सम्राट अकबरला मूर्ख ठरवणाऱ्या बिरबल कथा

तिहास म्हणजे एकाच दिशेने झालेला समाजाचा एकांगी प्रवास नाही. तो एकमुखीही नाही. सरंजामी नाही. लोककेंद्री ही नाही. इतिहास एकाचवेळी अनेक मूल्ये सांगतो. त्यामुळे इतिहास बहुप्रवाही ठरतो.

एकाच व्यक्ती वा घराण्याची गाथाही इतिहास सांगत नाही. त्यात एका व्यक्तीचे एखादेच पैलू नोंदलेले नाही. एका व्यक्तीविषयी अनेक प्रवाद इतिहासाच्या साधनात आढळतात. या साधनांचा अर्थ लावण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यामुळे इतिहासाविषयीची मतमतांतरे काळागणिक नव्या रुपात समोर येतात. आणि येत राहतील.

साधनांप्रमाणे इतिहास हा मौखिक परंपरेतून लोककथांतून चालत आला आहे. या लोककथांमध्ये कालांतराने प्रक्षेप होऊ शकतो. कालप्रवाहात लोककथांचा मूळ गाभा कायम राहतो. आशय अबाधित असतो. इतिहासातल्या विनोदविरांच्या लोककथादेखील आशय अबाधित राखत, प्रक्षेपासह प्रवाहीत होत राहिल्या आहेत.

‘तेनालीरामा’ असेल किंवा ‘बिरबल’ ही रंजक लोककथांची पात्रे आहेत. लोकांनी आपल्या मनोरंजन हेतूने त्यांच्या कथा काळाच्या प्रवाहात तारुन धरल्या आहेत. इतिहासापेक्षा कधी या पात्रांची चर्चा अधिक होत आली आहे. त्यातही ही पात्रे इतिहासाच्या मूळ गाभ्यावर वर्चस्व गाजवत त्याचे स्वरूप बदलत आली आहेत.

अकबराच्या काळावर तर बिरबलाच्या कथांनी मोठे गारुड केले आहे. अकबराच्या नवरत्नात बिरबल एक होता. मात्र त्याच्या कथा अकबराला असहाय्य, दुबळा, बावळट ठरवत आल्या आहेत.

या कथांच्या माध्यमातून बिरबलाचे व्यक्तित्त्व अकबरासारख्या इतिहासपुरुषावर लादण्यात आले आहे. बिरबल हा विद्वान होता हे निसंशय. मात्र अकबर दरबारी तो एकच विद्वान होता. प्रत्येक बाबतीत अकबर त्याच्यावरच विसंबून होता, हे मात्र खरे नाही. अकबराच्या दरबारात अनेक विद्वान होते. बिरबलाचे व्यक्तित्व खूजे भासेल, अशी अनेक विद्वान मंडळी अकबराच्या दरबाराची शोभा वाढवित होती.

वाचा : वेद आणि उपनिषदांचा अभ्यासक अल्-बेरुनी

वाचा : गुरुविना घडलेले महान संगीतज्ज्ञ अमीर खुसरो

अकबर काळ – साहित्याचा सुवर्णयुग

मोघलांनी अनेक साहित्यिक, विचारवंत, तत्ववेत्यांना आणि इतिहासकारांना राजाश्रय प्रदान केले होते. बाबरच्या काळामध्ये मीर अला उद्दौलापासून गुलबदन बेगमपर्यंत काहींचा उल्लेख करता येईल. हुमायूंनची कारकीर्द अस्थीर होती. मात्र त्याच्या काळातही अनेक साहित्यिक विचारवंत त्याच्या दरबारात राजाश्रय मिळवत होते.

खाने खाना पैरखाँ, जुनुबी बंदख्शानी, नादरी समरकंदी, वाहिदुद्दीन अबु अल्वाजीब फारगी, ताहीर दखनी, ख्वाजा अय्युब, कासीम काही, मिर्झा अमानी, अमीर अवेसी, मौलाना शहाबुद्दीन अहमद मआमाई या विद्वानांनी हुमायूंनच्या राजाश्रयातच अनेक ग्रंथांची, काव्यसंग्रहाची, खंडकाव्याची निर्मिती केली होती. हुमायूंनचा हा वारसा अकबराने खंडीत केला नाही.

