मराठीच्या दुरवस्थेमुळेच अभिजात भाषेचा दर्जा नाही

मस्ते, महाराष्ट्र राज्य मराठी साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आणि मराठी संत साहित्याचे गाढे अभ्यासक माननीय डॉ. सदानंदजी मोरे, सेंटर फॉर प्रमोशन ऑफ डेमोक्रसी अँड सेक्युलॅरीझमचे अध्यक्ष विद्वान प्रा. जहीर अली, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष माननीय शमसुद्दीन तांबोळी, मंडळाचे सर्व कार्यकर्ते, माननीय भानू काळे, ते लेखक, संपादक आहेत, समीक्षक आहेत, अनेक ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. आणि माझ्या मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व रसिक मित्र, श्रोते हो.. मला आनंद वाटतो की, तुम्ही सगळे या कार्यक्रमाला हजर आहात.

मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक आदरणीय हमीद दलवाई यांच्या जन्मदिनानिमित्त ‘सत्यशोधक फातिमाबी शेख कार्यगौरव सन्मान पुरस्कार’ आज मला परमपूज्य डॉ. सदानंद मोरे यांच्या शुभहस्ते मला प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार स्वीकारताना माझ्यासारख्या सामान्य स्त्रीला संकोचल्यासारखं वाटतंय. पण माझं मराठी भाषेवरील प्रेम आणि तिची मी केलेली अल्पशी सेवा याची दखल घेऊन मंडळाने माझी निवड केली, याबद्दल मंडळाचे मी कृतज्ञतापूर्वक आभार मानते. आज मी स्वत:विषयी बोलणार आहे, माझ्या काही अनुभवांबद्दल बोलणार आहे.

माझ्या आडनावावरून अनेक जण मला विचारतात, ‘अहो, तुम्ही इतकं छान मराठी कसं बोलता! हे कसं काय जमतं तुम्हाला? त्यावर माझं हसून उत्तर असतं, ‘मराठी माझी मातृभाषा आहे. तुमच्यासारखंच मी मराठी बोलते. छान-बिन काही नाही.’

मुंबईमध्ये S.I.E.S महाविद्यालयात जेव्हा मी मराठीची प्राध्यापिका म्हणून शिकवित होते, त्यावेळेला असेच अनुभव मला आले. पहिल्याच दिवशी वर्गामध्ये प्रवेश करताना, दोन-तीन विद्यार्थी घाईघाईने बाहेर यायचे आणि मला म्हणायचे, “मिस, मिस.. This is not an English Class, This is not a French Class !!”

मग मी याचावरती त्यांना शांतपणे विचारायची, ‘हा मराठीचा वर्ग आहे ना ? मी येऊ का आत?’ विद्यार्थी चकीत ! मी शिकवायला लागल्यानंतर त्यांचं आश्चर्य नाहीसं व्हायचं. पण सुरुवात अशी व्हायची. सुरुवातीला राग यायचा पण मला मजाही वाटायची.

माझी एक विद्यार्थिनीनं नीरा उपाध्ये – माझ्या नव्वदीला माझ्यावर एक लेख लिहिला होता. आणि त्यांना असं कळलं होतं की, “यास्मिन शेख ह्या बाई आपल्याला मराठी शिकवायला येणार आहे. तर सबंध वर्गाला असं वाटलं अरे – एक मुसलमान बाई आणि आपल्याला ‘मराठी शिकवायला येणार ! आणि बुरखा घातलेली असेल ती बहुतेक नाही का ! बापरे आता कसं काय होणार?”

त्यांनी माझी टिंगल करायची ठरवली. मी वर्गात प्रवेश केला. पण मी काही बुरखा वगैरे काही घातलेला नव्हता. त्याच्यासारख्याच पोशाखात मी होते. तर मग ते सगळे एकमेकांकडे बघायला लागले साशंकतेनं. की, ह्याच त्या बाई आहेत ना! मी शिकवायला सुरुवात केली आणि विद्यार्थी (आणि विद्यार्थिनीही) एकमेकांकडे बघायला लागले !

मला त्याचा राग येत नसे; असे अनुभव माल अनेकदा आलेले आहेत. पण दुःख वाटायचं. कशावरून माझी मातृभाषा मराठी आहे, असं समजतात! हे मला कळायचं नाही. आडनावामुळे मुसलमान असल्यामुळे माझी मातृभाषा हिंदी, उर्दू असावी असे त्यांना वाटायचं; पण सत्य हे एकच आहे हा मुद्दा मी अनेकदा सांगितला आहे की, भाषेला धर्म नसतो. तुम्ही ज्या राष्ट्रात जन्माला येता, जिथं तुम्ही वाढता, जिथं तुम्ही राहाता तिथं जी भाषा आहे ती तुमची मातृभाषा असते.

