भारताविषयी बाबरनाम्यातील लिखाण, त्यातील निरिक्षणे, निसर्गाची आणि जीवनाची वर्णने बाबरच्या परहितसहिष्णू विचारांना अधोरेखित करतात. सामान्य शेतकऱ्यांविषयी बाबरला प्रचंड आस्था वाटे. कृषी पद्धती, सिंचनातील बदल, वातावरणानुसार होणारा पीकांमधला बदल यांची बाबरने अत्यंत बारकाईने माहिती घेतली होती.
मुळात फिरस्ता असणारा बाबर कृषिविषयक निरनिराळ्या प्रदेशातला अनुभव शेतकऱ्यांना सांगायचा. शेतकऱ्यांनी नव्या पद्धती स्वीकाराव्यात, उत्पादन वाढवावे म्हणून तो नेहमी प्रयत्नशील राहिला. त्याने अफगाणिस्तानात बियाणे वाटण्याचा उद्योगही करुन पाहिला.
मात्र त्यातून राज्याच्या महसुली उत्पन्नात वाढ झाली नाही. अथवा कोणता सकारात्मक परिणामही झाला नाही. त्याचा हा प्रयोग काहिसा अपयशी ठरला. कृषी सुधारणेत त्याला प्रचंड रस होता. लष्करी मोहिमांवर असतानाही त्याने याकडे दुर्लक्ष केले नाही.
पूर्व आणि पश्चिमेच्या अभियानात व्यस्त असतानाही बाबरने केलेल्या कृषी सुधारणेची माहिती राधेश्याम यांनी आपल्या ‘बाबर’ या ग्रंथात दिली आहे. ते लिहितात, “बाबरने काबुलला समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. या राज्याचे वार्षिक महसुली उत्पन्न वाढावे म्हणून देखील त्याने प्रयत्न केले. याच हेतुने कृषी क्षेत्रात काही सुधारणा देखील केल्या. काही नव्या पीकांच्या उत्पादनाला सुरुवात केली.
तुमानमध्ये भातशेती मोठ्या प्रमाणात आहे. तेथे त्याने काही बागा लावल्या. फळांच्या या बागा सुखरुद आणि अदीनापुर किल्याच्या दरम्यान लावल्या होत्या. त्या ‘बाग ए वफा’ या नावाने विख्यात होत्या.
लाहोर आणि दिपालपुर जिंकल्यानंतर बाबरने तेथे उसाची शेती केली. केळीची बाग लावली. उसाची शेती इतकी उत्तम होती की, अधिकाधिक साखर तयार करुन बुखारा आणि बंदख्शा येथे पाठवली जायची.” (पान-३८३,३८४)
वाचा : भारताच्या लोकजीवनाविषयी बाबरला होती आस्था
वाचा : बाबर : सुफी परंपरेवर अत्याधिक निष्ठा ठेवणारा राज्यकर्ता
शेतकऱ्यांना न्यायाने वागवले
कृषी सुधारणेमागे त्याचा हेतू महसुली उत्पन्नातील वाढीपुरता मर्यादित नव्हता. त्याला सामान्य शेतकऱ्याच्या जगण्याची देखील काळजी होती. त्याने शेतकऱ्यांवर अवाजवी बोजा लादला नाही.
एकदा फरगण्याच्या बहुतांश प्रदेशावर शत्रुंनी हल्ले केले. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था खुपच बिकट बनली. तेव्हा शेतकऱ्यांकडून कर गोळा करणे त्याने टाळले होते. बाबरनाम्यात त्याविषयी तो लिहितो, “याठिकाणच्या (दुर्दैवी) लोकांकडून काय वसूल करावे?”
बाबर हा मुळचा सुफी परंपरेतला होता. त्याची नक्शबंदी पंथावर निष्ठा होती. सुफींच्या औदार्याचे विचार त्याच्या कृतीतून स्पष्ट दिसत होते. अब्दुल कुद्दुस गंगोही हे त्यावेळेसचे प्रख्यात सुफी होते. त्यांच्याविषयी बाबरला प्रचंड आदर वाटायचा. त्यांनी बाबरला लिहिलेले एक पत्र उपलब्ध आहे.
त्यामध्ये ते बाबरला म्हणतात, “प्रार्थना आहे की, सर्व सर्वसन्मानित सम्राटाच्या काळात सर्वकाही योग्य आणि सन्मार्गाने घडत आहे. विद्वान, संत, उलेमा आणि असहाय्य लोकाकडे अधिकाधिक लक्ष द्यायला हवे. त्यांना ‘मदद ए मआश’ (महसूल मुक्त जमीन) द्यावी.
