महाराष्ट्राच्या समकालीन राजकारणात मध्ययुगातील ‘मलिक अंबर’ या प्रतीकाची प्रचंड चर्चा होत आहे. मलिक अंबरच्या चर्चेची कारणे वेगवेगळी आहेत. सध्या शिवसेनेने औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर करावे अशी भूमिका घेतली आहे. या बरोबरच सोशल मीडियावरती औरंगाबाद शहराचे नामकरण ‘मलिक अंबर नगर’ (अंबराबाद) करावे अशी चर्चा होत आहे. मलिक अंबरचे चर्चाविश्व उभे करणारे हे सध्याचे कारण आहे.
याआधीच्या काळात शरद पाटील आणि नेमाडे यांनीदेखील मलिक अंबरचे चर्चाविश्व मांडले आहे. महाराष्ट्र ही मलिक अंबरची कर्मभूमी होती, तर आफ्रिका ही त्याची जन्मभूमी होती. यामुळे आफ्रिकेतील अली यांनीदेखील अभिजन वर्ग हे एक चर्चाविश्व याच दशकात आफ्रिकेत मलिक अंबरच्या संदर्भात मांडले आहे.
महाराष्ट्रात याआधी इतिहासाचे प्राध्यापक तामसकर यांनी मलिक अंबरच्या संदर्भात साधनांची जुळवाजुळव केली होती. त्यांनी सविस्तर लेखन केले नाही. परंतु तामसकरांच्या भूगोलाचे प्राध्यापक असणाऱ्या चिरंजीवांनी मलिक अंबरवरती ‘लाईफ ॲण्ड टाइम ऑफ मलिक अंबर’ हे पुस्तक प्रकाशित केले. यातून मलिक अंबरच्या संदर्भात अनेक मिथके आणि प्रतीके निर्माण झाली आहेत. तसेच चर्चाविश्वे विशिष्ट चौकटींमध्ये मांडली गेली आहेत.
वाचा : औरंगाबादच्या नामांतरास पर्याय ‘संभाजीनगर’ नव्हे ‘अंबराबाद’!
वाचा : प्रेषितांच्या स्मृती जपणारे बिजापूरचे आसार महाल
शरद पाटील यांनी मलिक अंबरचे चर्चाविश्व मार्क्स-फुले-आंबेडकरवाद (माफुआ) या चौकटीत विकसित केले आहे. यामुळे माफुआ ही एक चौकट मलिक अंबरचे विवेचन करणारी आहे. या चौकटीमुळे मलिक अंबर महाराष्ट्रातील सामाजिक चळवळींमध्येदेखील चर्चेचा विषय झाले. महाराष्ट्रातील डाव्या विचारांची ही एक भूमिका आहे असे दिसते.
नेमाडे प्रणित हिंदू चौकटीत मलिक अंबरचा अन्वयार्थ लावला गेला आहे. त्यांनी मलिक अंबरचे हिंदू सांस्कृतिक प्रतीक मांडले. विशेषतः पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात त्यांनी एका भाषणात मलिक अंबरची सांस्कृतिक चर्चा केली होती.
सयाजीराव गायकवाड यांनी विविध ग्रंथ प्रकाशित केले आहेत. गायकवाड यांच्या ग्रंथ निर्मितीतील एक पुस्तक मलिक अंबरवरील आहे. हे पुस्तक वाकसकर यांनी लिहिले. या पुस्तकाचा आधार नेमाडे यांनी घेतला आहे. किंबहुना नेमाडे यांनी ते पुस्तक पुन्हा छापण्यास पाठिंबादेखील दिला होता. यातूनच सांस्कृतिक क्षेत्रात मलिक अंबर याचे एक चर्चा विश्व उभे राहिले. या घडामोडींचा परिणाम महाराष्ट्रातील वैचारिक क्षेत्रावर झाला.
एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात मलिक अंबरवरती प्रसारमाध्यमांमध्ये लेखन केले गेले. यामुळे मलिक अंबरच्या स्मृती जागृत झाल्या. तसेच मलिक अंबरचे प्रतीक आणि मिथक तयार झाले.
शिवसेनेने औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्याची भूमिका घेतली, त्यामुळे मुस्लिम समाजातून सहिष्णू असे एक नवीन चर्चाविश्व विकसित केले. मुस्लिम समाजाने अशी भूमिका सोशल मीडियावरून मांडली आहे. म्हणजेच सहिष्णु मलिक अंबर ही नवीन अस्मिता महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मांडली जात आहे.
