‘औरंगाबाद समाचार’ : निजाम राजवटीतले उर्दू-मराठी द्वि-भाषी वृत्तपत्र

वृत्तपत्राचा इतिहास हा सामाजिक व राजकीय इतिहासाशी निगडित असतो. वृत्तपत्रे हे साधन म्हणून वेगवेगळ्या चळवळीत वापरण्यात येते. त्यामुळे चळवळीच्या इतिहासाचा एक भाग म्हणून वृत्तपत्रांचा विचार होतो. मराठवाड्यातील वृत्तपत्रांचा इतिहासही ‘मराठवाडा मुक्ती संग्रामा’च्या इतिहासाशी निगडित आहे. त्याचा स्वतंत्रपणे विचार व अभ्यास होण्याची गरज आहे.

मराठवाडा ही संताची भूमी आहे, ही ऐतिहासिक भूमी आहे. मराठवाडा हे मराठीचे माहेरघर आहे, असा या प्रदेशाचा गौरव करण्यात येतो. परंतु मगठी वृत्तपत्रांच्या इतिहासात मराठवाड्याच्या पत्रसृष्टीच्या वाट्याला मराठवाड्याचा उल्लेख फा​​रसा आढळत नाही. त्याचे कारण मराठवाड्याचा हा प्रदेश हैद्राबाद संस्थानाच्या अधिपत्याखाली असल्यामुळे जुन्या मराठी उर्दू वृत्तपत्रांचा आढावा घेताना मराठवाड्यात जुन्या वृत्तपत्रांची काही परंपरा आहे. येथेही पूर्वी काही वृत्तपत्रे निघत होती, त्यांची नोंद घेतली पाहिजे इकडे लक्ष राहिले नाही.

मराठी वृत्तपत्र सृष्टीचा इतिहास सांगणाऱ्या श्री. कानडे यांच्या पुस्तकात एकोणिसाव्या शतकात. हैदराबाद येथून प्रसिद्ध होणाऱ्या ‘निजाम वैभव’ – ‘निजाम विजय’ या वृत्तपत्राचा दोन किंवा चार ओळीमध्ये उल्लेख केलेला आढळेल. त्याखेरीज औरंगाबाद किंवा मराठवाडा येथून निघणाऱ्या वृत्तपत्रांबाबत काहीच माहिती उपलब्ध नाही.

तसेच मराठवाड्यातील वृत्तपत्रांच्या इतिहासाचा धावता किंवा त्रोटक एक सलग आढावा घेण्याचा फारसा प्रयत्नही झालेला दिसत नाही.

वाचा : शासनाच्या मराठी मंडळावर मुस्लिम का नाहीत?

वाचा : साहित्य-संस्कृती व्यवहारातील पालखीवाहू ‘मुस्लिम’

मराठवाड्यातील सर्वात जुने किंबहुना पहिले वृत्तपत्र म्हणून ‘औरंगाबाद समाचार’ या साप्ताहिकाचा उल्लेख करावा लागेल. १८८६ सालचा त्या वृत्तपत्राचा एक अंक अलीकडेच उपलब्ध झाला. तो औरंगाबादच्या एका ग्रंथालयात जपून ठेवण्यात आला आहे. (लेखाचे छायाचित्र) दुर्दैवाने या अंकावर संपादकाच्या नावाचा काहीच उल्लेख नाही. त्यामुळे हा अंक कोणी काढला, त्याचे संपादक कोण, तो किती काळ चालला वगैरे सर्व माहिती अज्ञातच राहाते.  या अंकावर पुस्तक तिसरे अंक एकविसावा असा उल्लेख आहे. त्यावरुन १८८६ मध्ये हे वृत्तपत्र सुरू झाले असावे असे स्पष्ट दिसते.

मराठवाड्याच्या कपाळी संस्थानी राजवटीचा वरवंटा असल्यामुळे वृत्तपत्र स्वातंत्र्याबाबत उर्वरित ब्रिटिश अमलाखालील महाराष्ट्रापेक्षा येथील स्थिती भिन्न होती. राज्यकर्त्यांच्या दडपणाचा दरारा आणि मागासलेपण अशा दोन्ही कारणांनी वृत्तपत्रीय क्षेत्राची पहाट येथे लवकर उजाडू शकली नाही. ज्यांनी धाडसाने वृत्तपत्र काढले त्यांना अज्ञातवासीच राहावे लागेल. त्यामुळे पत्रकारितेचे क्षेत्र फारसे फुलू शकले नाही.

आज मराठवाड्याच्या वृत्तपत्र सृष्टीमध्ये जी काही परभराट दिसते आहे. ती अगदी अलीकडेच राज्यपुनर्रचनेनंतरची आहे, असे दिसते. आज अत्यंत आधुनिक अशा यंत्रसामग्रीद्वारे येथील वृत्तपत्रांची छपाई होत आहे. त्यांच्या रविवारच्या आवृत्त्या आकर्षक निघत आहेत व दैनिकाबाबतही चुरस निर्माण झाली आहे.

