भारताच्या लोकजीवनाविषयी बाबरला होती आस्था

बाबर हा तुर्कवंशीय होता. तुर्कांचे जगणे भारतीयांपेक्षा निराळे. त्यांचा पेहराव, खानपान, नैसर्गिक रचना भारतीयांपेक्षा वेगळी होती. बाबर भारतात आल्यानंतर त्याला भिन्न जीवनपद्धतीच्या अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागले. त्यामुळे त्याचा त्रागा व्हायचा.

उष्ण वातावरणात जगणे अवघड व्हायचे. तेव्हा इथे बर्फ मिळत नाही म्हणून ‘बाबरनामा’ या आपल्या ग्रंथात त्याने टीका केली आहे. काही फळे मिळत नाहीत म्हणून नाराजीही व्यक्त केली आहे. याच आवेषात भारताविषयी त्याने व्यक्त केलेली काही मते स्वीकारता येत नाहीत. मात्र त्याच्या सबंध लिखाणात द्वेशाचा अंश नाही. किंवा स्वतःच्या मातृभूमीच्या तुलनेतला तिटकारा नाही.

निरिक्षणे टिपण्यात बाबर निरपेक्ष होता. टिपलेल्या निरिक्षणांवर त्याने कधीच अभिनिवेष लादले नाहीत. आपला मताग्रह धरला नाही. भारतात जे काही दिसले ते जसे आहे तसे त्याने आपल्या आत्मवृत्तात मांडले. त्यातील सौंदर्यस्थळे त्याने दाखवून दिली.

बाबर मर्मग्राही चिंतक होता. त्याच्या चिंतनाचा निसर्ग हा मुख्य घटक आहे. मानवी समाजाच्या विविध रुपांचे अनेक पडसाद त्याच्या समग्र लिखाणात सातत्याने जाणवत राहतात.

भारताविषयी देखील त्याच्या निरिक्षणात अशा अनेक गोष्टींचा भरणा आहे. बाबरनामा या ग्रंथात भारताच्या समग्र वर्णनात तो म्हणतो, “भारत मोठा विस्तृत प्रदेश आहे. मनुष्य आणि सर्जनाने हा प्रदेश परिपुर्ण आहे. भारत पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या इकलिममध्ये (ऋतुंमध्ये) मध्ये स्थित आहे. याचा कोणताच भाग चौथ्या इकलिममध्ये मोडत नाही.

हा खूप आश्चर्यजनक देश आहे, जर आपण ह्याची तुलना आपल्या देशाशी केली तर तो एका वेगळ्या विश्वासमान भासू लागेल. येथील पर्वत नद्या, जंगल, नगर, शेती, पशु आणि पाउस तथा हवा सर्व भिन्न आहेत. काबूलच्या जवळच्या स्थानातील गरम सीर (गरम भूभाग)च्या काही गोष्टी भारताशी मिळत्या-जुळत्या आहेत.

मात्र सिंधु नदी पार केल्यानंतर सर्व प्रदेश भारत सारखा दिसायला लागतो, भूमी, जल, वृक्ष, टेकड्या, मानवी समूह, आचार विचार आणि प्रथा.” (भाषांतर प्रस्तुत लेखकाचे)

वाचा : बाबरने शब्दबद्ध केलेला भारत कसा होता?

वाचा : अहमदनगर : मध्ययुगीन भारतातील ऐतिहसिक शहर

हवामानाचे वर्णन

भारताच्या भौगोलिक विस्ताराने बाबर मोहित झाला होता. पुनरुक्तीचा दोष पत्करुन त्याने याविषयी बाबरनाम्यात सातत्याने उल्लेख केला आहे. इथल्या ऋतुमानाचे त्याला विशेष आकर्षण होते. त्याविषयी तो लिहितो, “भारत एक विस्तृत असा मोठा देश आहे. त्याच्यामध्ये सोन्या चांदीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आहेत. पावसाच्या ऋतुंमध्ये वाहणारे वारे अल्हाददायी असते.

येथील पावसामुळे कधी-कधी एका दिवसात दहा-दहा, पंधरा-पंधरा, वीस-वीस वेळा ढगांमधून पाण्याचा वर्षाव होतो. पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी होते. जेथे पाण्याचा थेंबही नसतो तेथे नद्या-नाले वाहायला लागतात.

पावसामध्ये आणि पावसाच्या नंतर अल्हाददायी वारे वाहतात. येथील पावसाचे आश्चर्यकारक वैशिष्ट्य हे आहे की, बाण अनुपयोगी ठरतात. बाणांचा काय विषय? इथे ग्रंथ, पोषाख, आणि अनेक वस्तूंची निर्मिती केली जाते.

कधी-कधी पावसाच्या दिवसाऐवजी उन्हाळ्यात देखील वारा वेगाने वाहतो. काहीवेळा तर त्याचा वेग इतका असतो की, त्याला वादळाचे स्वरुप प्राप्त होते. भारतात व्यवसायांची विभागणी वैशिष्ट्यपूर्ण आहे.

एकाच व्यवसायातील लोक मोठ्या संख्येत असतात. गरजेवेळी एकच काम करणारे हजारो माणसे उपलब्ध होतात. मुल्ला शरफुद्दीन यजदी ‘जफरनामा’मध्ये लिहितात, जेव्हा दगडांनी जुमा मस्जिद बांधली तेव्हा दोनशे दगडावर नक्षीकाम करणारे कारागीर अझरबैजान, फारस आणि भारतातून गोळा केले होते.

तुलनेत भारतामध्ये दगडावर नक्षीकाम  करणाऱ्यांच्या संख्येचा अंदाज यावरुन देखील बांधता येईल की, जी इमारत मी आग्रा शहरात तयार करायला सुरुवात केली आहे. त्यासाठी फक्त आग्रा शहरातून ६८० दगडकाम करणारे कारागीर उपलब्ध झाले आहेत.

सिकरी, बयाना, दौलतपूर, ग्वाल्हेर, कोल येथे ज्या इमारती उभारणीचे काम हाती घेतले आहे. ते १४०० दगडकाम करणारे कारागीर काम करत आहेत. यावरुन अंदाज बांधता येईल की भारताच्या काही विशिष्ट व्यवसायात हजारो माणसे कार्यरत आहेत.

भारताच्या भूगोलाप्रमाणे बाबरने इथल्या मानवी समाजाविषयी त्यांच्या व्यावसायिक परंपरावर भाष्य केले आहे. इथले लोक वर्षानुवर्षे परंपरेने हे एकच व्यवसाय करत असतात, असे बाबर म्हणतो. त्याचे हे निरिक्षण अल्‌ बेरुनीच्या जातसंस्थेवरील भाष्याशी साम्य साधणारे आहे. भारतीय समाजाच्या विविध  घटकांविषयीही बाबरने अशाच पद्धतीने विश्लेषण केले आहे.

वाचा : कथा बिजापुरच्या गोलगुंबजच्या जन्माची

वाचा : शाही थाट-बाट असणारी मुघल डीश

भारताविषयी आत्मियता

बाबरने भारतावर सत्ता प्रस्थापित केल्यानंतर प्रचंड गतीने साम्राज्याचा विस्तार केला. भारतातच त्याला स्थैर्य मिळाले. त्याने भारताच्या सत्तेविषयी इश्वराचे आभार मानले. त्याविषयीच्या शेर मध्ये तो म्हणतो,

शेकडो धन्यवाद दे, हे बाबर । उदार, क्षमा करणाऱ्याला

त्याने प्रदान केले आहेत तुला हिंद आणि सिंध सारखे राज्य

जरी तु सहन करु शकत नाहीस येथील उष्णता

जर तुला थंड दिशा पहायची असेल तर ते पहा तिकडे गजनी आहे.

भावानुवाद-हिंद आणि सिंधचे राज्य तुला मिळाले म्हणून तु इश्वराचे आभार मानले पाहिजेत. जरी या प्रदेशातील वातावरण तुला योग्य वाटत नसले तरी तू हे सहन करायला हवेस. कारण गजनीत थंडी असताना तुला कीती त्रास सहन करावा लागला. सारे आयुष्य उद्ध्वस्त झाले. आणि इश्वराने तुला हिंद आणि सिंध सारखे राज्य देउन तुझ्यावर कृपाच केली आहे.  