वाचा : सम्राट अकबरला मूर्ख ठरवणाऱ्या बिरबल कथा
वाचा : शेतकऱ्यांकडून अधिक कर वसुलीस बाबरची होती मनाई
गेल्या महिन्यापासून ‘सहिष्णू मलिक अंबर’, ‘कृषी धोरणाचा पुरस्कर्ता मलिक अंबर’, ‘शहर रचनाकार मलिक अंबर’, ‘जलधोरण निश्चित करणारा मलिक अंबर’, ‘मोगल विरोधी धोरण निश्चिती करणारा मलिक अंबर’, ‘गनिमीकाव्याचा शिल्पकार मलिक अंबर’ अशा विविध प्रकारच्या चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात रंगलेल्या आहेत.
एकूण महाराष्ट्राच्या समकालीन राजकारणात सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धातील आणि सतराव्या शतकाच्या पहिल्या पाव शतकातील मलिक अंबरची चर्चा सुरू आहे. मलिक अंबरचे प्रतीक नव्याने महाराष्ट्राचे राजकारण घडविण्यामध्ये कृतिशील झालेले दिसते.
मलिक अंबरबद्दल महाराष्ट्रात प्रचंड जिज्ञासा आहे. मलिक अंबरचा कालखंड जरी सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धातील आणि सतराव्या शतकाच्या सुरुवातीचा असला, तरी एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला मात्र मलिक अंबरचे महत्त्व वाढलेले दिसून येते.
मलिक अंबर इतिहासाच्या चौकटीतून बाहेर येऊन समकालीन महाराष्ट्रामध्ये संस्कृतिक चर्चाविश्व, माफुआ चर्चाविश्व, सहिष्णुतेचे चर्चाविश्व, राष्ट्रवादाचे चर्चाविश्व नव्याने घडवत आहेत. ही सर्व चर्चाविश्वे परस्परांना पूरक आहेत.
परंतु काही संदर्भात या चर्चाविश्वामध्ये अंतर्गत विसंगती आहे. त्यामुळे मलिक अंबरच्या संदर्भात महाराष्ट्राच्या राजकारणात एकवाक्यता आणि एक विचार निर्माण होण्याच्या ऐवजी एक वाद क्षेत्र उभे राहत आहे. यातून राष्ट्रवाद, गनिमी युद्ध, सहिष्णुता, कृषी धोरण, पाणीपुरवठा धोरण, शहर रचना, सामाजिक सलोखा या चौकटीत नव्याने चर्चा मतभिन्नता वाचक घडत आहे.
या विषयावरील उथळ चर्चा राजकारणाला कोणतीही दिशा देऊ शकते. परंतु तरतमभाव आणि सारासार विवेकबुद्धीने नव्याने चर्चा या विषयावर करण्याची गरज आहे. ही पोकळी महाराष्ट्राच्या राजकारणात आणि वैचारिक चर्चाविश्वात आहे. यामुळे मलिक अंबरच्या भोवती जरी चर्चाविश्वे उभी राहिली तरी ती चर्चाविश्वे पूर्णपणे विकसित झालेली नाहीत.
त्या चर्चेचा विषय यांनी तुटक तुटक मांडलेला आहे. तसेच काही संदर्भात गौरवीकरणदेखील केलेले आहे. तसेच काही प्रमाणात अनैतिहासिक मलिक अंबरची मांडणी केलेले आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात प्रचंड गुंतागुंत निर्माण झालेली आहे. ही गुंतागुंत समजून घेण्याची क्षमतादेखील विकसित झालेले नाही.
कारण मलिक अंबर समतेच्या तत्त्वज्ञानाला किती उपयुक्त ठरू शकतात हा प्रश्न विचारला गेला नाही. मलिक अंबरने गुलामगिरीतून स्वतःची मुक्ती केली.
मलिक अंबरच्या अंगी ती क्षमता विकसित झाली. तेव्हापासून मलिक अंबरने अहमदनगरच्या पंतप्रधान पदापर्यंत वाटचाल केली. हा अर्थ राजकीय सत्तेच्या संदर्भात समावेशन वाचक आहे. परंतु एकूण मलिक अंबरच्या या वाटचालीचा पाया बळाशी जोडला गेलेला होता.
ताकद हाच मलिक अंबरच्या राजकीय व्यवहाराचा नियम होता. त्यामुळे मलिक अंबरच्या प्रतिकालादेखील मर्यादा आहेत हे लक्षात घेतले पाहिजे.
(सौजन्य : साप्ताहिक सकाळ)
जाता जाता :
लेखक शिवाजी विद्यापीठात राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत