माणसं विस्थापित का होतात? ‘जगण्याचे प्रश्न’ या भोवतीच सर्व गुंता झालेला आहे. जगण्यासाठीच्या ‘रॅट रेस’मध्ये माणूस विस्थापित होत जातो. इंदोरमधील एका मिलमध्ये कामगार म्हणून काम करणारे काज़ी मियाँ आठ अपत्यांचे अब्बू. मिलच्या तुटपंज्या वेतनात कसाबसा गाडा रेटत असताना एक दिवस त्यांची नोकरी गेली. कारण मजुरांची संख्या अधिक झाली असे त्यांना सांगण्यात आले.
शेवटी कशासाठी पोटासाठी; म्हणत ते सगळे लटाबंर घेऊन मुंबईला पोहचले. एवढे मोठे खटले एकट्याचे जीवावर चालणार नाही, हे त्यांच्या ११ नोव्हेंबर १९२६ला जन्मलेल्या दोन नंबरच्या मुलाच्या बदरुद्दीनच्या लक्षात आले. मग त्यानेही पडेल ते काम करायला सुरुवात केली.
दिवसभर वणवण भटकून आईस कँडी, फळं, भाजीपाला, स्टेशनरी जे जमेल ते विकून चार पैसे घरी आणणे आणि बापाच्या हातात देणे, हे त्याचे काम. मात्र हे सर्व करत असताना त्याच्या डोक्यात इतर किडे वळवळत असत.
१९३०-४०च्या दशकात चॅर्ली चॅप्लीन नावाच्या एका फाटक्या सुटाबुटातील माणसाने जगाला वेडं केलं. अनुभवाच्या विद्यापीठातून मास्टर डिग्री केलेल्या या ट्रंफने ‘हासू आणि आसू’च्या तीव्र रसायनात जगाला पार बुडवून टाकले. याचे साईड इफेक्ट जगभर पसरले.
तीसच्या दशकात भारतीय सिने इतिहासात नूर मुहंमद मेमन उर्फ नूर चार्ली नावाचे एक विनोद वीर कम स्टंटमन होऊन गेले. भारतीय चित्रपटाच्या पहिल्या पिढीतले ‘किंग ऑफ कॉमेडी.’ या नूर चार्लीचा किडा बदरुद्दीनला पण चावला होता. तो त्यांचा जबरा फॅन होता. त्यांनी पडद्यावर केलेले स्टंट हा पठ्ठा स्वत:ही करून बघायचा.
फेब्रवारी १९२६ मध्ये मुंबईत सार्वजनिक बस सेवा सुरू झाली. बेरोजगार बदरुद्दीनसाठी बहुतेक काही दरवाजे उघडणार होते. लवकरच त्याला कंडक्टरची नोकरी मिळाली. या कामाने त्याच्या कुटुंबीयाना थोडा दिलासा मिळाला.
दादरच्या बस डेपोमध्ये त्यांना ही नोकरी मिळाली. घंटी वाजवत बदरुद्दीन प्रवाशांसाठी तिकीटे फाडू लागला. ‘पुढील आयुष्यात लोक त्याच्यासाठी तिकीटे फाडणार आहेत’ याची मात्र त्याला त्यावेळी अजिबात कल्पना नव्हती.
वाचा : बॉलीवूडचे इफ्तेखार दिसताच, खरे पोलीस त्यांना सॅल्युट ठोकत
वाचा : रफींना ऐकले की आजही वाटते, ‘तू कहीं आसपास हैं दोस्त’!
वाचा : महमूद : ‘किंग ऑफ द कॉमेडी’
अभिनयाचा किडा
बसच्या फेऱ्या करताना बदरुद्दीनच्या डोक्यातला किडा मध्येच वळवळ करीत असे. मग तो विविध नकला करून, चित्र-विचीत्र आवाज करून विशेषत: दारूड्याची नक्कल करून प्रवाशांचा प्रवास मजेशीर करे. एकदा या बसमध्ये प्रसिद्ध चित्रपट अभिनेते बलराज सहानी प्रवास करत होते. त्यांना या आगळ्या कंडक्टरमधला किडा बहुधा दिसला असावा.