हे दृश्य ताजे असले तरी मराठवाड्यातील वृत्तपत्रांचा आढावा फार तर पन्नास पंचाहत्तर वर्षामागे जाऊ शकत नाही. याचा अर्थ वृत्तपत्रीय प्रयत्न झाले नाहीत, असे म्हणणे अतिव्याप ठरेल. त्या झालेल्या प्रयत्नांचा पुरावा किंवा त्यांची माहिती उपलब्ध नाही त्यामुळे त्याबाबत निश्चित काही सांगता येत नाही.

एवढे मात्र खरे, हैदराबाद संस्थानात १८६४ साली इंग्रजी व १८७८ साली उर्दू वृत्तपत्रे जन्माला आली. १८९७मध्ये  ‘निजाम वैभव’ सुरू झाले १९०६ ते १९०८ पर्यंत ‘भाग्येषु विजय’ हे वृत्तपत्र चालू होते. त्यानंतर ‘निजाम विजय’ या वृत्तपत्राचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हे वृत्तपत्र चालले. केवळ मराठी भाषा बोलणाऱ्या ३२ लाख हिंदी जनतेसाठी हे एकच वृत्तपत्र चालले ही गोष्टही लक्षात घेण्यासारखी आहे. त्याला पुरेसे वर्गणीदार मिळाले नाहीत ही दु:खाची गोष्ट होय.

वाचा : रफिक झकारिया : एक समर्पित राजकारणी आणि विचारवंत

वाचा : भारत-पाकमध्ये दोस्ती करू पाहणारे फिरोज अशरफ

‘निजाम विजया’च्या जुन्या अंकाच्या प्रती सुदैवाने उपलब्ध आहेत. त्याचा संशोधकांनी अभ्यास करणे आवश्यक आहे. ‘औरंगाबाद समाचार’ या वृत्तपत्राच्या उपलब्ध अंकासंबंधी येथील पत्रकार श्री.नागनाथ फटाले यांनी सविस्तर अभ्यास केला. एकोणिसाव्या शतकातील वृत्तपत्राच्या स्वरूपाची कल्पना त्यावरून येते.

महाराष्ट्रातील तत्कालिन वृत्तपत्रे व हा अंक यांच्यात एक मोठा तात्वीक फरक दिसतो. १८८६ सालचा हा अंक वाचला तर ‘वृत्त’पत्र म्हणूनच त्याचे महत्त्व होते. ते मतपत्र नव्हते हे लक्षात येईल.

हयुमन इंटरेस्टच्या बातम्या त्या अंकात आहे. समारंभाचे वृत्तांत आहेत. त्या बातम्यामध्येच संपादकास किंवा लिहिणारास त्यासंबंधी वाटणारे विचार दिले आहेत परंतु संपादकीय किंवा स्फुटे – आम्हास काय वाटते इ.इ, मात्र त्यात नाहीत. त्या अंकाचे स्वरुप माहितीपूर्ण व उपयुक्त असावे. फसली १२९६ म्हणजे १८८६ सालामध्ये वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांची सविस्तर यादी त्यात छापली आहे.

हैदराबादच्या राजवटीतील एक गाजलेले दिवाण सर सालारजंग यांनी एका मोठ्या समारंभात केलेल्या भाषणाचा वृत्तांत सटीक दिला आहे. या समारंभात सर सालारजंग यांनी राणीच्या व निजामच्या गौरवपद व स्तुती करणारे व्याख्यान केले. त्यात राणीची व राजाची स्तुती करताना स्वत:विषयी पुष्कळ तारीफ करून तिच्या राज्यव्यवस्थेच्या स्तुतीत माजी मुसलमानी राजवटीची पुष्कळ प्रकारे निर्भत्सना केली. ही गोष्ट संपादकास खटकली.

यासंबंधी संपादकांनी लिहिले की, “सर सालारजंग हे एका बड्या मुसलमान घराण्यातील मनुष्य असून त्यांचा माजी मुसलमानी राज्याशी काही एक प्रकारे संबंधही आहे. असे असता त्यांच्या हातून माजी मुसलमानी कारकिर्दीची अशी निर्भत्सना बाहेर येणे हे इतिहासात लिहून ठेवण्यासारखेच दिसते.

हे या व्याख्यान देणारे दिवाण सर सालारजंग यांनी या वेळी तसे म्हणण्याचे काय कारण होते याचा थोडा विचार केला असता तर त्यास थोडी बहुत तरी कारणे सापडली असती. त्या कारणांचा किंश्चितही उल्लेख न करता शाळेत शिकविण्याच्या घड्यात जी रंगीत वाक्ये दाखल केलेली आहेत. त्यांचा मात्र त्यांनी व्याख्यानात उपयोग केला असे यावरुन होते.”

वाचा : जेव्हा कायदामंत्री डॉ. आंबेडकर उर्दूमधील कामकाज पाहण्यासाठी कोर्टात बसले

वाचा : औरंगाबादच्या नामांतरास पर्याय ‘संभाजीनगर’ नव्हे ‘अंबराबाद’!