बिरबल अकबराच्या दरबारात येण्यापूर्वी अनेक साहित्यिक त्याच्या राजाश्रयात होते. मौलाना फरीदुद्दीन, मियाँ वजीयुद्दीन, काझी नसिरूद्दीन, गाजीखाँ बंदख्शी, मीर अब्दुल बाकी, मीर फैजुल्लाह, मीर मीर्जा शकरुल्लाह, मौलाना वली, मिर्झा मुहम्मद कासीम गिलानी, शेख मुबारक नागौरी, अबूल फैज फैजी, आका जलाल, हकीम रूहुल्लाह यांचा त्यामध्ये समावेश आहे.

अकबराने अनेक ग्रंथाची निर्मिती स्वतःच्या निर्देशानुसार करून घेतली होती. त्याने अनेक हिंदू धर्मग्रंथांची भाषांतरे विद्वांनांकडून करवीली होती. यात ‘सिंहासन बत्तीसी’, ‘महाभारत’, ‘रामायण’, ‘लिलावती’ अशा अनेक ग्रंथाचा उल्लेख करता येईल. या ग्रंथाची भाषांतरे अकबरासमोर वाचली जायची.

अकबर त्याविषयीच्या सूचना द्यायचा. अकबराच्या काळात अनेक ग्रंथाची नव्याने निर्मितीदेखील करण्यात आली होती. याशिवाय काही तुर्की, काश्मीरी ग्रंथाचे फारसीत भाषांतर करण्यात आले होते. त्यामध्ये ‘हैयातुल हैवान’, ‘एंजील’, ‘तारीखे कश्मीरी’, ‘तुज्क बाबरी’, ‘मज्मुआ उल बल्दान’, ‘जामिआ रशिदी’, ‘बहिरूल समाद’, ‘ताजक हरबीन’, ‘नजहतूल रवा’ व ‘नजहतूल फिरहा’ या ग्रंथाचा समावेश होतो.

अकबराच्या काळात महान ग्रंथकृती म्हणून ज्या ‘तारिख ए अल्फी’चा उल्लेख केला जातो, त्याच्या निर्मितीसाठी अकबराने साहित्यिकांच्या समितीची निर्मिती केली होती. अबूल फज्लची  ‘आईन ए अकबरी’ हे ऐतिहासिक ग्रंथ अकबराच्या राजाश्रयाशिवाय शक्य नव्हते.

‘अकबरानामा’ची निर्मितीमागेदेखील अकबराची प्रेरणा महत्त्वाची होती. या सर्व घटनाक्रमात बिरबल कुठेच नव्हता. किंवा या ग्रंथापेक्षा सरस ग्रंथकृती बिरबलाने जन्माला घातल्याचे दिसत नाही. ‘तारिख ए अल्फी’च्या वेळोवेळी बदललेल्या साहित्यमंडळात बिरबलाला स्थान मिळालेले नाहीये.

अनेक हिंदू धर्मग्रंथाच्या भाषांतरादऱम्यान बिरबलाने कोणतेच योगदान दिल्याचे इतिहासात नमूद नाही. अबूल फज्लपासून मुल्ला अब्दुल कादर बदायुनी पर्यंत अनेक विद्वान मोघल दरबारात होते. त्यामध्ये बिरबल कुठेच दिसत नाही.

वाचा : भारताच्या लोकजीवनाविषयी बाबरला होती आस्था

वाचा : मलिक अंबर महाराष्ट्राचे सांस्कृतिक राजकारणाचे प्रतीक

सामर्थ्यशाली अकबर

मोघलांच्या संपूर्ण इतिहासात औरंगजेबपूर्वी अकबर हा सामर्थ्यशाली बादशहा म्हणून ओळखला जातो.  अकबरचे कर्तृत्त्व औरंगजेबपेक्षा आधिक आहे. त्याने घेतलेले अनेक निर्णय त्याला त्याच्या काळापुढे उभे करतात. त्या निर्णयांमागचा विवेक त्याच्या सामर्थ्याला अधोरेखित करतो.

