी आणि विचारवंत

वाचा : दिलीपकुमार : मुस्लिम ओबीसी चळवळीचे ‘अर्ध्वयू’

वाचा : डॉ. दाऊद दळवी : एक व्यासंगी इतिहासकार

साहित्य परिषदेची स्थापना

१९८०च्या दशकात प्रा. बेन्नूर राजकीय विश्लेषक म्हणून सर्वपरिचित झाले होते. डॉ. मोईन शाकिर, भा.ल. भोळे, प्रा. पुंडे, राजेंद्र व्होरा इत्यादींसोबत राज्यशास्त्र परिषदांना हजेरी लावत. प्रबोधन चळवळीत त्यांचा मित्रपरिवार फार मोठा होता. त्यांच्यासमवेत विविध प्रागतिक चळवळीत ते सक्रिय झाले होते. त्यात दलित पँथर, युक्रांद, समाजवादी प्रबोधिनी, आंबेडकर अकादमी इत्यादी संघटना-संस्था होत्या.

युवक क्रांती दलातर्फे त्यांनी सोलापूरला मेडिकलच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न लावून धरला. दलित अत्याचार, दुष्काळ, मिल कामगार व मजूरांचे प्रश्न त्यांनी लावून धरले. दुष्काळग्रस्त भागांना भेटी देणं, पीडित कुटुंबाला आधार देणं, इत्यादी कार्यात त्यांनी स्वत:ला झोकून दिलं.

मुस्लिम समाज व त्यांचे प्रश्न, समस्या, संस्कृती, सामाजिकता प्रा. बेन्नूर यांच्या कार्याचा केंद्रबिंदू होता. मोईन शाकीर व असगरअली इंजिनिअर यांच्यासोबत एकता चळवळीत सक्रीय होते. मुस्लिम समाजाच्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक प्रबोधनासाठी त्यांनी विविध संस्था-संघटनांची स्थापना केली.

१९८९ साली त्यांनी सोलापूरला ‘मुस्लिम मराठी साहित्य परिषदे’ची स्थापना केली. या कार्यात अजीज नदाफ, लतिफ नल्लामंदू, मुबारक शेख व विलास सोनवणे सारखे सहकारी त्यांना लाभले. या साहित्य चळवळीतून त्यांनी मिथकावर आधारित मुस्लिम चित्रणाला आव्हान दिलं. इतकेच नाही तर मुस्लिम समाज मुख्य प्रवाही चर्चाविश्वात आणला.

तत्पूर्वी मराठीत मुस्लिम विषयक लेखन विकृत झालेलं होतं. मुस्लिम पात्रांनी जाणिवपूर्वक निर्मिले जात होते, त्यातून समाज टीकेच्या केंद्रस्थानी यावा, अशीच योजना असे. मराठी लेखकांच्या या वृत्तीला या साहित्य परिषदेने आव्हान दिलं, असे प्रा. बेन्नूर यंनी त्यांच्या साहित्य-समीक्षेविषयक अनेक लेखात लिहून ठेवलं आहे.

या साहित्य परिषदेने मराठीतून लिहिणाऱ्या मुस्लिम लेखकांचा प्रथमच मेळावा घेतला. केवळ कथा-कविताच नव्हे तर वैचारिक लेखनालादेखील चालना दिली. प्रथमच ‘मराठी मुस्लिम’ची व्याख्या केली. मुसलमानांचे जगणे, राहणे, धर्म, संस्कृती, खाद्य, समाजजीवन, रुढी-प्रथा, असुरक्षितता, राजकीय हल्ले इत्यादी घटकांवर प्रकाशझोत टाकला.

मुस्लिम मराठी साहित्य-समीक्षेवर लिहिलेल्या असंख्य लेखात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.  शाहबानो व बाबरी प्रकरणानंतर मुस्लिम समाज अस्थिर व अस्वस्थ झालेला होता, मुंबई दंगलीनंतर महाराष्ट्रात मराठी मुसलमानांच्या सुरक्षेचे प्रश्न ऐरणीवर आले, अशा काळात मुस्लिम मराठी साहित्य परिषदेने मुसलमानांना सावरण्याचं काम केलं.

या साहित्य चळवळीने विचारपीठ दिल्याने अनेक मुस्लिम लेखक नियमित लिहिते झाले. त्यात फ. म. शहाजिंदे, अजीज नदाफ, बशारत अहमद, जावेद कुरेशी, अब्दुल कादर मुकादम, बाबा मुहंमद आत्तार, बशीर मुजावर, मुबारक शेख, एहतेशाम देशमुख, नसीम देशमुख इथंपासून ते आजच्या काळात लिहित असलेले माझ्यासह अनेकजण या साहित्य चळवळीचं फलित आहे.

