जेव्हा कायदामंत्री डॉ. आंबेडकर उर्दूमधील कामकाज पाहण्यासाठी कोर्टात बसले

कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात एखादी अशी घटना असते, जी तिच्यासाठी आनंददायी आणि ऐतिहासिकही ठरते. माझे वडील अॅड. शेखलाल पटेल यांच्या जीवनातही अशी घटना घडली. ती इतक्या वर्षांनंतर सांगण्याचे कारण म्हणजे नव्या पिढीला त्यातून प्रेरणा मिळावी आणि डॉ. आंबेडकरांच्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचा एक अनोखा पैलू समोर यावा.

माझे वडील औरंगाबाद जिल्ह्याच्या खुलताबाद तालुक्यातील बोडखा या अगदी छोट्याशा गावचे रहिवासी. त्यांचे प्राथमिक शिक्षण मराठी भाषेत झालेले. पण, इंग्रजीवर त्यांचे प्रभुत्व होते. उर्दूविषयीही त्यांच्या मनात ओढ होती. शिक्षण हाच प्रगतीचा मार्ग ही त्यांची धारणा होती.

त्यांनी हैदराबादेतील उस्मानिया विद्यापीठातून बी.एस्सी, एलएलबी पूर्ण करून औरंगाबादेत वकिली सुरू केली.मराठवाडा निजाम राजवटीतून १७ सप्टेंबर १९४८ रोजी स्वतंत्र झाला. त्या काळात मुस्लिमांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण होते. ते दूर करण्यासाठी तातडीने काहीतरी करावेच लागेल, हे त्यांच्या लक्षात आले. म्हणूनच त्यांनी औरंगाबादमध्ये अंजुमन इशाअते तालीम संस्थेची स्थापना केली.

त्या माध्यमातून मौलाना आज़ाद हायस्कूल, झिया उल उलूम मुलींची शाळा सुरू केली. एकीकडे शाळेचे कामकाज आणि दुसरीकडे वकिली अशी जबाबदारी ते सांभाळत.

वाचा : ‘औरंगाबाद समाचार’ : निजाम राजवटीतले उर्दू-मराठी द्वि-भाषी वृत्तपत्र

वाचा : औरंगाबादच्या नामांतरास पर्याय ‘संभाजीनगर’ नव्हे ‘अंबराबाद’!

ऐतिहासिक दिवस

मराठी, उर्दू आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांचा जाणकार वकील अशी त्यांची पंचक्रोशीत ओळख होती. यामुळे त्यांच्या जीवनात तो ऐतिहासिक दिवस आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री झाले होते. त्यांना हैदराबाद संस्थानातील न्यायालयात उर्दूतून कामकाज कसे चालते, हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. त्यांनी याबाबत काही जाणकारांकडे विचारणा केली.

तेव्हा औरंगाबादचे तत्कालीन जिल्हा न्यायाधीश चंद्रशेखर गोडसे तसेच बार असोसिएशनतर्फे डॉ. बाबासाहेबांना विशेष निमंत्रण देण्यात आले. न्या. गोडसे यांनी युक्तिवादासाठी माझ्या वडिलांना म्हणजे अॅड. शेखलाल पटेल यांना बोलावले.


एवढ्या महान व्यक्तीसमोर युक्तिवादाची संधी मिळाल्याने वडील खूप आनंदित झाले होते. २८ जुलै १९५० रोजी डॉ. आंबेडकरांसमोर त्यांनी सुमारे ५० मिनिटे उर्दूतून युक्तिवाद केला.

त्या वेळी सरदार दलिपसिंग, अॅड. काझी हमीदुद्दीन, अॅड. अफझलुद्दीन नेहरी, अॅड. रामराव महाजन, अॅड. सीतानारायण लोहिया, अॅड. सिद्धार्थ देशमुख, अॅड. दत्तोपंत देशपांडे, अॅड. जेथलिया, अॅड. नेवासकर, अॅड. पी. आर. देशमुख, अॅड. नावंदर, अॅड. लक्ष्मीकांत कुलकर्णी, अॅड. वैष्णव आदी मान्यवर उपस्थित होते.

औरंगाबादप्रमाणेच इथल्या न्यायालयीन व्यवस्थेसाठी ऐतिहासिक ठरलेले ते क्षण माझ्या वडिलांनी हृदयाच्या कुपीत अखेरपर्यंत जपले. आमच्या कुटुंबासाठी तर तो अभिमानाने सांभाळावा असा अमूल्य ठेवा ठरला.उर्दूतील कामकाज पाहण्याची उत्सुकता, ५० मिनिटे ऐकला युक्तिवाद

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे औरंगाबाद शहरात दीर्घकाळ वास्तव्य होते. विविध निमित्ताने ते येथे येत असत. पण, एकदा ते जिल्हा सत्र न्यायालयात उर्दूतून कामकाज कसे चालते, हे जाणून घेण्यासाठी आले होते.

२८ जुलै १९५० रोजी अॅड. शेखलाल पटेल यांनी त्यांच्या उपस्थितीत सुमारे ५० मिनिटे युक्तिवाद केला. त्या घटनेस आज बुधवारी २९ जुलै रोजी ७१ वर्षे होत असल्याच्या निमित्ताने अॅड. पटेल यांचे सुपुत्र अॅड. कमरुद्दीन पटेल यांनी वडिलांकडून मिळालेला या घटनेच्या आठवणींचा ठेवा उलगडला.

(सभार : दिव्य मराठी, औरंगाबाद आवृत्ती)

जाता जाता :