पित्याच्या मृत्यूनंतर इसवी सन 1556 मध्ये वयाच्या चौदाव्या वर्षी अकबर सत्तेत आला. सत्तेत आल्यानंतर हेमुने मोघल सत्तेवर आक्रमण केले. अकबरकडून त्याने सुरुवातीला आग्रा आणि नंतर दिल्लीही हस्तगत केली. हेमुच्या झंझावाताने घाबरलेल्या मोघल सरदरांनी अकबरला काबूलकडे पळून जाण्याचा सल्ला दिला.

बादशाह अकबरने हा सल्ला मानला नाही. त्याने आणि त्याचा संरक्षक असणाऱ्या बैरमखानने हेमुचा सामना करण्याचा निर्णय घेतला. हेमूला पराभूत करुन मोघल सत्ता मजबूत केली. या सर्व घटनाक्रमांवर बैरमखानाचा प्रचंड प्रभाव असल्याचे इतिहासकारांचे मत आहे.

इसवीसन 1560 मध्ये वयाच्या 18व्या वर्षी बैरमखानच्या सर्व प्रशासकीय अधिकारांना अकबरने समाप्त केले.

आपलं संपूर्ण पतन घडून आल्यानंतर बैरमखानाने अकबराच्या राज्याला विशेष काही हानी पोहचवली नाही किंवा बंडाचाही प्रयत्न केला नाही. अकबराच्या सामर्थ्यापुढे तो काहीच करू शकला नाही. या सर्व घटनाक्रमातून अकबर सर्वकालिक प्रभावशाली राज्यकर्ता होता, हे सिद्ध होते.

अकबरच्या कारकिर्दीतील या सर्वात महत्त्वपूर्ण असणाऱ्या निर्णयांवेळी अकबर एकटाच होता. त्याला कुणी सल्ले दिले असतील तर त्याच्या ‘हरम’मधील स्त्रियांनी. तसेच त्याला आईने आणि हुमायूनच्या नात्यातील काही महिलांनीदेखील सल्ले दिले.  या महत्वपूर्ण निर्णयांवेळी बिरबल कुठेच नव्हता. किंबहूना त्यावेळी तो अकबरी दरबारचा सदस्यदेखील नव्हता.

वाचा : खुल्ताबादचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा

वाचा : कोकणी मुसलमानांचे पूर्वज ब्राह्मण होते का?

काळाच्या पुढे अकबरची पाऊले  

अकबरने हेमू आणि बैरमखानाचा बंदोबस्त केल्यानंतर राज्याकडे लक्ष दिले.  साम्राज्यविस्तारासह, अनेक प्रशासकीय बदल राज्यव्यवस्थेत केले. करप्रणालीची पुनर्रचना केली.  हिंदूंना द्यावा लागणारा ‘यात्रा कर’ त्याने रद्द केला.

‘जिझिया कर’ समाप्त केला. त्याचे हे निर्णय अर्थव्यवस्थेला प्रभावित करणारे ठरू शकतील असे इतिहासकारांचे मत होते. मात्र अकबरने अर्थव्यवस्थेला या करांच्या समाप्तीनंतर प्रभावित होऊ दिले नाही. अकबरने बालविवाहाविषयी घेतेलेले निर्णय दोन्ही धर्मप्रमुखांच्या धर्मसत्तेला हादरे देणारे होते.

इसवी सन 1595 मध्ये अबूल फज्लने अकबरचे बालविवाह संदर्भात धोरण स्पष्ट करणारे एक आदेश नमूद केले आहे. त्यामध्ये अकबर म्हणतो, ‘‘अल्पवयीन अज्ञान मुलीशी विवाह इश्वरी कोपाला कारणीभूत ठरू शकेल. विवाहाने ज्या गोष्टीची इच्छा उत्पन्न होते, ते अकल्पनीयच, मात्र अशा विवाहांनी मुलीच्या शरीराला मोठे नुकसान सहन करावे लागते.’’

