असे सांगितले जाते की, रशियन व फ्रेंच राज्यक्रांतिनंतर स्वातंत्र्य, समता व बंधुता ही तत्त्वे जगाला मिळाली, पण त्याही आधी इस्लामने ही मूल्ये जगाला दिलेली आहेत. त्यातूनच जगात समताधिष्ठित डावा विचार निपजला.
नंतरच्या काळात या मुल्यांना घेऊनच जगात आर्थिक, राजकीय आणि कामगार क्रांत्या झाल्या. हे खर आहे की, ‘अत्याचार’ व ‘शोषण’ हे घटक या विविध क्रांतीला कारणीभूत होती. पण हा आवाज शासन व व्यवस्थेपर्यंत पोहचवणारे अभ्यासक, विचारवंत, भाष्यकार आणि साहित्यिकांची भूमिकाही तेवढीच महत्त्वाची होती.
या समाज भाष्यकारांनी प्रजेचा जनआक्रोश व शोषणाला अधोरेखित करणारे साहित्य निर्मितीला घातले. ज्यामुळे क्रांतीचा हा लढा सुकर होऊ शकला. दुर्दैवाने क्रांतीचे हे निर्माते आज दुर्लक्षित झाले आहेत.
डॉ. मुहंमद इकबाल हे असेच एक क्रांतीदाता होते. त्यांनी आपल्या काव्यातून श्रमिकांना आपल्या हक्कासाठी जागरुक करण्याचे काम केलेले आहे.
कष्टार्जन हा भूमिपुत्रांचा राष्ट्रधर्म. पण वसाहतिक मुल्यांनी भांडवलदारी आसूयेने मजूरांना वेठीस धरले. त्यांचे शोषण केले. इकबाल यांनी त्या अन्यायाविरोधात आपल्या शब्दांची शस्त्रे उगारली.
वाचा : डॉ. मुंहमद इकबाल यांच्या तत्त्वज्ञानाचे चिंतन
वाचा : मराठीतील ‘कोहिनूर-ए-गझल’ इलाही जमादार
‘बांगे दिरा’ हा मुहंमद इकबाल यांचा काव्य संग्रह. इतिहास आणि कल्पनांचं मिश्रण त्यात आहे. भावना आणि बुद्धिवादाची सांगड घालून इकबाल यांनी आपल्या चिंतनाला त्यात शब्दबद्ध केले आहे.
‘सरमाया व मेहनत’ म्हणजे भांडवल आणि श्रम ही त्या काव्यसंग्रहातली इकबालांची एक कविता. सांप्रत भांडवलदारी मानसिकतेचा प्रत्यय त्यातून येतो.
भांडवलदारी मानसिकतेला उघडे पाडून इकबालांनी त्यातून मजूरांच्या जागृतीचा एल्गार पुकारला आहे. त्यामध्ये इकबाल म्हणतात,
बंदाये मज्दूर को जाकर मेरा पैगाम दे
खिज्र का पैगाम क्या, है ये पयामे कायनात ।।1।।
अय् तुमको खा गया के सरमायादारे हीलागर
शाखे आहू पर रही सदियोंतलक तेरी बरात ।।2।।
वाचा : ग़ज़ल समर्पणाची भावना आणि फुलांचा दरवळ
वाचा : प्रगतिशील कविंच्या उर्दू शायरीतून ‘नेहरू दर्शन’
भांडवलदारांचा विरोध
मजुरांचे दुःखी कष्टी जिणे इकबालांना पहावत नाही. त्यांच्या हळव्या मनाला त्यामुळे वेदना होतात. ते श्रमिकांना संदेश देतात.
म्हणतात, मजुराला या स्थितीतून सावरता यावं यासाठी हा माझा संदेश आहे. माझा हा संदेश त्यांना द्या. हा फक्त माझाच नाही तर साऱ्या सृष्टीचा संदेश आहे. (हे मजुरांनो, श्रमिकांनो) त्या धुर्त भांडवलदारांनी (सरमायादार) तुम्हाला संपवले आहे. तुझ्या क्षमतांना गिळंकृत केले आहे. त्यांच्या इच्छेवर तुझी मजूरी ठरत आहे.
कार्ल मार्क्सने श्रम मूल्य आणि वस्तुचे बाजार मूल्य यातील तफावत सांगितली. कोणत्याही वस्तूचे वरकड मूल्य (अतिरिक्त मूल्य/सरप्लस व्हॅल्यू) हे भांडवलदाराकडून श्रमिकांच्या होणाऱ्या शोषणाचे प्रतीक असल्याचं तत्त्व त्याने शोधून काढलं. वरकड मुल्यात मजुरांनाही वाटा मिळेल अशी व्यवस्था निर्माण करणे हे मार्क्सचे स्वप्न म्हणता येईल.
दस्ते दौलत आफरी को मुज्दायौ मिलती रही
अहले सरवत जैसे देते है गरीबोंको जकात ।।3।।
साहीरे अल्मुतने तुझ को दिया बर्गे हशीश
और तु अय् बेखबर समझा उसे शाखे नबात ।।4।।
मजूर हा श्रीमंताची गरज असतो. पण त्या गरजेचे प्रदर्शन मात्र श्रीमंत भांडवलदार कटाक्षाने टाळतात. मजुराला काम देऊन जणू काही ते मजुरावर उपकार करत आहेत, अशा अविर्भावात वागतात.
