रूपेरी पडद्यावर ‘नाच्या’ची परंपरा कशी सुरू झाली?

‘तमाशा म्हणजेच नाच्या आणि नाच्या म्हणजेच तमाशा!’ ‘नटरंग’ चित्रपटात पांडबा आणि गुणा कागलकर यांच्यामधला हा संवाद! खरं तर हा संवाद ‘नाच्या’ या मध्यवर्ती भूमिकेभोवती ‘नटरंग’चं कथानक गुंफलं असल्यामुळे आला आहे. परंतु वस्तुत: तमाशात सरदार, सोंगाडय़ा आणि शाहीर यांच्यानंतरच नाच्याचा विचार होतो.

मुजरा, गौळण आणि वगातल्या एखाद्या भूमिकेत स्त्रीपात्र रंगवणारा, नाचकाम करणारा आणि लळित गाणारा असा नाच्या ढोलकीफडाच्या तमाशामध्ये विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अतिशय लोकप्रिय होता. पवळा आणि चंद्राबाई या दोन स्त्रिया पहिल्यांदा तमाशात नाचू लागल्या आणि हळूहळू तमाशाच्या बोर्डावरून नाच्या अंतर्धान पावला.

नाच्याचे बेगडी कवित्व सुरू झाले ते मात्र रूपेरी पडद्यावर! मराठी चित्रपटांतून डोक्यावर लाल मखमली टोपी, सुरवार-सदरा आणि त्यावर जॅकेट, एक पाय गुडघ्यात दुमडलेला, कमरेला लचके देत चालणारा आणि बायकी आवाजात बोलणारा नाच्या उभा राहिला तो गणपत पाटलांच्या रूपाने!

हाताची टाळी देत ‘आत्ता गं बया!’ असे लाडिकपणे म्हणणारा नाच्या हा तृतीयपंथी परंपरेतला- हा जावईशोध आपल्याकडे अनंत माने, व्ही. शांताराम अशा ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शकांनी लावला आणि मग नाच्याचे नाचकाम रूपेरी पडद्यावर सुरू झाले.

तृतीयपंथी नाच्या म्हणजेच पुरुषत्व गमावलेला नाच्या या स्वरूपातला तुलनेने प्रायोगिक म्हणता येईल असा ‘सख्या सजणा’ हा पहिला चित्रपट भालजी पेंढारकरांनी काढला. ज्यात गणपत पाटील आणि उषा चव्हाण यांची मध्यवर्ती भूमिका होती.

‘सख्या सजणा’नंतर तब्बल ३०-३५ वर्षांनी ‘नटरंग’च्या निमित्ताने पुन्हा नाच्याविषयीचे कुतूहल जागृत झाले आहे. स्त्री-पात्र रंगविणाऱ्यांची संख्या आपल्याकडे कमी नाही. पूर्वी संगीत नाटकांमध्ये पुरुष मंडळीच स्त्री-पात्रं रंगवीत. मात्र त्यांच्या कामाची, अभिनयाची भरपूर प्रशंसा झाली. मरणोत्तर त्यांचे पुतळे बसवले गेले, त्यांच्या नावांचे मार्ग तयार झाले.

दुसऱ्या बाजूला तितक्याच ताकदीच्या अभिनयाने स्त्री-पात्र रंगविणाऱ्या नाच्यांच्या वाट्याला मात्र कायम अवहेलना आणि केवळ दु:खच आलं. हा भेदाभेद का, याचीही कारणे तपासली पाहिजेत.

वाचा : गणपत पाटील : अभिनयाची शिक्षा भोगणारा खरा ‘नटरंग’

वाचा : जॉनी वॉकर : नायकाच्या समांतर रोल मिळवणारा सहयोगी कलावंत    

काय आहे इतिहास?

‘नटरंग’ चित्रपटाची निर्मिती ही आनंद यादव यांच्या ‘नटरंग’ कादंबरीवर आधारित असल्याने कादंबरीतल्या कल्पनेच्या भराऱ्यांप्रमाणेच चित्रपटातही कल्पनेच्या भराऱ्या येणे साहजिक आहे. ‘नटरंग’मधील ‘गुणा कागलकर’ या नाच्यामुळे काही प्रश्न उपस्थित होतात. ते असे-

(१) ढोलकीफडाच्या तमाशात तृतीयपंथी नाच्या होता का? (२) नाच्या परंपरेने बाळसे कधी धरले? (३) तमाशात नाच्या नेमके काय करीत असे? (४) रूपेरी पडद्यावरील नाच्या आणि ढोलकीफडातील पारंपरिक नाच्या यांच्यात नेमका कोणता फरक आहे? (५) ‘नटरंग’मधील नाच्या किती खरा, किती खोटा? ..अशा अनेक प्रश्नांचे मोहोळ मनात उठले आणि त्याची उत्तरे काही ज्येष्ठ तमाशा कलाकारांकडून मिळविण्याचा प्रयत्न केला. तो असा..