साहनी त्यावेळी गुरूदत्तच्या ‘बाजी’ या चित्रपट कथेवर काम करत होते. त्यांनी मग बदरुद्दीनला एक कल्पना सांगितली. दुसऱ्या दिवशी त्याला गुरूदत्तच्या ऑफिसमध्ये यायला सांगितले. दुसऱ्या दिवशी गुरूदत्त चेतन आनंद सोबत आपल्या बाजी या चित्रपटावर चर्चा करत असताना अचानक एक दारूडा मध्ये आला. त्याने गोंधळ घालायला सुरुवात केली. शेवटी शेवटी तर गुरूदत्तचीच फिरकी घ्यायला लागला. गुरूदत्तने रागाने सुरक्षा रक्षकास बोलावले या दारूड्याला हाकलून लावा, असे सांगितले.
बराच वेळ ही मजा बघत बसलेले बलराज सहानीने मग त्या दारूड्याची ओळख करून दिली. ‘बदरुद्दीन जमालुद्दीन काज़ी’ असे याचे नाव असून हा दारूडा नाही तर तो दारूड्याचा अभिनय करत होता. त्यांच्या या अस्सल दारूड्यावर गुरूदत्त मग जाम फिदा झाला आणि त्याला ‘बाजी’ चित्रपटात काम मिळाले.
काय गंमत आहे पहा ज्या पोराने कधी दारूला स्पर्श केला नाही, त्याने झक्कास दारूड्याचा अभिनय करून दाखवले व काम मिळविले. गुरूदत्तने फक्त त्याला कामच नाही दिले तर त्याची एक नवी ओळख निर्माण केली आणि त्याचे नाव ‘जॉनी वॉकर’ असे ठेवले.
त्याकाळी स्कॉच व्हिस्कीचा जॉनी वॉकर हा ब्रॅन्ड खूपच लोकप्रिय होता. शेवटी बदरुद्दीनच्या डोक्यातला किडा जिंकला आणि पुढची ४० वर्षे या अभिनेत्याने लोकांना हसवत ठेवले.
गुरूदत्त आणि जॉनी वॉकर ही मित्रांची जोडी पडद्यावर आणि पडद्यामागे अभिन्न राहिली. गुरूदत्त आपल्या या मित्रासाठी पटकथेतही बदल करण्यास तयार होत. खरे तर तो काळ असा होता गाणी ही फक्त नायक-नायिकांवर चित्रीत होत, पण जॉनी वॉकरच्या अभिनयाने प्रेरीत होऊन ओ.पी. नय्यर या संगीतकाराने खास त्यांच्यासाठी गाणी कंपोज केली.
विशेष म्हणजे मुहंमद रफी देखील खास त्याच्यासाठी आपला ठेवणीतला आवाज वापरत असत. अर्थातच जॉनी वॉकर आणि गाणी या कॉम्बीनेशनदेखील धम्माल केली. जॉनी वॉकरची पडद्यावरील एन्ट्रीच चित्रपटगृहात हास्याचे कारंजे उसळून द्यायची.
वाचा : ‘बाबूजी धीरे चलना…’ म्हणणारी सदाबहार शकीला
वाचा : सलमा आग़ा : बॉलीवूडने नाव ठेवले, तरी ठरली सुपरहिट गायिका
वाचा : मदनमोहन : अविट चालीची गाणी देणारा प्रतिभाशाली संगीतकार
अविस्मरणीय कारकीर्द
अगदी साध्या साध्या संवादातून व अचूक टायमिंगमुळे ते पडद्यावर धमाल करत असत. असं म्हटलं जातं की विसगंतीतून व्यंग निर्माण होतं. आपला सभोवताल प्रचंड विसंगतीने भरलेला आहे. जॉनी वॉकर ज्या बसमध्ये नोकरी करत असे, त्यात त्यांनी अनेक व्यक्तीरेखा अनुभवल्या होत्या. त्यामुळे वेगवेगळे प्रसंग साकारताना ते अगदी गर्दीतील आपल्यासारखेच एक वाटत.
गुरूदत्त आणि जॉनी वॉकर एकदा कलकत्त्याला गेले. तिथे गुरूदत्तने एका तेल मालिशवाल्याला बघितले. त्याने जॉनी वॉकरला सांगितले त्याच्यावर नजर ठेव तुला ती भूमिका करायची आहे. १९५७मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘प्यासा’मध्ये जॉनी वॉकरने ‘सर जो तेरा चकराए…..’ म्हणत जीवनाचे सार या गाण्यातून व्यक्त केले. साहिरने काय अफलातून लिहिलं आहे हे गाणे!
