औरंगाबाद स्थित मौलाना आझाद शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा फातिमा झकारिया यांचे करोना संसर्गाने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ८६ होते. शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार व सामाजिक प्रश्नांच्या अभ्यासक म्हणून त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा महाराष्ट्र व देशभर उमटवला होता.
फातिमा झकेरिया यांनी ५० वर्षांहून अधिक काळ विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे. १९७०च्या दशकात ‘द इलस्ट्रेटेड विकली’मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली होती. संपादक खुशवंत सिंग यांच्या त्या असिस्टंट होत्या. सिंग यांनी आपल्या विविध पुस्तकात फातिमा झकारिया व त्यांचे शोहर रफिक झकारियाबद्दल ठिकठिकाणी वर्णेने केलेली आहेत.
My mother, Fatma Zakaria, passed away last night – a heart attack after getting Covid-19. She lived a long, rich,…
Posted by Fareed Zakaria on Tuesday, 6 April 2021
मीडिया रिपोर्टच्या मते, फातिमा झकारिया यांचा जन्म १७ फेब्रुवारी १९३६ रोजी मुंबईत झाला. मुंबईतील प्रसिद्ध निर्मला निकेतन इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधून त्यांनी उच्च शिक्षण घेतले होते. सन १९५८ मध्ये त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ चिल्ड्रेन अँड विमेन या संस्थेद्वारे मुलांची देखभाल करण्याची जबाबदारी घेतली. त्यांनी ५०० हून अधिक मुलांचे शिक्षण, त्यांचे आरोग्याची काळजी वाहिली. पुढे ‘द इलस्ट्रेटेड विकली’ साप्ताहिकात जाईन झाल्यानंतर लहान मुलांसाठी खास लेखमाला देखील लिहिली होती.
वाचा : रफिक झकारिया : एक समर्पित राजकारणी आणि विचारवंत
वाचा : अनिस चिश्ती : इस्लामी तत्त्वज्ञानाचे मराठी विचारवंत
गाजवले पत्रकारिता क्षेत्र
श्रीमती फातिमा झकारियांनी १९७० ते १९८०च्या दशकात ‘द इलस्ट्रेटेड विकली’मध्ये अनेक महत्त्वा जबाबदाराऱ्या संभाळल्या. पुढे त्या टाइम्स ग्रूपच्या दि संडे टाइम्सच्या सापादिका झाल्या. खुशवंत सिंग यांच्या मते त्याकाळी पत्रकारितेत एखादी मुस्लिम महिला इतक्या मोठ्या हुद्यापर्य़ंत पोहोचणे कौतुकाची बाब होती.
प्रसिद्ध पत्रकार आणि माजी परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी खुशवंत सिंग यांच्या स्मृतिलेखात फातिमा झकारियांनी पत्रकारितेत संधी दिल्यानेच मी यशस्वी होऊ शकलो, अशी कबुली दिली आहे. खुशंवत सिंग यांनी आपल्या एका पुस्तकात फातिमा झकारिया यांच्याबद्दल गौरवाचे उद्गार काढत, त्यांच्या कलागुणांवर स्मृतिसुमने उधळली आहेत.
पत्रकारिता क्षेत्रात पती रफिक झकारिया यांची प्रसिद्धी, विद्ववत्ता व व्यक्तिमत्वाचे गारुड बाजुला ठेवून स्वतंत्र असा ठसा त्यांनी उमटवला होता. त्यांनी अनेक उल्लेख कामगिरी केलेली आहे. वृत्तपत्रे, साप्ताहिकातून विविध विषयांवर नियमित लिखाण केले. त्या काळात त्यांनी इंदिरा गांधी, मार्गारेट थॅचर, जयप्रकाश नारायण, जेआरडी टाटा, मोरारजी देसाई, चरण सिंग अशा मोठ्या नेत्यांच्या अविस्मरणीय मुलाखती त्यांनी घेतल्या आहेत. इंदिरा गांधी व ब्रिटेनच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांची मुलाखत फार गाजली होती.
श्रेष्ठ भाषांतरकार
एक उत्तम मुलाखतकार म्हणून त्यांनी पत्रकारितेतील आपली कारर्कीर्द गाजवली. त्यांनी १९८४मध्ये अमेरिकेतील निवडणुका, तसेच त्याच वर्षी लंडनमधील ‘फेस्टिव्हल ऑफ इंडिया’चे विशेष वृत्तांकन केले होते. त्यांच्या या योगदानाची दखल घेत १९८३मध्ये त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील सरोजिनी नायडू एकत्रिकरण पुरस्कार देखील देण्यात आला होता.
उत्तम भाषांतरकार म्हणूनदेखील त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. उर्दू भाषेतील अनेक महत्त्वाची पुस्तके त्यांनी इंग्रजी भाषेत अनुवादित केलेली आहेत. डॉ. जाकिर हुसैन, कृश्न चंदर अशा विख्यात लेखकांच्या लघुकथांचे उर्दूतून इंग्रजीत अनुवादही केला आहे. इस्लाम व मुस्लिम समाजातील सांस्कृतिक रुढी प्रथा व परंपरा शिवाय देशातील बदलत्या राजकीय घडामोडीचा त्यांचा उत्तम अभ्यास होता.
केंद्र सरकारने मीडियाची पुनर्रचना करण्याबाबत गठित केलेल्या समितीच्या फातिमा झकारिया या सदस्या देखील होत्या. सद्यस्थितीत त्या त्यांच्या शिक्षण संस्थेद्वारे चालवल्या जाणाऱ्या ‘ताज’ मॅगझिन अर्थात ‘द ताज मॅग्जीन आर्ट जर्नल ऑफ द ताज ग्रुप ऑफ हॉटेल्स’च्या संपादिका होत्या.
फातिमा यांनी पत्रकारितेबरोबरच शिक्षण क्षेत्र आणि सामाजिक कार्यात महत्वाचे योगदान दिले आहे. १९६३मध्ये मौलाना आझाद शिक्षण संस्थेच्या ट्रस्टवर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचे पती डॉ. रफिक झकारिया यांचे २००५मध्ये निधन झाल्यानंतर त्यांच्यावर संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आली.
२००५ साली रफिक झकारिया यांच्या निधनानंतर त्यांच्यावर मौलाना आझाद शिक्षण संस्था व ट्रस्टच्या कार्याची जबाबदारी आली. त्यांनी ही जबाबदारी अत्यत योग्यरित्या संभाळली. गरीब, मागास, शोषित वर्गातील महिला, अनाथांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. २०१२ पूर्वी फक्त विद्यापीठात यूजीसी मान्यताप्राप्त अभ्यासक्रमाचे स्त्री अभ्यासन केंद्र होते. त्यानंतर आझाद कॅम्पसमध्ये दुसरे मोठे केंद्र फातिमा झकारियांच्या प्रयत्नामुळे सुरू झाले.
वाचा : धर्मवाद आणि सेक्युलर राष्ट्रवादात का होतोय संघर्ष?
वाचा : डॉ. गेल ऑम्वेट : भारतीय चर्चाविश्व समृद्ध करणाऱ्या लोकविचारवंत
मुलींच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न
फातिमा यांनी संस्थेत अनेक आधुनिक व व्यावसायिक शैक्षणिक कोर्सला मान्यता दिली. तसेच गरिब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप योजनादेखील सुरू केली. आयएचएममध्ये पदव्युत्तर आणि पीएचडीच्या अभ्यासक्रमाला सुरुवात केली. डॉ. रफिक झकारिया हायर लर्निंग रिसर्च कोर्स अंतर्गत विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखेत एकूण २० नवीन अभ्यासक्रम सुरू केले.
मुलींच्या सर्वांगीण विकास आणि शिक्षणासाठी नवखंडा कॉलेजमध्ये विवध सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या तसेच मुलींसाठी शिक्षण प्रोत्साहन योजनादेखील सुरू केल्या. त्या खास मुलींसाठी ‘फुलवारी’ नावाची शाळा सुरू केली. याचे वैशिष्ट्य म्हणजे शाळेत शिपायापासून सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महिलाच आहेत.
