मनावर आणि जिभेवर लादलेली बंधने म्हणजे स्वातंत्र्यहरणच!

नुकतेच माझे प्रसिद्ध झालेले ‘सनराइज ओव्हर अयोध्या: नेशनहूड इन अवर टाइम्स’ हे पुस्तक तब्बल तीनशेहून जास्त पानांचे आहे. माझ्या अनेक सहकाऱ्यांनी अयोध्या निकालाच्या कायदेशीर अचूकतेबद्दल शंका उपस्थित केल्या. असे असले तरी मी मात्र या पुस्तकाच्या पानापानावर या निकालाला पाठिंबा देण्याचा आणि त्याचे समर्थन करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

पुस्तकात हिंदू तत्त्वज्ञान मान्य करत त्याची मी मनःपूर्वक प्रशंसा केली आहे, सनातन धर्माची मानवीय बाजू अधोरेखित केलेली आहे. हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजातील सामंजस्याचा पुरस्कार करण्याची आणि दुर्दैवी भूतकाळावर पडदा टाकून सामायिक भविष्याच्या दिशेने वाटचाल करण्याची एक संधी या दृष्टिकोनातून अयोध्या निकालावर (Ayodhya judgment) प्रकाशझोत टाकणे हा या पुस्तकाचा गाभा आहे.

दुर्दैवाची गोष्ट अशी की ‘राष्ट्रीय माध्यमे’ किंवा सत्ताधारी पक्षातील सदस्यांनी पुस्तकाच्या या मुख्य गाभ्याकडे मुळीच लक्ष दिले नाही. त्याऐवजी सहाव्या प्रकरणातील एका वाक्यातच ते गुंतून पडले. या वाक्यात हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान आणि हिंदुत्व यातील फरक स्पष्ट केलेला होता – “Sanatan Dharma and the classical Hinduism known to sages and saints was being pushed aside by a robust version of Hindutva, by all standards a political version similar to the jihadist Islam of groups like ISIS and Boko Haram of recent years.”

भावार्थ : “सनातन धर्म आणि ऋषीमुनींना ज्ञात असलेला अभिजात हिंदू धर्म दूर सारण्यात आला आणि त्याची जागा हिंदुत्वाच्या जोशपूर्ण अवताराने घेतली. कोणताही निकष लावला तरी हा एक राजकीय अवतार होता. त्याचे नजीकच्या काळात निर्माण झालेल्या ‘आयसिस’ किंवा ‘बोको हराम’सारख्या इस्लामी गटाशी साम्य होते.”

वाचा : सलमान खुर्शीद यांच्या घरी जाळपोळ म्हणजे असहिष्णुतेचा नमुना

वाचा : पुस्तकातून उरलेला बाबरी-आयोध्यावाद

वाचा : काय आहे अयोध्या-बाबरी मस्जिदीचा वाद?

हिंदुत्वाच्या स्वरूपाबद्दल मी उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे  आणि त्याहून जास्त ‘बोको हराम’ किंवा ‘आयसिस’शी हिंदुत्वाचे असलेले साम्य दाखवून देण्याचा प्रयत्न मी केल्यामुळे या लोकांचा तिळपापड झाल्याचे दिसते. तेव्हापासून प्रसिद्धी माध्यमांनी पुनःपुन्हा उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी दिलेली आहेत.

हे प्रश्न विचारताना त्यांच्यापैकी अपिरहार्यपणे बऱ्याच लोकांची असोशी लपता लपत नव्हती. इतर अनेकांच्या प्रश्नांनाही मी उत्तरे दिली. मी अशी भूमिका घ्यावी याबद्दल त्यांना वाटणारी निराशा व्यक्त करतच ते पुढील संभाषणाला सुरुवात करत.

काही लोक याही पुढे जाऊन मी हिंदुत्वावर दहशतवादाचा आरोप करू इच्छितोय काय, असेही विचारत. यावर ‘दहशतवादी’ हा शब्द मी कुठेच वापरलेला नाही, असे स्पष्टीकरण देताच माध्यमांनी पटकन घोषितच करून टाकले की मी स्पष्टीकरण दिलेले आहे आणि माझे आरोप मागे घेतलेले आहेत.

