मदीनेत इस्लामी सभ्यतेचे आगमन कसे झाले?

क्केत सुरुवातीचे १० वर्षे धर्मप्रसार केल्यानंतर अखेर प्रेषित मुहंमद (स) यांना आपली ही मातृभूमी सोडून नव्या कर्मभूमीकडे प्रस्थान करावे लागले. मदीनेत आल्यावर त्यांनी सर्वप्रथम साऱ्या जमाती, कबिले, टोळ्या विविध समूह विशेषतः ज्यू धर्मियांशी एक करार संमत केला. हा करार म्हणजे राजकीय व्यवस्था स्थापन करण्याची सुरुवात होती.

मदीनेच्या विविध धार्मिक, वांशिक टोळ्या करार अंमलात येताच मुस्लिमांसहित सर्वचे सर्व एकत्र प्रजासमूह असतील. याद्वारे त्यांनी सर्वप्रथम साऱ्या अस्मिता संपवून टाकल्या. राष्ट्रवाद नव्हता पण देशवाद, टोळीवाद, धर्मवाद हे सगळे संपून गेले आणि फक्त मदीनेचे नागरिक बनले.

सर्वांचे अधिकार समान. सर्वांना संरक्षण आणि परराष्ट्र ही दोन क्षेत्रे वगळता आपापल्या धर्म शिकवणीनुसार, रीतीरिवाज, परंपरांचे स्वातंत्र्य दिले. या करारात ४९ हून अधिक अटी होत्या, पण प्रमुख अट म्हणजे सारे मदीनावासी एकत्र प्रजा.

मक्केच्या कुरैशांना कोणी मदत करणार नाही. त्यांना मदीनेत आश्रय देता कामा नये. कुरैश किंवा इतर लोक मदीनेवर चाल करून आले तर सर्व नागरिक मिळून शहराचे रक्षण करतील. सांगायचे तात्पर्य असे की प्रेषितांनी सर्वप्रथम राजकीय व्यवस्था स्थापित केली.

यानंतर प्रेषितांनी सामाजिक बांधणीकडे लक्ष दिले. यासाठी सर्वप्रथम प्रेषितांना मनुष्याच्या ऐहिक आणि आध्यात्मिक अशा वेगवेगळ्या अस्तित्वांना संपवून त्यांना एकत्र केले. नंतर नैतिक मूल्यांना मानवाच्या सामाजिक जीवनाचा मुलाधार ठरविले.

वाचा : पॉलिटिकल इस्लामप्रणित समाजपरिवर्तनाचा दस्तऐवज

वाचा : जेव्हा मौलाना रुमी आपल्यातील ‘मी’ला नष्ट करतात!

वाचा : मुहमंद पैगंबरांचे श्रमावर आधारित बाजारांचे व्यवस्थापन

सामाजिक क्रांती

पूर्वी सांगितल्याप्रमाणे मक्काकाळात मुस्लिमांचे सामूहिक जीवन नव्हते. प्रत्येकजण वैयक्तिक जीवन जगत होता. मदीनेस स्थलांतर करून गेल्यावर सामूहिक तसेच वैयक्तिक जीवनाबाबत आता अल्लाह त्यांचे मार्गदर्शन करीत होता.

एका विशिष्ट सामाजिक स्थितीचे दुसऱ्या सामाजिक स्थितीत परिवर्तन करण्याचा अर्थ सामाजिक क्रांती घडवण्यासारखे असते. प्रेषितांनी सामाजिक क्रांती घडवली नाही, तर समाजपरिवर्तनाची व्याख्याच बदलली.

एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात वास्तव्य करणारे, एकच भाषा असणारे, सामाजिक रुढी-परंपरांनुसार कुठल्या एका धर्मावर किंवा विविध धार्मिक श्रद्धा बाळगणाऱ्या समूहास आपण एक विशिष्ट समाज म्हणू शकतो. त्यांच्यात काही सामाजिक बंधने असतात. त्यांचे त्यांना पालन करावे लागते. अशा समाजाला पारंपरिक समाज म्हणता येईल, कारण त्यांच्या परंपराच त्यांना एकत्र ठेवतात. पण जर कोणी परंपरेविरूद्ध काही केल्यास कोणतेही कायदे-नियम नसल्याने त्या समूहातील इतर सदस्य अशा व्यक्तीविरूद्ध कारवाई करू शकत नाहीत. त्यासाठी राज्यसंस्था असावी लागते.

त्या काळच्या अरब द्वीपकल्पात अशी कोणती सर्वमान्य राज्यसंस्था नव्हती. जाति-जमातींची ती व्यवस्था होती. संघटित समाज नव्हता. प्रत्येकाची आपापल्या जमातीवर निष्ठा होती. संघटित समाज काही मापदंडांवर आधारलेला असतो. सामायिक भौगोलिक सीमा, भौतिक साधने, अर्थव्यवस्था, भावनात्मक आणि बौद्धिक पातळी, यातील एकही निकष त्यांना लागू पडत नव्हता.

म्हणूनच प्रेषितांनी केवळ समाजपरिवर्तन केले नसून, त्यांनी शून्यातून नव्या समाजाची उभारणी केली. अशा समाजाच्या नवनिर्मितीसाठी प्रेषितांनी प्रत्येकांमध्ये वैयक्तिक सुधारणा घडवून आणल्या. अल्लाहच्या सांगण्यानुसार त्यांना पावन केले. पवित्र केले. अज्ञान काळातील अपवित्र रुढीपरंपरांपासून त्यांची सुटका केली.

साधारणपणे जेव्हा एखादी राज्यव्यवस्था उदयास येते, तेव्हा तिचे नियमन करण्यासाठी कायदे केले जातात. संविधान संपादित केले जाते. या उलट मदीनेत स्थिती अशी होती की जसजशा ईश्वराच्या आज्ञा येत त्यानुसार समाज आकार घेत होता आणि राज्यसंस्थेची निर्मिती होत होती.

खुद्द प्रेषित मुहंमद आधी आपल्या कृतीतून आपल्या अनुयायांना शिकवण देत असत आणि नंतर त्या कृतीचे शब्दांत रूपांतर करीत. फक्त लोकांना प्रवचन देऊन त्यांचे प्रबोधन करून त्यांना सोडून देत नसत. आधी कृती आणि मग त्याचे शब्दांकन.

वाचा : ज्ञान साधनेची महती सांगणारा रमज़ान

वाचा : ‘इस्लाम ज्ञात आणि अज्ञाता’चा शोध

वाचा : स्मरणी आहेत पुण्यातील त्या मुहर्रमच्या मिरवणुकी!

बंधुत्वाची निर्मिती

मदीनेत जी समाजव्यवस्था आकार घेत होती त्याची आधारभूत मूल्ये आपसातील बंधुभाव, एकमेकांसाठी प्रेमळ भावना, अनुकंपा आणि दानधर्म हे होते. निरोगी सुदृढ समाजव्यवस्थेसाठी सामाजिक बंधने जपावी लागतात. नाती-गोती, सांभाळावी लागतात. त्यांची जोपासना करावी लागते. नाही तर समाजाचे विघटन होते. समाज विखरून जातो. अराजकता माजते.

सर्व श्रद्धावंत एकमेकांचे भाऊ आहेत. मग ते कोणत्याही समूहाशी संबंधित असो, काळा असो की गोरा असो, भाषा कुठलीही बोलत असो, श्रद्धेच्या दृष्टिने सर्व मुस्लिम आपसांत बांधव आहेत. त्यांचे संबंध सर्वांशी समान असतात. कोणता भेदभाव या बंधुत्वाला मान्य नाही. सर्वांचे हक्क समान. त्यांच्यावरील जबाबदाऱ्या समान.