भाषेच्या संदर्भामध्ये तुमच्या धर्माला कुठलाही अर्थ नाही, असं मला वाटते. तुम्ही कोणत्या धर्मात जन्मलात, हे माझ्या दृष्टीने भाषेच्या संदर्भात महत्त्वाचं नाही. मी एकच धर्म मानते – मानवता, सर्वधर्मसमभाव. मराठी ही माझी मातृभाषा नाही, असं म्हणताच कामा नये. हा विचार जर मान्य झाला तर आपल्या भाषेची दुर्दशा कमी आणि महाराष्ट्रातील सर्व लोकांना मराठी भाषा जी आपली मातृभाषा आहे याची जाणीव व्हावी.

माझ्याविषयी जर सांगायचं झालं तर मी महाराष्ट्रात नाशिकला जन्मले. माझे आई-वडील दोघेही मराठी भाषा बोलायचे. पप्पा पीडब्लूडीमध्ये असल्यामुळे नाशिक, येवले, चांदवड नंतर पंढरपूर, कऱ्हाड, वाई अशा अनेक ठिकाणी त्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. असं असल्यामुळे आम्ही सर्व भावंडं मराठी माध्यमाच्या शाळांतून शिकलो.

पपा-मम्मालासुद्धा दोघांनाही मराठी वाचनाची खूप आवड होती. खूप पुस्तके असायची आमच्याकडे. कितीतरी मराठी पुस्तकं ते विकत घ्यायचे. किर्लोस्कर, स्त्री, सत्यकथा, यशवंत अशी कित्येक मासिकं दर महिन्याला आमच्या घरी येत.

माझं मॅट्रिकपर्यंत शिक्षण झालं. मराठी हा शाळेपासूनच माझ्या आवडीचा विषय होता. मराठी वाचनाची गोडी मला लहानपणापासूनच लागली. माझं शालेय शिक्षण (तेव्हाची दुसरी ते मॅट्रिक) पंढरपूरला झालं. स. प. महाविद्यालय, पुणे येथे एम. ए.पर्यंत. मराठी हा माझा बी. ए. चा विषय होता. त्या वर्षापासून ऑल मराठी म्हणजे इंग्रजी कम्पलसरी आणि मराठीचे सहा सुरू झाले.

प्रा. श्री. म. माटे आम्हाला मराठी व्याकरण शिकवायचे आणि प्रा. के. ना. वाटवे भाषाशास्त्र. माटे इतकं छान आणि आम्हाला कळेल अशा सोप्या भाषेत मराठी व्याकरण शिकवायचे, की आम्हां विद्यार्थ्यांत विशेषतः मला तो विषय रूक्ष, कंटाळवाणा वाटलाच नाही.

व्याकरणाची गोडी मला प्रा. माटे यांच्यामुळेच लागली. याबद्दल कृतज्ञतापूर्वक मी त्यांचे आभार मानते. बी. ए.ला मी फर्स्ट क्लास फर्स्ट. सर्व विषयांच्या विद्यार्थ्यांपेक्षा जास्त गुण मिळवले. पहिल्या क्रमांकाची फेलोशिप मला मिळाली. एम. ए.ला मराठी व दोन पेपर्स इंग्लिश घेऊन उत्तीर्ण झाले.

सुरुवातीला नाशिकला मी शाळेत मराठी आणि इंग्लिश शिकवलं. माझं लग्न झाल्यानंतर काही वर्षांनी मी मराठीची प्राध्यापिका झाले. २७-२८ वर्षे मी मुंबईच्या S.I.E.S. महाविद्यालयात, तत्पूर्वी मिलिंद महाविद्यालयात दोन वर्षं मराठी साहित्य, भाषाशास्त्र, व्याकरण हे विषय शिकविले. S.I.E.S. मध्ये असताना ‘बालभारती’, पुणे या संस्थेत शालेय मराठी पुस्तकांचे संपादन काही वर्षं केलं.

निवृत्तीनंतर IASच्या विद्यार्थ्यांना मराठी वाङ्मय, भाषाशास्त्र आणि व्याकरण हे विषय दहा वर्षे शिकविले. S.I.E.S मध्ये असताना एम. ए.च्या विद्यार्थ्यांना भाषाशास्त्र, व्याकरण शिकवल. एकूण ४४/४५ वर्षं मी मराठी शिकवलं. एम. ए.ला शिकवत असताना एक गमतीशीर अनुभव मला आला, तो सांगते.

के.सी. कॉलेजला संध्याकाळी वरच्या मजल्यावर मराठीच्या एम.ए.च्या मुलांचा वर्ग होता. एकदा मी वर्गात जाण्यासाठी जिना चढत असताना एक विद्यार्थी पायऱ्या उतरून माझ्याजवळ आला आणि म्हणाला, ‘बाई, तुम्ही व्याकरण, भाषाशास्त्र आमच्या तळहातावर आणून ठेवलंत. आम्ही सर्व विद्यार्थी तुमचे आभारी आहोत.’

पुनः एकदा सांगते, मराठी माझी मातृभाषा आहे. माझ्या मातृभाषेवर माझं नितांत प्रेम आहे. तिचं पावित्र्य टिकवणं, रक्षण आणि संवर्धन करणं हे माझं कर्तव्यच आहे. गेली अनेक वर्षं मी तिची मनापासून आणि आनंदाने सेवा केली आणि या वृद्धावस्थेतही करतेच आहे. अनेकजण मला फोनवरून मराठीच्या संदर्भात शंका विचारतात, त्यांचं निरसन, मी कामात असले तरी, आनंदाने करते.

आता मराठीच्या प्रमाणभाषेच्या संदर्भात बोलणार आहे. मराठीच्या अनेक पोटभाषा, बोली आहेत. आपण कोणतीतरी बोली बोलत असतो – सातारी, कोल्हापूरी, वऱ्हाडी, अहिराणी, पुणेरी इत्यादी. मात्र, औपचारिक लेखनासाठी जी भाषा वापरली जाते, ती प्रमाणभाषा होय.

मराठीची प्रमाणभाषा ही एक संकल्पनाच आहे. वर्तमानपत्रांत, मासिकांत, शास्त्रीय ग्रंथात, वैचारिक, वैज्ञानिक लेखनात, शासकीय पत्रव्यवहारात जी भाषा वापरली जाते, ती प्रमाणभाषा होय. प्रत्येकानं ‘मी जसं बोलतो, तसंच लिहिणार’ असा हट्ट करणं चुकीचे आहे. असा अट्टहास केल्यास लेखनात अनागोंदी माजेल हे विसरू नका.

१ मे १९६० रोजी भाषावार प्रांतरचनेच्या तत्त्वाला अनुसरून मराठी भाषकांचे राज्य म्हणून महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्यानंतर मराठी भाषा, मराठी साहित्य यांच्या संदर्भात कार्य करणाऱ्या तज्ज्ञांची एक समिती स्थापन करण्यात आली. ती समिती म्हणजे ‘मराठी साहित्य महामंडळ’ होय.

मराठी लेखनात एकसूत्रीपणा यावा आणि शासकीय लेखन व्यवहारात मराठीचा अचूक आणि सुलभतेने वापर व्हावा, म्हणून महाराष्ट्र शासनाने मराठी लेखनविषयक नियम नव्याने निश्चित करण्याचं काम या समितीकडे सोपवलं. महामंडळाने १९६१ साली तयार केलेली १४ नियमांची यादी शासनाने १९६२ साली स्वीकारली.

१९७२ साली समितीने या नियमांत काही सुधारणा करून आणखी ४ नियमांची भर घालून एकूण १८ नियम सिद्ध केले. हे नियम शासनमान्य असून, त्या नियमांनुसार लेखन करावे असा शासनाचा आदेश आहे.

त्यानंतर शासनाने तज्ज्ञांची समिती नेमून २००९ साली मराठी वर्णमाला, जोडाक्षर-लेखन, मुद्रण, टंकलेखन, संगणकावरील लेखन, मराठीची देवनागरी लिपी अद्ययावत करून त्यात एकसूत्रीपणा आणण्याच्या उद्देशाने एक अध्यादेश काढला. मराठी लेखनात एकरूपता राखण्यासाठी सर्वांनी या सूचनांचे पालन काटेकोरपणे करावे, असा शासनाचा आदेश आहे.

आणखी एका गोष्टीकडे मला तुमचं लक्ष वेधायचं आहे. मराठी माध्यमाच्या शाळा ओस पडत आहेत. अनेक मराठी शाळा बंद करण्यात आल्या आहेत. अगदी गरीब, मजूर, घरकाम करणारी माणसंही शाळेच्या देणग्या, फी परवडत नसूनही आपल्या मुलांना इंग्लिश माध्यमाच्या शाळेत प्रवेश देत आहेत.

