पश्चिम बंगालच्या निवडणुकीत काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी आघाडी केली आणि त्याचबरोबर ‘इंडियन सेक्युलर फ्रंट’ नामक एका संघटनेशीही आघाडी केली. पण काँग्रेस नेत्यांना म्हणजे आनंद शर्मा यांनी एका मुस्लिम संघटनेशी काँग्रेसने युती केली ती आवडली नाही.
आनंद शर्मा यांनी म्हटले आहे की, “काँग्रेस धर्मनिरपेक्ष पक्ष असून तो महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांच्या धर्मनिरपेक्षतेचे पालन करणारा आहे.” असे असताना पश्चिम बंगालचे काँग्रेस अध्यक्ष अधीर रंजन ‘इंडियन सेक्युलर फ्रंट’चे अध्यक्ष अब्बास सिद्दीकी यांच्याबरोबर कसे बसले होते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
शर्मा म्हणतात, “महात्मा गांधी आणि नेहरूंचे विचार काँग्रेस पक्षाचा आत्मा आहे.” इंदिरा गांधी यांनी भिंद्रनवालांशी हातमिळवणी केली होती. त्या वेळेस हा आत्मा कुठे लोप पावला होता. याचे उत्तर आनंद शर्मा यांना द्यावे लागेल. त्याच मैत्रीतून शेवटी इंदिरा गांधी यांची हत्या झाली हा इतिहास काँग्रेसचे नेते आनंद शर्मा यांना माहीत आहे की नाही?
वाचा : औरंगाबादच्या नामांतरास पर्याय ‘संभाजीनगर’ नव्हे ‘अंबराबाद’!
वाचा : मलिक अंबर महाराष्ट्राचे सांस्कृतिक राजकारणाचे प्रतीक
कोणाचा दबाव?
बरे! अब्बास सिद्दीकी यांनी आपल्या संघटनेचे नाव ‘इंडियन सेक्युर फ्रंट’ असे ठेवलेले असताना त्याची धर्मनिरपेक्षता काँग्रेसच्या धर्मनिरपेक्षतेपेक्षा वेगळी कशी? त्यांच्या संघटनेचे नाव जर ‘इंडियन इस्लामिक संघटना’ असते तर मग आनंद शर्मा यांचे काय झाले असते? कदाचित हार्ट अटॅक आला असता!
या काँग्रेस पक्षाची केरळ राज्यात मुस्लिम लीगशी युती असतानादेखील तिथे त्यांनी कधी धर्मनिरपेक्षतेचा प्रश्न का उपस्थित केला नाही? पश्चिम बंगालच्या राजकारणात आणि निवडणुकीतच आनंद शर्मा यांना एक धर्मनिरपेक्ष संघटनेचा संस्थापक मुस्लिम असल्यामुळे इतका त्रास का होतो, ही कळण्यासारखी गोष्ट नाही.
इंडियन सेक्युलर फ्रंटने पश्चिम बंगालच्या निवडणुकीत येऊच नये, कारण त्याचे अफाट कार्यकर्ते असून माणसांची गर्दी खेचणारा नेता आहे. म्हणून वरून म्हणजे शहांकडून तर आनंद शर्मांवर दबाव वगैरे आला नसावा का, असा प्रश्न उपस्थित होतो.
शर्मा यांच्या आक्षेप घेण्यामागे कोणती वस्तुस्थिती असावी, ते इतके चलविचल का झाले, असे कितीतरी प्रश्न त्यांना जनतेकडून विचारले जाऊ शकतात. खरी गोष्ट दुसरीच आहे. काँग्रेस पक्षाला आता मुस्लिमांची गरज नाही. त्याला हिंदुत्वाशी लढा द्यायचा आहे म्हणून भाजपपेक्षाही आपण कसे जास्त हिंदुत्ववादी आहोत हे त्यांना सिद्ध करायचे आहे. तसे नसते तर एका स्थानिक मुस्लिम नेत्याच्या आणि त्याच्या सेक्युलर म्हणजेच धर्मनिरपेक्ष संघटनेचा त्यांनी विरोध केला नसता.
या निवडणुका काँग्रेसला भाजपच्या पदरात घालायच्या असतील, असेही कुणी म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. त्या संघटनेच्या नावाला त्यांचा विरोध नाही. त्याच्या मुस्लिम संस्थापकास त्यांचा विरोध आहे. अहमद पटेल यांचे निधन झाले. गोरगरीब, म्हातारे कसेबसे कोरोनाशी लढा देत बाहेर आले. पण पटेल यांनाच कोरोनामुळे का मृत्यू आला असेल, असा प्रश्न लोकांच्या मनात आहे, कुणी विचारत नसेल.
