ताजमहाल ही उत्तरेतील महत्त्वाची आणि इतिहासप्रेमींसाठी कुतुहलाचा विषय असलेली वास्तू आहे. तिच्या बांधकाम शैलीपासून सौंदर्यापर्यंत या इमारतीविषयी अनेकांनी विस्ताराने लिहिले आहे. ताजमहालप्रमाणेच दक्षिणेत गोलगुंबज या इमारतीचेही खुप महत्त्व आहे. अभ्यासकांसाठी ही इमारत देखील आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिली आहे.
विजयापूर (बिजापूर) शहरात शेकडो ऐतिहासिक इमारती आहेत. या वैशिष्ट्यपूर्ण इमारतींमुळे दक्षिणेतील फतेहपूर सिक्री म्हणून बिजापूरचा उल्लेख काही ठिकाणी पहायला मिळतो. गोलगुंबजच्या बांधकामापूर्वी बिजापूर शहर ‘इब्राहिम रोजा’ या इमारतीसाठी ओळखले जात होते.
इब्राहिम रोजाला ‘दखनचा ताज’ म्हटले जाते. दुसऱ्या इब्राहिम आदिलशाहने बांधलेल्या या इमारतीने दक्षिणभारताच्या वास्तुकलेतील इतिहासात एक वेगळी ओळख निर्माण केली होती.
वाचा : औरंगाबादच्या नामांतरास पर्याय ‘संभाजीनगर’ नव्हे ‘अंबराबाद’!
वाचा : प्रेषितांच्या स्मृती जपणारे बिजापूरचे आसार महाल
कारागिरांना निमंत्रण
दुसऱ्या इब्राहिम आदिलशाह याचा मुलगा मुहंमद आदिलशाह याने मध्ययुगीन रीतीप्रमाणे आपल्या मकबऱ्याच्या बांधकामासाठी योजना तयार केली. आपला मकबरा हा ‘इब्राहिम रोजा’हून भव्य असावा अशी त्याची महत्त्वकांक्षा होती.
भविष्यकाळात इब्राहिम रोजा ऐवजी बिजापूर आपल्या मकबऱ्यासाठी ओळखले जावे असे त्याला वाटे. त्यादृष्टीने त्याने प्रयत्न सुरू केले. अनेकांशी चर्चा केल्यानंतर एका विशाल गुंबजची निर्मिती करण्याचा विचार मान्य करण्यात आला.
या वास्तूच्या बांधकासाठी मुहंमद आदिलशाह याने इराणमधून अनेक कारागिरांना बिजापूरला येण्याचे निमंत्रण धाडले. इसवी सन १६२६मध्ये गोलगुंबजच्या बांधकामास प्रत्यक्ष सुरुवात झाली. इराणहून आलेल्या दावल याकूत याने याचा पूर्ण आराखडा तयार केला होता. त्याच्या नेतृत्वाखाली बांधकामाला सुरुवात झाली.
इसवी सन १६५६ पर्यंत तब्बल ३० वर्षे या इमारतीचे बांधकाम चालू होते. बांधकाम पूर्ण होत असतानाच ४ नोव्हेंबर १६५६ रोजी मुहंमद आदिलशाहचे निधन झाले. त्याच्या इच्छेप्रमाणेच त्याचा दफनविधी गोलगुंबजमध्ये करण्यात आला.
मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारातच मुहंमद आदिलशाह त्याची पत्नी राणी रंभा, उरुस बीबी आणि सुलतानच्या नातवाच्या कबरींची प्रतिकृती आहेत. या प्रतिकृतीच्या खाली तळघरात मुख्य कबरी आहेत. पश्चिमेकडील जिन्याच्या बाजूने एक रस्ता या मुख्य कबरींकडे जातो.
वाचा : कशी होती तुघलक काळातील ईद?
वाचा : बाबरने शब्दबद्ध केलेला भारत कसा होता?
जगातील एकमेव इमारत
इमारतीची उंची जमीनीपासून १७८ फूट इतकी आहे. घुमटातील गॅलरीपासून जमीन १०९ फूट आहे. तर गॅलरीपासून घुमटाची उंची ६९ फुट इतकी आहे. या इमारतीच्या गुंबजाला आधार देण्यासाठी असंख्ये स्तंभ या इमारतीच्या चारही बाजूने उभे करण्यात आले आहेत. हे स्तंभ खालच्या बाजूने दहाने फूट तर वर निमुळते होत गेल्याने नऊ फुटाचे आहे.
स्तंभांची उंची तळघरापासून मोजल्यास १४४ फूट इतकी आहे. हे स्तंभ नजरेस पडू नयेत म्हणून मुख्य इमारतीच्या भिंतींचा आकार वाढवण्यात आला. इमारतीच्या खालचे तळघर १३५ फूट पाच इंचाचे आहे. या तळघराला कसलाच पाया नाही. गोलगुंबजचे एकूण बांधकाम १८ हजार ३३७ चौरसफुट इतके आहे.
विस्ताराच्या बाबतीत जगात गोलगुंबजचा पहिला क्रमांक लागतो. दुसऱ्या स्थानावर रोमचे पॅन्थेऑन मंदिर आहे. गोलगुंबजच्या इमारतीच्या टोकाला चारही बाजूने शहराचे निरिक्षण करण्यासाठी टेहाळणी बुरुजासारखे मिनार आहेत. या मिनारांमध्ये जिने असून त्यात भुलभुलैय्या सारखे मार्गदेखील आहेत. पण अलीकडे पुरातत्व खात्याने ते बंद केले आहेत. या मिनारांतून घुमटात जाण्यासाठी बाहेर पडल्यानंतर चारही बाजूने अकरा फुटांची गॅलरी आहे.
इतकी विशाल इमारत उभ्या स्तंभाच्या आधारावर टिकणे शक्य नव्हते. त्यामुळे दावल याकूत याने विरोधी भारखेचक स्तंभ निर्माण करुन ही इमारत उभी केली आहे. त्याला इंग्रजीत ‘पेंडेटीव्ह तंत्र’ म्हणून ओळखले जाते. हिच पद्धत बिजापूरच्या अन्य इमारतींवरील घुमट बांधण्यासाठी वापरण्यात आली आहे. त्यामुळे या सर्व वास्तू आजही सुस्थितीत उभ्या आहेत.
गोलगुंबजसाठी वापरलेल्या सामग्रीमुळे मूळ इमारतीचे एकूण वजन प्रचंड आहे. यामुळे जमीनी खचण्याचा धोका होता. त्यामुळे निरनिराळ्या पद्धतीचे खडक बाजूने पसरवण्यात आले आहे. त्यावेळेसच्या भूगर्भ तज्ज्ञांनी या पद्धतीची दुसरी इमारत शहरात उभी न करण्याच्या सूचना आदिलशाही राज्यकर्त्यांना दिल्या होत्या. गोलगुंबजच्या सौंदर्याचा उल्लेख मध्ययुगातील अनेक साहित्यिकांनी त्यांच्या ग्रंथात केला आहे.
सन १९१४मध्ये ब्रिटिश अंमलात त्याकाळचे जिल्हाधिकारी बशीरुद्दीन दहेलवी यांनी या इमारतीचे सर्वेक्षण केले होते. त्यावेळी त्यांनी इमारतीत ४०-५० प्रतिध्वनी ऐकू येत असल्याचे म्हटले आहे. तर १९७०च्या सर्वेक्षणात २१ वेळा प्रतिध्वनी ऐकू येत होत्या. आज त्या प्रतिध्वनींची संख्या ७ इतकी आहे.
इमारतीची निगा राखली जात नसल्याने घुमटाच्या बाजूला असलेल्या गॅलरी शेजारी काही दगड निखळले आहेत. समोरील बागेची देखील दुरवस्था झाली आहे. गोल गुंबजच्या शेजारी एक मस्जिद आहे.
समोरच्या बाजूस कारंजे आणि इमारतीच्या परिसरात दाखल होण्यासाठीचे मध्ययुगीन प्रवेशद्वार आहे. त्या प्रवेशद्वारासमोरच वास्तुसंग्रहालयाची इमारत आहे. वास्तुसंग्रहालयात इस्लामी खलिफांच्या पेटींग्ज आहेत. कुरआनच्या अनेक प्रती ठेवलेल्या आहेत. संग्रहालयाच्या तळमजल्यावर मराठी शिलालेखही ठेवला असून त्यात यादवकालीन अनेक मूर्ती आहेत.
जाता जाता :