त्या शाळांत मराठी भाषेला जवळजवळ काहीच महत्त्व दिलं जात नाही. मराठी भाषेची परवड या शाळांमुळे, त्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे होत आहे. नोकरीसाठी इंग्लिश बोलणाऱ्या मुलांची निवड होते. मराठी माध्यमात शिकणाऱ्या मुलांना कमी लेखलं जातं. अशी परिस्थिती असताना मराठीची दुरवस्था होणारच. याला जबाबदार कोण? पालक की शासन? की आपण सर्व मराठी माणसं?

मराठी माणसं मराठी लिहितानाच नव्हे, तर बोलताना मराठी भाषेची दुर्दशा करतात. लेणे ऐवजी लेणी. लेणी ऐवजी लेण्या, लोकं, अभिमान ऐवजी गर्व, घे-घेऊन ऐवजी घेऊन, दुरवस्था ऐवजी दुरावस्था, सहस्त्र – सहस्त्र, अमावास्या ऐवजी अमावस्या, माहात्म्य ऐवजी महात्म्य अशा कितीतरी चुका मराठी माणसं करतात, मराठीची मोडतोड करतात. याचा खेद वाटतो.

नुसते शब्दच चुकीचे नव्हे, तर वाक्यरचना चुकीची करतात. माझी मदत कर, त्याच्या कलेने (कलाने) घे. मराठी वाहिनीवर जाहिराती किंवा लिहिलेला मजकूर यांत तर अगणित चुका असतात. हिंदी, इंग्लिश भाषेचा अतिरिक्त वापर आपण मराठी भाषकांनी आग्रहपूर्वक टाळला पाहिजे. इंग्लिश शब्द मराठीने स्वीकारले आहेत, त्याला माझा विरोध नाही; पण मराठीत शब्द उपलब्ध असताना इंग्लिश शब्दांचा अतिरिक्त वापर करणे योग्य नाही.

मराठीच्या ह्या दुरवस्थेमुळेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नाही. तमीळ, तेलुगु, कन्नड या भाषांना अभिजात भाषांचा दर्जा मिळाला, याचं कारण दक्षिणेतील राज्य पोटतिडिकेने त्यांच्या भाषांच्या विकासासाठी कार्य करीत आहेत. त्या त्या भाषांसाठी वेगळी विद्यापीठं निर्माण झाली आहेत.

भाषा ‘अभिजात’ ठरवण्याचे काही निकष केंद्रशासनाने निश्चित केले आहेत. ‘प्राचीनता, अखंडता, संपन्न वाङ्मयीन परंपरा’ हा दर्जा प्राप्त होण्यासाठी त्या त्या भाषांच्या अभिमान्यांनी, अभ्यासकांनी, राजकीय पुढाऱ्यांनी व राज्यशासनाने योजनापूर्वक एकजुटीने अविश्रांत परिश्रम केले. मराठीसाठी असे प्रयत्न झाल्याचे किंवा होत असल्याचे दुर्दैवाने दिसत नाही.

महाराष्ट्र शासनातही नोकरी मिळविण्यासाठी उत्तम मराठी येण्याची सक्ती नाही. मराठी विषयीची अनास्था याला कारणीभूत आहे. शासनही या बाबतीत उदासीन आहे. माझी तज्ज्ञांना अशी विनंती आहे की, अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या राज्यांचा आदर्श समोर ठेवून एकजुटीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.

माझ्या सर्व मराठीप्रेमी लोकांना मला एवढीच विनंती करायची आहे, की, मराठीचं संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. मुस्लिम सत्यशोधक मंडळ गेली कित्येक वर्षं मराठी त्रैमासिकाद्वारे मराठी भाषेची मातृभाषा म्हणून सेवा करते आहे. त्या भाषेत बोलायला, लिहिण्याला, वाचनाला उत्तेजन देत आहे. त्यांचे हे कार्य खूप मोलाचे आहे.

एक लक्षात असू द्या, भाषा हा माणसाचा सर्वश्रेष्ठ वारसा आहे. हा वारसा जपणं, समृद्ध करणं हे आपलं कर्तव्य आहे. आपण एकजुटीने प्रयत्नांची पराकाष्ठा करून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून द्याल असा विश्वास वाटतो.

जय महाराष्ट्र, जय मायबोली मराठी !