वार्ता देण्याची ही एक पद्धत झाली. आजकालच्या वृत्तपत्रात मानवी आस्था (हयूमन इंटरेस्ट) म्हणून ज्याचा उल्लेख करतात अशा तऱ्हेच्या बातम्या ‘औरंगाबाद समाचार’मध्ये येत असाव्यात. कारण सदरहू अंकात ‘वर्तमानसार’ या सदरात दिलेली अशीच एक बातमी पहा, ‘मुंबई -गेल्या शुक्रवारी पनवेलची एक बाई शेफर्ड कंपनीच्या आगबोटीतून येऊन कनीक बंदरावर उतरली व तेथेच ती बाळंत होऊन तिस कन्या झाली. त्या बाईने एका हमालाजवळ आपले सामान देऊनागपाड्यावर आपल्या भावाच्या इथे येण्यास सांगितले. परंतु बाई घरी येऊन पाहते तो हमालाचा पत्ता नाही.’

याच अंकात ‘तंटया भिल्ल’ याच्या हालचाली विषयी माहिती दिलेली (बातमी स्वरुपात आहे.) “तंटया भिल्ल हा एक मध्य हिंदुस्थानातील रॉबिन हूडच आहे.” लंडन, पॅरिस, या ठिकाणच्याही बातम्या या अंकात आहेत. याशिवाय जाहीर नोटिस, लिहून आलेला मजकूर आणि एक काव्यही दिले आहे. काव्याच्या पंक्ती अशा आहेत. ‘हिंदुभूमीचे सार्थक । उत्सव आला घरी । राज्याला पन्नास वर्षपुरी ।।’ व्हिक्टोरिया राणीच्या राज्याला पन्नास वर्ष पूर्ण पाण्याच्या प्रसंगावर हे काव्य रचिले आहे.

मराठी वृत्तपत्र सष्टीच्या प्रारंभकाळी ‘दर्पण’कर्ते श्री.बाळशास्त्री जांभेकर आपल्या अंकात ज्याप्रमाणे अर्धा मजकूर मराठीत आणि अर्था मजकूर इंग्रजीत त्याप्रमाणे अकात एका पानावर (पान ४) अर्धा मजकूर उर्दूत व अर्धा मराठीत देण्यात आला आहे, हे वैशिष्टय होय. निजामच्या राजवटीत सरकारला उद्देशून द्यावयाचा मजकूर किंवा उर्दू भाषिकांना माहीत म्हावा असा मजकूर उर्दूतून (फारसी) देण्याची पद्धत त्यांनी काढली असावी,

‘औरंगाबाद समाचार’ची नेमप्लेट मोठी सजविलेली आणि आकर्षक असल्याचे दिसते. या पहिल्या पानाचे स्वरूप त्याकाळच्या वृत्तपत्रांसारखेच सर्वसाधारणपणे आहे. नेमप्लेटच्या खाली ‘सुनीती पसरो जगि । बहुविधा सुविधाच ती । स्वदेश जनांना सुख पडो सदा मानसी । असा मुफल हेतु, हो म्हणोनि वृत्तपत्रिका सुपर्व गुरुवार दिनी प्रगटते साप्ताहिका । सध्या उपलब्ध असलेला हा अंक गुरुवार दि. २७ फरवरी १२५६ फसली तारीख मार्च सन १८८६ अक २१ आणि पुस्तक ३ रे असा आहे.’

वाचा : ग़ज़ल समर्पणाची भावना आणि फुलांचा दरवळ

वाचा : मुस्लिमविषयक पुस्तकांचा वानवा का आहे?

प्रारंभी पत्राचे वर्गणीचे दर आणि नोटीशीने दर हे दिलेले आहेत. वर्गणीचे दर सालीना आगाऊ ३ रुपये तर जाहिरातीचे दर मराठी आणि फारसी अशा दोन्ही भाषांचे वेगवेगळे दिलेले आहेत. पहिल्या पानावर सर्व जाहिरात आहे. जाहिरखबर जाहीर नोटीस दिलेले आहे. नाईट स्कूलबहल एक जाहिरात आहे.

औरंगाबादचे शंकर नारायण हेडमास्तर यांच्या नावे ही जाहिरात आहे. ‘कारागीर वगैरे लोकास कळविण्यात येते की, आपले धंद्यासंबंधीने दिवसभर सवड नसून आपणास साधारण लिहिण्या-वाचण्याचे ज्ञान असावे अशी पुष्कळांची इच्छा आहे. सोयिस्कररीत्या त्यांचे सोयीकरिता तूर्त रात्रीचे सातपासून नऊ वाजेपर्यंत आमचे किराणाचे चावडी नजिकचे शाळेत शिकविण्याची योजना केली आहे. फी सामर्थ्याप्रमाणे आगाऊ घेतली जाईल. तारीख १ ९ फरवरी १२९६ फसली.’ दुसरीही एक जाहिरात शाळे संबंधातच आहे.

(सदरील लेख ‘वृत्तपत्र व्यवसाय : काल नि आज’ या प्रा. सुधाकर पवार लिखित पुस्तकातून घेतला आहे. जे औरंगाबादच्या BAMU विद्यापीठ प्रकाशनाने प्रकाशित केले होते.)

जाता जाता :