धर्माचा गैर अर्थ लावत मानवीयतेवर हल्ला करण्याचा सर्वत्र दिसून येणारा चुकीचा प्रयत्न उजेडात आणण्यासाठी मी मुद्दाम समान (similar) असा शब्द वापरला आहे, अगदी ‘वैसा ही’ (same) असे म्हटले नाही हे मी कितीही सांगितले तरी त्याकडे ठार दुर्लक्ष केले जाईल.

ट्रोल मंडळी या विषयावरून धमाल उडवत असतानाच सुदैवाने कल्की धाम येथे कल्की महोत्सवाच्या समारोप प्रसंगी मला विशेष अतिथी म्हणून बोलावले गेले. पीठाधीश्वर श्री. आचार्य प्रमोद कृष्णन यांनी त्यांच्या अंगभूत स्वभावानुसार माझे दिलदारपणे स्वागत केले.

दुधात साखर पडल्याप्रमाणे काशी पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य नरेंद्रानंद गिरीजी सरस्वती महाराज यांच्याही आशीर्वादाचा मला तिथे लाभ झाला. मानवजातिचे ऐक्य या विषयावर ते भरभरून बोलले. धर्म किंवा जात यामुळे आपल्यात भेद पडता नयेत असे ते म्हणाले.

एका उदात्त धर्माच्या राजकीय दुरुपयोगापुढे लीन होऊन मी त्याला मान्यता देत नाही, तोवर शंकराचार्याबद्दल मला वाटणारा प्रचंड आदर, सनातन धर्माची मी केलेली प्रशंसा, अयोध्या निकालाला दिलेले समर्थन, समेटासाठी केलेले आवाहन, रामाच्या या देशातील स्थानाचा ‘इमाम ए हिंद’ असा केलेला पुनरुच्चार या कशालाच काही अर्थ उरत नाही, अशी परिस्थिती झालीय.

माझे विरोधक माझ्या पुस्तकावर बंदीची मागणी करतात, तेव्हा त्यांच्या हे लक्षात येत नाही की या पुस्तकात अयोध्या निकालाचा जो इत्थंभूत आढावा घेण्यात आला आहे, त्यालाही ही बंदी लागू होईल. यालाच आपल्या काळाचे लक्षण असलेली विचित्र विसंगती म्हणता येईल. किंवा मग श्रीरामाची स्तुती केली या गुन्ह्यासाठी मला फौजदारी न्यायालयात खेचावे लागेल.

वाचा : मुरुगन ते मुनव्वर : द्वेषाचा विजयोत्सव आणि कलावंताचा मृत्यू

वाचा : संघ-परिवाराने राज्यघटनेला विरोध का केला होता?

वाचा : वाजपेयींच्या काळात झाला होता राज्यघटना बदलण्याचा प्रयत्न

गंमत म्हणजे माझे ज्येष्ठ सहकारी गुलाम नबी आज़ाद यांनी या आगीत कदाचित नकळतपणे तेलच ओतले. पुस्तक प्रकाशनाला काही तास उलटतात न उलटतात तोच त्यांनी स्वतःहून काढलेल्या स्वाक्षरीकृत निवेदनाने मी गोंधळात पडलो. लगेच माध्यमांनी जाहीरच करून टाकलं की यासंबंधी पक्षांतर्गत तुंबळ वादावादी सुरू असून आज़ाद पुस्तकातील विधानांना विरोध करणाऱ्यांचे नेतृत्व करत आहेत.

पण याबाबत दोन मुद्दे लक्षात घेणे गरजेचे आहेत. आज़ाद यांनीही राजकीय विचारसरणी म्हणून हिंदुत्व नाकारले आहे, त्याचे कारण मात्र त्यांनी सांगितलेले नाही. ते पुढे म्हणतात, “हिंदू ही एक संमिश्र संस्कृती आहे. पण त्याची तुलना बोको हराम किंवा आयसिसशी करणे तथ्यहीन आणि अतिशयोक्त आहे.”

पण एखाद्या गोष्टीची अतिशयोक्ती करायची असेल तर तिची ओळख तरी पटायला नको? एका गाण्याच्या ओळी मला आठवतात. ‘गात-गात हळुवारपणे तो मला मारून टाकत आहे.’

ही तुलना साम्य दाखवते, एकरूपता नव्हे. आणि प्रत्यक्ष अस्तित्वात असलेल्या गोष्टीचीच केवळ अतिशयोक्ती होऊ शकते. काही वर्षांपूर्वी आज़ाद यांनीच हिंदुत्वाची आयसिसशी बरोबरी केल्याच्या व्हीडियोचा आधार घेण्याची माझी मुळीच इच्छा नाही. आम्हा दोघातले मतभेद केवळ प्रमाणासंबंधीचे असून मूळ मुद्द्यांविषयी नाहीत असे तर नसेल? की काळच बदलला आहे?

हिंदुत्वाच्या एखाद्या अनुयायाच्या हानिकारक वर्तनाचे एखादे तरी ठोस उदाहरण द्या, असे  काही संवादक (interlocutors) मला म्हणाले. त्याची तर लांबलचक यादीच होईल. पण ती देण्याने तडजोडीच्या माझा मूळ उद्दिष्ट्यांचीच हानी होईल. शिवाय जे घडले ते त्यांच्याकडून मान्य केले जाण्याचा सुतराम संभव नाही.

पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी पी. चिदम्बरम यांनी हे अगदी समर्पक शब्दात मांडले. ते म्हणाले, “Just as no one killed Jessica, no one demolished Babri Masjid.” – “जेसिकाला ज्याप्रमाणे कोणीच मारले नाही त्याचप्रमाणे बाबरी मस्जिदही कोहीच उद्ध्वस्त केली नाही.”

वाचा : खासदार मोहुआ मोइत्रा लोकसभेत काय बोलल्या, जो इतका गदारोळ झाला!

वाचा : प्रा. फकरुद्दीन बेन्नूर : संवेदनशील आणि विद्यार्थीप्रिय प्राध्यापक

वाचा : दंगलीतून सहिष्णुता अंगीकारण्याचा बोध घ्यावा

‘भाजप’, ‘बजरंग दल’, ‘विश्व हिंदू परिषद’ अशा सर्व संघटनांच्या धुरीणांबरोबर माझ्या ज्या काही चर्चा झाल्या त्यातून यात आणखी भरच पडते. पहलू खान (अलवर) आणि अखलाक (दादरी) यांची हत्या कोणीच केली नाही; 2002 साली नरोडा पाटिया येथे स्त्रियांचे आणि मुलांचे प्राण कोणीही घेतले नाहीत.

उन्नाव आणि हाथरस येथे मुलींवर बलात्कार कोणीच  केले नाहीत; मुझफ्फरनगरमधील घरेदारे कोणीच जाळली नाहीत; इशरत जहाँचा खून कोणीच केला नाही; लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना कोणीच चिरडले नाही. आणि अर्थातच गांधीजींची हत्याही कोणीच केली नाही.

चर्चेला मी सदैव उत्सुक असतो. पण स्वेच्छापूर्वक प्रसृत केलेल्या निवेदनांऐवजी अशी चर्चा (काँग्रेस) पक्षाच्या व्यासपीठावर व्हायला नको काय? शिवाय आता तर पक्षाचे भूतपूर्व अध्यक्ष आणि उच्चस्तरीय नेते राहुल गांधी यांनी आपले मत स्पष्टपणे व्यक्त केले आहे.

आपल्या विचारात धोरणात्मक स्पष्टता असावी यावर ते अलीकडे विशेष लक्ष देत आहेत. असे असले तरी ‘हिंदू तत्त्वज्ञान’ आणि ‘हिंदुत्व’ या सरळसरळ दोन भिन्न गोष्टी आहेत. कारण हिंदुत्व हे निरपराध लोकांच्या हत्यांमध्ये सहभागी होत असताना चर्चेला जागाच कुठे उरते?