नाच्यांबद्दल लिहिण्यापूर्वी त्यांच्या इतिहासात डोकावणे गरजेचे आहे. साधारणत: अठराव्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये ‘तमाशा’ हा प्रकार उदयाला आला, तो मुस्लिम सैनिकांच्या छावण्या उदयास आल्या म्हणून! मुस्लिम सैनिकांना उत्तरी मुलखातील बायकांचा नाच बघण्याचे वेड होते. त्यामुळे त्यांनी जेव्हा मराठी मुलखावर आक्रमण केले तेव्हा आपल्या मनोरंजनासाठी गावकुसाबाहेरच्या लोककलावंतांचे फड निर्माण केले. ही मंडळी गाणी रचायची आणि छावण्यांत जाऊन मुस्लिम सैनिकांचे मनोरंजन करायची.

मराठी मुलखात त्यावेळी बोर्डावर बाई नाचायची पद्धत नव्हती. तशी समाजाची परवानगीच नव्हती. मग एखादा देखणा, मिसरूड न फुटलेला तरुण ते निवडायचे आणि त्याला रंगरंगोटी करून नाचवायचे. यालाच पुढे ‘तमाशा’ म्हणायला लागले. मूळ फारसी शब्द, तेथून उर्दूत आला.

जरी ‘तमाशा’ हा फारसी शब्द असला तरी त्याचे सादरीकरण हे पूर्णपणे मराठी मातीतलं आणि अस्सल मराठी संस्कृतीतलं होतं. पुढे १७६० नंतर- म्हणजे औरंगजेबच्या मृत्यूनंतर मुस्लिम सैनिक निघून गेले आणि ही कला सादर करणारी मंडळी मग दूरवरच्या खेड्यापाड्यात आपली कला सादर करायला लागली.

पेशवाईच्या काळात या लोककलावंतांना राजाश्रय मिळाला. पहिल्या बाजीराव पेशव्याने काही शाहिरांना राजाश्रय दिला. हे शाहीर तमाशा करायचे. परंतु त्यात नाचे नव्हते. शाहीर फुटकळ रचना करायचे. स्तुतिगीतांच्या लावण्या आणि कवने रचायचे आणि पेशव्यांसमोर सादर करायचे. मात्र त्याच काळात पेशवाईत पुण्यात कोठ्यावर नाचे नाचायचे. असा हा नाच्यांचा प्रवास आहे.

पुरुषांनी स्त्री-पात्र साकारल्याचा उल्लेख आपल्याकडील संतांच्या अभंगांतूनही आहे. समर्थ रामदासांनीच एका रचनेत ‘खेळता नेटके दशावतारी’ असे म्हटले आहे. त्यांनी या रचनेत नानाकळा करणारे- म्हणजे विविध कला सादर करणारे हे स्त्रीवेषधारी ‘अवघे धटिंगण’ असा शब्द वापरला आहे. त्यामुळे १७ व्या शतकापासून पुरुषांनी स्त्रियांची भूमिका साकारण्याची परंपरा सुरू झाली होती, असे म्हणता येऊ शकेल.

ढोलकीफडाच्या तमाशात जसा सोंगाड्या, सरदार किंवा शाहीर असतो, तसाच नाच्याही असतो. किंबहुना तमाशात सोंगाड्या, सरदार, शाहीर यांच्याइतकाच नाच्या हे महत्त्वाचे पात्र असते. हा नाच्या काय करायचा? तर तो मुजरा, गौळणीमध्ये नाचायचे काम करायचा. जो दिसायला देखणा असे आणि ज्याला पारंपरिक लावण्या, कवने मुखोद्गत असत, अशांनाच तमाशा फडात नाच्याची भूमिका मिळायची.

या नाच्यांची वेशभूषाही सर्वस्वी वेगळी होती. त्यांचे केस वाढलेले असायचे. ते सुरवार-सदऱ्यावरच लुगडं नेसायचे आणि डोक्यावरून पदर घ्यायचे. त्यांच्यात एक प्रकारची नजाकत असे. मात्र त्यांचे हालचाली वा लकबी कधीच ततीयपंथींसारख्या नव्हत्या. त्यांचा आवाजही बायकी नसे. ढोलकीफडाच्या तमाशात नाचे हे केवळ नाचायचेच काम करीत नसत, तर ते वगनाटय़ातही तितक्याच ताकदीने कामं करत.