त्यांच्यानंतर अणखीन एक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते काँग्रेस पक्षासाठी आपले सबंध जीवन अर्पण केलेले गुलाम नबी आझाद यांनाही काँग्रेसने मोठमोठे आरोप करत इतका त्यांना मानसिक त्रास दिला, इतकी बदनामी केली की त्यांनी काँग्रेस पक्षाचा आतापर्यंत तरी राजीनामा दिलेला नाही, पण लवकरच तसे करण्यासही त्यांना विवश केले जाईल.
वाचा : ‘सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट’ की सांस्कृतिक वारसा पुसण्याचा प्रयत्न
वाचा : संघ-परिवाराने राज्यघटनेला विरोध का केला होता?
‘बी टीम’ कोण?
गुलाम नबी आझाद यांनी भाजपला छुपी मदत केली आणि करत आहेत, असा त्यांच्यावर आरोप झाला. आता उघडपणे गुलाम नबी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा करीत आहेत. याचे परिणाम काय होतील, ते आझाद यांना माहीत आहे. एक एक करून ज्येष्ठ मुस्लिम नेत्यांना काग्रेस पक्षातून काढले जात आहे.
पश्चिम बंगालमधील काँग्रेसच्या आघाडीवरून पक्षातील अंतर्गत मतभेद आणखी तीव्र झाले असून ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील स्तुतिसुमने बंद करा’, असा हल्लाबोल लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी काँग्रेसमधील बंडखोर ‘जी-२३’ गटातील नेत्यांवर केला. चौधरी यांनी बंडखोर नेते मोदींचे कौतुक करून धर्माध भाजपला बळ देत असल्याचा आरोप केला.
त्याच वेळी जम्मूमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आझाद आणि शर्मा यांच्या प्रतिमेचे दहन करून राहुल गांधी झिंदाबादच्या घोषणा दिल्या.
मुस्लिममुक्त काँग्रेस, मग भाजपला साजेसा विरोधी पक्ष होणार आहे. एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी जेव्हा वेगवेगळ्या राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुका लढवण्याची घोषणा करतात तेव्हा लगेच त्यांना भाजपधार्जिणे म्हटले जाते. ‘वोटकटवा’ म्हटले जाते. अमीत शहा यांच्या इशाऱ्यावर ते निवडणुका लढवतात असे त्यांच्यावर आरोप केले जातात.
त्याच वेळी अरविंद केजरीवाल जेव्हा वेगवेगळ्या राज्यंमध्ये निवडणुका लढवतात तेव्हा त्यांना कुणी काहीच कसे म्हणत नाही? कारण ते ‘हिंदू’ आहेत आणि ओवैसी ‘मुस्लिम’ आहेत म्हणून ओवैसींवर विश्वास ठेवू नये. ओवैसी यांच्या पक्षाला भाजपची ‘बी टीम’ म्हणतात. खरे पाहता गांधी परिवार सोडून उर्वरित काँग्रेस पक्षच भाजपची ‘बी टीम’ आहे, ही गोष्ट लोकांना नसेल माहीत, पण भाजपवाल्यांना ती माहीत आहे.
पश्चिम बंगालमध्ये लोकांना डाव्या आणि सेक्युलरवाद्यांची सत्ता नको आहे. त्यांना असे वाटते की आजवरच्या डाव्या पक्षांनी आणि नंतर ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या धार्मिक भावना दाबून ठेवल्या होत्या. भाजपमुळे त्यांना धर्माकडे परतण्याचे आकर्षण आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे गेल्या दहा वर्षांच्या सत्तेमुळे तिथल्या जनतेमध्ये सत्ताविरोधी भावना आहेत. यामुळे कदाचित ममता बॅनर्जी यांना यंदा निवडणुकीत पराभव पत्करावा लागेल का असे लोकांच्या मनात आहे. काँग्रेसला त्याचे काय सांगावे त्याचे त्यालाच माहीत नाही. ज्या राज्यात ३० टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे त्या राज्यात एक मुस्लिम नेता त्यांना नको आहे, हा काँग्रेसचा अस्सल धर्मनिरपेक्षपणा आहे.
जाता जाता :
लेखक ज्येष्ठ पत्रकार असून गाजिउद्दीन रिसर्च सेंटरचे पदाधिकारी आहेत. इस्लामी तत्त्वज्ञानावर त्यांनी पुस्तके लिहिली आहेत.