‘बाजी’ (१९५१), ‘जाल’ (१९५२), ‘आंधियां’, ‘बाराती’ (१९५४), ‘टॅक्सी ड्राइवर’, ‘मिस्टर एंड मिसेज 55’ (१९५५), ‘श्रीमती 420’, चोरी चोरी’ (१९५६), ‘सीआईडी’, ‘प्यासा’ (१९५७), ‘गेटवे ऑफ इण्डिया’ (१९५७), ‘मिस्टर एक्स’, ‘मधुमती’ (१९५८), ‘कागज के फूल’ (१९५९), ‘सुहाग सिन्दूर’ (१९६१), ‘घर बसा के देखो’ (१९६३), ‘मेरे महबूब’(१९६२).
‘उस्तादों के उस्ताद’ (१९६३), ‘शिनाई’ , ‘दूर की आवाज’ (१९६४), ‘सूरज’, ‘सगाई’, ‘पती-पत्नी’, ‘दिल्लगी’, ‘दिल दिया दर्द लिया’ (१९६६), ‘बहू बेगम’, ‘दुल्हन एक रात की’(१९६७), ‘दुनिया’, ‘मेरे हुजूर’, ‘हसीना मान जाएगी’, ‘शिकार’ (१९६८), ‘नन्हा फरीश्ता’, ‘सच्चाई’, ‘दो रास्ते’ (१९६९), ‘गोपी’, ‘आनंद’ (१९७०), ‘राजा जानी’ (१९७२), ‘प्रतिज्ञा’ (१९७५), ‘शान’(१९८०), ‘चाची 420’ (१९९८) हे त्याचे निवडक चित्रपट.
१९४० ते १९७०च्या दशकात हास्य अभिनेता आणि नायकाची समातंर भूमिका असे. फक्त विनोद निर्मिती एवढेच काम नाही तर चित्रपटाच्या कथेमध्ये ही महत्त्वाची भूमिका असे. प्रेक्षकांना हसवत ठेवताना सिनेमातील नायकाची दु:खातही ते समरस होत. त्यामुळे त्याकाळात हास्य अभिनेत्यांना लोकप्रियतेसोबत सन्मानाची वागणूकही मिळे.
पुढच्या काळात जसजसे हे कमी होत गेले जॉनी वॉकरनी काम कमी केले. ‘टॅक्सी ड्रायव्हर’, ‘नया दौर’ आणि ‘मधुमती’ या चित्रपटात त्यांनी अप्रतिमच काम केले आहे. मधुमतीसाठी त्यांना फिल्म फेअर पुरस्कारही मिळाला. यातील त्याचे ‘जंगल मे मोर नाचा किसी ने ना देखा’ जबरदस्तच.
१९६८मधील ‘शिकार’ या चित्रपटातील तेजू (जॉनी वॉकर) आणि महूआ (बेला बोस)ची जोडी पण मस्त. शेकडो जणांकडे कामाचा अनुभव असणारा तेजू एकदा महूवाच्या एका वाक्यात म्हणतो, “हम प्यारव्यार सब जानत है हम, मजनू के हात के नीचे भी काम किया है….” या चित्रपटातला त्याचा ग्रामीण भोळसर तेजू भाव खाऊन गेला अन् फिल्म फेअरचा उत्कृष्ट विनोदी कलाकाराचा दुसऱ्यांदा पुरस्कारही मिळवून गेला.
वाचा : दिलीपकुमार : मुस्लिम ओबीसी चळवळीचे ‘अर्ध्वयू’
वाचा : दिलीपकुमार यांची अदाकारी परिपूर्ण होती, पण….
वाचा : रूपेरी पडद्यावर ‘नाच्या’ची परंपरा कशी सुरू झाली?
अभिनयाची वेगळी स्टाईल
जॉनी भाईच्या चेहऱ्यावर खास प्रकारचे मिश्किल भाव नेहमीच असत. समोरच्या संवादाला उत्तर देण्याची एक खास अदा त्यांच्याकडे होती. गोंधळात पडलेला त्यांचा चेहरा खूप हसे आणि टाळ्या वसूल करून जाई. जॉनीभाईची बोलण्याची पण एक खास लकब होती. त्यांच्या आवाजावरून ते लगेच ओळखले जात.
या सर्व वैशिष्ट्यामुळे रफीसाहेब पण त्यांच्यासाठी असा आवाज देत की जणू काही जॉनीभाई गात आहेत. त्यांच्यावर चित्रीत झालेली सर्व गाणी हिट झाली. विशेष म्हणजे जॉनी वॉकर स्वत:ही उत्तम गात असत. चित्रपट जरी कृष्ण धवल होते तरीही त्यांनी आपल्या अदाकारीने त्यात विविध रंग भरले.