जो कलावंत गण आणि गौळणीत नाच्याच्या भूमिकेत दिसायचा, तोच कलावंत नंतर वगनाट्यात खलनायकाची, राजेमहाराजाची भूमिकाही रंगवायचा. नाचे फक्त जुजबी असायचे.. आविष्काराची गरज म्हणून! तमाशात काम करणारे सगळे कलावंत प्रामुख्याने अस्पृश्य आणि भटक्या विमुक्त जाती-जमातींमधलेच असत.

हे कलावंत एकेकाळी गोंधळ, जागरण, डौर घालण्याचे काम करीत. हीच मंडळी पुढे मानेपर्यंत केस वाढवून तमाशात नाचायला लागली आणि त्यांना नाचे म्हटले जाऊ लागले. त्यावेळी मंदिर परिसरात देवदास आणि देवदासी नृत्य करत. त्यांचीच परंपरा पुढे तमाशात आली. आपल्याकडे अनेक महान कलावंतांनी नाच्याची भूमिका केली आहे.

वाचा : ‘साहिबे आलम’ दिलीपकुमार यांचा मराठी बाणा

वाचा : दिलीपकुमार : मुस्लिम ओबीसी चळवळीचे ‘अर्ध्वयू’

पुरुषच नाच्या का ?

भाऊ फक्कड, दादू तुळापूरकरांपासून ते चंद्रकांत ढवळपुरीकर, काळू-बाळूपर्यंत प्रत्येकजण कधी ना कधी नाच्या झालेला होता. नाच्याला स्वतंत्र अशी ओळख नव्हती. संगीतबारीच्या तमाशातही नाच्या तृतीयपंथी असल्याचा कुठेही उल्लेख सापडत नाही. रंगभूषा करणे, कपडे सांभाळणे, प्रमुख कलावंतांचे सामान उचलणे ही कामे त्याकाळी जोगतिणी करत. मात्र नाच्या हा शंभर टक्के पुरुषच असायचा. त्याला मुलंबाळं असायची, संसार असायचा.

रूपेरी पडद्यावरचा नाच्या मात्र तृतीयपंथी का रंगवला गेला, आणि त्याची वेशभूषा ढोलकीफडाच्या तमाशातील नाच्यापेक्षा सर्वस्वी वेगळी कशी झाली, याबद्दल बोलताना मुंबई विद्यापीठातील लोककला अकादमीचे प्रमुख प्रा. गणेश चंदनशिवे म्हणतात की,

“अनंत माने आणि व्ही. शांताराम यांनी नाच्या हा तृतीयपंथी असतो, असे अनेक चित्रपटांमधून दाखविले. नाच्याचे हे रूप त्यांनी उत्तर भारतातून आणले असण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात जे मुजरे, पेशे चालायचे, त्यात तृतीयपंथी नाच्या असायचा. जो गिऱ्हाईकांना पान-सुपारी द्यायचा, अत्तर लावायचा, गजरे द्यायचा किंवा दलालीची कामे करायचा.

त्याची वेशभूषा सदरा-चुडीदार, त्यावर मखमली जॅकेट, डोक्यावर लाल मखमली टोपी, एक पाय कमरेत दुमडलेला आणि बायकी हावभाव करणारा असा तो असायचा. तीच परंपरा नाच्याच्या रूपात या ज्येष्ठ मराठी दिग्दर्शकांनी रूपेरी पडद्यावर आणली. रूपेरी पडद्यावर नाच्या अनेक झाले, मात्र गणपत पाटलांनंतर दुसरा गणपत पाटील निर्माण होऊ शकला नाही.”

रूपेरी पडद्यावर ज्या पद्धतीने नाच्या रंगवला गेला, ते पाहून नाच्याबद्दल सर्वसामान्यांच्या मनात खूप वेगवेगळ्या भावना येणे स्वाभाविक आहे. नाच्यांच्या वाट्याला कायम अवहेलनाच येत असणार.. नाच्यांचे व्यक्तिगत तसंच सामाजिक जीवन किती भयानक असेल.. त्यांच्यावर किती अत्याचार होत असतील.. वगैरे वगैरे!

