भीमा कोरेगावमधील जयस्तंभ – राजकारण, जात आणि ब्रिटिशसत्तेची स्मृती

भीमा कोरेगावमधील जयस्तंभाच्या स्मृतींचा इतिहास अतिशय विस्मयकारक आहे. वर्तमानामध्ये प्रभुत्वसत्तेसाठी (hegemony) सुरू असलेल्या चढाओढीचे ठसे स्मृतींमधील चढाओढीवरही पडलेले असतात, याचा लक्षणीय दाखला म्हणून कोरेगावमधील या स्मारकाकडे बघता येते.

साम्राज्यवादी युद्धातील एका रक्तरंजित लढाईची स्मृती जतन करणारे हे स्मारक आहे. साम्राज्यवादी सत्ताधाऱ्यांनी आपलं बळ आणि वीरश्री यांच्यावरचा दृढविश्वास दर्शवण्यासाठी भीमा कोरेगाव इथे उभारलेला हा स्तंभ आता तोच उद्देश दुसऱ्या लोकसमूहासाठी- पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांसाठी- पार पाडतो आहे.

अस्पृश्यांनी त्यांच्यावर जुलूम करणाऱ्या एतद्देशीय सत्तेविरोधातील लढ्यामध्ये वसाहतवाद्यांना साथ दिली होती. या स्मारकाच्या ठिकाणी वार्षिक यात्रा भरवण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू असलेली दिसते.  पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांची (आताच्या नव-बौद्धांची) स्वतंत्र संस्कृती निर्माण करण्याचा व ती लोकांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न म्हणून या परंपरेकडे पाहावे लागेल.

विविध जातींमधील विषमतेची समस्या भारतीय समाजाला ग्रासून असताना या स्मारकाच्या भोवतीही परस्परविरोधी स्मृतींचा वेढा पडल्याचे निदर्शनास येते. आजघडीला, कोरेगाव स्मारकाबद्दलच्या स्मृतीचे स्वरूप, स्तंभाकडे बघणाऱ्याच्या सामाजिक स्थानावर अवलंबून दिसते.

साम्राज्यवादी सत्तेचा शेवट होण्याच्या कितीतरी आधीच ब्रिटिश लोकस्मृतीमधून हे स्मारक विरून गेलेले आहे. परंतु, इथल्या स्मरणोत्सवाचे कायापालट झालेले पुनरुज्जीवित स्वरूप त्याच्या मूळ हेतूपेक्षा बऱ्याच भिन्न गोष्टी सूचित करते.

कोरेगावची लढाई आणि त्याचे स्मारक

भारताच्या पूर्व आणि उत्तर भागांमधील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे राजकीय वर्चस्व १७५७ सालच्या प्लासीच्या लढाईनंतर वाढत गेले. त्यानंतर हळूहळू कंपनीचा राजकीय प्रभाव भारताच्या इतरही भागांमध्ये विस्तारू लागला.

याच काळात पुण्यातील सत्ताधारी पेशवे (१७०७-१८१८) आपला राजकीय प्रभाव विस्तारण्याचा प्रयत्न करत होते. परिणामी पेशवे आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यातील संघर्ष अटळ होता. तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धातील अनेक लढायांची आणि बाळाजीपंत नातूच्या वैयक्तिक स्वार्थाची परिणती होऊन १७ नव्हेंबर १८१७ रोजी शनिवारवाड्यावर यूनियन जॅक फडकला आणि दुसऱ्या बाजीरावाला सेनेसह पुणे सोडावे लागले.

त्यानंतर लवकरच एक जानेवारी १८१८ रोजी कंपनीचा सेनाधिकारी एफ. एफ. स्टॉन्टन यांच्या नेतृत्वाखालील शिरूरहून पुण्याला निघालेल्या सुमारे ९०० सैनिकांच्या बटालियनची पेशव्यांच्या नेतृत्वाखालील २० हजार सैन्यबळ असलेल्या फौजेशी अचानकपणे गाठ पडली. भीमा नदीच्या काठावरील कोरेगाव या गावातल्या या लढाईत ब्रिटिशांचा विजय झाला.

तत्कालीन अधिकारी व इतिहासकार ग्रान्ट डफ यांच्या शब्दांत, ‘कॅप्टन स्टॉन्टन यांना रसदीची चणचण भासत होती. अशा परिस्थितीत आधीच विश्रांतीअभावी थकलेले सैन्य रात्रीची दीर्घ पायपीट करून आलेले, आता जळत्या उन्हात अन्नपाण्याविना संघर्षाला सामोरे गेले. ब्रिटिशांनी भारतात लढलेली ही एक अतिशय अवघड लढाई होती.

या लढाईत मोठी हानी होऊनही आणि पेशवा सैन्याचा अगदी निर्णायक पराभव न करूनदेखील स्टॉन्टनच्या सैनिकांना आपल्या शस्त्रसामग्रीसह जखमी अधिकाऱ्यांना व जवानांना शिरूरला परत आणण्यात यश आले. पेशवा सैन्याने मात्र रणांगण सोडले आणि ते साताऱ्याच्या दिशेने निघून गेले.’