सल्तनतकाळापासून दिल्लीच्या गादीवर उलेमावर्गाचा प्रचंड प्रभाव होता. मुहंमद तुघलकानंतर अकबराने या वर्चस्वाला आव्हान दिले. त्याने उघडपणे उलेमा वर्गाच्या विरोधात भूमिका घेतल्या.

‘सुलह कूल’ची संकल्पना समोर आणून त्याने सहिष्णू राजवटीची मुहुर्तमेढ रोवली. धर्म आणि धर्मततत्वांच्या बारकाव्यांसदर्भांत अकबरने उलेमांशी चर्चा केली. उलेमांच्या काही चुकीच्या पोकळ धर्मनिष्ठांना त्याने उघड आव्हान दिले.

बुद्धीप्रामाण्यवादाचा मार्ग चोखाळला. बुद्धीप्रामाण्यवादाचे समर्थन करताना अकबर म्हणतो, ‘‘बुद्धिचा स्वीकार आणि परंपरावादाचा नकार यापद्धतीने करणे गरजेचे आहे की, त्यावर चर्चेची गरजच नाही. जर पुनरावृत्तीच गरजेची असती तर प्रेषितांनी फक्त आपल्या बुजुर्ग व्यक्तींच्या आचरणाची पुनरावृत्ती केली असती. (अर्थात त्यांनी नवा संदेश दिला नसता.)’’

सुलह कूलची  संपूर्ण रचना त्याच्या प्रबुद्ध व्यक्तीमत्त्वाचा परिचय घडवते. अकबराच्या आयुष्यातील या सर्व घटना, त्याने स्वतंत्र मार्गाने राज्य राबवण्याचा घेतेलेला निर्णय,  हे सर्व बिरबलाच्या पूर्वीच्या घटना आहेत.

वाचा : कथा बिजापुरच्या गोलगुंबजच्या जन्माची

वाचा : शाही थाट-बाट असणारी मुघल डीश

निरक्षर (?) कवी अकबर

‘अकबर हा निरक्षर होता. त्याला अक्षरज्ञान नव्हते. त्यामुळे तो राज्यकारभारात अपरिपक्व होता.’  पु. ना. ओकांच्या धाटणीचे असे भ्रमिष्ठ सिद्धान्त मुख्य प्रवाहातील काही इतिहासकारांनी मांडायला अलीकडे सुरुवात केलेली आहे.

अकबराची ऐतिहासिक उंची कमी करण्याच्या राजकारणासाठी त्यांना हे बोगस कथिते मांडावेच लागतील. या कथितांना तथ्यांत रुपांतरित केले तरी वस्तुस्थितीजन्य संदर्भ बदलत नाहीत. अकबराच्या अडाणीपणाविषयी काही महत्वाचे संदर्भ समकालीन साधनांत नोंदलेले आहेत.

जहाँगीरने त्याला निरक्षर मानणाऱ्यांवर ‘जहाँगीरनाम्यात’ टीका केली आहे. शिरीं मसूवी यांनी ‘अकबरनामा’चे संपादन केले आहे. त्याच्या प्रस्तावनेत ते जहाँगीरला उदधृत करून लिहतात, ‘‘बादशहांचा स्वभाव मोठा प्रेरणादायी आहे. ते हिंदी तथा फारसी कवितादेखील लिहितात.’’

मैनेजरसिंह पांडे यांनी काही मुघल कवींच्या कवीता संकलित केल्या आहेत. त्यांनी आपल्या संग्रहात अकबराच्या काही ब्रजभाषेतील कविता दिल्या आहेत. त्यातील एक कविता अकबराच्या प्रतिभेचा परिचय देण्यासाठी पुरेशी आहे..

