“भारतात एक संस्कृती कधीही अस्तित्त्वात नव्हती. हिंदू भारत, ब्राह्मणिक भारत आणि बुद्धिस्ट भारत या ऐतिहासिकदृष्ट्या तीन भारतीय संस्कृती भारतात राहतात. त्या प्रत्येक भारताला तिची स्वतःची संस्कृती आहे. मुस्लिम आक्रमणाच्या आधीचा इतिहास हा ब्राह्मणिझम आणि बुद्धिझम यांच्यातील संघर्षाचा इतिहास आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे.”
-बाबासाहेब आंबेडकर
भारतीय समाजाच्या आकलनाची नवी परिणामे मांडणारी भाष्यकार, न्याय, समता आणि बंधुता यावर आधारित आदर्श समाजाचे स्वप्न पाहणारी आणि त्यासाठी परिवर्तनाच्या चळवळीत सक्रिय सहभाग घेणाऱ्या डॉ. गेल ऑम्वेट ह्या एक आधुनिक भारतातील ओरिजिनल विचारवंत होत्या.
त्यांचं विचारवंत असणं आणि चळवळीतील कार्यकर्ती असणं हे एकमेकाला पूरक होत. त्यांच्या लेखनाने परिवर्तनवादी चळवळीला बळकटी देण्याचे काम केले तर चळवळीतील प्रत्यक्ष सहभागामुळे तिला चळवळीबद्दलची अंतर्दृष्टी (Insight) आणि Ethnographic तपशील मिळाले त्यामुळे त्या अधिक चांगल्या प्रकारे चळवळीबद्दल लिहू शकल्या.
गेल यांनी वेगवेगळ्या विषयावर लिहिले आणि अनेक चर्चाविश्वात निर्णायक हस्तक्षेप केला. तिने डाव्या विचारवंतांना आणि स्त्रीवाद्यांना जातवास्तवाची सतत जाणीव करून दिली. तसेच जातिच्या भौतिक परिमाणाबाबत व्यापक विस्तार केला. जातीबरोबरच त्यांनी शेती, पर्यावरण, वर्ग आणि स्त्रियांच्या प्रश्नाबाबत चर्चाविश्व समृद्ध करणारे लिखाण वेळोवेळी केले.
वाचा : परिवर्तनवादी चळवळीत आत्मविश्वास भरणाऱ्या डॉ. गेल ऑम्वेट
वाचा : जेव्हा कायदामंत्री डॉ. आंबेडकर उर्दूमधील कामकाज पाहण्यासाठी कोर्टात बसले
शोषणावर आधारित ब्राह्मणिझम
‘वसाहतिक समाजातील सांस्कृतिक बंड’ (पीएच्.डी.चा प्रबंध) या पुस्तकाने सत्यशोधक चळवळ आणि ब्राह्मणेतर चळवळीच्या अभिजनवादी दृष्टिकोनाला धक्का देत नवी मांडणी केली.
डॉ. गेल यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत, त्यात ‘वसाहतिक समाजातील सांस्कृतिक बंड’, ‘अंडरस्टॅण्डिंग कास्ट’, ‘दलित अँड द डेमोक्रॅटिक रेव्होल्यूशन’, ‘बुद्धीइजम इन इंडिया’, ‘दलित व्हिजन’, ‘सीकिंग बेगमपूरा’ इत्यादी या पुस्तकांचा समावेश आहे.
गेल ऑम्वेटने वेगवेगळ्या विषयावर, प्रश्नावर मूलभूत मांडणी केली. असे असली तरी फुले-आंबेडकरी चिंतन व्यापक विचारविश्वात समर्थपणे मांडत जातिच्या प्रश्नांची विविधांगाने केलेली मीमांसा हा त्यांच्या लेखनाचा आणि विचारविश्वाचा केंद्र होता.
सुरुवातीच्या काळात मार्क्सवादी असलेल्या गेल नंतर वर्ग आणि आर्थिक संरंचनेशिवाय अन्य घटकांवर (संस्कृती, विचारसरणी इत्यादी) त्या जोर देऊ लागल्या. डॉ. गेल यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य म्हणजे एका बाजूला त्या सतत ब्राह्मणीझम/हिंदुइझमवर टीका करत त्यांचं विघटन (Deconstruction) करतात. तर दुसऱ्या बाजूने त्या जातिअंताच्या चळवळीच्या इतिहासाचा, विचाराच्या परंपरांच्या विकासाचा प्रयत्न करतात.
हिंदू धर्म जो आज आपण पाहतो तो वासाहातिक काळात वेगवेगळ्या स्थानिक परंपरांना एकत्र आणून निर्माण केला गेला असं डॉ. गेल मांडतात. तसेच त्या दाखवून देतात की इथले उच्च जातीय अभिजनवादी आणि ओरिएंटॅलिस्ट यांनी हिंदू धर्माच्या ‘निर्मितीत’ महत्त्वाचा सहभाग घेतला आहे.
नव्याने निर्माण हिंदू धर्माचा गाभा शोषणाच्या उतरंडीवर आधारित ब्राह्मणिझम आहे फक्त त्याला आधुनिकतेचा नवीन मुलामा दिला गेला आहे. गांधी आणि इतर हिंदू धर्मसुधारकांवर टीका करताना दाखवून देतात की इथल्या प्रदेशाला ‘भारतीय’ आणि इथे राहणाऱ्या लोकांच्या धर्माला ‘हिंदू’ आणि इथल्या परंपरांना ‘हिंदू धर्माशी’शी जोडल्या गेल्याने, नव्याने निर्माण झालेल्या हिंदू धर्मांचे प्रभुत्व निर्माण मदत झाली असल्याचा आरोप गेल करतात.