आजही अनेक तरुण मंडळी सकस व दर्जेदार लेखन करत आहेत. या मंडळींनी वेगवेगळ्या पातळीवर आपल्या लेखनाचा ठसा उमटवला आहे. एका अर्थानं मराठी मुसलमानांना ताठ मानेनं जगण्याचं बळ या चळवळीनं दिलं.

साहित्य चळवळीतून सुफी व संतकविंचा इस्लाम आणि हिंदु-मुस्लिम समन्वयाचा विचार नव्यानं मांडण्यात आला. ५०पेक्षा जास्त मुस्लिम मराठी संतकविंच्या रचना साहित्य परिषदेनं प्रकाशात आणल्या. इतर संघटनांप्रमाणे धार्मिक विचार मांडण्याऐवजी मराठी मुसलमानांचा ‘जगण्यातला इस्लाम’, त्यांची संस्कृती, सहजीवन, सामाजिक प्रश्न अधोरेखित केले.

वाचा : राहत इंदोरी : जमिनीशी नाळ जोडलेला कलंदर शायर

वाचा : मराठीतील ‘कोहिनूर-ए-गझल’ इलाही जमादार

वाचा : शायर ए आजम ‘साहिर लुधियानवी’ स्त्रियांसाठी मसिहा

ओबीसी परिषद

साहित्य परिषदेतून समाजाच्या विविध प्रश्ने, समस्या व चर्चाविश्वाला घात घातले. विविध विषयाची सखोल मांडणी सुरू झालेली होती. परिषदेने हाताळलेल्या विषयावर चर्चाविश्व रंगले होते. साहित्य परिषदेच्या एका परिसंवादातून प्रेरणा घेऊन १९९२ साली ‘मुस्लिम ओबीसी’ चळवळीची स्थापना झाली. १९९५-९६पर्यंत राज्यभर या चळवळीचं काम पसरत गेलं. उत्तर भारतात पसमांदा चळवळ याच प्रेरणेतून गतीमान झाली.

संघटनेला शब्बीर अन्सारी व पुढे प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांची साथ-संगत लाभली. अल्पकाळात ही चळवळ महाराष्ट्रात पसरली. या चळवळीने प्रथमच मुसलमानांना जाति-प्रश्नावर संघटित केले. इस्लाममध्ये जातिव्यवस्था नाही परंतु भारतीय मुसलमानांत ती होती. याचे कारण भारतातला बहुसंख्य मुस्लिम हा हिंदू धर्मातून परावर्तित होऊन इस्लाममध्ये दाखल झालेला होता. त्याने हिंदू धर्म तर सोडला होता पण आपला व्यवसाय सोडला नव्हता.

याच व्यवसायावर आधारित भारतात जात उतरंड तयार झालेली आहे. साहजिकच जातिचे जू तो मानेवर घेऊनच नव्या धर्मात आलेला होता. परिणामी भारतीय मुस्लिमा(इस्लाम)मध्ये जातरचनेचा शिरकाव झाला. ह्या जातिव्यवस्थेने मुस्लिमातील एका मोठ्या समुहगटाला उपेक्षित ठेवले होते.

पडेल ती व मिळेल ती कामे स्वीकारून हा वर्ग पोट भरत होता. या समूहगटाला मुस्लिम ओबीसी परिषदेने जगण्याचे बळ दिलं. त्यांची सामाजिक व सांस्कृतिक ओळख ठाशीव पद्धतीने मांडली. फक्त मुस्लिम असणे ही ओळख त्यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या पुरेशी नव्हती. त्यातून त्यांना कुठलाही लाभ व शासकीय सवलती मिळणार नव्हत्या. त्यासाठी ‘जात’ म्हणून त्यांना अधोरेखित करणे गरजेचं होतं. मागास जातीच्या सवलतींचा लाभ मिळवून देण्यासाठी शासकीय कागदपत्रे संकलित करण्यात ह्या संघटनेचा मोठा वाटा आहे.  

सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या ही चळवळी फार महत्त्वाची होती. पण अवेळी संघटनेत फूट पडल्याने कामात खंड पडला. उत्तरेत पसमांदा आंदोलनानं दोन खासदार तर मुस्लिम ओबीसी चळवळीने महाराष्ट्रात दोन आमदार दिले. मागास मुसलमानांची नव्यानं गणना करून त्यांना शासकीय सवलती देऊ केल्या. सच्चर समितीनं मुस्लिम ओबीसी चळवळीचे प्रश्न व समस्या लक्षात घेऊन मुस्लिमांना आरक्षणाची तरतूद केली.