या संदर्भात कुरआन म्हणतो, “आपसांत तेढ निर्माण होऊ देऊ नका. नाते तोडू नका. एकमेकांचा द्वेष करू नका. अल्लाहच्या आज्ञेनुसार आपसांत बंधुभावाने वागा.” तसेच “आपसांत संशय घेऊ नका. उणिवांच्या मागे राहू नका. परस्परांतील नात्यांचा सन्मान करा.”

स्थलांतर करून मदीनेत आल्यानंतर त्या समाजजीवनाची सुरुवात होणार होती. प्रेषितांनी त्याचा पाया ‘बंधुत्व’ या नात्यावर ठेवला. मक्केत असतानादेखील मुस्लिमांदरम्यान बंधुत्वाची संकल्पना पहिल्यांदा रुजविली होती. प्रत्येक मुस्लिम एकमेकांचे बंधू आहेत. त्यांनी आपसात याच नात्याने वागावे. बंधुत्वाचे नाते समतेपेक्षाही मजबूत होते.

दुसऱ्यांदा प्रेषितांनी मदीनेतील अन्सार लोक आणि मक्केहून स्थलांतर करून आलेले मुहाजिरीन यांच्या दरम्यान बंधुत्वाचे नाते रुजवले. या संदर्भात कुरआनची आयत अशी-

“ज्यांनी श्रद्धा धारण केली, देशत्याग केला आणि अल्लाहच्या मार्गात आपल्या संपत्ती व जिवांचा संघर्ष केला आणि ज्या लोकांनी त्यांना आश्रय दिला, त्यांना मदत केली ते आपसांत एकमेकांचे स्नेही संरक्षक आहेत.” (कुरआन-८:७२)

‘औस’ आणि ‘खजरज’ या मदीनेतील दोन प्रमुख जमाती होत्या. त्यांच्यामध्ये रक्तरंजित लढाया होत होत्या. ‘बुआस’ नावाच्या शेवटच्या आपसांतील लढाईमध्ये दोन्ही जमातींचे नामचीन लोक मारले गेले. त्या दोन्ही जमातींच्या लोकांनी आपसांतील कलह संपवण्याच्या प्रयत्नात मक्केतील कुरैश सरदार अबू जहलला विनंती केली होती. पण त्याने प्रतिसाद दिला नाही.

प्रेषित हजयात्रेला गेले त्यावेळी या जमातीच्या काही लोकांनी त्यांची भेट घेतली. इस्लामचा स्वीकार केला आणि नंतर त्या दोन्ही जमातींमधील कलह संपला. ते आता ‘मुस्लिम’ या नात्याने एकमेकांचे बंधू झाले होते. इस्लामच्या ‘बंधुत्व’ या संकल्पनेने ‘औस’ आणि ‘खजरज’ अशा विभिन्न जमातीची ओळख खोडून टाकली. आता ते फक्त मुस्लिम या नावाने एकमेकांना ओळखू लागले.

प्रेषित म्हणाले, “सश्रद्ध लोक एकमेकांसाठी एका इमारतीप्रमाणे आहेत. जिचा एक भाग दुसऱ्या भागाला बळ पुरवतो.” या नव्या बंधुभावाच्या नात्याद्वारे मक्केतील ‘मुहाजिर’ आणि मदीनेतील ‘अन्सार’ लोक एकमेकांशी जोडले गेल्यावर अन्सारांनी त्यांना आपल्या मालमत्तेत, शेतजमिनीत, घरादारांत वाटा देऊ केला, इतकेच नव्हे तर ज्यांच्याकडे दोन पत्नी होत्या त्यांनी एकीस तलाक दिला आणि आपल्या मुहाजिर बांधवास तिच्याशी विवाहबद्ध केले.

कुरआन म्हणतो, “जे लोक पूर्वीपासून मदीनेत राहत आहेत ज्यांनी श्रद्धा धारण केली जे देशत्याग करून (हिजरत) त्यांच्याकडे आले त्यांच्याशी स्नेहाने वागतात आणि त्यांना (निराश्रितांना) जे दिले गेले त्यासाठी आपल्या मनांमध्ये काही अपेक्षा बाळगत नाहीत.” (कुरआन-५९:९)

वाचा : धर्मवाद आणि सेक्युलर राष्ट्रवादात का होतोय संघर्ष?