इंग्रज आणि मराठा यांच्यातील युद्धामधील शेवटच्या काही लढायांमध्ये या लढाईची गणना होते. या युद्धात कंपनीचा संपूर्ण विजय झाला, त्यामुळे ही चकमक विजयासाठी स्मरणात ठेवली गेली. ईस्ट इंडिया कंपनीने आपल्या सैनिकांना मानसन्मान बहाल करण्यात अजिबात हयगय केली नाही. गव्हर्नर जनरलने स्टॉन्टनला ‘एड्-डी-कॅम्प’ (परिसहायक) या सन्माननीय पदावर बढती दिली.

१८१९ सालच्या संसदीय चर्चेमध्येही या लढाईचा विशेष उल्लेख करण्यात आला. या ठिकाणी स्मारक उभारण्यासाठी तजवीज करण्यात आली आणि वर्षभराने या गावावरून जाणाऱ्या लेफ्टनंट जनरल देलामिन यांना ६० फुटी जयस्तंभाच्या रूपातील स्मारकाचे बांधकाम सुरू असलेले दिसले.

कोरेगावचे हे स्मारक आजही शाबूत आहे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि पेशव्यांचे सैन्य यांच्यातील ‘अटीतटीच्या संघर्षामध्ये या गावाचे यशस्वी संरक्षण केलेल्या’ ब्रिटिश व भारतीय सैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा स्तंभ उभारला आहे. स्तंभाच्या चारही बाजूंनी संगमरवरी स्मारकशिला आहेत. दोन बाजूंच्या इंग्रजी मजकुराचे मराठीतील भाषांतर उर्वरित दोन बाजूंच्या शिलांवर आहे.

‘ब्रिटिश सैन्याच्या पूर्वेकडील सर्वांत अभिमानास्पद विजयांपैकी एक विजय साध्य करणाऱ्या’ कॅप्टन स्टॉन्टन व त्यांच्या सैनिकांनी कोरेगावचे संरक्षण केले, त्याच्या स्मरणार्थ हा स्तंभ उभारण्यात येत असल्याचे स्मृतिफलकावर म्हटले आहे. त्यानंतर लगेचच ‘कोरेगाव’ (Corregaum) हा शब्द आणि सदर जयस्तंभ यांना बॉम्बे नेटिव्ह लाइट इन्फन्ट्रीच्या (जिला पुढे महार रेजिमेंट हे नाव मिळाले) अधिकृत सन्मानचिन्हावर जागा मिळाली.

या पराक्रमाचे वर्णन मार्च १८१९मधील ब्रिटिश संसदीय चर्चेत पुढील शब्दांत करण्यात आले होते : ‘अखेरीस त्यांनी सन्मान्य माघार घेतली, शिवाय आपल्यापैकी जखमी झालेल्यांना परतही आणले!’ चार्ल्स मॅकफार्लेन यांनी १८४४ साली प्रसिद्ध केलेल्या ‘अवर इंडियन एम्पायर’ या अभ्यासामध्ये गव्हर्नरला पाठवण्यात आलेल्या अधिकृत अहवालातील अवतरण दिले आहे.

कोरेगावमधील लढाईत ‘युरोपीय व एतद्देशीय सैनिकांनी सर्वोच्च उदात्त निष्ठा आणि सर्वोच्च स्वप्नवत शौर्य दाखवले; कुठल्याही सैन्याने साध्य केलेल्या सर्वोत्तम कामगिरींमध्ये याची गणना होईल,’ असे त्यात नोंदवलेले आहे. ‘मानवी सहनशीलतेचा जवळपास अंत पाहाणारी तहान व भूक यांना तोंड देत’ कंपनीच्या शूर सैन्याने ‘दाखवलेली सर्वोच्च निष्ठा आणि सर्वोच्च अद्भुत शौर्य’ यांची मॅकफार्लेन यांनी प्रशंसा केली आहे.

वीस वर्षांनी हेन्री मॉरीस यांनी अधिक आत्मविश्वासाने पुढील टिप्पणी केलेली दिसते : ‘भारतातील इंग्रजांच्या सर्वाधिक धाडसी कामगिऱ्यांपैकी एक कामगिरी पार पाडून कॅप्टन स्टॉन्टन शिरूरमध्ये परतले तेव्हा रंग उधळले जात होते, ढोल बडवले जात होते.’१०

वासाहतिक सत्तेच्या त्यानंतरच्या बखरकारांनी या सैन्यावरील कौतुकाचा वर्षाव सुरूच ठेवला. १८८५ साली तर दूर न्यूझीलंडमध्ये प्रकाशित होणाऱ्या ‘ग्रे रिव्हर आर्गस’ या वर्तमानपत्रानेही सदर लढाईचे भपकेबाज वर्णन केले होते.११ त्यानंतरचे शतक उजाडल्यावर मात्र या लढाईची चकाकी धूसर व्हायला सुरुवात झाली, आणि कालांतराने ही घटना ब्रिटनच्या लोकस्मृतीतून लोपच पावली.१२

आता केवळ सैनिकी इतिहासाच्या विशेष वाङ्मयातच या लढाईचा उल्लेख केला जातो. त्यातही ब्रिटिश लढाऊ क्षमतेचा दाखला म्हणून नव्हे, तर भारतीय सैनिकांच्या लढाऊ क्षमतांबाबत हा उल्लेख होतो.१३

2 thoughts on “भीमा कोरेगावमधील जयस्तंभ – राजकारण, जात आणि ब्रिटिशसत्तेची स्मृती

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.