उर्दू इतिहासलेखनात शिवकालीन ग्रंथांचे महत्त्व

र्दू इतिहासलेखन ही एक प्रगल्भ ज्ञानशाखा आहे. या ज्ञानशाखेला शिबली नोमानी, सर सय्यद, प्रा. सुलैमान नदवी, शाह जकाउल्लाह, प्रा. नजीब अशरफ, अबू जफर नदवी या थोर इतिहासकारांचा वारसा लाभला आहे.

उर्दूचा फारसी भाषेशी खूप घनिष्ठ संबंध आहे. फारसी आणि देशी भाषांच्या व्यवहारातून उर्दूचा जन्म झाला आहे. त्यामुळे उर्दूवर फारसीचा प्रभाव आजही कायम आहे. उर्दू साहित्यात फारसीतील अनेक साहित्य प्रकार हाताळले जातात.

उर्दू कवितांच्या रचनाबंधावर देखील फारसीचा मोठा परिणाम आहे. त्यामुळे उर्दू साहित्यिक आणि विशेषतः इतिहासकारात फारसीच्या अभ्यासाची मोठी परंपरा आहे.

त्यामुळे मध्ययुगीन काळातील मूळ साधनांची भाषांतरे उर्दूत मोठ्या प्रमाणात झाली आहेत. उर्दू इतिहासलेखात मुसलमान राजवटीवर अत्याधिक लेखन झाले आहे.

हे वास्तव असले तरी, उर्दू इतिहासलेखनाने आपल्या चौकटीबाहेर जाऊन इतर विषयांचीही दखल घेतली आहे. त्यामुळेच उर्दूत महाराणा प्रताप पासून शिवाजी महाराजांपर्यंत अनेक इतिहासपुरुषांवर महत्त्वाचे ग्रंथ आढळतात.

वाचा : बाबरने शब्दबद्ध केलेला भारत कसा होता?

वाचा : अहमदनगर : मध्ययुगीन भारतातील ऐतिहसिक शहर

पहिली दखल

उर्दूत शिवाजी महाराजांची दखल पहिल्यांदा कदिम उर्दू म्हटल्या जाणाऱ्या दखनी भाषेने घेतली आहे. ‘नुसरती’ हा आदिलशाही दरबारचा कवी होता. त्याने मोगल आणि बिजापूरमध्ये झालेल्या तहावर ‘अलीनामा’ हा कवितासंग्रह लिहिला आहे.

या कवितासंग्रहात पहिल्यांदा उर्दूतून शिवाजी महाराजांवर लिखाण करण्यात आले आहे. कवितासंग्रहात शिवाजी महाराजांवर काही कविता आहेत. त्यातील अनेक कवितांमध्ये शिवबाच्या काही वैशिष्ट्यांची दखल घेतली आहे. तर काही कवितांमध्ये राजकीय टीका केली केली आहे.

मध्ययुगीन काळात पद्यात्म इतिहासलेखनाची एक पद्धत प्रचलित होती. त्याचा वापर करून ‘अलिनामा’ लिहिला आहे. नुसरतीच्या ‘तारिखे सिकंदरी’ या सिकंदर आदिलशाहच्या इतिहासावर आधारित दुसऱ्या दखनी मसनवीतही शिवरायांवर काही कविता आहेत.

उर्दूत ‘अलिनामा’च्या नंतर शिवाजी महाराजांवरील एका उर्दू नाटकाचा संदर्भ येतो. ‘नवलकिशोर प्रेस’ ही स्वातंत्र्यपूर्व काळातील गाजलेली प्रकाशन संस्था आहे. या संस्थेने ‘शेर ए दखन’ हे उर्दू नाटक प्रकाशित केले होते.

या नाटकात शिवाजी महाराजांचे प्रचंड गौरव करण्यात आला आहे. तब्बल २३ वेगवेगळ्या प्रसंगावर हे नाटक आधारलेले होते.

स्वातंत्र्यपूर्वकाळातच महान उर्दू इतिहासकार शिबली नोमानी यांनी ‘औरंगजेब आलमगीर पर एक नजर’ हा ग्रंथ लिहिला आहे. या पुस्तकात त्यांनी मराठा आंदोलनाच्या उदयाची पार्श्वभूमी मांडली आहे.

त्यासाठी शिबली नोमानी यांनी दखनेतील अनेक ग्रंथालये धुंडाळून पुराव्यांची जुळवाजुळव केली आहे. मराठ्याच्या लढाऊ बाण्याची शिबली नोमानी यांनी चांगलीच दखल घेतली आहे.

वाचा : सम्राट अकबरला मूर्ख ठरवणाऱ्या बिरबल कथा

वाचा : शेतकऱ्यांकडून अधिक कर वसुलीस बाबरची होती मनाई

पाकिस्तानी इतिहासात स्थान

स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानातून ‘तारिख ए महाराष्ट्र’ हा दखनेच्या इतिहासावर पाचशे पानी ग्रंथ प्रकाशित झाला आहे. आर्य समाजी भाई परमानंद हे या पुस्तकाचे लेखक आहेत.

‘ताजिराने कुतुब, लाहोर’ या प्रकाशन संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यात एकुण १३ प्रकरणे आहेत. आर्यांच्या आगमनापासून ग्रंथाची सुरुवात होते. नाना फडणवीस – टिपू सुलतान संघर्ष मांडल्यानंतर मराठा सत्तेच्या विसर्जनासोबत या ग्रंथाची सांगता होते.

सन १९९०मध्ये प्रो. एम. के शाजली यांनी ‘तारिख ए हिंद का इन्कलाबी किरदार – शिवाजी’ हे उर्दू इतिहासलेखनातील अतिशय गाजलेले ग्रंथ लिहिले. प्रख्यात इतिहासकार सेतू माधव पगडी यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे.

प्रो. शाजली हे नांडेद जिल्ह्यातील कंधारच्या शिवाजी महाविद्यालयात प्राध्यापक होते. मुळचे नांदेडचे असणाऱ्या शाजली यांनी अतिशय वस्तुनिष्ठ पद्धतीने या पुस्तकाचे लेखन केले आहे. पुस्तकात एकुण १४ प्रकरणे आहेत. मूळ साधनांचा वापर करून लिहिलेल्या या ग्रंथाचे मराठी भाषांतर व्हायला हवे.

पाकिस्तानमध्ये मुबारक अली यांनी उर्दूतून काही वर्तमानपत्रात लेख लिहिले आहेत. मुबारक पाकिस्तानमधील प्रागतिक विचारांचे इतिहासकार आहेत.

याशिवाय अलीगडचे शाह जकाउल्लाह यांच्या मोगलांच्या इतिहासावरील ग्रंथातही शिवरायांचा इतिहास मांडलेला आहे. तर जकाउल्लाह यांच्या नंतर उर्दू इतिहासलेखनाला अनेक नवे आयाम देणारे प्रा. सुलैमान नदवी यांनी शिवबांवर काही लेख लिहिले आहेत. नदवींच्या लेखसंग्रहात या लेखांचा समावेश होतो.

जाता जाता :