वाचा : संघ-परिवाराने राज्यघटनेला विरोध का केला होता?

वाचा : सेक्युलॅरिझम धर्मीय की राजकीय विचारधारा?

एकमेकांचे संरक्षक मित्र

प्रेषित म्हणाले, “एक मुसलमान दुसऱ्या मुसलमानांचा भाऊ आहे. तो स्वत: त्याच्यावर अत्याचार करीत नाही की कोणा दुसऱ्यास त्याच्यावर अत्याचार करू देत नाही. जो मुस्लिम दुसऱ्या मुस्लिमाची गरज भागवतो, अल्लाह त्याची गरज पूर्ण करतो. जर त्याने आपल्या मुस्लिम भावाला कष्टापासून मुक्त केले तर, अल्लाह त्याच्या अडचणी दूर करील. जर त्याने आपल्या मुस्लिम भावास वस्त्रे दिली, तर अल्लाह त्यास वस्त्रे देईल.” (सालिम – तिर्मिजी, बुखारी, तबरी)

एका प्रसंगी अनुयायांनी विचारले, “हे प्रेषित! कोणता इस्लाम प्रतिष्ठेस पात्र आहे?” प्रेषित उद्गारले, “ज्याच्या वाईट बोलण्या आणि इजा पोचवण्यापासून दुसरी व्यक्ती सुरक्षित राहील त्याचा इस्लाम प्रतिष्ठित आहे.” (बैहकी) याचा अजून एक संद्रभ असा- “(तो) मुस्लिम होऊ शकत नाही, जर त्याने स्वत:स जे आवडते त्याचीच आपल्या बांधवांसाठी निवड केली नाही.” (बुखारी, मुस्लिम).

एक श्रद्धावंत दुसऱ्या श्रद्धावंतासाठी आरशासमान आहे. त्याच्यात कुठला दोष आढळला तर त्याने तो सुधारावा. श्रद्धावंत दुसऱ्या श्रद्धावंताचा भाऊ आहे. तो त्याच्या मालमत्तेची सुरक्षा करतो. त्याच्या मागे त्याची देखरेख करतो.

सश्रद्ध पुरुष आणि सश्रद्ध महिला एकमेकांचे संरक्षक मित्र असतात. न्याय्य आहे ते करण्यास प्रवृत्त करतात आणि गैरवर्तनापासून रोखतात.

म्हणजे मुस्लिम समाजाचे सदस्य फक्त स्वत:चीच काळजी घेत नसतात तर ते समाजातल्या प्रत्येक व्यक्तीची काळजी वाहत असतात. सर्वांनी भले करावे, कुणाचे वाईट कुणाच्या हाताने घडू नये. कोणी वाईट करीत असेल, अत्याचार करीत असेल तर त्यास सर्वांनी रोखावे. एकमेकांनी आपापल्या उणिवा जाणून घ्याव्यात आणि काही दोष आढळत असतील तर ते दूर करावेत.

सामाजिक बांधिलकी आणि नाती जपण्याचा अल्लाहने स्वतः मानवजातीकडून करार करून घेतला आहे. म्हणजे एकंदर असे की प्रेषितांनी सर्वप्रथम राजकीय व्यवस्था स्थापन केली आणि समाजाचे व्यवस्थापन केले. अशा प्रकारे एका नव्या उदयास येणाऱ्या राज्यव्यवस्थेची प्रस्थापना करून एका नव्या सभ्यतेची बिजे रोवली. ती बघताबघता जगभर पसरली. कारण या राज्यव्यवस्थेत प्रत्येक नागरिकास स्वातंत्र्याचे अधिकार जास्त दिले गेले होते. त्यांना बंदिस्त करण्याचे कायदे नगण्य होते.

जाता जाता :