त्यांच्याकडून ‘उश’ (महसूल) वसूल करू नये. कारण अशा प्रकारचा कर अत्यंत घृणित आणि अन्यायी आहे. संताकडून काहीही मागणे विवेकाच्या विरोधी आहे. गरीबांकडून सरकारी कर वसूल करून आणणे योग्य नाही. हे शरीयतचे उल्लंघन आहे. त्याच्या वसुलीने जगात घोर अंधकार पसरेल. निर्धन आणि शोषित लोक आक्रोष करायला लागतील. एखाद्या खाईत कोसळण्यासारखे हे कार्य असेल. अनुकंपा दाखवून ते माफ केले जावे.”
वाचा : बाबरने शब्दबद्ध केलेला भारत कसा होता?
वाचा : सम्राट अकबरला मूर्ख ठरवणाऱ्या बिरबल कथा
गरिबांशी सहानुभूती
याच पत्रात गंगोही यांनी बाबरला कोणावरही अत्याचार न करण्याची सूचना दिली आहे. बाबरनेदेखील या पत्रातल्या सूचना मान्य केल्याचे दिसते. त्याने गरीबांना छळण्याचा प्रयत्न केला नाही. त्याने त्याच्या सहकार्यांना आणि सैनिकांना देखील प्रचंड औदार्याने वागवले. त्यांना शिक्षा देण्यापेक्षा त्यांच्यात सुधारणा घडवण्याकडे त्याचा कल होता. त्याने सहकाऱ्यांची मदत घेतली.
बाबरने गरीबांना आपल्यापासून कधीही दूर लोटले नाही. औदार्य हा बाबरच्या व्यक्तिमत्त्वातील महत्त्वाचा घटक होता. बाबरच्या व्यक्तिमत्त्वासंदर्भात माहिती देताना राधेश्याम यांनी त्याला ‘बाबर’ ग्रंथामध्ये अधोरेखित केले आहे. ते लिहितात,
“त्याच्या ममत्वाने आणि मृदु स्वभावाने अनुयायी आणि समर्थकांमध्ये आत्मबळ निर्माण केले होते. मृदुलता आणि कठोरता यांचा मोठ्या प्रमाणात त्याच्या व्यक्तिमत्त्वात समावेश होता. त्यामुळेच लोक त्याच्या आज्ञांचे सुलभतेने पालन करत.”
आपल्यानंतर मोगल सत्ता याच पद्धतीने चालावी यासाठी त्याने प्रयत्न केले. आपल्या मुलांना त्याने त्या पद्धतीने उपदेश करणारी पत्रे लिहिली. कामरान आणि हुमायुं यांना लिहिलेल्या पत्रातून त्याची मोगल सत्तेविषयीची संकल्पना त्याने मांडली आहे.
वाचा : गुरुविना घडलेले महान संगीतज्ज्ञ अमीर खुसरो
वाचा : कशी होती तुघलक काळातील ईद?
कामरानला लिहिलेले पत्र
बाबरने आपल्या मुलांना अनेक पत्रे लिहिली. त्यातील हुमायुंला लिहिलेली दोन्ही पत्रे त्याने बाबरनाम्यात नमूद केली आहेत. इतिहासाच्या अभ्यासकांकडून त्याविषयी खुप चर्चा केली जाते. मात्र बाबरने त्याच्या दुसऱ्या मुलाला लिहिलेल्या पत्राची इतिहाससंशोधक बेवरीज यांच्याव्यतिरित इतर अभ्यासकांनी दखल घेतली नाही.
बेवरीज यांनी या पत्रावर एक शोधनिबंध लिहिला आहे. त्यामध्ये त्यांनी मूळ पत्र दिले आहे. कामरानला लिहिलेल्या त्या पत्रात बाबर म्हणतो, “हे पहा, तू चांगल्या मार्गातून कधीही भटकू नये. आणि तुझ्या बुद्धीत ख्वाजा हाफीज यांचे हे शब्द सतत स्मरले जावेत. वृद्ध पुरुष अनुभवाच्या गोष्टी सांगतात. हो हेच मी माझ्या मुला तुला सांगतोय.