श्रीमंतांनी गरीबाच्या तोंडावर जकात फेकावी त्यापद्धतीने श्रीमंतांची संपत्ती आपल्या कष्टातून उभी करणाऱ्या श्रमिकांना मजूरी मिळत असते. या अन्यायाची जाणीव कामगारांना होत नाही.
जणू काही ‘अल्मुत’ नावाच्या पर्वतावरील जादूगाराने त्यांना हशीशचे मादक द्रव्य देऊन गुंग केले आहे. त्यामुळेच ते हशीश सारख्या मादक द्रव्याला ते कल्पवृक्ष समजत आहेत. म्हणजे मजूर हे त्यांचे शोषण करणाऱ्या भांडवलदारांनाच आपला मुक्तीदाता मानत आहेत.
नस्ल, कौमीयत, कलीसा, सल्तनत, तहजीब, रंग
‘खाजगी’ने खूब चुनचुनकर बनाये मुस्कीरात ।।5।।
कट मरा नादां खियाली देवतांओ के लिये
सुक्र कि लज्जत में तु लुटवागया लज्जते हयात ।।6।।
वाचा : शायर ए आजम ‘साहिर लुधियानवी’ स्त्रियांसाठी मसिहा
वाचा : उर्दू इतिहासलेखनात शिवकालीन ग्रंथांचे महत्त्व
मजुरांसाठी मृगजळ
मजूरांना भूलवण्यासाठी त्यांना त्यांच्या कल्याणाच्या मार्गापासून भटकवण्यासाठी नेत्यांनी मोहमयी विषयांची निर्मिती केली आहे. वंश, राष्ट्रवाद, मठ, राज्य, संस्कृती, वर्ण ही सर्व त्या नेत्यांनी मजूरांसाठी बनवलेली मादक द्रव्ये आहेत.
नादान मजूरा तू या खोट्या दैवतांच्या (मादक द्रव्यांच्या) व्यर्थ मागे पडला आहेस. त्यातूनच तुझे मरण ओढावले आहे. समाधिसुखासाठी तू ऐहीक जीवन मात्र गमावले आहेस. त्याला तुझ्या नादानपणामुळे उद्ध्वस्त करुन घेतले आहेस.
मक्र की चालों से बाजी ले गया सरमायादार
इंतिहाये सादगीसे खा गया मज्दूर मात ।।७।।
उठ के बज्में जहां का और ही अंदाज है
मशरीक व मगरीब में तेरे दौर का आगाज है ।।8।।
भांडवलदार हे धुर्त आहेत. त्यांनी आपल्या कावेबाजीने विजय मिळवला. त्यांच्या धुर्तपणामुळेच श्रमिकांनी अत्यंत साधेपणाने पराभव स्वीकारला. पण हे मजुरा आता उठ. ही पराभूत मानसिकता त्याग. पूर्व आणि पश्चिमेत तुझ्या युगाची नांदी सुरू झाली आहे.
हिंमते आली तो दरिया भी नहीं करती कुबूल
गुंचा सैं गाफिल तरे दामन मे शबनम कबतलक ।।9।।
नग्मायें बेदारीये जमहूर है सामाने ऐश
किस्साये खाबआवरे इस्कंदारो जम कबतलक ।।10।।
वाचा : राहत इंदोरी : जमिनीशी नाळ जोडलेला कलंदर शायर
वाचा : ग़ज़ल समर्पणाची भावना आणि फुलांचा दरवळ
श्रमिक आहे म्हणून मजुरांनी किती दिवस न्युनगंडात रहावे. त्यांनी क्रांतीची मशाल पेटवावी. श्रमिकांनी क्रांतीप्रवण व्हावे म्हणून इकबाल भांडवलदारांच्या विरोधात मजुरांना धैर्य देतात.
इकबाल कामगारांना म्हणतात, दृढनिश्चय असेल तर कोणतीही बाब असाध्य नाही. किती दिवस फुलात दवबिंदू असावेत त्याप्रमाणे तू आसवांनी आपले कपडे भिजवत राहशील.
बहुजनांमध्ये बेदारी (जागृती) निर्माण करणारे गीत आनंददायी आहे. तुला मोहित करणाऱ्या ‘सिकंदर’ आणि ‘जमशेद’च्या गोष्टी तू किती दिवस ऐकत बसणार आहेस. इकबाल सामान्यांची बाजू घेऊन कविता रचत होते. त्यामुळेच त्यांच्या एका कवितेत त्यांनी शुद्रांचे दुःख मांडताना
‘आह शुद्दर के लिए हिंदुस्ताँ गमखाना है।’
हे उदगार काढले आहेत. इकबाल श्रमिक, बहुजन आणि कनिष्ठ वर्गींयांच्या समस्यांचे प्रतिनिधी होते. त्यांच्या काव्यातील सौदर्याचे शास्त्र माणसाच्या जगण्यातल्या जाणिवांनी व्यापले आहे. त्यामुळेच इकबाल भारतीय परंपरेतील विवेकवादी, चिंतनशील काव्यलेखनाच्या इतिहासातील महाकवि आहेत.
जाता जाता :
लेखक डेक्कन क्वेस्ट मराठीचे संपादक असून मध्ययुगीन इतिहासाचे अभ्यासक आहेत. ‘सल्तनत ए खुदादाद’ या टिपू सुलतान वरील वेस्ट सेलर पुस्तकाचे लेखक आहेत. इतिहासावर त्यांची पाच पुस्तके प्रकाशित आहेत.