साहिर लुधियानवी यांचा ८ मार्च रोजी शतकीय जन्मदिवस आहे. योगायोग असा की याच दिवशी आंतरराष्ट्रीय महिला दिवस आहे, साहिर खरोखरच स्त्रीचा सन्मान करणारा मसिहा आहे. त्यानं तर आईसाठी विलासी बापाची जमीनदारी ठोकरली व गरिबी पत्करली. कारण बाप आईला त्रास द्यायचा. पण त्याची अम्मी ही स्वाभिमानी होती. तिनं नवऱ्यापासून खुला (स्त्री जेंव्हा घटस्फोट घेते, त्याला तलाक न म्हणता खुला म्हणतात) घेतला व सिंगल मदर म्हणून त्याला प्रेमाने वाढवले व चांगले संस्कार केले.
साहिर पण मातृभक्त, तिच्या प्रेमात दुसरी स्त्री- पत्नी नको म्हणून त्यानं लग्नच केलं नाही. तिच्या निधनानंतर त्याची जगण्याची इच्छाच संपली व तो अम्मीच्या माघारी जेमतेम अडीच वर्षे जगला. त्याने स्त्रीच्या अन्यायावर अनेक कविता व गीतं लिहिली. साहिर हा माझ्या मते स्त्री जातीचे दुःख दर्द ओळखणारा व त्याचा काव्यातून प्रभावी आविष्कार करणारा केवळ शायरच नाही तर मसिहा होता.
‘तू मेरे साथ रहेगा मुन्ने!’
‘जब तक होगा तेरा साथ निभाऊंगी मैं
फीर चली जाऊंगी उस पार के सन्नाटे में
और तारों से तुझे झाकूंगी
जख्म सीने में लिए, फुल निगाहों मे लिए
तेरा कोई भी नही मेरे सिवा
मेरा कोई भी नही तेरे सिवा
तू मेरे साथ रहेगा मुन्ने’
३१ जुलै १९७६ रोजी साहिरची अम्मी – सरदार बीबीचा ७९व्या वर्षी इंतकाल (मृत्यू) झाला आणि त्यानंतर उण्यापुर्या साडेतीन-पावणेचार वर्षांनंतर साहिरनंही २५ ऑक्टोबर १९८०ला या जगाचा निरोप घेतला.
साहिरनं लग्नाचा सेहरा (फुलांचा हार) चेहर्यावर बांधून गृहस्थधर्मी होत संसार करावा अशी कुणाही आईप्रमाणे सरदार बीबीची पण इच्छा होती, पण अनेक वेळा प्रेम जडूनही व अनुकुलता असतानाही साहिरनं लग्न केलं नाही. आयुष्यभर आईला जीवनाचा केंद्रबिंदू मानत तिच्या भोवतीच त्याचं पूर्ण एकोणसाठ वर्षांचं जीवनचक्र फिरत राहिलं. त्यामुळे तिच्या मृत्यूनंतर त्याची जगण्याची जणू आसच मिटून गेली. तो जगापासून अलिप्त एकाकी होत गेला. त्यानं जणू स्वत:हून मृत्यूला बाहूपाशात घेतलं… जणू त्याला आईविना जगणं मुळी मंजूरच नव्हतं!
खुशवंत सिंगनं आपल्या खास शैलीत साहिरला ‘मदर फिक्सेशन’ होतं, असा एका लेखात लिहिताना निष्कर्ष काढला होता. त्यातली रोगट टिपिकल खुशवंती स्टाईलची निरीक्षणे नजरेआड केली, तरी साहिर हा आईवेडा होता, हे मात्र सत्य होतं.
वाचा : इकबाल यांची कविता म्हणजे कामगार हिताचा एल्गार
वाचा : प्रगतिशील कविंच्या उर्दू शायरीतून ‘नेहरू दर्शन’
मातृप्रेमाचे शायरीत रेखाटन
प्रथम शिक्षणासाठी लुधियानाहून लाहोरला गेल्यावर व फाळणीच्या वेळी झालेल्या ताटातुटीचा असा एकूण चार-पाच वर्षांचा काळ वगळला तर आयुष्यभर तो आईबरोबरच राहिला. आईबद्दलच्या त्याच्या सार्या तीव्र, कोमल व महन्मंगल भावनांना साहिरच्या शायरीत विपुलतेनं स्थान मिळालं नसलं तरी मुलाचं सुख-दु:ख समजून घेणारी सच्ची हमदर्द आईच असते, ही त्याची श्रद्धा होती – विश्वास होता. ते तो असं व्यक्त करतो.
‘तुम माँ हो
तुम अच्छी तरह पहचानती हो, औलाद का गम क्या होता है
ये तीरे सितम क्या होता है? ये बार आलम क्या होता है?
तुम माँ हो
तुम्ही से इंन्साँ को ये जिस्म मिला और जान मिली
नेकी का चलन, इमाँ की लगन, सच्चाई की पहचान मिली
तुम माँ हो.’
सरदार बीबी – साहिरची आई खानदानी काश्मिरी मुस्लिम होती, पण त्या वेळच्या उत्तर भारतातील मुस्लिम स्त्रीपेक्षा तिचं व्यक्तिमत्व आणि स्वभाव वेगळा होता, लिक से हटकर होता. ती शिकली होती की नाही, हे कुणालाच ज्ञात नाही, पण साहिरनं शिकून मोठं व्हावा हा तिचा ध्यास होता.
साहिरचा बाप फजलनं ‘जहागिरदारच्या मुलाला शिक्षणाची काय गरज?’ म्हणत तिला साफ नापसंत होतं. साहिरच्या लाडक्या अब्दुलमामुची मुलगी सरवर सुलताननं साहिरच्या जन्माची आठवण व त्याच्या आईच्या त्याच्याकडून असलेल्या अपेक्षांबाबत साबिर दत्त यांचा ‘फन और शख्सियत’ या साहिरवरील पुस्तकातील ‘अम्मी कहती थी’ या लेखात सांगितलेल्या आहेत. सरवर सुलतानाच्या शब्दांत सांगायचं झालं तर,
“जेव्हा भाईजान (साहिर) जन्मला, तेव्हा मौलवी साहेबांनी त्याच्या कानात अजान म्हटली होती व माझ्या आत्यापुढे (साहिरच्या आईपुढे) त्यांनी हा पुढे आयुष्यात खूप मोठा होणार असं भविष्य वर्तवलं होतं, त्यामुळे आत्याच्या भाईजानबाबतच्या अपेक्षा अधिकच वाढल्या होत्या.
ती नेहमी म्हणायची, मी अब्दुलला (साहिरला) मोठेपणी जज्ज किंवा सिव्हिल सर्जन करणार. पण भाईजानचा शायरीकडे ओढा वाढत होता व ते परीक्षा जवळ आली तरी अभ्यास करायचे नाहीत, तेव्हा आत्या संचित होत म्हणायची, हा पुढे जाऊन जीवनात यशस्वी कसा होणार?’
विलासी बापाची अभद्र काळी छाया पडून आपल्या मुलानं बापाप्रमाणे दुराचारी होऊ नये म्हणून सरदार बीबी नवर्यापासून अलग झाली आणि गरिबीशी सामना करत मुलाला हिंमतीनं एकटीनं – आजच्या भाषेत ‘सिंगल मदर’प्रमाणे वाढवलं होतं. पण आपल्या निर्णयामुळे साहिरला मुफलिसीचं – गरिबी व अभावाचं जीवन जगावं लागत आहे याची सदैव खंत सरदार बीबीला असायची.
यामुळे तिनं प्रसंगी दागिने विकून व भावाकडे वारंवार पैसे मागूनही त्याचे हर तर्हेचे लाड पुरवले. एखाद्या राजकुमाराप्रमाणे त्याला वाढवलं. कारण आपला मुलगा खूप मोठा होणार यावर तिचा अतूट विश्वास होता. तिची साहिरबद्दलची मातृप्रेमाची भावना साहिरनं तिच्या भूमिकेतून स्वत:ला कलांवताच्या तटस्थतेनं पाहत कशी व्यक्त केली आहे ते पहा.
‘मैं कितनी खुशकिस्मत माँ हूं,
मेरी गोद में पनप रहा है, धरम और इमान का संगम
मेरा छोटासा आँचल है, गीता और कुरआन का संगम
सदियाँ जिस वरदान को तरसी, मुझको वो वरदान मिला है
प्यार की इक डोरी में लिपटा, कल का हिंदुस्तान मिला है
मेरी गोद के पाले पर कल सारा भारत मान करेगा
मुझ सी माँ कहलाने को हर माँ का दिल अरमान करेगा
मैं कितनी खुशकिस्मत माँ हूं!’
खरंच, तिच्या आशेप्रमाणे साहिर पुढे तुम्हा-आम्हा सर्व भारतीयांच्या अभिमानाला पात्र ठरला. एक ‘गंगाजमनी तहजिबी’चा आशिक, गीता व कुरआनला समान मान देणारा खराखुरा सेक्युलर आणि अवामचा आवाज बुलंद करणारा शायर – शब्दांचा जादूगार. सरदार बीबीचा त्याग व तपश्चर्या वाया गेली नाही!
पण कोर्ट केसच्या दरम्यान साहिर आपला जैविक मुलगा नाही असं फजलनं जाहीरपणे कोर्टात सांगणं हे एक स्त्री म्हणून – एक आई म्हणून सरदार बीबीला किती अवमानित व छिन्न भिन्न करून गेलं असेल, याची साधी कल्पना आजही तुम्ही आम्ही केली तर अंगावर काटे येतील. त्या मातेने हे कसं सहन केलं असेल?
पुन्हा त्याचा लहान आठ-दहा वर्षांच्या साहिरच्या मनावर विपरीत परिणाम होऊ नये, त्याला समाजानं ‘बास्टर्ड’ ठरवू नये म्हणून त्या माऊलीला काय काय करावं लागलं असेल? कोर्टानं फजलला साहिरचा बाप मानल्यामुळे अनौरसपणाचा सामाजिक शिक्का साहिरवर बसला नाही हे खरे, पण त्याचे व्रण त्याच्या मनावर वज्रमुद्रे प्रमाणे कोरले गेले असणारच! त्या काळात तिची एक स्त्री म्हणून किती बदनामी झाली असेल याचा अंदाज बांधता येतो.
वाचा : राहत इंदोरी : जमिनीशी नाळ जोडलेला कलंदर शायर
वाचा : समाजाची भाषा का आणि कशी बिघडते?
आईने उपसले कष्ट
सरदार बीबीनं साहिरला जसं विवेकी व चांगला इन्सान बनवलं, तसंच त्यानं परिस्थितीचं जहर पचवून कणखर व्हावं यासाठी पण प्रयत्न केले. साहिर आईच्या प्रेम, तपस्या, लालनपालन आणि संस्कारानं कणखर व स्त्री कैवारी, स्त्रीपूजक बनला. त्याच्या आईच्या त्या वेळच्या भावना साहिरने पुढे ‘त्रिशूल’ (१९७८) सिनेमात खाली दिल्याप्रमाणे समर्थ शब्दांत व्यक्त करून तिनं त्याच्यासाठी काय काय दिव्य केलं हेच जणू आपणास कथन केले आहे.
‘तू मेरे साथ रहेगा मुन्ने, ताकि तू जान सके
तुझको परवान चढाने के लिए
कितनी संगीन मराहिल से तेरी माँ गुजरी
तू मेरे साथ रहेगा मुन्ने, ताकि तू जान सके
कितने पाँव मेरी ममता के कलेजे पे पडे
कितने खंजर मेरी आँखों में, मेरे कानों मे गढे
मैं तुझे रहम के साये मे न पलने दूंगी
जिंदगानी की कडी धूप में जलने दूंगी
ताकि तप-तप के तू ङ्गौलाद बने
मॉं की औलाद बने, तू मेरे साथ रहेगा मुन्ने!’
साहिर तिच्या विश्वासाला, प्रेमाला खरा उतरला आणि तिच्या अपेक्षेप्रमाणे जगला, वागला आणि अखेरपर्यंत तिचा ‘मुन्ना’ बनून राहिला.
पण तिला फजलच्या धमकीची चिंता सदैव संत्रस्त करत होती. ‘तू जर जहागिरीचा हिस्सा मागितलास तर त्याला पळवून नेईन. मग तो तुझ्या दृष्टीला कधीच पडणार नाही किंवा मी त्याला ठार पण मारून टाकेन!’ त्यानं सरदार बीबी हादरली व तिनं जहागिरीवर मुलाच्या सुरक्षेसाठी व त्याहून जास्त त्याच्या जीवासाठी पाणी सोडलं!
या काळात तिला असं सतत वाटायचं की, आपण उद्या जगात नसलो तर कसं होणार बाल साहिरचं? तिच्या या भावनेला साहिरनं पुढे ‘मुझे जिने दो’ या सिनेमातील खालील गाण्यातून उजागर केलं. सिच्युएशन वेगळी असली तरी त्याच्या/तिच्या जीवनातील त्या काळच्या साशंकतेला चपखल बसणारी होती. त्यानं या गीतामध्ये उत्कट मातृत्वाची वेदना अशा मांडल्या-
‘तेरे बचपन को जवानी की दुआ देती हूं
और दुआ दे के परेशान सी हो जाती हूं
मेरे बच्चे, मेरे गुलजार के नन्हें पौधे
तुझको हालात की आंधी से बचाने के लिए
आज मैं प्यार के आँचल में छुपा लेती हूं
कल ये कमजोर सहारा भी न हासिल होगा
कल तुझे काँटो भरी राह पे चलनी होगा
जिंदगानी की कडी धूप में जलना होगा
तेरे माथे में शराफत की कोई मोहर नही
चंद बोसे है मुहोबत के सो वो भी क्या है?
मुझ-सी माँओं की महोबत का कोई मोल नही
मेरे मासूम फरिश्तें तू अभी क्या जाने
तुझ को किस किस के गुनाहों की सजा मिलनी है…’
पण साहीर नशिबवान होता – आईच्या प्रेमाच्याबाबत. त्याच्या माथ्यावर तिच्या प्रेमाचा हात त्याच्या जीवनाची शेवटची तीन – साडेतीन वर्षे सोडली तर कायम होता… म्हणूनच साहिर तुमच्या आमच्या पुढे शायर म्हणून आला व आपली मनं काबीज केली. हे त्या मातेच्या आशीर्वादाचं सगळं म्हणलं पाहिजे!
वाचा : मुस्लिमविषयक पुस्तकांचा वानवा का आहे?
वाचा : उर्दू इतिहासलेखनात शिवकालीन ग्रंथांचे महत्त्व
बदनामीचा डाग
साहिरच्या मनात सुप्तपणे कुठेतरी एक खंत असणार, ती ही की, फजलनं – त्याच्या बापानं सरदार बीबीला बरोबरीचं स्थान का दिलं नाही? तिच्यासोबतचं आपलं पती-पत्नीचं नातं – रिश्ता त्यानं जगापुढे का नाही कबूल केला? साहिरच्या अनेक चरित्रकारांनी फजल आणि सरदार बीबीचा विधिवत निकाह झालेला होता हे सांगितलं आहे, पण तरीही हा सवाल अनुत्तरित राहतोच. त्यामुळे साहिरच्या मनात खोलवर कुठेतरी अनौरसपणाचं – बास्टर्डपणाचं दु:ख दडलं असेल का? हे मानवी स्वभाव पाहता शक्य आहे.
पुन्हा कोर्टात बापानं ‘हा माझा मुलगा नाही, कारण इतर दहा बायकांपासून मला मुलगा झाला नाही’ हे म्हणणं पण मायलेकाला किती विद्ध करून गेलं असणार? पुन्हा सरदार बीबी फजलपासून वेगळी झाल्यावर त्यानं आणखी एक विवाह केला होता. पण या बाराव्या पत्नीलाही मूल झालं नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ही अशी काही मानवी रहस्ये आहेत की जिची चर्चा साहिर व त्याच्या आईवर, आज ते दोघे हयात नसताना करणं अन्यायी आहे.
पण अनुप सिंग संधूनं ‘लाईफ अँड लव्हज ऑफ साहिर लुधियानवी’ या विशेष संशोधन करून व सर्व संबंधितांशी बोलून -माहिती घेऊन लिहिलेल्या परखड पुस्तकात आणखी एका त्या काळी जोर धरून असलेल्या एका अफवेचा, चर्चेचा विषय झालेल्या बाबीचा उल्लेख केला आहे, तो असा आहे.
साहिरचं मामाच्या घरी गेलेलं आयुष्य हे कष्टाचं व गरिबीचं होतं. कारण त्याचा मामा हा छोटा फळविक्रेता होता व त्यावर त्याचा उदरनिर्वाह चालायचा. बहिणीला त्यानं प्रथम फजलपासून अलग झाल्यावर आपल्याच घरी ठेऊन घेतलं होतं, पण स्वाभिमानी सरदार बीबी काही वर्षांनी स्वतंत्रपणे मुलासह वेगळी राहू लागली.
भाऊ जमेल तेवढी बहिणीला पैशांची मदत करायचा. सरदार बीबीकडे चरितार्थाचं कोणतंही साधन त्या काळात नव्हतं. होतं ते केवळ ‘मेहेर’ म्हणून असणारे काही दागिने. ते किती काळ पुरणार होते जगण्यासाठी? त्यामुळे काही काळ सरदार बीबीनं जगण्यासाठी व मुलाला वाढवण्यासाठी वेश्या व्यवसाय केला, अशी पूर्ण लुधियानात चर्चा होती आणि समज येण्याच्या वयात साहिरला ते समजलं असावं – असणार!
वाचा : नवीन लेखकांसाठी पुस्तके प्रकाशित करण्याची सोपी प्रक्रिया
वाचा : मराठी ज्ञान, रोजगाराची आणि अभिजात होण्याची त्रिसूत्री!