भैरोहीभैरवरागअलाप्यो

अहोप्यारेवंशोमेंआन

खरजगान्धाररिषभपंचम

मध्यमनिषादधैवततान।।

आरोहीअवरोहीअस्थायी

संचाईतालकालऔरमान

उरपतीरपलागडाँटदेशी

मारगतानसेनसुनोसाहअकबरप्रमान।।

या व्यतिरिक्त मैनेजरसिंह पाण्डेय यांनी अकबराच्या अनेक कविता त्यांच्या ग्रंथात दिल्या आहेत. त्याच्या कवितांमध्ये अनेक ठिकाणी प्रतिकांवर चर्चा करण्यात आली आहे. भारताविषयी त्याने व्यक्त केलेले विचार बाबरपेक्षाही सरस आहेत. त्यामुळे अकबर हा निरक्षर निर्बुद्ध होता. हा इतिहासात रूढ झालेला प्रवाद संदर्भांच्या परिप्रेक्ष्यात गैर ठरतो.

त्यातही अकबरच्या काही कविता बिरबलच्या काव्य प्रतिभेला आव्हान देणाऱ्या आहेत. बिरबलने कवी म्हणून अकबरापेक्षा जास्त रचना केल्या आहेत. मात्र या क्षेत्रात अकबराने निर्माण केलेले स्वतंत्र अस्तित्व उल्लेखनिय आहे. त्यामुळे कोणत्याही बाबतीत बिरबल हा अकबरापेक्षा महान होता, हे सिद्ध होत नाही. 

वाचा : अहमदनगर : मध्ययुगीन भारतातील ऐतिहसिक शहर

वाचा : सम्राट अशोक ‘महान’ होतो, मग टिपू सुलतान का नाही?

बिरबल प्रभावहिन कसा?

बिरबलाचा जन्म 1528 सालचा आहे. त्याचे मूळ नाव ‘महेश दास’ होते. कलपी जवळच्या एका खेड्यात बिरबलचा जन्म झाल्याचा उल्लेख इतिहासाच्या साधनात मिळतो.  ब्राम्हण वंशात जन्मलेल्या बिरबलाच्या घरात साहित्य आणि विद्वत्तेचा वारसा असल्याचे कोणतेच संदर्भ मिळत नाहीत. कळत्या सवरत्या वयात त्याने कविता लिहायला सुरुवात केली.

रजपूतांच्या दरबारात त्याने अल्पावधीत चांगलीच प्रतिष्ठा मिळवली होती. या प्रतिष्ठेच्या बळावरच तो अकबराच्या दरबारात पोहचला असावा. अकबर कवी असल्याकारणाने आणि साहित्याचा रसिक असल्यामुळे त्याने बिरबलासारख्या अनेक कवींना राजाश्रय दिला होता.

बिरबलाने अकबराला कठीण काळात मार्गदर्शन केल्याचे विनोदीकथातून मांडले जाते. त्यापद्धतीने बिरबलने रजपुतांच्या दरबारात राजाला मार्गदर्शन केल्याचा एकही संदर्भ उपलब्ध नाही. किंवा रजपुतांच्या दरबारात बिरबल सेवेत असताना त्याने आपल्या अचाट विद्वत्तेने प्रभाव निर्माण केल्याचे देखील कुठेच नमूद नाही.

रजपूतांच्या दरबारात असताना बिरबलाची ही विद्वत्ता दुर्लक्षित राहिली का? किंवा त्याला साहित्यिकांच्या राजकारणात रजपूत दरबारमध्ये आपली विद्वत्ता दाखवता आली नाही का? तर तसेही नाही. कारण कवी म्हणून रजपुतांच्या दरबारात त्याने बरीच प्रतिष्ठा मिळवली होती.

मूळात कवी असणारा बिरबल अकबरी दरबारात आल्यानंतर ‘खुशामतखोर’ विनोदवीराच्या भूमिकेत कसा अवतरला? अथवा बिरबलापूर्वी एकाहून एक प्रगल्भ निर्णय घेणारा अकबर बिरबल आल्यानंतरच कसा असहाय्य अथवा निर्बुद्ध बनला?

या प्रश्नांची उत्तरे इतिहासलेखनाला संदर्भ म्हणून आधार प्रदान करू न शकणाऱ्या दंतकथातून मिळणे शक्य नाही.  इतिहासाचे संदर्भ विवेकाच्या पटलावर घासून वापरावे लागतात. मात्र अकबर आणि बिरबलाच्या बाबतीत प्रचलित दंतकथांच्या माध्यमातून आपण इतिहासाच्या आकलनाला भ्रमाच्या मर्यादा घालत आहोत.

बिरबलच्या कल्पीत कथांचे जागतिक संदर्भ

अकबर-बिरबलसारख्याच काही कथा जगाच्या अनेक देशात वेगवेगळ्या पात्रांच्या रूपात अस्तित्वात आहेत. मुल्ला नसरूद्दीन, शेख चिल्ली, दक्षिणेत तेनालीरामाच्या अनेक कथा अकबर-बिरबलच्या कथांशी साम्य पावणाऱ्या आहेत. युरोप आणि अरेबियन नाईट्सच्या काही कथा तर कॉमिक बुक्सवाल्यांनी अकबर बिरबलच्या नावावर खपवल्या आहेत. कथासुत्र कायम ठेवून त्याची पात्रे बदलून त्याला भारतीय रूप देण्यात आले आहे. तेनालीरामाच्या काही कथादेखील अशाच धाटणीच्या आहेत. मध्ययुगीन काळात अर्धवट काव्य रचून त्याची पूर्ती करण्याचे आव्हान कवी प्रतिस्पर्धी कवींना देत असत. काही प्राचीन ग्रंथामध्ये देखील यासंदर्भात नोंदी आढळतात.

अकबर बिरबलाच्या अनेक कथा अकबर कवी असल्याची मान्यता देऊन मिथक जन्मास घालतात. अकबर अर्धवट काव्य रचून बिरबलाला आव्हान देत असल्याचे या कथांमध्ये नमूद आहे. बादशाह हारून रशीद आणि कवी अबु नुवास यांच्यासंदर्भात देखील अशाच काव्यपूर्तीच्या कथा अरब देशांमध्ये आढळतात. 

वाचा : पुस्तकातून उरलेला बाबरी-आयोध्यावाद

वाचा : काय आहे अयोध्या-बाबरी मस्जिदीचा वाद?

नवरत्नात बिरबलाचे स्थान

ज्ञान विज्ञान आणि साहित्याचा भोक्ता असणाऱ्या अकबराने प्रत्येक क्षेत्रातील एका विद्वानाला घेऊन नवरत्न मंडळाची निर्मिती केली होती. यामध्ये प्रख्यात इतिहासकार, आधुनिक प्रवृत्तीचे विचारवंत, खगोलतज्ज्ञ, भुर्गर्भशास्त्रज्ञ आणि धर्ममतांचे अभ्यासक अबूलफज्ल, मूळचा फारसी कवी असणारा आणि गणितज्ज्ञ म्हणून नवारूपास आलेला अबूल फज्ल यांचा भाऊ फैजी नवरत्नचा सदस्य होता. अकबराने त्याच्या परिवारातील काही सदस्यांना गणित शिकवण्यासाठी देखील फैजीची नेमणूक केली होती.

तानसेन हा संगीतकार म्हणून अकबरी दरबारच्या नवरत्नात सामील होता. बीरबल कवी म्हणून अकबरच्या नवरत्नांमधला सदस्य होता. त्याच्या नावावर काही कविता आहेत. मात्र त्या काव्यसंग्रहाच्या रूपात त्याने या कविता संकलित केलेल्या नाहीत. त्यामुळे त्याच्या नावावर एकही काव्यसंग्रह नाही.

अकबरच्या राज्याचा अर्थमंत्री टोडरमल इतिहासविख्यात आहे. याने अनेक करसुधारणा केल्या. अकबरी काळातील आर्थिक परिवर्तनात याचा मोठा सहभाग होता. अकबरच्या सैन्याचा सेनापती राजा मानसिंह देखील नवरत्न मंडळाचा सदस्य होता. त्यानंतर अब्दुल रहिम खान ए खाना आणि मुल्लाह दो प्याजा हेदेखील या मंडळाचे सदस्य होते.

नवरत्न मंडळात सर्वोच्च स्थान अकबरनंतर अबूल फज्ल यांना प्राप्त होते. अबूल फज्लचा वाचन दांडगे होते. उलेमा आणि अकबरच्या संघर्षात अबूल फज्ल यांनी धर्मतत्वांचा सखोल अभ्यास केला होता. खगोल शास्त्राविषयी त्यांनी मांडलेली मते नव्या तथ्यांना जन्मास घालत होती. राजकारण आणि समाजाविषयी अबूल फज्ल यांनी मांडलेली मते प्रेरणादायी आहेत.

अकबरही अबूल फज्ल यांना प्रचंड सन्मान द्यायचा. इतर ‘उच्चपदस्थ सरदारांसमोर अकबर दरबारी अचारसंहितेनुसार वागायचा. हे सरदार त्याला दबकून असता. त्याच्या समोर मान उंचवण्याचीसुद्धा हिंमत कुणी करत नसे.’’ मात्र अबूल फज्ल यांच्याकडून अकबर सल्ला घेत असे. त्यामुळे तत्कालीन अनेक विद्वान अबूल फज्ल यांचा द्वेष करताना दिसतात.

बदायुनीच्या लेखनात अबूल फज्ल यांच्याविषयीचा जळफळाट जाणवतो. अबूल फज्ल यांच्यानंतर नवरत्न मंडळात फैजी, टोडरमल यांना स्थान होते. त्यानंतर बिरबलचा क्रमांक होता. बिरबलचा नवरत्न मंडळातील समावेश कवी म्हणून करण्यात आला होता. सल्लागार म्हणून त्याची नेमणूक केलेली नव्हती. मुल्ला दो प्याजाची नेमणूक ही थेट कुशाग्र बुद्धीचा सल्लागार म्हणून करण्यात आली होती. त्याच्यासंदर्भात देखील बिरबलासारख्या कथा जन्माला घालण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला होता.

बदायुनीला अबूल फज्ल आणि मुल्ला दो प्याजा प्रमाणे प्रतिष्ठा मिळू शकली नाही त्यामूळे मुल्ला दो प्याजा बादशाहची टिंगल करायचा अशा अवास्तव नोंदी त्याने केल्या आहेत. तशा अफवा पसरवून बादशाह व मुल्ला दो प्याजामध्ये दुरावा निर्माण करण्याचादेखील काही सरदारांनी प्रयत्न केला होता. या सर्व तथ्यांचे आवलोकन केल्यानंतर बिरबलच्या कथा विनोदी कल्पनांच्या रूपात शिल्लक राहतात. त्यातील भंपकपणा संदर्भ आणि तर्काच्या कसोटीवर प्रकर्षाने समोर येतो.

वाचा : पुस्तकातून उरलेला बाबरी-आयोध्यावाद

वाचा : काय आहे अयोध्या-बाबरी मस्जिदीचा वाद?

समारोप

अकबर बिरबलच्या कथा कशा जन्मल्या हे गुढ आहे. चौधरी  नईम आणि डी.एम. गोल्डमेन यांनी त्याची वेगवेगळी कारणे दिली आहेत. अकबरच्या इतिहासाचे आधिकारीक अभ्यासक इरफान हबीब या कथांना महत्त्व न देता त्यावर भाष्य टाळतात.

चौधरींच्या मते त्या मुस्लिमद्वेषातून किंवा मोघल द्वेषातून झालेली समाजमनाची निर्मिती असू शकेल. तर गोल्डमेन त्याला समाजाची अहेतूक सहजनिर्मिती मानतात. निर्मिती कशी झाली हा विषय वादाचा आहे. मात्र या कथांचा आजचा वापर अकबराला मूर्ख ठरवण्यासाठी केला जात आहे.

इतिहासेलखनाच्या जमातवादी आकलनाचा आग्रह धरणारा वर्ग या कथांना भ्रमिष्ठ तथ्य जन्मास घालून पाठबळ देताना दिसत आहे. त्यातून पु. ना. ओकांच्या स्वरचित अनैतिकाहासिक कल्पनांच्या दिशेने इतिहासाला वळण दिलं जात आहे. इतिहासाच्या या विटंबनेला बुध्द्धिवादी, वैज्ञानिक इतिहासलेखनाच्या या टप्प्यावर मान्यता देता येणार नाही.