या बुजुर्गाचे मार्गदर्शन ऐक. तू कधीही तरुण वर्गातील लोकांच्या सूचना सहजतेने ऐकू नकोस. त्यांना राजकार्य देऊ नकोस. तू सदैव वृद्ध, अनुभवी, उदार आणि निष्ठावान तथा सत्यवादी बेग जे तथ्यांची पडताळणी चांगल्या पद्धतीने करतात. त्यांच्या इच्छा आणि सूचनांप्रमाणे कार्य करावे.
तू त्या लोकांच्या भूमिकांच्या पुढे जाऊ नयेस, जे लोक हुशार, मृदुभाषी आणि तर्क करण्यात कुशल आहेत. कधीही चापलुस आणि कपटी लोकांच्या भुलथापांमध्ये अडकू नकोस.”
हुमायुंला लिहिलेल्या वसिहतनाम्याच्या बरोबरीचे हे पत्र आहे. पण कामरान हा हुमायुंऐवजी सत्तेत आला नाही. म्हणून त्याला लिहिलेल्या या पत्राची चर्चा इतिहासात हुमायुंच्या वसिहतनाम्याप्रमाणे होऊ शकली नाही. हुमायुंला लिहिलेला वसिहतनामादेखील या पत्रापेक्षा विस्तृत आहे.
वाचा : पुस्तकातून उरलेला बाबरी-आयोध्यावाद
वाचा : काय आहे अयोध्या-बाबरी मस्जिदीचा वाद?
हुमायुंला लिहिलेला वसिहतनामा
वसिहतनाम्यामध्ये बाबरने भारताविषयी त्याने मांडलेल्या मतांचा सार आहे. एकात्मता, धार्मिक सहिष्णुता वगैरे मुल्यांचा उल्लेख बाबरने त्यात केला आहे. त्यामुळे बाबरचा वसिहतनामा मुळातून अभ्यासणे गरजेचे आहे. त्याने लिहिलेला वसिहतनामा असा-
“हे मुला, या भारत देशात विभिन्न संप्रदाय विद्यमान आहेत. ईश्वरला धन्यवाद. त्याच्या इश्वरी कृपेने हे (राज्य) तुला मिळाले आहे. तू तुझ्या हृदयाला सांप्रदायिक पक्षपातापासून मुक्त ठेवावे. प्रत्येक संप्रदायाशी योग्य न्याय करावा. विशेषतः गोहत्येपासून तू दुर राहायला हवे. यामुळे तू भारतातील प्रजेची मने जिंकू शकशील. प्रजा अथवा जनता शाही शुभ व्यवहारामुळे राज्याशी जोडली जाईल.
कोणत्याही धर्माच्या जे शासनाच्या अधिपत्याखाली आहेत, मंदिराना आणि प्रार्थनागृहांना उद्ध्वस्त करु नकोस. न्याय अशा पद्धतीने कर की, प्रजा राजामुळे आणि राजा प्रजेमुळे आनंदी राहतील. इस्लामची प्रगती अत्याचाराच्या तलवारीऐवजी सहिष्णुतेच्या साधनाने करणे अधिक हितकर आहे.
शिया-सुन्नींच्या पारंपरिक भांडणाकडे लक्ष देऊ नकोस. कारण त्या इस्लामच्या शाखा आहेत. विभिन्न संप्रदायांना मानणाऱ्या प्रजेचे चार तत्त्वांद्वारे संगठन करावे, जेणेकरुन राज्य त्याच्या शरीराच्या व्याधींपासून सुरक्षीत राहिल. आदरणीय अमीर तैमूर साहेबांचे शासन आपल्या नजरेसमोर ठेवावे, त्यामुळे शासनकार्य योग्य होईल.”
बाबरच्या धार्मिक दृष्टीचा बऱ्यापैकी परिचय या वसिहतनाम्यातून होतो. बाबरवर असलेल्या सुफी परंपरेच्या प्रभावाची देखील या वसिहतनाम्यातून प्रचिती येते. बाबरच्या धार्मिक धोरणात देखील याच वसिहतनाम्यातील विचारांचा अंश पाहायला मिळतो.
जाता जाता :
लेखक डेक्कन क्वेस्ट मराठीचे संपादक असून मध्ययुगीन इतिहासाचे अभ्यासक आहेत. ‘सल्तनत ए खुदादाद’ या टिपू सुलतान वरील वेस्ट सेलर पुस्तकाचे लेखक आहेत. इतिहासावर त्यांची पाच पुस्तके प्रकाशित आहेत.