२०१५ साली ‘महाराष्ट्रीयन मुस्लिम आरक्षण अधिकार आंदोलन’ नावाची चळवळ बेन्नूर सरांच्याच प्रयत्नाने उभी राहिली. या चळवळीने राज्यभर मुस्लिम आरक्षण, स्कॉलरशिप, आर्थिक विकास महामंडळे, शिक्षणातील सवतलींची मागणी लावून धरली. आजही संघटनेचे वेगवेगळे पदाधिकारी विविध मोर्चांवर कार्यरत आहेत.

वाचा : शासनाच्या मराठी मंडळावर मुस्लिम का नाहीत?

वाचा : डॉ. अक्रम पठाण : मुस्लिम मराठी साहित्याचे साक्षेपी अभ्यासक

वाचा : कलीम खान : साहित्यातील आधुनिक कबीर

एक विद्वान अकॅडेमिशियन

प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांनी राजकीय विश्लेषक व विचारवंत म्हणून केलेली कामगिरी अतुलनीय आहे. मुस्लिमांच्या एकसाचीकरणाला त्यांनी आव्हान म्हणून स्वीकारलं. राजकीय मानसिकतेची चिकित्सा करत मुस्लिमांची होणारी कोंडी त्यांनी मांडली. मुस्लिम राजकारणाची नव्याने व्याखा करत प्रादेशिक नेतृत्व निर्मितीवर त्यांनी भर दिला.

स्वातंत्र्य आंदोलन, फाळणी, साम्राज्यवाद, जागतिकीकरण, इतिहासशास्त्र, वसाहतवाद, दहशतवादाची सडेतोड चिकित्सा त्यांनी केली. इतिहासशास्त्रावर त्यांनी केलेलं लिखाण वादादित आहे. मध्ययुगीन इतिहासाला समोर ठेऊन मुस्लिमांच्या होणाऱ्या बदनामीला त्यांनी रोखठोक उत्तरे दिली.

त्यांनी वसाहतवादी इतिहासकार व त्यांची प्रस्थापना करणाऱ्या लेखकाला अकॅडमीक पद्धतीनं उत्तर दिले. नुसते त्यांचे वादच खोडून काढले नाही तर त्यांचा छुपा अजेंडादेखील निदर्शनास आणला. मुस्लिमांबद्दल होणारी ठोकळेबाज मांडणी, मिथक आणि गृहितकांना वेळोवेळी उत्तरे दिली. या प्रश्नी अनेक दिग्गज म्हणवणाऱ्या मराठी लेखकांसोबत त्यांनी वाद-विवाद घडविला.

अनेक मासिके, साप्ताहिके, दैनिके व पाक्षिकात त्यांनी दीर्घकाळ लिखाण केले. समाज प्रबोधन पत्रिका, परिवर्तनाचा वाटसरू इत्यादी नियतकालिकात त्यांनी विविध विषयावर अनेक लेखमाला लिहिल्या. बेन्नूर मासिकांच्या लिखाणात इतके रमले की त्याच्यावर लेखांवर येणाऱ्या प्रतिक्रियांवर ते वादविवाद करू लागले, वेगवेगळ्या प्रतिक्रियांना निरंतर उत्तरे देऊ लागले. कदाचित यामुळेच त्यांचं स्वत:च्या पुस्तक निर्मिती प्रक्रियेकडे दुर्लक्ष झालं असावं.

वाचा : भारत-पाकमध्ये दोस्ती करू पाहणारे फिरोज अशरफ

वाचा : ‘औरंगाबाद समाचार’ : निजाम राजवटीतले उर्दू-मराठी द्वि-भाषी वृत्तपत्र

वाचा : औरंगाबादच्या नामांतरास पर्याय ‘संभाजीनगर’ नव्हे ‘अंबराबाद’!

बौद्धिक संपदा

१९९८ साली त्यांनी ‘भारतीय मुसलमानांची मानसिकता व समाजरचना’ हे महत्त्वाची पुस्तिका लिहिली. या पुस्तकात त्यांनी मुस्लिमांना इस्लामच्या दृष्टिकोनातून नव्हे तर एक ‘समाज’ म्हणून समजून घेण्याची विनंती गैरमुस्लिमांना केली.