भारताविषयीच्या आत्मियतेचा बाबरचा हा विचार काव्यापुरता मर्यादित नव्हता. त्याने तो विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवला. आपल्या ग्रंथात लिहिलेली २४ फेब्रुवारी १५१९ची एक घटना यासंदर्भात उल्लेखनीय आहे. त्याचे काही सैनिक भिराच्या नागरिकांची लुट करत होते.

ही बातमी समजल्यानंतर बाबरने काही अन्य सैनिकांना पाठवून त्यांना कैद करायला लावले. त्यातील काहींना त्याने मृत्युदंड दिला तर काहींची नाक कापून त्यांची छावणीतून धिंड काढायला लावली.जे लोक आपली अधिसत्ता कबूल करतात त्यांच्याशी आणि शेतकऱ्यांशी आपल्या मित्रांसारखा व्यवहार करायला हवा असे त्याचे मत होते.

भारतीयांशी सद्‌व्यवहार करण्याविषयी तो लिहितो, “भारतावर अधिकार जमवण्याची माझी तीव्र इच्छा होती. हा भिन्न देश, भीरा, खुशआब, चिनाब आणि चिनिउत कोण्याकाळी तुर्कांच्या अखत्यारित राहिले आहेत. त्यामुळे मी त्याला आपले मानत होतो. त्याला शांतिपूर्वक किंवा युद्धाद्वारे, ज्या पद्धतीने शक्य असेल आपल्या अधिकारात आणण्याचा निश्चय केला होता.

त्या कारणानेच या पर्वतरांगाबद्दल सद्व्यवहार आवश्यक होते. त्यामुळे मी आदेश दिला की, शेतकऱ्यांना, जनावरांना कोणत्याच प्रकारचे नुकसान पोहचवू नये. इथपर्यंत की त्यांच्या सुताच्या तुकड्याला आणि सुईला देखील कोणतीही हानी पोहचू नये.”

वाचा : वेद आणि उपनिषदांचा अभ्यासक अल्-बेरुनी

वाचा : गुरुविना घडलेले महान संगीतज्ज्ञ अमीर खुसरो

लोकजीवनाविषयी आस्था

बाबरला इथल्या लोकजीवनाचे, त्यांच्या गरजा, उत्पादनसंस्था, श्रमाची विभागणी याविषयी आश्चर्य वाटायचे. ती सारी व्यवस्था एखाद्या संहितेने बद्ध असावी अशा पद्धतीने चालते, पण वास्तवतः शासनाने तसे कोणतेच नियमन केलेले नाही, हे पाहून तो थक्क व्हायचा. भारतीय समाज या अर्थाने स्वयंभू आहे असे त्याचे म्हणणे होते. 

बाबरने भारताविषयी केलेल्या लिखाणात मध्ययुगीन ग्रंथलेखन पद्धतीप्रमाणे बाजारातील नियम, तोलन-मापन पद्धती, स्थानिक गणिताचे शास्त्र, घड्याळ वापरण्याचे नियम, वेळेची विभागणी, महसुली उत्पन्न, प्रादेशिक पीकांची माहिती दिली आहे.

त्याने त्याच्या डायरीत केलेले लिखाण प्रासंगिक आहे. त्या काळाची ती नोंद आहे. पण त्या डायरीचा समग्र अभ्यास केल्यास तो एखादा ग्रंथ असावा आणि एखाद्या अभ्यासकाने नियोजनपुर्वक, प्रचंड कष्ट करुन त्याची रचना केली असावी असा भास होतो. मध्ययुगात सर्वप्रथम अल्‌ बेरुनीने भारतीय समाजाचा अभ्यास केला. त्यानंतर इब्ने बतुता, जियाउद्दीन बरनी वगैरेंनी अभ्यासाची ही परंपरा समृद्ध केली. याच अभ्यासकांच्या परंपरेत बाबरला सन्मानानेच स्थान आहे.

जाता जाता :