इतिहासाच्या भगवेकरणाचा प्रयत्न

निवडणुका व त्यातून मोदी सरकारची स्थापना हे संघ परिवाराच्या राजकारणाचे फक्त पहिले पाऊल आहे. लोकांची मानसिकता हिंदुत्ववादासाठी तयार करणे व हिंदुराष्ट्राची मागणी पुढे रेटणे हा यापुढचा परिवाराचा कार्यक्रम आहे. त्यासाठी शिक्षण हे सर्वात मोठे हत्यार असणार आहे.

शालेय वयातच मुला-मुलींना जातीयवादी चष्म्यातून लिहिलेला इतिहास शिकवणे व त्यातून त्यांची जातीयवादी मानसिकता तयार करणे हे काम दक्षिण आशियातील जवळपास सर्वच मूलतत्त्ववादी राजवटींनी केले आहे. पाकिस्तानचा इतिहास आठव्या शतकातील मुहंमद बिन कासिमच्या सिंधवरील आक्रमणापासून सुरू होतो.

जणू काही त्याच्या आधी सिंध पाकिस्तानचा भूभाग अस्तित्वातच नव्हता. मग त्याचा इतिहास असण्याचा प्रश्नच नाही. या प्रकारच्या विचारधारेचे शिक्षणखाते हे नेहमीच महत्त्वाचे हत्यार राहिले आहे.

वाचा : संघ-परिवाराने राज्यघटनेला विरोध का केला होता?

वाचा : सेक्युलॅरिझम धर्मीय की राजकीय विचारधारा?

राष्ट्रीय लोकशाहीचे आघाडीचे सरकार होते तेव्हा देशातील इतिहासाची जातीयवादी अंगाने मांडणी करण्याचा प्रयत्न झाला होता. या वेळी तर भाजपला पूर्ण बहुमत आहे.

प्राध्यापक वाय सुदर्शन राव यांनी इतिहासाचा अभ्यासक म्हणून शैक्षणिक क्षेत्रात काही भर घातल्याचे दिसून येत नाही. त्यांचे काम विशेषतः रामायण व महाभारताचे ऐतिहासिकत्व सिद्ध करणे याच विचारांशी संबंधित आहे. याशिवाय त्यांनी विविध ब्लॉग्ज लिहिले आहेत ज्यामध्ये पारंपरिक विचारसरणीचे प्रतिबिंब स्पष्ट दिसते.

 ते जरी स्वत:ला संघाशी जोडून घेत नसले तरी त्यांचे हिंदुराष्ट्राबद्दल आकर्षण स्पष्ट दिसते. इस्लामपूर्व वैभवशाली हिंदू संस्कृती व मुस्लीम आक्रमणांमुळे झालेली अधोगती हे त्यांचे आवडते विषय आहेत. त्यांच्या मते घोरी राजवटीपासून सुरू होऊन मुघल बादशाहापर्यंत ज्या मुस्लीम राजवटी निर्माण झाल्या आहेत त्याच भारताच्या अंधारयुगाला जबाबदार आहेत.

आपल्या देशातील ज्या ओंगळ सामाजिक चालीरीती आहेत (उदा. जातिसंस्था, स्त्री-पुरुष भेद) त्या सर्व या मुस्लीम राजवटींचा परिणाम होय. सुदर्शन राव यांच्या मते प्राचीन काळी ही जातिसंस्था व्यवस्थित काम करत होती आणि तिच्याविरुद्ध समाजात बिलकुल असंतोष नव्हता.

जर राव यांनी थोडादेखील विवेकवादी दृष्टिकोन बाळगला असला तरी त्यांना सहज कळून येईल की, जातिसंस्था आणि अनिष्ट प्रथा ही मुस्लीम सत्ताधीशांची देणगी नव्हती तर वैदिक धर्माच्या (ब्राह्मणी धर्माच्या) वैचारिक पायातच ही विषमता होती. या सामाजिक व्यवस्थेतूनच जन्मावर आधारीत जाती-वर्णांची उतरंड तयार झाली; आणि ही सर्व प्रक्रिया मुस्लीम शासकांच्या आगमनाअगोदरच घडली.