सुश्री फातिमा झकारिया यांनी मुंबई विद्यापीठात सिनेटर म्हणूनही काम केलेले आहे. कतार सरकारने त्यांची ‘व्हाइस प्राइस फॉर एज्युकेशन ज्युरी’ म्हणून निवड केली होती. अशी निवड होणाऱ्या आशिया खंडातील त्या पहिल्या महिला होत्या. शैक्षणिक, साहित्य क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन २००६ साली फातिमा यांना ‘पद्मश्री’ सन्मानाने गौरवण्यात आले होते.
२९ मार्चला त्यांना करोना संक्रमण झाले. उपचारासाठी बजाज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दोन दिवसापूर्वी श्वास घेण्यास त्यांना त्रास होऊ लागला. अखेर उपचारादरम्यान फातेमा झकारिया यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली.
वाचा : दंगलीतून सहिष्णुता अंगीकारण्याचा बोध घ्यावा
वाचा : मनावर आणि जिभेवर लादलेली बंधने म्हणजे स्वातंत्र्यहरणच!
मान्यवरांनी व्यक्त केल्या संवेदना
फातिमा यांच्या निधनाचे वृत्त येताच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी शोक संदेश जारी केले. एमजीएम स्वायत्त विद्यापीठाचे कुलपति डॉ. सुधीर गव्हाणे यांनी आपल्या आठवणी सांगत फातिमा यांच्या पत्रकारितेतील व शैक्षणिक कारकीर्दीचा आढावा घेतला.
खासदार इम्तियाज जलील यांनीदेखील माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले, “फातेमा झकारिया यांचे निधनाने खरोखर शहराचे मोठे नुकसान झाले आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे आणि लाखो विद्यार्थ्यांनी मौलाना आझाद एज्युकेशन ट्रस्टच्या अंतर्गत औरंगाबादमध्ये सुरू असलेल्या असंख्य संस्थांमध्ये शिक्षण घेतलेले आहे. त्यांचे पती डॉ. रफिक झकेरीया यांच्या निधनानंतर त्यांनी सर्वस्वी जबाबदारी स्वीकारली आणि अल्पसंख्याक विद्यार्थ्यांमधील विशेषतः गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे मोठे काम पुढे नेले. आम्हाला फक्त अशी आशा आहे की मौलाना आझाद एज्युकेशन ट्रस्टने यापुढे ही चांगले कार्य सुरू ठेवून औरंगाबादमध्ये शिक्षणाची नवीन केंद्रे उघडवावी हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.”
Madam Fatma Zakaria, chairperson of Maulana Azad education trust, former journalist and Padmashri- awardee passed away short while back in Aurangabad. She will be laid to rest in Maulana Azad College campus tonite. Her death is a great loss for everyone. pic.twitter.com/vT8ThM0fzb
— imtiaz jaleel (@imtiaz_jaleel) April 6, 2021
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी म्हटले, “औरंगाबाद शहराच्या विकासाचे शिल्पकार म्हणून माजी मंत्री डॉ. रफिक झकारिया यांना ओळखले जाते.
डॉ. झकारिया यांच्यासोबतच मौलाना आझाद शिक्षण संस्थेच्या उभारणीत मोठे योगदान देण्याचे काम पद्मश्री फातिमा झकारिया यांनी केले. डॉक्टरसाहेबांच्या नंतर या संस्थेची धुरा त्यांनी खंबीरपणे सांभाळली. आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्या कार्यरत राहिल्या. पुर्वश्रमीच्या पत्रकार असलेल्या फातेमा झकेरिया यांच्या निधनामुळे आपण एका कर्तबगार शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार व विचारवंताला मुकलो आहोत.”
खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील फातिमा झकारिया यांच्यासोबतचा फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला. त्यांनी लिहिले, “फातिमा झकारिया यांच्या निधनाची वार्ता माझ्यासाठी अतिशय दुःखद आहे. त्यांच्याशी माझे वैयक्तिक,कौटुंबिक व जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या निधनामुळे माझे वैयक्तिक नुकसान झाले आहेच याशिवाय मराठवाडा व महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले.