भारतीय मुस्लिम हा अरबांसारखा ‘एकजिनसी’ नसून पूर्णत: वेगळा आहे, त्याचं जगणं, खाणं, वेशभूषा, आचरण पद्धती पूर्णत: अरबांपेक्षा भिन्न आहे. भारतीय मुसलमानांत हिंदुप्रमाणे जातिव्यवस्था आहे, तसेत ते भारताच्या प्रादेशिक अस्मितांशी घट्ट बांधलेले आहेत, हा महत्त्वाचा विचार त्यांनी पुस्तिकेतून मांडला. ही पुस्तिका हिंदी आणि उर्दू भाषेतही अनुवाद झालेली आहे. २०१२ साली त्यांचे पुस्तकरुपाने प्रकाशन झाले. साहजिकच हे पुस्तकदेखील चांगलेच गाजले.

‘आधुनिक भारतातील मुस्लिम विचारवंत’, ‘हिंदुत्व, मुस्लिम आणि वास्तव’, ‘गुलमोहर’ (काव्यसंग्रह), ‘हिंद स्वराज्य : एक अन्वयार्थ’, ‘मुस्लिम राजकीय विचारवंत’, ‘सुफी संप्रदाय आणि वाड्मय’ इत्यादी अशी त्यांची एकूण सात पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. नुकतंच त्याची तीन पुस्तके नव्याने प्रकाशित झाली आहेत, त्यात एका हिंदी पुस्तकाचा सामावेशही आहे.

या व्यतिरिक्त ‘राष्ट्रवाद, साम्राज्यवाद आणि इस्लाम’, ‘मुस्लिम मराठी साहित्य : एक दृष्टिक्षेप’, ‘इस्लामी तत्तज्ञान’, ‘सुफी परंपरा आणि मुस्लिम प्रश्न’, आणि ‘कुदरत’ हे त्यांचे आत्मवृत्त शब्द पब्लिकेशनकडे प्रकाशनार्थ आहेत.

वाचा : डॉ. गेल ऑम्वेट : भारतीय चर्चाविश्व समृद्ध करणाऱ्या लोकविचारवंत

वाचा : अनाथांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या फातिमा रफिक झकारिया

वाचा : प्रा. यास्मिन शेख : सदाप्रसन्न वैयायोगिनी

समन्वयाचे वाहक

महाराष्ट्रातील विविध समूहगटात त्यांनी सामाजिक समन्वय व धार्मिक सुसंवाद घडविण्यासाठी केलेली कामगिरी अतुलनीय आहे. जाति-धर्माच्या भेदापलीकडे जाऊन त्यांनी सुसंवाद प्रस्थापित केला. हिंदू-मुस्लिम संघर्षाचे सूत्र ब्राह्मण्यात समावलेलं आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. बहुजनांनी वेळीच या शत्रूपासून सावध झालं पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती. धर्म हा संघर्षाचा नव्हे तर सुसंवाद स्थापित करण्याचे तत्त्व आहे, असा त्यांचा मानस होता.

याच दृष्टिकोनातून त्यांनी सुफी-संत परंपरेवर विपुल लिखाण केले. सभा-संमेलने, परिषदा-परिसंवाद आयोजित केल्या. २०१४ सालच्या सत्तांतरानंतर भारतात अल्पसंख्य व मुस्लिम समाजाचे प्रश्न अधिक बिकट झाले. मुस्लिमांना अस्तित्वाचे संकट सतावू लागले. त्यांच्या संस्कृती, धार्मिक प्रतिकांवर हल्ले होत आहेत.

हिंदू धर्माच्या नावाने राजकीय संघटन केलं जात आहे. चोहीकडे अस्थिरता प्रसवली जात आहे. जमातवाद, संप्रदायवाद, धर्मांधता आणि द्वेश पसरवला जात आहे. अल्पसंख्य समुदायाच्या खाण-पान, संस्कृतीवर हल्ले होत आहेत.

गोरक्षेच्या नावाने दलित, मुस्लिम आणि मागास समुदायाची मॉब लिचिंग केली जात आहे, परिणामी अल्पसंख्य समुदायात असुरक्षितेची भावना प्रबळ होत आहे, अशा परिस्थितीत प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांचं नसणे महाराष्ट्राच्या प्रबोधनवादी चळवळीची फार मोठी हानी आहे.

प्रा. बेन्नूर यांच्या रुपाने भारतीय समाजात हिंदु-मुस्लिम सौहार्दची संकल्पना प्रत्यक्षात राबवणारा कर्ता सुधारक महाराष्ट्रानं गमावला. सामाजिक समन्वय व सौहार्दचं त्यांचं काम अर्धवट राहणार नाही, याचा प्रयत्न आम्हा सर्वांना करण्याची गरज आहे.

जाता जाता :