कारण रूपेरी पडद्यावर नाच्याचे पात्र असेच उभे केले गेले होते. अगदी आजचा ‘नटरंग’ही याला अपवाद नाही. मात्र, प्रत्यक्षात वस्तुस्थिती खूपच वेगळी आहे. ढोलकीफडाच्या तमाशाच्या इतिहासात आजपर्यंत एकही नाच्या हा तृतीयपंथी नव्हता. या नाच्यांना मुलंबाळं होती. त्यांना संसार होते

वाचा : ‘बाबूजी धीरे चलना…’ म्हणणारी सदाबहार शकीला

वाचा : सलमा आग़ा : बॉलीवूडने नाव ठेवले, तरी ठरली सुपरहिट गायिका

लोककलावंत म्हणून अवहेलना

त्यांच्या वाट्याला सामाजिक अवहेलना जरी आली असली, तरी ती ते नाच्या असल्यामुळे नव्हे, तर एक लोककलावंत म्हणून जी अवहेलना लोककलावंतांच्या वाट्याला येत होती, तीच त्यांच्याही वाट्याला येत असे. या अवहेलनेमागे जातिव्यवस्था, गरिबी ही कारणे होती.

मराठी चित्रपटांमध्ये नाच्याची भूमिका अजरामर करून ठेवणाऱ्या गणपत पाटील यांनाही सात मुलं होती. तेदेखील पैलवान गडी होते. त्यांचा शेवट जरी क्लेशदायक झाला असला तरी त्यामागे आर्थिक विवंचना हेच प्रमुख कारण होते.

काही वर्षांमागे कोपरगाव येथे एका नाच्यावर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. हा नाच्या अतिशय देखणा होता. पण त्यालाही मुलंबाळं होती. एका विकृत माणसाने निव्वळ लैंगिक विकृतीपोटी या नाच्यावर बलात्कार केला होता. अशा काही अपवादात्मक घटना घडल्याही असतील; मात्र त्याचा सरसकट अर्थ काढणे चुकीचे आहे.

सुखदेव माने हे नाच्याचे आयुष्य जगलेले असेच एक भन्नाट कलावंत. या सुखदेव मानेंनी तमाशासम्राज्ञी विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्या तमाशाफडात नाच्याची भूमिका केली होती. सुखदेव माने हे पंढरपूरचे नगरसेवक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस म्हणून आणि तमासगिरांचे पुढारी म्हणूनही कार्य करतात.

नारायणगाव या तमाशाच्या पंढरीत सुखदेव मानेंना ‘लोकसत्ता’चे नारायणगावचे वार्ताहर सचिन कांकारिया यांनी गाठले. म्हणतात, “नाच्या म्हणून काम करताना मला रसिकांकडून भरभरून प्रेम मिळाले. देखणी अक्का, थोरली अक्का म्हणून मी प्रसिद्ध होते..”

सुखदेव भीमराव माने भूतकाळात रमले.. “घरची बेताची परिस्थिती. शिक्षण तिसरीपर्यंत झालेले. वडिलांनी मारलं म्हणून घरातून रागाने बाहेर पडलो. गाण्याची आवड असल्याने तमाशात जाण्याचे ठरविले. वयाच्या दहाव्या वर्षी काळू-बाळूच्या तमाशात बिनपगारी छोटी छोटी कामे करू लागलो. काळू-बाळूने मला कलाकारीचे धडे दिले. चांगला सांभाळ केला. तेच माझे खरे गुरू आहेत.

कालांतराने विठाबाई भाऊ मांग यांच्या तमाशाफडात १०० रुपये पगारावर काम सुरू केले. ‘चंद्रमोहन’ या वगात युवराजची (मोहन) भूमिका केली. ‘राजगडची राणी अर्थात् पन्हाळगडचा कैदी’मध्ये राजारामची भूमिका केली. परंतु कलावंत म्हणून खरी सुरुवात झाली ती ‘पाटलाची अवलाद’ या वगनाट्यात सीआयडी म्हणून व नाच्याची भूमिका केली तिथून. येथूनच मी नाच्या म्हणून परिचित झालो.

नाच्या म्हणून काम करताना अनेक प्रसंग आले. मी खराच नाच्या आहे, असे सर्वाना वाटत असे. रसिक दौलतजादा करताना माझा हात दाबायचे. हा खरंच छक्का आहे का, हे पाहण्यासाठी तंबूतही घुसायचे. कपडे बदलताना चोरून लपून बघायचे. तृतीयपंथी म्हणून डोळे मारायचे. मी तृतीयपंथी आहे की नाही, यावरून पैजा लावायचे.

एकदा तर वग संपल्यानंतर एक पोलीस इन्स्पेक्टर हात धुऊन माझ्या मागे लागला होता. त्याच्या हाता-पाया पडून ‘मी बाप्या आहे, बाई नाही’ असे सांगितले तेव्हा माझी सुटका झाली. नाच्या म्हणून काम करताना घरात वाईट प्रसंग आला नाही. परंतु इतर लोक मला हिणवायचे. मला लग्नासाठी मुलगी मिळत नव्हते. तीन-चार स्थळे आली, पण नाच्या म्हणून त्यांनी मुलगी दिली नाही.

काही दिवस घरीच थांबलो. शेवटी नात्यातली एक मुलगी पाहिली व माझे लग्न झाले. लग्नानंतर दोन वर्षांनी पत्नी रंजना हिने पंढरपूर यात्रेत माझे काम पाहिले. विठाबाईने रंजनाला समजावून सांगितले. माझ्या कामावर रंजना खूश झाली. तिला समाधान वाटले. मला तीन मुलगे, एक मुलगी आहे. एक मुलगा एम. ए. होऊन बँकेत नोकरीला आहे. एक शेती करतो. तिसरा कॉन्ट्रॅक्टर व राजकारणात आहे. मुलीचे लग्न झाले आहे.

तमाशामध्ये ३० वर्षे काम केले. नाच्याबरोबर सोंगाड्या, राजकुमार, मावशी यांच्याही भूमिका केल्या. ‘सवाल-जबाब’मध्ये मी नाचकाम केले आहे. पाटलाची, रोहिदासाचीही भूमिका केली आहे. विठाबाई, कांताबाई सातारकर, काळू-बाळू, जगताप पाटील पिंपळेकर, पांडुरंग मुळे, सरस्वतीबाई कोल्हापूरकर, चंद्रकांत ढवळपुरीकरसह दत्ता महाडिक आदी दिग्गज कलाकार व फडमालकांकडे मी काम केले आहे.

शासनाने ‘दलितमित्र’ पुरस्काराने मला २००६-०७मध्ये सन्मानित केले आहे. १९९५मध्ये मी तमासगिरांचा पुढारी झालो. नगरपरिषदेच्या निवडणुकीत बिनविरोध निवड होऊन नगरसेवक झालो. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचा सोलापूर जिल्हा सरचिटणीस म्हणून मी कार्यरत आहे.”

वाचा : राहत इंदोरी : जमिनीशी नाळ जोडलेला कलंदर शायर

वाचा : मराठीतील ‘कोहिनूर-ए-गझल’ इलाही जमादार

रूपेरी पडद्यावरील नाच्या

१९६०-७० पासून ढोलकीफडातील नाच्यांची परंपरा बंद पडली. परंतु रूपेरी पडद्यावर मात्र हा नाच्या अजूनही साकारला जात आहे. अगदी ‘दे धक्का’पासून ते ‘नटरंग’पर्यंत! आज महाराष्ट्रात हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच नाचे शिल्लक आहेत. सगळेच थकले आहेत.

ढोलकीफडाच्या मालकांनी या नाच्यांना वाऱ्यावर सोडलेले नाही. आजही त्यांना तमाशाच्या फडात मानाचे स्थान आहे. तमाशा फडाचे सामान ज्या पेटाऱ्यात असते त्याची पूजा करण्याचा मान नाच्यांना असतो. नाच्या हा तमाशाचा ‘बेअरिंग’ असला तरी तो आता मावशीच्या रूपात तमाशा फडामध्ये जिवंत आहे.

सदरा-लेंग्यावर लुगडं नेसून, डोक्यावर पदर घेऊन मिसरूड असलेली आणि कुंकू लावणारी मावशी आज तमाशात केवळ पाच मिनिटांसाठीच उरली आहे. कमरेखालचे विनोद आणि अश्लील हावभाव यामुळे मावशीच्या व्यक्तिरेखेलाही आता फारसे महत्त्व उरलेले नाही.

मराठी सिनेमामध्ये ‘नटरंग’ चित्रपट गाजला. या चित्रपटाचे दिग्दर्शक रवी जाधव यांची याबाबतीतली भूमिका जाणून घेणे गरजेचे होते. ते या नाच्या परंपरेसंबंधात बोलताना म्हणाले की, “तमाशांमध्ये किंवा यापूर्वीच्या मराठी चित्रपटांमध्ये जेव्हा मी नाच्या पाहिला, तेव्हा खरोखरच चाट पडलो. अभिनय आणि नजाकतींमध्ये इतक्या ताकदीचा असतानाही नाच्याच्या वाटय़ाला मानहानी का यावी, याचा मी विचार करू लागलो.

संगीत रंगभूमीवर स्त्री-पात्र रंगविणाऱ्या पुरुष कलावंतांना ‘व्वा! क्या बात है!’ अशी दाद मिळे. पण नाच्यांच्या वाट्याला ती का आली नाही? नाच्या कधी बालगंधर्व का होऊ शकले नाहीत, याचे मला दु:ख होत असे. आपल्याकडे विदुषकावर चित्रपट निघाले, मात्र नाच्यासारख्या व्यक्तिरेखेवर नाही. म्हणूनच या विषयावर चित्रपट काढण्याचा मी निश्चय केला.

रूपेरी पडद्यावर आतापर्यंत साकारलेल्या नाच्यांचा मी अगदी बारकाईने अभ्यास केला होता. ‘नटरंग’मधील ‘गुणा कागलकर’ ही नाच्याची व्यक्तिरेखा पूर्णपणे वेगळी आहे. हा नाच्या फक्त स्टेजवरच नाच्या दाखविण्यात आला आहे. एकदा का तो स्टेजवरून खाली उतरला, की तो पुरुषच दाखवला आहे.

यापूर्वीच्या चित्रपटांतून नाच्यांचे नेमके याच्या उलट चित्रण केले गेले आहे. नाच्या हा तमाशातील स्त्री-कलावंतांची लुगडी धुताना, पाय चेपताना दाखवण्यात आले आहेत. गुणा कागलकर साकारताना आम्ही फक्त यापूर्वीच्या नाच्यांचा ‘लुक’ वापरला. म्हणजे त्यांची वेशभूषा आणि बायकी हावभाव कायम ठेवले.”

‘नटरंग’मधील नाच्यावर होणाऱ्या बलात्काराच्या दृश्यावर अनेक लोककलावंतांनी आणि लोककला अभ्यासकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्या संदर्भात रवी जाधव म्हणतात की, “नाच्यावर होणारा बलात्कार हा फक्त प्रतीकात्मक म्हणून दाखविण्यात आला आहे. हा ‘फिजिकल’ बलात्कार नसून ‘सिम्बॉलिक’ आहे. हे दृश्य एक रूपक म्हणून वापरण्यात आले आहे. कला विरुद्ध राजकारण असा हा संघर्ष आहे.

राजकारण्यांनी कलावंतांना नेहमीच आपल्या फायद्यासाठी वापरून घेतलेले आहे. प्रत्यक्षातही समाजात आज हे घडताना दिसते. त्यामुळे कलावंतांची ही एक अब्रू घेणेच आहे. शिवाय ‘नटरंग’ चित्रपट बनविताना आम्ही इथल्या सर्वसामान्य प्रेक्षकांप्रमाणेच आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांनाही गृहीत धरले होते.

कलावंताची परवड दाखवताना मनाला झिणझिण्या आणणाऱ्या दृश्याची गरज होती आणि हे दृश्य दाखवून आम्ही सामान्य प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचलो आहोत असे मला वाटते.”

रूपेरी पडद्यावर नाच्या हा तृतीयपंथी आणि गणपत पाटील यांच्या ‘आत्ता गं बया!’ स्टाईलने रंगविला गेला असला, तरी ज्या वगनाट्यांमध्ये पुरुषच स्त्रियांची कामे करीत असत, त्या वगनाट्यांमधील स्त्री-वेषधारी या पुरुष नाच्याने मराठी लोकरंगभूमीवर एक स्वतंत्र परंपरा निर्माण केली आहे.

‘नटरंग’ पाहताना मराठी मातीतल्या अस्सल रांगड्या तमाशातील अशा असंख्य ज्ञात-अज्ञात नाच्यांचे चेहरे डोळ्यांसमोर तरळून गेले. मानेवर रुळणाऱ्या केसांनी, तसेच भृकुटीविलास आणि कटीविलास दाखविणाऱ्या नाच्यांनी लोकरंगभूमीवर देशी बाण्याच्या बालगंधर्वाची परंपरा निर्माण केली. ‘नटरंग’च्या निमित्ताने या परंपरेला हा सलाम!

(सदरील लेख लोकसत्ता दैनिकात २७ मार्च २०१०ला प्रकाशित झालेला आहे.)

जाता जाता :