शम्मी कपूर जॉनी वॉकरचे खास मित्र. अनेकदा ते त्यांच्या घरी जाऊन गीता बालीला कसं पटवावे याच्या टिप्स मागायचे आणि हा बहाद्दरही टीप्स द्यायचा. त्याची लोकप्रियता बघून १९५७मध्ये मदन व दलजित वेद या निर्माता दिग्ददर्शकाने जॉनी वॉकर व श्यामा यांना मुख्य भूमिकेत घेऊन ‘जॉनी वॉकर’ याच नावाचा चित्रपट काढला. अर्थात तो म्हणावा तितका चालला नाही.
गुरूदत्तचा अकाली मृत्यू हा जॉनी वॉकरसाठी मोठा धक्का होता. सबंध आयुष्यभर जॉनी वॉकर आपल्या या मित्राला कधीच विसरू शकला नाही. गुरूदत्त गेल्या नंतर दिलीप कुमारने जॉनी वॉकरला खूप मोठा मानसिक आधार दिला.
गुरूदत्तच्या प्रत्येक चित्रपटात त्याची महत्त्वाची भूमिका असे. त्याच्या ‘सीआयडी’ या चित्रपटात मजरूह सुल्तानपुरीचे एक गाणे आहे, “ए दिल है मुश्कील हे जिना यहॉ…जरा हटके जरा बचके…..ये है बबंई मेरी जा.” हा चित्रपट १९५६ सालातला. या गाण्यात उल्लेख असलेली ट्राम आणि मील वगळता आजही मुंबईत सर्व काही तसेच आहे. बाकी सर्व गाणे आजही मुंबईला लागू पडते.
जॉनी वॉकर यांनी आपल्या अतिशय सुंदर अभिनयाने या गाण्याला अजरामर केले. मग आजची मुंबई खरोखर किती बदलली आहे? आजही बेकारांचे तांडे मुंबईकडे जातच असतात. विस्थपनाची प्रक्रिया आजही सुरूच आहे.
वाचा : राहत इंदौरी : उर्दूतल्या विद्रोही परंपरेचे वारसदार
वाचा : राहत इंदोरी : जमिनीशी नाळ जोडलेला कलंदर शायर
वाचा : मराठीतील ‘कोहिनूर-ए-गझल’ इलाही जमादार
विनयशील व्यक्तिमत्व
जॉनी वॉकर हे अत्यंत नम्र आणि विनयशील माणूस. ते जेव्हा ‘आर-पार’ या चित्रपटाची शुटींग करत होते त्यावेळी चित्रपटाची नायिका शकिलाची बहीण नूरजहाँ अनेकदा सेटवर येत. जॉनी वॉकर तिच्या प्रेमात पडले. पण तिच्या घरच्या कडून विरोध असल्यामुळे एक दिवस मग दोघांनी गूपचूप निकाह केला.
बऱ्यापैकी पैसे हातात आल्यावर जॉनी वॉकरने आगोदर बांद्रा व नंतर अंधेरीला घर घेतले व त्याचे नाव ‘नूर व्हीला’ असे ठेवले. या दापंत्याला नाजिम, कासिम व नासिर हे तीन मुले तर कौसर, तसनिम, फिरदौस या तीन मुली आहेत.
त्यांचा एक मुलगा नासिरने आगोदर मॉडेलिंग केले, आता तो अभिनेता आहे. ‘बागबान’, ‘फोर्स-2’, ‘चॉक अन्ड डस्टर’ अशा चित्रपटात त्याने निगेटिव्ह भूमिका केल्या मात्र वडिलांसारख्या विनोदी भूमिका त्याला करायची इच्छा असूनही वाटयाला आल्या नाही. ‘अम्मा’ नावाच्या एका हिंदी मालिकेत तो काम करत आहे.
जॉनी वॉकरची लोकप्रियता बघून त्याच्या छोटा भाऊ कमालुद्दीन यानेही आपले नाव बदलून ‘ऑनी वॉकर’ ठेवले. पण फक्त नाव बदलून काहीच होत नाही, आडात असल्या शिवाय पोहऱ्यात येत नाही. जॉनी वॉकर व्हिस्की पिऊन जितकी मजा येणार नाही तितकी मजा हा जॉनी वॉकर आपल्या विशिष्ट आवाज आणि देहबोलीने आणीत असे.