अस्वस्थ करणाऱ्या कविता
साहिरत्या काळातही भरपूर शायरी वाचायचा आणि शिवाय स्वत:ची तुकबंदी पण करायला लागला होता. त्यामुळे सहसंवेदना व करुणेनं कदाचित त्यानं आईची देह विकण्याची पण मजबूरी समजून घेतली असणार. त्याचं प्रतिबिंब ‘चखले’ (वेश्या घर) या त्याच्या प्रसिद्ध कवितेत उमटलेलं दिसतं. ही त्याची धारदार व अस्वस्थ करणारी नज्म गुरूदत्तनं ‘प्यासा’मध्ये वापरली. त्याच्या या काही ओळी पहा.
‘ये पुरपेच गलियाँ, ये बदनाम बाजार
ये गुमनाम राही, ये सिक्कों की झनकार
ये इस्मत के सौदे, ये सौदों पे तकरार
जिन्हे नाझ है हिंद पर वो कहाँ है?’
साहिरची सहवेदना जशी गरीब, पददलित व किसान-कामगाराबाबत तीव्र होती, त्याहीपेक्षा जास्त ती स्त्रीबाबत होती. तिचं होणारं शोषण त्याला खुपायचं. त्यातूनच जे गीत गाताना लता मंगेशकर अक्षरश: रडली होती, ते गीत ‘साधना’ (१९५८) सिनेमातलं जन्मास आलं असणार.
‘औरत ने जनम दिया मर्दों को, मर्दों ने उसे बाजार दिया,
जब जी चाहा मसला कुचला, जब जी चाहा दुतकार दिया
तुलती है कहीं दिनारों में, बिकती है कही बाजारों में
नंगी नचवाई जाती है अय्याशों के दरबारों में,
ये वो बेइज्जत चीज है जो बट जाती है इज्जतदारों में
औरत ने जनम दिया मर्दो को, मर्दों ने उसे बाजार दिया’
अर्थात अनुप सिंग संधूनं वरील चर्चा-अफवेला त्याला प्रयत्न करूनही पुष्टी मिळाली नव्हती, हे पुस्तकात नमूद करत पुढे म्हणलं होतं की, ही केवळ अफवा असणार!
पण काही असो. साहिरसाठी सरदार बीबीने जे केलं त्याला तोड नव्हती. तिचे कष्ट, तिचा स्वाभिमान आणि मुलावरचं पराकोटीचं प्रेम यामुळे बालवयातला असुरक्षितता व भावनिकदृष्ट्या दुभंगलेला साहिर तिच्यावर नको तितका विसंबून राहू लागला होता.
पुढेही जीवनातील अपयशी प्रेम प्रकरणामुळे तो एकाकीच राहिला. त्यामुळे त्याचं आईवरचं परावलंबित्व शेवटपर्यंत कमी झालं नाही. यालाच खुशवंत सिंगनं फ्राईडचा दाखला देत ‘मदर फिक्सेशन’ म्हणलं ते खरं होतं. त्याची बालपणाची फरफट पाहता तो तसा तिच्याशी ‘ऍटॅचड्’ असणं पण स्वाभाविक होतं! कोर्टात दहाव्या वर्षी त्यानं बापाची श्रीमंती ठोकरून लावत ‘आईबरोबर गरिबीत राहीन’ असं नि:संदिग्धपणे सांगितलं, कारण त्याच्यासाठी त्या वेळी आई सर्वस्व होती व पुढेही कायम राहिली…
सरदार बीबीनं पण नवर्यापासून अलग झाल्यावर आपलं सारं लक्ष मुलावर केंद्रित केलं होतं. कारण तेच तिच्या जगण्याचं एकमेव कारण उरलं होतं. त्याला नवर्यापासून वाचवणं, सुरक्षित ठेवणं आणि शिक्षण देऊन मोठं करणं हेच तिचं आता जीवनध्येय बनलं होतं! त्यामुळे आई-लेकराच्या या लोकविलक्षण प्रेमाची साहिरच्या हयातीतच दंतकथा बनली होती. म्हणूनच साहिरनं एका गीतात आईची इच्छा व्यक्त करताना म्हणल्याप्रमाणे तो तिच्यासोबत तिच्या अंतिम श्वासापर्यंत राहिला आणि आईची इच्छा पूर्ण केली.
‘तू मेरे साथ रहेगा मुन्ने!’
(“हर इक पल का शायर: साहिर लुधियानवी” या लोकवाङ्मयतर्फे प्रकाशित होणाऱ्या पुस्तकातील संपादित भाग)
जाता जाता :
लेखक भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी, लेखक व ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत.