साहित्य-संस्कृती, नाट्य, सिनेमा, संगीत अशा कुठल्याही क्षेत्रातील शासकीय किंवा राजकीय समित्यांवर निवडीचं पत्र मिळालं, तेव्हा भरभरून कौतुक सोहळे व त्यानंतर नावावरून होणारे वाद ठरलेलेच असतात. मला या वादांची मजा वाटते. निवडीवर प्रश्न निर्माण करावं असंही कधी वाटत नाही. पण गेल्या काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या मराठी साहित्य संस्कृती मंडळ व विश्वकोश मंडळावरील नावानिमित्त होणाऱ्या वादावर मात्र स्वतःलाच काही प्रश्न विचारावेसे वाटतात.
निवड मंडळात प्रामुख्याने एकही मराठी मुस्लिम लेखकाचं किंवा जाणिवांचं नाव दिसत नाही. प्रा. फकरुद्दीन बेन्नूर तर गेलेच.. पण डॉ. अलीम वकिल, फ.म. शहाजिंदे, जावेद कुरैशी, खलील मोमीन, अजीम नवाज राही किंवा गेला बाजार कुणीतरी सापडावा की नाही यांना!
मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाची चळवळ गेल्या तीन दशकांपासून सुरू आहे. गेल्या बारा वर्षांपासून अलग नावाने त्याचा उरूस किंवा जत्रा म्हणू काय ते भरतेच ना! त्यात सामील होणारा एखादा विचारवंत, साहित्यिक, कवी किंवा इतिहास संशोधकाला असा प्रश्न पडत नाही आणि निवड समितीला यांच्यापैकी कोणी दिसत नाही.खरेतर गल्ली-मोहल्ल्यात लिंचिंगविरोधी मोर्च्यापासून ते सीएए-
एनआरसी आंदोलनात आणि लॉकडाऊन काळात बहिष्कृत ठरवलेला असूनही मदतीला बाहेर पडणाऱ्या मुसलमानांचे साहित्य संस्कृती असो की विश्वकोश मंडळाला देणे घेणे आहे की नाही?
इथल्या व्यवस्थेने निर्माण केलेल्या अनेक प्रश्नांच्या पिंजऱ्यात मुस्लिम अकडत राहतो. त्याची सुटका त्यालाच करावी लागते.
कुठल्याही सुधारक, पुरोगामी, परिवर्तनवादी, सुधारणावादी गटातून या व्यवहारावर किंवा मुस्लिम साहित्यिकांच्या बाजूने कोणीही बोलत नाही, प्रश्न विचारत नाही. कुठल्याही चळवळीच्या एका कोपऱ्यात पालखीवाहू असणारा मुस्लिम आपल्या कुठल्या अस्मितांचे शेण त्यांच्या भिंतीवर लेपत असतो हे कळत नाही.
वाचा : प्रगतिशील कविंच्या उर्दू शायरीतून ‘नेहरू दर्शन’
वाचा : उर्दू इतिहासलेखनात शिवकालीन ग्रंथांचे महत्त्व
१२ वर्षांच्या ‘मुस्लिम मराठी साहित्य व सांस्कृतिक’ चळवळीतील एकाही माणसाला हा प्रश्न विचारावासा वाटत नाही. ते ही गरीब, बिचारे, बापुडे काय करतील म्हणा! ज्यांनी कुठल्याही काळात व्यवस्थेला प्रश्नच विचारले नाहीत, त्यांना हा प्रश्न किती महत्त्वाचा वाटतो हे ही शंकास्पद की!
मराठी मुस्लिम साहित्य मंडळ किंवा मुस्लिमांमधील सत्य (?) शोधणाऱ्या कुठल्याही मंडळीतून कुठल्याच सामाजिक, सांस्कृतिक दमन शोषणाबद्दल ब्र् काढला जात नाही. काढला जात असेल तर तो संशयित स्वरुपातच म्हणू या.. कारण त्यात सामान्य मुस्लिम जाणिवांचे, त्यांच्या विचारांचे व समस्यांचे प्रतिबिंब असतेच असं नाही.