सत्य हे आहे की आपण दीर्घ काळ आम्हाला उग्रपणे हुकूम देण्याची मुभा आम्ही हिंदुत्ववादी शक्तींना दिली आहे. जणू सत्याची मक्तेदारी त्यांच्याकडेच आहे. एक धोरण म्हणून आपली अपेक्षा अशी होती की निसर्ग आपणहून स्वतःला पूर्ववत करतो, तसे ही आक्रमकता आपोआप लयास जाईल आणि सार्वजनिक व्यवहार पुनःश्च सामान्य पातळीवर येतील. पण नुकत्याच घडलेल्या काही घटना आपल्याला दाखवून देतात की विरोधकांना आम्ही इंचभर जागा बहाल केली ते फूटभर आत येण्याचा प्रयत्न करतात.

म्हणून आता एक लाल रेषा आखण्याची वेळ आली आहे. केवळ आमच्याच हितासाठी नव्हे आपल्याला परिचित असलेल्या आपल्या स्वप्नातील राष्ट्राच्या रक्षणासाठी अशी रेखा आपण आता आखायला हवी. शिवाय हा मुद्दा काही केवळ हिंदुत्ववादी शक्तींच्या प्रवृत्ती आणि वर्तन याविषयी असलेल्या मतभेदांचा नाही. तर जे लोक हिंदू धर्मातील मानवीयता खच्ची करत देशातील दोन महत्त्वाच्या समुदायांत कायमची फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यापासून हिंदू नावाच्या एका गौरवशाली धर्माचे रक्षण करण्याच्या प्रयत्नात स्वतःला झोकून देणे हाच खरा मुद्दा आहे.

आज, या क्षणी इथेच आपण आपली भूमिका निश्चित केली पाहिजे. शब्दच्छल करत टाळाटाळ करण्याची वेळ कधीच निघून गेलीय. विरोधी प्रतिक्रियांच्या भयाने आजवर आपले योग्य म्हणणे सर्वत्र मांडण्यात कसूर करत आलो आहोत. परिणामी मित्रांनी आमचा नाद सोडलाय आणि शत्रू आम्हाला झोडपत सुटलाय. खोटारडेपणाचा सुळसुळाट गेल्या काही वर्षात झालाय तितका पूर्वी कधीच झाला नव्हता. आता गमावण्यासारखे आमच्याकडे राहिलेले आहे काय? उजव्या शक्ती ज्यात आम्हाला अडकवू पहात आहेत ते साखळदंडच ना?

स्वातंत्र्याचा अभाव म्हणजे केवळ शारीरिक बंदिवास नव्हे. मनावर आणि जिभेवर लादलेली बंधने हेही स्वातंत्र्यहरणच होय. हिंदुत्वाचे प्रचारक सत्याला कमालीचे घाबरतात. प्रथम जरब दाखवून ते त्याला गप्प बसवण्याचा प्रयत्न करतात आणि नंतर त्याची मुस्कटदाबी करण्यासाठी सर्व प्रकारची दमनकारी हत्यारे वापरतात.

गांधीवादाशी असलेल्या आपल्या बांधिलकीनुसार हिंसा आणि असभ्यता यांना आपण नकार देतोच. तसेच निःशस्त्र प्रतिकार करत असताना होणारे सर्व परिणाम भोगायलाही आपण तयार असतो. किंबहुना आपले विरोधक द्वेषाने भारलेले आहेत. त्यामुळे आपण सत्याच्या बाजूने  ठामपणे उभे राहू. आपण या बाजूचे की त्या, याची निवड मित्रांना करावी लागेल.

नैनिताल येथील माझ्या घराची जाळपोळ झाली तेव्हा मला विचारण्यात आले की हे कोणी केले असेल, असे मला वाटते. मी म्हणालो ‘बोको हराम’ने असेल, ‘आयसिस’ने असेल किंवा हिंदुत्ववाद्यांनी असेल. शहाण्यांनीच काय तो निर्णय घ्यावा.

__

सदरील लेख No one burnt my cottage या शीर्षकाने  18 नोव्हेंबर 2021 रोजी इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रकाशित झालेला आहे, अनंत घोटगाळकर यांनी त्याचा अनुवाद केला आहे.

जाता जाता :