काही माणसं पटकन डायजेस्ट होत नाहीत, ही तशीच आहे. तिचे सूर मनाला आवडतात पण बुद्धीला पटत नाहीत. ती अवचित उगवते, सूर आभाळभर पसरून ठेवते, सुरांच्या प्रांगणात आधीच चिंब भिजल्यावर ही अचानक अजून एक सर घेऊन येते.
इच्छा नसताना कुणीतरी जबरदस्तीने ओढून न्यावं तसं जावं लागतं, मनसोक्त भिजल्यानंतर पुन्हा ही वरून धबधब्यासारखी कोसळत राहते आणि मग लक्षात येते की यातही एक वेगळीच तृप्ती आहे. सलमाचे सूर असेच वेगळी अनुभूती प्रत्येक वेळेस देतात.
तिच्या आवाजाचा कित्येकांना तिटकारा आहे. खूप अनुनासिक गाते म्हणे.. खरं ही आहे.. कधीही बरी न झालेल्या, सर्दी भरलेल्या नाकातून गाते. अशी अनेक दूषणे दिली तरीही ती ठासून गात राहते. कारण तिचा आवाज पब्लिकला आवडतो. हा आवाज नॉर्मल नाही हे जाणवते तरी आवडत राहतो.
समजा लता मंगेशकर आलीच नसती तर आजही आपण अशाच आवाजात गाणी ऐकत बसलो असतो, हे ही तितकच सत्य आहे. एक काळ लताला ही अशाच नूरजहाँच्या आवाजात संगीतकार गायला लावत होते. लताने पुढे मात्र सगळं गणित बदलून टाकले आणि आपल्याला नॉर्मल आवाजात गाणी गाणाऱ्या गायिका मिळाल्या.
असे युनिक आवाज अधूनमधून उमटत होते. सिनेमातील बॅकराउंड व्हॉइस, तसेच सिनेमात वापरले जाणारे डिस्को, पॉप, किंवा क्वचित रागदारीसाठी असे काही आवाज वापरले जायचे पण आख्खे स्वर नभांगण व्यापून टाकणारे बळ त्यांना मिळाले नाही. सिनेमाच्या एका मर्यादित चौकटीत त्यांनी त्यांचे विश्व तयार करून ठेवले.
वाचा : ‘बाबूजी धीरे चलना…’ म्हणणारी सदाबहार शकीला
वाचा : मदनमोहन : अविट चालीची गाणी देणारा प्रतिभाशाली संगीतकार
ऐंशीच्या दशकात संगीत ऐन भरात बदलत असताना सलमा आगा अचानक अवतरली. तिच्या आवाजाला प्रचंड नावं ठेवली गेली तरीही तिची गाणी हिट झाली. हिच्या आवाजाला सिनेसृष्टीत कमी दर्जाचं मानलं जायचं. पण जे चालतंय तेच वापरायचं, आणि तेच वाजवायचे या अलिखित नियमाने तिला गाणी मिळत गेली आणि आपल्या वेगळ्या स्वरावर अद्भुत विश्वास असलेल्या सलमाने तिची बहुतांशी गाणी हिट करून दाखवली.
नुसत्या लोणच्या बरोबर सगळं जेवण जेवता येत नसलं तरी लोणच्याचा एखादा घास मात्र मेंदूला हलकीशी झिणझिणी आणून देतो तसं सलमाच्या आवाजाचे होऊ लागले होते. ‘उंचे लोग’ या सिनेमात ही बया साक्षात किशोर कुमार बरोबर गायली. किशोरच्या मदमस्त आवाजात ‘तू मेरा क्या लागे’ ऐकताना अचानक सलमाचा आवाजात ‘दिन बिती बातो मे…’ची एक लकेर ऐकू येते आणि क्षणभर किशोरलाही विसरायला लावते.
कधी कधी मलाच आश्चर्य वाटायचे हे असे कसे घडू शकतं? मनावर निग्रह ठेऊनही मी ते गाणं पुनःपुन्हा ऐकलं, तरीही तोच अनुभव येत राहतो. मग लक्षात येतं की काही गोष्टी आपण जाणीवपूर्वक टाळायला लागलो की त्यांच्याकडे जास्त लक्ष जाते. तशीच सलमा मनात अलगद घर करायला लागली होती.