सिने सृष्टीतून दूर गेल्यावर जॉनी वॉकरनी रत्न व खड्यांचा व्यापर करायला सुरुवात केली. मग बऱ्याच मोठ्या कालखंडा नंतर १९९७मध्ये कमल हासनच्या ‘चाची ४२०’मध्ये ते दिसले. यातला त्यांचा पियक्कड्ड मेकअपमन म्हणजे अर्क होता. मधल्या १३-१४ वर्षात ते कॅमेऱ्या समोर आलेच नव्हते. पण यातील ७७ वर्षांच्या या विनोद वीराने धमाल केली या भूमिकेत. त्यांनी जवळपास सर्वच लोकप्रिय अभिनेत्या सोबत काम केले.
वाचा : इकबाल यांची कविता म्हणजे कामगार हिताचा एल्गार
वाचा : शायर ए आजम ‘साहिर लुधियानवी’ स्त्रियांसाठी मसिहा
वाचा : प्रगतिशील कविंच्या उर्दू शायरीतून ‘नेहरू दर्शन’
रडविणारे जॉनी
१९७०मध्ये आलेल्या ‘आनंद’मध्ये हृषिकेश मुखर्जीच्या आग्रहा खातर जॉनी वॉकरने एक छोटीशी पण लक्षणीय भूमिका केली. मला स्वत:ला ती खूप भावली. आनंद चित्रपटभर एका अनामिक मूरारीलालचा शोध घेत असतो. खरं तर त्याला माणसं जोडायची असतात, मूरारीलाल तर एक बहाणा असतो. पण एकदा अचानक त्याला त्याचा मूरारीलाल अर्थात जॉनी वॉकर सापडतो. मग दोघांत मस्त संवादाची देवाणघेवाण होते.
जॉनी वॉकरचा हा मूरारीलाल अर्थात इसाभाई सुरतवाला एकदम झकासच. या इसाभाईची एक नाटक कंपनी असते. तिथला त्याचा एक संवाद- “जिंदगी और मौत उपरवाले के हाथो में” जो या चित्रपटाचा क्लायमॅक्स बिंदू होता. यातील जॉनी वॉकरला नेहमी ‘लगी शर्त’ म्हणायची सवय असते. तो आनंद बरोबरही शर्त लावतो.
त्याला माहीतच नसते की आनंद खूप कमी दिवसाचा सोबती आहे. आनंदच्या शेवटच्या क्षणी हा इसाभाई त्याला भेटायला येतो. हा प्रसंग जॉनी भाईने अप्रतिम साकार गेला आहे. ‘मैं वापस आऊंगा जयचंद, इतने जल्दी इस पर पर्दा नही गीरने दूगाँ…” म्हणत बाहेर येतो आणि डॉ. भास्करला… “ये शर्त रघूकाका जीत जाये…” म्हणत ढसाढसा रडणारा इसाभाई कमालीचा भाव खाऊन् गेला. आयुष्यभर खळखळून हसविणाऱ्या जॉनी भाईने या चित्रपटात रडविले. हृषिदाला त्यांची ही क्षमता नक्कीच माहित असावी.
हा योगायोग नाही की जगभरातील सर्वच हास्य कलावंतानी त्यांच्या खासगी आयुष्यात खूप काही सोसले. कष्टांचे डोंगर उपसले. आम्हाला मनमूराद हसविताना त्यांच्या चहेऱ्यावर मात्र दु:खाची एक लकेरही उमटू दिली नाही.
आपल्या ३५ वर्षांच्या कारकीर्दित जॉनी भाईने तीनशेपेक्षा अधिक चित्रपटातून निखळ आनंद दिला. बसची तिकीटे फाडणाऱ्या बस कंडक्टर बदरुद्दीन जमालुद्दीन काज़ीने आपल्या कतृर्त्वाने लोकांनाही स्वत:च्या चित्रपटाची तिकीटे फाडायला भाग पाडले यातच या अभिनेत्याचा कतृर्त्व दिसून येते. २९ जुलै २००३मध्ये जॉनी भाई वयाच्या ८३व्या वर्षी रूखसत् झाले.
जाता जाता :
- नवीन लेखकांसाठी पुस्तके प्रकाशित करण्याची सोपी प्रक्रिया
- मराठी ज्ञान, रोजगाराची आणि अभिजात होण्याची त्रिसूत्री!
- डॉ. अक्रम पठाण : मुस्लिम मराठी साहित्याचे साक्षेपी अभ्यासक
लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि सिनेसमीक्षक आहेत.