वाचा : वाजपेयींच्या काळात झाला होता राज्यघटना बदलण्याचा प्रयत्न

वाचा : मुरुगन ते मुनव्वर : द्वेषाचा विजयोत्सव आणि कलावंताचा मृत्यू

मुस्लीम शासकांनी जातिव्यवस्थेत ढवळाढवळ करण्याचा फारसा प्रयत्न केला नाही व त्यांनी तशी इच्छाही दाखवली नाही. याउलट मुळातील समतावादी मुस्लीम धर्माने सामाजिक स्तरावर हळूहळू जातिव्यवस्था स्वीकारण्यास सुरुवात केली होती.

ज्याप्रमाणे पाकिस्तानी इतिहासाच्या पुस्तकात हिंदू धर्माचे अस्तित्वच मान्य केले जात नाही; त्याप्रमाणे हे जातीयवादी  सर्व अनिष्ट प्रथांचे पातक मुस्लीम व ख्रिश्चन धर्मावर फोडतात. राव यांनीसुद्धा त्यांच्या लिखाणातून याच विचारांची री ओढली आहे. त्यां

च्या इतिहासात भारताच्या सर्व अधोगतीचे खापर कल्पनेतील मुस्लीम सत्ताधीशांवर फोडले आहे. पण राव येथे हे विसरतात की औरंगजेबाच्या दरबारातसुद्धा 34 टक्के लोक हिंदू होते. याउलट स्त्रीदास्य आणि जातिसंस्थेची उतरंड या गोष्टी मनुस्मृतीमधून आल्या आहेत, जी पहिल्या व दुसर्‍या शतकात लिहिली गेली.

मनुस्मृतीमध्ये असे अनेक श्लोक आहेत की खालच्या जातीतील लोकांनी उच्च जातीच्या लोकांपासून दूर राहावे, असे त्यातून प्रतीत होते. जातिव्यवस्थेची सुरुवात चार वर्णांच्या रूपाने वेदकाळापासून झाली. मनुस्मृती लिहीपर्यंत तिचे रूपांतर जन्मावर आधारीत एका कधीही न बदलल्या जाणार्‍या सामाजिक व्यवस्थेत झाले होते.

इसवी सन पूर्व दहाव्या शतकात रचल्या गेलेल्या वाजसेनी संहितेत चांडाळ आणि पौलक्ष हे दोन शब्द सापडतात. छांदोग्य उपनिषद जे आठव्या शतकात  लिहिले गेले त्यात वर्णन आहे की, जे लोक कुकर्म करतील त्यांना पुढचा जन्म कुत्रा किंवा चांडाळ यांचा प्राप्त होईल.

याउलट सिंधवरील आक्रमणाचा अपवाद वगळता भारतातील मुस्लीम आक्रमणे नवव्या शतकात सुरू झाली आहेत आणि युरोपियन सत्ता भारतात पाय रोवण्याच्या हिशेबाने 16व्या शतकात आल्या आहेत. जातिबाह्य लग्नांना परवानगी नाकारणे आणि शुद्रांना अस्पृश्य ठरवणे या प्रथा त्याआधीच चालू झाल्या होत्या. म्हणजे अस्पृश्यतेसारख्या चुकीच्या प्रथांचा व मुस्लीम आक्रमणाचा काहीएक संबंध नाही.

वाचा : सावरकरांच्या हिंदुराष्ट्रात वंचितांचे स्थान काय असेल?

वाचा : हिटलरच्या आत्महत्येचा तो शेवटचा क्षण!

संघाचे दुसरे सरसंघचालक मा. स. गोळवळकर गुरुजी यांनी तर वर्णव्यवस्थेचे कौतुकच केले आहे. ‘वर्णव्यवस्था हा काही हिंदू समाजाचा दोष नाही आहे; आणि आपले प्राचीन वैभव हस्तगत करण्यासाठी याचा उपयोगच होणार आहे.’  (मा. स. गोळवलकर, भारत प्रकाशन नागपूर 1939,  पृष्ठ 39)

यानंतरसुद्धा त्यांनी वर्णव्यवस्थेचे छुपे समर्थनच केले आहे. ‘‘जेव्हा समाज सुधारणेच्या पुढच्या टप्प्यावर जाईल तेव्हा काही भेद आहेत ते वैज्ञानिक व सामजिक आहेत आणि सर्व वर्ण एकाच समाजपुरुषाचे भाग आहेत. ही तर फक्त विविधता आहे आणि यात दोषास्पद काही नाही.

दीनदयाळ उपाध्याय जे संघपरिवारातील ज्येष्ठ नेते होते आणि जनसंघाचे अध्यक्ष होते. त्यांनी लिहिले आपली जी चातुर्वण्याची व्यवस्था होती त्यातील प्रत्येक वर्ण हा एकाच वेळी एकतेचे आणि समाजातील व्यक्तिवादाचे उदाहरण आहे. शिवाय चारी वर्ण हे समाजाला पूरक आहेत.

ही कल्पना ढासळली तर याच जाती एकमेकांना पूरक ठरण्याच्या ऐवजी मारक ठरतील आणि त्यामुळे समाज एकसंध राहणार नाही तर कोलमडला जाईल (डॉ. दीनदयाळ उपाध्याय, एकात्मिक मानवतावाद, नवी दिल्ली, भारतीय जनसंघ 1965 पृ. 43)

आंबेडकरांच्या आणि गोळवलकरांच्या वैचारिक मांडणीत या दोन्ही विचारसरणींचे द्वंद स्पष्ट दिसते. घटनाकार आंबेडकरांनी जातिसंस्था आणि अस्पृश्यता संपवण्यासाठी आयुष्यभर लढा दिला. त्यासाठी त्यांनी मनुस्मृतीला जबाबदार धरले आणि मनुस्मृती दहनाचे कार्यक्रम केले.

याउलट गोळवलकरांनी मनुस्मृती आणि चार्तुवर्णाच्या कल्पनेवर स्तुतिसुमने उधळली. जातिव्यवस्था व्यवस्थित काम करत होती आणि मुस्लीम आक्रमणामुळे बिघडली हा जातिव्यवस्थेच्या समर्थकांचा दावा अर्धसत्य आहे. जातिव्यवस्था समाजातील मूठभर उच्चवर्णीयांसाठी व्यवस्थित काम करत होती आणि तेच तिचे लाभार्थी होते. याउलट समाजातील शुद्र आणि अतिशुद्रांसाठी दमनाची आणि दहशतीची यंत्रणा होती.

यामध्ये दलित समाजाने विरोधच केला नाही ही गोष्ट खोटी आहे, कारण दलितांना शिकण्याचा अधिकारच नव्हता. बुद्धकाळापासून याविरुद्ध संघर्ष चालूच आहे. तथागतांचे सम्यक बौद्ध तत्त्वज्ञान आणि मध्यममार्ग, स्वर्गनरक या कल्पना नाकारणे आणि एकूणच विवेकवादी बौद्ध तत्त्वज्ञान ही प्रस्थापित जातिसंस्थेविरुद्ध चळवळच होती.

मध्ययुगीन काळातील संत कबिरांसारखे संत व त्याच वेळी महाराष्ट्रात उदयाला आलेला वारकरी पंथ यांनी समाजातील जन्मावर आधारीत उच्च-नीचतेचा कायमच निषेध केला आणि माणुसकीचे साधे सोपे व सरळ तत्त्वज्ञान रुजवले. परंतु प्राध्यापक रावांसारखे लोक याच जातिसंस्थेची भलामण करत आहेत.

मोदी राजवटीमध्ये बहुजन समाजापुढे व बहुजन हिताय आणि बहुजन सुखायचा पुरस्कार करणार्‍या समतेच्या तत्त्वज्ञानापुढे काय वाढून ठेवले आहे याचेच हे उदाहरण आहे.

जाता जाता :