आधुनिकतेमुळे आणि आर्थिक विकासामुळे धर्म आणि जाति यांच्या अस्मिता निरर्थक होतील असा विचार करत इथल्या साम्यवादी आणि धर्मनिरपेक्षवाद्यांनी जमिनीवरच्या वास्तवाशी फारकत घेतली. यामुळेच हिंदुत्ववाद्यांचा भस्मासुर निर्माण झाल्याची टीका गेल करतात आणि म्हणूनच हिंदू धर्मातील सुधारणावादी किंवा धर्मनिरपेक्षवादी हे हिंदुत्वाला पर्याय असमर्थ आहेत.
हिंदुत्वाचा पर्याय हिंदू धर्मातील सुधारणा नसून त्या ‘हिंदुधर्माच्या’ पलीकडे आहेत असे त्या आग्रहाने प्रतिपादन करत, द्रविडीयन, अवैदिक, बुद्धिइझम आणि अन्य वेगवेगळ्या परंपरांकडे बोट दाखवत.
वाचा : प्रा. फकरुद्दीन बेन्नूर : संवेदनशील आणि विद्यार्थीप्रिय प्राध्यापक
वाचा : दिलीपकुमार : मुस्लिम ओबीसी चळवळीचे ‘अर्ध्वयू’
दुःखविरहित शहराची कल्पना
भारतातील प्रबोधनाचे खरे प्रतिनिधित्व जातिअंताच्या आणि ब्राह्मणेतर चळवळी करतात कारण त्या लोकशाही, न्याय, समानता आणि विवेकवादी विचार इत्यादी प्रबोधनाची मूल्ये जोरकसपणे मांडतात असे त्या आग्रहाने सांगतात. म्हणून जातिअंताच्या चळवळीतील विचारवंतांनीच ब्राह्मणवादी हिंदू धर्मासमोर खऱ्या अर्थाने मूलभूत प्रश्न उभे केले.
ज्या परिवर्तनवादी शक्ती समतेची आणि मुक्तीची आकांक्षा ठेवतात त्यांनी भारतीय संस्कृती, परंपरा आणि अस्मिता पूर्णपणे नाकारावे का ? भारतीय परंपरा संस्कृती ही असमानतेची आणि शोषणाचीच आहे का? असे अनेक प्रश्न समोर उभे ठाकले.
डॉ. गेल फक्त हिंदूधर्मावर टीका करून थांबत नाहीत तर त्या भारतीय परंपरांचा, इतिहासाचा नव्या पद्धतीने अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात. गेल त्यांच्या लिखाणातून भारतीय इतिहास, परंपरेतील विरोध सर्जनशीलपणे उलगडून दाखवतात.
डॉ. गेलच्या लिखाणातील आणखीन महत्त्वाचे काम म्हणजे ‘सीकिंग बेगमपुरा’ हे होय. बेगमपुरा ही दुःखविरहित शहराची केलेली कल्पना आहे. ह्यात ५०० वर्षाच्या जातिअंताच्या लढ्याच्या विचारवंतांच्या आर्थिक सामाजिक विचाराची एका प्रकारे वंशावळ (Genealogy) निर्माण करण्याचा प्रयन्त केला गेला आहे.
न्याय समाजाच्या निर्मितीच्या विचाराचा इतिहास अत्यंत सर्जनशीलतेने उपलब्ध केला गेला आहे. दुसऱ्या पातळीवर युटोपिया (आदर्श समाज व्यस्थेचा विचार) हा यूरोपच्या युटोपियाला समांतर भारतीय समाजात जातिअंताच्या लढ्यात अस्तित्वात होता दावा अत्यंत महत्त्वाचा आहे. भारतीय इतिहासात अर्ली मॉडर्न हा सर्वाधिक चर्चिला गेलेला काळ आहे, या चर्चेत बेगमपुरा हे मूलगामी भर आहे.
डॉ. गेल ऑमवेट यांचा समाजशात्रज्ञ म्हणून सुरू झालेला प्रवास वेगवेगळ्या विद्याशाखेत तितक्याच सहजतेने होतो आणि बहुशाखीय होऊन जातो. ती एकाचवेळी भारतीय तसेच जागतिक विचारविश्वात सहजतेने सहभागी होते.
वासाहतिक आधुनिकता, सामाजिक चळवळी, जातिअंताचे विचारविश्व् या संकल्पनांच्या विकासात गेलचे काम मूलगामी आहे. बाबासाहेब आंबेडकर ज्याप्रमाणे भारतीय इतिहास हा ब्राह्मणीइझम आणि बुद्धीइझम यांच्या सहघर्षाचे आहे असे प्रतिपादन करतात.
हेच सूत्र पकडत डॉ. गेल रविदास, तुकाराम, बसवण्णा, चोखामेळा या भक्ती परंपरेतील जातिअंताच्या क्रांतिकारी विचाराची मांडणी करतात. या जातिअंताच्या लढ्याची वंशावळ उभी करतात. आज आंबेडकराईट म्हणून जो काही विचार उभा आहे त्या विचाराच्या वेगवेगळ्या संकल्पनेच्या विकासात गेल ऑमवेट यांचे योगदान मूलगामी आहे. भारतीय चर्चाविश्व अधिक अर्थपूर्ण आणि समृद्ध करण्यात त्यांचा वाटा कोणीही नाकारू शकत नाही.
जाता जाता :
- कार्ल मार्क्सवर होता धर्म आणि विज्ञानाचा मोठा प्रभाव
- मुस्लिम असो की इस्लाम, त्याला कुणाचाच धोका नाही!
लेखक मुंबईस्थित आयआयटीमध्ये सामाजिकशास्त्राचे संशोधक आहेत.