आता ‘दिल के आरमा आसू..’पेक्षा ‘फ़जा भी जवा जवा’ जास्त आवडायला लागले होते. उर्दूचे तिचे उच्चार जास्त प्रभावी होत होते. ‘शायद उनका आखरी था ये सितम, हर सितम ये सोच कर हम सेह गये’ या कडव्यातील तीचे अस्खलित उच्चार ऐकले की उर्दू भाषेची गोडी अधिक जाणवायला लागते.
‘‘मेरा नाम सलमा’ आणि ‘चुम्मा चुम्मा’ ही ‘आपके साथ’ आणि ‘पाताल भैरवी’मधील गाणी ऐकली की एका गज़ल गायिकेचे हे नव दुसरं रूप अचंभित करत होते. विशेष म्हणजे रती अग्निहोत्री आणि डिंपल ला ही आवाज कळत नकळत सूट होऊन जातो.
नदीम श्रवण सारखा संगीतकार ही आपल्या पहिल्या ‘मैने जिना सिख लिया’ या सिनेमात सलमा कडून ‘जरा जरा तू प्यार कर’ हे अफलातून गाणं गाऊन घेतात. पती पत्नी और तवायफ या सिनेमातील ‘केहना ना तुम ये किसींसे’ हे तर वडापमध्ये सर्वाधिक वाजवले जाणारे गाणं असायचे. याच सिनेमातील ‘तेरी मोहब्बत और मेरी जवानी’ कानांना बरे वाटू लागते. ‘मित मेरे मन के’ या सिनेमातील ‘चले आओ’ या गाण्यातील तिच्या आवाजाची नजाकत काही औरच आहे.
२५ ऑक्टोबर १९५६साली जन्मलेल्या सलमा आगाचा आवाज वादळासारखा आहे, आधी घोंगावतो, जर तुम्ही आसपास असला तर तुम्हाला कवेत घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही, इतका गुंतवून ठेवतो. तिचा पडद्यावरचा अवतार ही असाच धक्कादायक होता. सलमाच्या आधीच्या दोन पिढ्या हिंदी सिनेमात होत्याच.
तिची आजी अनवरी बेगम ने १९३२ साली प्रचंड गाजलेल्या ‘हिर रांझा’मध्ये नायिका साकारली होती. पुढे पृथ्वीराज कपूरच्या मामा अर्थात जुगलकिशोर मेहरा बरोबर निकाह केला. नंतर सलमाच्या आईने नसरीन गजनवी ने ‘शहाजहान’ सिनेमातून एन्ट्री केली होती.
घरातच सिनेमा असूनही आजी अनवरी बेगमने सलमाच्या सिनेमातील प्रवेशाला बंदी घातली होती. त्यातूनही कुणी सलमाला साइन करायला लागले की आजी मध्ये पडून बेत हाणून पाडायची. राज कापूरशी घरगुती संबंध असल्याने ऋषीच्या लग्नाचे आमंत्रण मिळताच नसरीन, सलमाला घेऊन मुंबईत आली.
वाचा : जॉनी वॉकर : नायकाच्या समांतर रोल मिळवणारा सहयोगी कलावंत
वाचा : बॉलीवूडचे इफ्तेखार दिसताच, खरे पोलीस त्यांना सॅल्युट ठोकत
राजकपूर ‘हीना’ या सिनेमासाठी पाकिस्तानी मुलीच्या शोधात आहे ही बातमी नसरीनला आधीच लागली होती, म्हणून ती जाणीवपूर्वक सलमाला घेऊन आली. लग्नाच्या धामधुमीत राज चे सलमाकडे लक्ष ही गेले नाही. पण बी आर चोप्रानी मात्र तिला पाहिले आणि त्यांच्या ‘तलाक तलाक तलाक’ (निकाह सिनेमाचे आधीचे नाव) साठी साइन केले.
प्रश्न होता तो सलमाच्या आवाजला मॅच होईल असा आवाज कुठून आणायचा हा होता. संगीतकार रवी आणि बी आर असेच नौशादना भेटायला गेले तर पुन्हा तिथे सलमा आधीच येऊन बसलेली होती. नौशादना स्वतःच्या काही गज़ला ऐकवत होती. तिथेच हीचाच आवाज सिनेमात वापरायचा नक्की ठरला.
‘निकाह’ या सिनेमाची हिंदी फिल्मसृष्टी अक्षरशः ढवळून निघाली. या सामाजिक सिनेमाने क्रांती केली होती. सर्वत्र आता निकाहची गाणी गाजत होती. सलमाला अलगदपणे उत्तुंग यश लाभले होते.
मुळातच धरसोड वृत्तीच्या सलमाला ते यश पचवता आले नाही. अति चांगल्या भूमिकेच्या अट्टाहास पायी काही चांगले सिनेमे तिने सोडून दिले. ‘कसम पैदा करनेवाले की’ हा अजून एक हिट सिनेमा मिळाला. त्यातली ही तिची पॉप गाणी जोरदार गाजली.
सलमा व्हरायटी गाऊ लागली होती. दरम्यान ‘सलमा’ याच नावाचा सिनेमा आला. सिनेमा फारसा चालला नाही पण सलमाला तवायफ, ‘दुसरी स्त्री’ या टाईपच्या भूमिका मिळू लागल्या, अशा सिनेमातील तिचा वावर सुंदर असायचा.
‘पती पत्नी और तवायफ’, हिट झाल्यावर ते ‘मीत मेरे मन के’पर्यंत तशाच भूमिका तिच्याकडे येऊ लागल्या होत्या. इकडे जम बसत असतानाच सलमा मधूनच पाकिस्तानला निघून जायची. तिथे ही तिने जवळपास तीस सिनेमे केले. यापैकी कित्येक सिनेमात तिचा नायक जावेद शेख हा असायचा. त्याच्या सोबतच तिने पहिला निकाह केला.
अवघ्या सहा महिन्यात दोघांनी घटस्फोट घेतला. मग सलमाने रेहमत खान बरोबर दुसरा निकाह केला. सात-आठ वर्षात हे ही नातं तुटलं. शेवटी दहा वर्षांपूर्वी २०११ मध्ये दुबईमधील प्रख्यात व्यावसायिक मंझर शाह बरोबर तिसरे लग्न केले.
आता तिची मुलगी साशा आगाने ही बॉलीवूडमध्ये यशराज बॅनर निर्मित अर्जुन कपूरच्या ‘औरंगजेब’ या सिनेमातुन एन्ट्री केली आहे. अनवरी बेगम- नसरीन गजनवी- सलमा आगा- साशा आगा चार पिढ्यांचा रतीब इथे चालू आहे. पण सलमाचे यश इतर कुणालाच मिळाले नाही. तिला लाभला तसा आवाजही कुणाला लाभला नाही.
थोडी मेहनत आणि जरा डोकं लावले असते तर आज कदाचित तिच्याबद्दल वेगळं चित्र दिसले असते. आज करण्यासारखे काही नसले तरी ती अनेक मुशायरे अजूनही गाजवते. तिच्या असंख्य गज़लांचे अनेक फॅन जगात आहेत. तिची गाणी पाकिस्तानमध्ये अजूनही चर्चेत आहेत.
वाचा : दिलीपकुमार यांची अदाकारी परिपूर्ण होती, पण….
वाचा : रूपेरी पडद्यावर ‘नाच्या’ची परंपरा कशी सुरू झाली?
सध्या पुन्हा तिने स्वतःचे कार्यक्रम करायला सुरू केले आहेत, जिथं संधी मिळेल तिथे ती तिच्या आजही जपलेल्या त्याच अनुनासिक स्वरांनी पोहचते. अवघे विश्व त्या दोन तासासाठी ती तिचेच करून टाकते.
तुम्हाला आवडो न आवडो तुम्ही त्या दोन तासासाठी फक्त तिचेच होता, इतकं अजब रसायन ती समोर मांडते. तिचे स्वर हिप्नॉटिझम करतात, भारावून सोडतात.
उजेडाची सवय असताना अचानक आलेल्या बोगद्यातील मिणमिणता प्रकाश जशी साथ सोबत पुरवतो, तो त्या क्षणी जसा महत्त्वाचा असतो. तशीच सलमा आयुष्यातील प्रवासात कायमची राहते. प्रवासातील त्या बोगद्यातील तीच दैदिप्यमान अस्तित्व नेहमी सोबत राहणार ह्याची खात्री असते. तिचा दर्द आपल्या आवाजात उतरत राहतो, मन आपसूक गुणगुणायला लागते..
खुद को भी हमने मिटा डाला मगर
फासले जो दरमिया थे, वो रह गये।
जाता जाता :