रफिक झकारिया यांच्यानंतर फातिमा मॅडम यांनी मौलाना आझाद एज्युकेशन ट्रस्टच्या कार्याचा भार अतिशय समर्थपणे पेलला. समाजातील वंचित, शोषितांना त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात आणले. अल्पसंख्याक मुला-मुलींना दर्जेदार आधुनिक शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी अनेक नावीन्यपुर्ण उपक्रम राबविले. …या दुःखद प्रसंगी माझ्या संवेदना अरशद आणि फरिद झकारिया यांच्यासोबत आहेत. फातिमा झकारिया यांना भावपूर्ण श्रद्धांजली.”
औरंगाबाद येथील मौलाना आझाद एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षा पद्मश्री फातिमा झकेरिया यांच्या निधनाची वार्ता माझ्यासाठी अतिशय…
Posted by Supriya Sule on Tuesday, 6 April 2021
औरंगाबाद महापालिकेचे प्रशासक अस्तिक कुमार पाण्डेय यांनी श्रीमती झकारिया यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. आमदार अबु आसिम आझमी यांनी ट्विटरवर शोकसंदेश व्यक्त करून दु:ख व्यक्त केले आहे. आमदार सतीश चव्हाण म्हणतात,
“मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने अनेक वेळा विविध कार्यक्रमानिमित्त त्यांच्या शिक्षण संस्थेत जाण्याचा योग आला. फातेमा झकेरिया स्वतः उच्च शिक्षित असल्याने विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे यावर त्यांचा नेहमीच भर असायचा. त्यांच्या बोलण्यातून ते नेहमीच जाणवायचे. त्यांच्या जाण्याने मराठवाड्यातील शैक्षणिक क्षेत्रातील एक मार्गदर्शक आपण गमावला आहे.”
मौलाना आझाद शिक्षण संस्थेचे माजी संचालक डॉ. एम. डी. जहागीरदार यांनी आझाद कॉलेजच्या भविष्याबद्दल चिंता होत असल्याचे प्रतिक्रिया प्रसिद्धी माध्यमांना दिली.
ते म्हणतात, “डॉ. फातेमा झकारिया यांच्या निधनामुळे मौलाना आझाद शिक्षण संस्थेचा आधारवड कोसळला आहे. डॉ. रफिक झकारीया यांनी स्थापन केलेली शिक्षण संस्था फातेमा यांनी समर्थपणे सांभाळल्या. या शैक्षणिक संस्थांचा नावलौकिक देशभरात वाढविला.
या शिक्षण संस्थामुळे मराठवाड्यातील वंचित, मागास व अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण घेता आले. व्यवस्थापनशास्त्र, शिक्षणशास्त्र फार्मसी व व हॉटेल मॅनेजमेंटचे दर्जेदार शिक्षण औरंगाबाद उपलब्ध करून देण्यात आले. झकारिया यांच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.
या संस्थेत प्राध्यापक म्हणून काम करताना झकारिया दांपत्याचा मिळालेला कौटुंबिक स्नेह देखील न विसरता येण्यासारखा आहे. रफिक झकारिया व फातिमा झकेरिया यांनी अत्यंत कष्टाने उभा केलेल्या या संस्थेच्या भवितव्याबद्दल माझ्यासारख्याला वाटणारी काळजी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी समजून घ्यावी एवढीच अपेक्षा आहे.”
फातिमा झकारिया यांच्या त्यांच्या पश्चात ‘सीएनएन’चे अमेरिकास्थित पत्रकार फरिद झकारिया व उद्योगपती अरशद झकारिया ही दोन मुले आहेत. ७ एप्रिल रोजी बुधवारी सकाळी ९ वाजता संस्थेच्या रोजा बाग कॅम्पसमधील आझाद शिक्षण संस्थेच्या डॉ. रफिक झकारिया यांच्या समाधीशेजारी त्यांचा दफनविधी निवडक लोकांच्या उपस्थितीत पार पडला.
करोना व लॉकडाऊनमुळे फरिद झकारिया व अरशद झकारिया दफनविधीत उपस्थित राहू शकले नाहीत. फरिद झकारिया यांनी ट्विटर व फेसबुकवरून आईबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत.
जाता जाता :