नव्याने लिहिणारा आणि थोडीशी अकळ (बुद्धी) असणाऱ्या कोणत्याही नव्या लेखक, साहित्यिकाला मंडळाच्या कुठल्याही नियुक्तीवर प्रश्न विचारावेसे वाटत नाही. आपल्या मर्यादा जपल्या पाहिजेत, असं त्याला वाटते. त्याच्या या मर्यादेला पुन्हा एकदा गडद करण्याची संधी मराठी साहित्य संस्कृती वा विश्वकोश मंडळाने दिली, त्याबद्दल त्यांचेही आभार!
एकतर गाव ग्रामीण किंवा शहरी भागातून नव्याने लिहिणाऱ्या मुस्लिम नावाच्या कोणत्याही हौशी किंवा प्रसिद्ध साहित्यिक, लेखक, कवी, विचारवंताला ही एकूण भानगड काय आहे, याचे रीतसर भान नसतेच. नाहीच. त्याचे दुय्यमत्व अधिक ठळक करण्यात व्यवस्थेसह तो ही कारणीभूत ठरतोच. सध्याच्या काळात सोशिक मुस्लिम म्हणून गप्प न बसता किंवा केवळ उथळ गप्पा न करता प्रश्न विचारले पाहिजेत.‘मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळ’ तसेच ‘ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य’
मंडळामधले कवी, कथाकार, चारोळीकार, लेखक, विचारवंत, साहित्यिक नेमकी काय साहित्यिक, वैचारिक कृती करतात, मराठी साहित्य विश्वात काय भर टाकतात, किती निकडीचे प्रश्न हाताळतात; याबद्दल कोणालाच कल्पना नसते. सोशल मीडियावर सक्रिय असणारे उदामतवादी, प्रागतिक विचारांचे, निधर्मी, मध्यममार्गी, सर्वसमावेशक लेखक कवी मंडळींना याचं काय? त्यांच्यासाठी लाईक्स किंवा शेअर वाढले की आभासीखुश होण्याची दिनचर्या महत्त्वाची असते.
काहीजण ‘कमिटमेंट’ म्हणून सकस ज्ञानपरंपरा निर्माण करण्यासाठी, वैचारिक ग्रंथे, पुस्तके तयार करण्यासाठी एखादा ‘रिसर्च सेंटर’ काढतात, त्याला व त्यांच्या संस्थेला समाजाचं व परिवर्तनवाद्याचं किती सहकार्य, मदत, अर्थसाहाय्य लाभते! हा प्रश्नचदेकील गंभीर आहेच की !
आपल्या वाटणाऱ्या काही समाजचिंतकानी निवडीबाबत प्रश्न विचारले, तरी त्यातून ज्यांची निवड होईल ते व्यवस्थेला पूरक प्रेमळ असतील याचीही खात्रीलायक शंका आहेच. तरीही समजा अशा मंडळावर एखाद्या मुस्लिम नावाची निवड झालीच तरी तो ‘फेवेरीजम’चा घोळ असू शकतोच. त्यात वैचारिक उदारता नसून सनातनी संकुचितता असलेच! कारण त्यांनाही अटी-शर्थीची मुस्लिम नावं हवे असतात. म्हणजे एकूण काय तर नेहमी शांत रहा.
वाचा : ग़ज़ल समर्पणाची भावना आणि फुलांचा दरवळ
वाचा : मुस्लिमविषयक पुस्तकांचा वानवा का आहे?
गल्ली मोहल्ल्यात रस्त्यावर किंवा घरात.. आपलं काहीच कुठं विकत नाही. सौंदर्यशास्त्र असो किंवा कसलीही मांडणी तुम्ही चुप बसा. तुम्हाला काय त्याचे? बरं या निवडीनंतर समाजाचे काही प्रश्न तरी सुटणार आहेत! फेलोशिप, पाठ्यवृत्ती देऊन नवीन सामाजिक संशोधन होणार, की मुस्लिम द्वेशावर आधारित मध्ययुगीन इतिहासाची पुन:मांर्डणी होणार! अर्थात ही एक भाबडी अपेक्षाच !
लिंचिंग, एनआरसी किंवा बंद काळात मुस्लिम समुदायाकडून होणाऱ्या मदतीत खंड पडला नाही. पण मुख्य प्रवाही साहित्य प्रवाहाने त्याची कितपत दखल घेतली? उलट तबलिग संघटना लक्ष्य करून संपूर्ण मुस्लिमांना पारड्यात तोलले गेले. कथित मिथकांवर, फेक न्यूजवर ग्रंथे, लेख, विशेषांक काढली गेली. मुसलमानांच्या मदतकार्याची दखल घेणाऱ्या कविता, कथा, ललित लिहिली जातील का? किंवा पुस्तके, ग्रंथ रचली जातील का? स्पष्ट आहे की, एकही साहित्यिक यावर ठोस भूमिका घेऊन बोलणार नाही.
सिनेमॅटिक ‘कर्णन’वर प्रतीकांच्या पाऊस पडतो. त्याच्या रूपकांवर आणि एकूण मांडणीवर जेवढं बोललं किंवा लिहिण्यात आलं, तेवढ्यात बाजूने ‘दिठी’वरही सौंदर्यशास्त्राची मांडणी झाली. त्यातले नायक असो किंवा एकूण शोषितांचं ‘आसर्षण’ किंवा तिच्या माध्यमातून रामजीची प्रामाणिक सोशिकता आणि माणुसकीचे दोन्ही ठिकाणी पाळलेले धर्म मुस्लिम मुलाने, मुस्लिम साहित्यिकाने काय लिहावे, असे प्रश्न इथली व्यवस्था सातत्याने टाकत असते. सुज्ञास सांगणे न लगे!
मोहल्ल्यावर तूच लिही, तुझा सिनेमा नाही, तुझी संस्कृतीच नाही, तुझ्या सौंदर्यशास्त्राला लिंचींग केलं गेलं की काय.. असो. अशा सगळ्या ओळी विसरल्या तरी चालतील. पण किमान पातळीवर प्रश्न तरी निर्माण व्हावीत!
कुठल्याही समित्यांच्या निवडीतील एवढ्या सगळ्या पसार्यात बुजगावण्याच्या स्वरूपात एखादं तरी मुस्लिम नाव असावं की नाही! गल्लीतल्या साध्या तरुण मंडळाच्या नोंदणीसाठी धर्मादाय संस्थेत जाताना किंवा मदत वाटपाचे काही ग्रुप्स तयार करताना मुस्लिम मुलांच्या सहा नावांमध्ये मुद्दाम का होईना दोन-तीन नाव इतर समाजाची घेतली जातात.
दुसऱ्या तरुण मंडळांनी हाच पायंडा एका मुस्लिमांची निवड करून ठेवलेला आहे. व्यवस्थेला एवढंही कळू नये, की सध्याच्या काळात व्यवस्थेला पूरक असणारी समज आहे. वेळ मिळेल तेव्हा कुठल्याही मुद्द्यावर पुरोगामित्व मिरवले जाते. अशा वेळी गप्पगार; ही बनचुकेगिरी नव्हे का!
असो.. आपले काय ते जास्तीत एफबीवर टाका; कारण कोणी संपादक तुम्हाला स्पेस देईल याची खात्री नाही. पण लिहिणाऱ्यांनी लिहित राहवे, जे काही असेल प्रामाणिकपणे लिहा, विचार लिहा, समीक्षा करा, टीका करा पण व्यक्त व्हा. कांदे, बटाटे, भाजीपाला गरजवंताना मोफत देऊन त्याची निकड भागवा. कोविड नियमांचे पालन करताना डोक्यावरची टोपी घालू नका. रोजी-रोटी मिळाली की प्रार्थनेला जा. तिथ मेळा नको जमवू. शांत रहा. संयम राखा. ‘सब्र का फल’ वगैरे सब झुठ, निष्फळच.
लॉकडाऊन काळात मस्जिदला जाण्याची परवानगी नसली तरी सामूहिक प्रार्थना मलाच एकट्याला करावी लागणार आहे. शुक्रिया सलाम दुआ! अब्दुल चल, समाजाने तुझा पंक्चर केलाय. जगण्याठी त्यात पुन्हा ऑक्सिजनरुपी हवा भरायला नको का!
जाता जाता :
लेखक सामाजिक जाणिवांचे कथाकार व कवी आहेत.