वसाहतवाद संपुष्टात आल्यानंतर जगात सर्वत्र उदार व निधर्मी राष्ट्रवादाचा कालखंड सुरू झाला. ह्या राष्ट्रवादाने लोकांना अधिक सक्षम राज्ययंत्रणेचे व सामाजिक सुव्यवस्थेचे अभिवचन दिले. रफिक झकारिया हे या कालखंडाचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्यामध्ये आढळणारा जमातवादाचा अभाव हे या कालखंडाचे प्रतिबिंब होय. ते नेहमीच जमातवाद व सांप्रदायिकतेच्या सीमापार राहिले आहेत.
भारताचा सर्व संग्राहक सांस्कृतिक वारसा, उदारवादी अभिजात साहित्याची सखोल जाण व इस्लामी संस्कृतीचे ज्ञान या सगळ्यांचा मिलाफ झकारियामध्ये आढळतो. त्यांच्या व्यक्तित्वाचा, विचारांचा व राजकीय कारकीर्दीचा आढावा घेतल्यास ते निस्सीम राष्ट्रवादी, हिंदू-मुस्लिम एकतेचे पुरस्कर्ते व भारतीय विभाजनाच्या विरोधी होते.
झकारिया सांप्रदायिक राजकारणाच्या विरोधी कायम संघर्षात राहिले. सांप्रदायिक राजकारणामुळे हिंदू-मुस्लिम या दोन समुदायांचेच नव्हे तर भारतीय राष्ट्रीयतेचे नुकसान झाले आहे या निष्कर्षापर्यंत ते आले होते. झकारिया हे बुद्धिवादी, सहिष्णुता, धर्मनिरपेक्षता, सर्वसमावेशकता या मूल्यांचे आग्रही पुरस्कर्ते होते.
शक्तिशाली भारताच्या निर्मितीसाठी त्यांनी वरील मुल्ये आदर्श मानली, त्यानुसार आपले विचार मांडले व कार्य केले. व्यक्तित्व व जडण-घडण रफिक झकारिया यांचा जन्म मुंबईपासून उत्तरेला ३० मैल अंतरावरील कोकण किनारपट्टीवरील नालासोपारा शहरात एका कोकणी मुस्लिम कुटुंबात ५ एप्रिल १९२० रोजी झाला.
झकारियांच्या कुटुंबास शैक्षणिक विद्वत्ता, वैचारिक संपन्नता व बौद्धिक प्रगल्भता यांचा जणू ईश्वरी वरदहस्त प्राप्त आहे. वैचारिक लेखन, शिक्षण व राजकारण या विभिन्न क्षेत्रात मौलिक कामगिरी करणाऱ्या झकारियांच्या या कार्यात त्यांच्या विदुषी पत्नी व सल्लागार यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या बुद्धीच्या तेजाने तळपणारा आणि अतुलनीय कर्तृत्वाने जगाला स्तिमित करणारा अमेरिकास्थित ‘न्यूजविक इंटरनॅशनल’चा (आता सीएनएन) तरुण संपादक फरीद झकारिया हा त्यांचा मुलगा तर झकारिया यांच्या संस्काराचे फलित होय.
वाचा : प्रा. फकरुद्दीन बेन्नूर : समन्वयाची संकल्पना प्रत्यक्षात राबवणारे सुधारक
वाचा : परिवर्तनवादी चळवळीत आत्मविश्वास भरणाऱ्या डॉ. गेल ऑम्वेट
दिग्गजांचा लाभला सहवास
झकारिया यांचा शैक्षणिक आलेख गुणवत्तापूर्ण व उल्लेखनीय राहिला आहे. त्यांचे माध्यमिक शिक्षण प्रथम भिवंडी येथे आणि नंतर पुणे येथे झाले. पुण्यातील शैक्षणिक वास्तव्यात झकारिया यांच्या जीवनविषयक दृष्टिकोनाच्या कक्षांचा विस्तार झाला. येथील वास्तव्यामुळे उदारवादी दृष्टिकोणाच्या निर्मितीचा पाया घातला गेला. पुण्यातूनच त्यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली.
१९३७ साली झकारिया पुण्याहून मुंबईला आले आणि त्यांनी मुंबईच्या इस्माईल यूसुफ महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथे त्यांची विद्यार्थी संघाचे सरचिटणीस म्हणून निवड झाली होती. त्यांनी विद्यार्थी संघाच्या वतीने महाविद्यालयात तत्कालीन भारतातील आघाडीच्या नेत्यांना निमंत्रित केले होते. झकारिया यांना त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात बॅ. जीना, के. एम. मुन्शी, सुभाषचंद्र बोस व सर कावसजी जहांगीर यांसारख्या नेत्यांना जवळून ऐकण्याची व त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली.
झकारियांनी मुंबई विद्यापीठातून एम. ए.च्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवून राज्यपालांचे सुवर्णपदक प्राप्त केले. त्याचबरोबर त्यांना परदेशात संशोधनासाठी शिष्यवृत्तीही मिळाली. त्यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लंडन विद्यापीठात पीएच.डी.साठी प्रवेश घेतला व विशेष गुणवत्ता श्रेणीत पदवी संपादन केली. त्यानंतर जगप्रसिद्ध लिंकन्स इनमधून बॅरिस्टरची पदवी प्राप्त केली. १ जानेवारी १९४९ रोजी ते मुंबईस परतले.
राजकारणात पूर्णवेळ सक्रिय होण्याअगोदर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिस सुरू केली. सुमारे एक दशक त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात शासनाचे विशेष अभिवक्ता म्हणून कार्य केले. विद्यार्थी दशेपासूनच झकारियांनी राजकारणात प्रवेश केला होता. त्यांनी १९४२च्या भारत छोडो चळवळीत भाग घेतला आणि त्यांना अटकही झाली होती. अखिल भारतीय युवक काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी म्हणूनही त्यांनी कार्य केले. त्यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस पक्षामध्ये महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या.
तीस वर्षांपेक्षा अधिक काळ ते अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य होते. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेने व प्रोत्साहनाने ते सक्रीय राजकारणात आले. त्यांच्याच इच्छेनुसार झकारियांनी औरंगाबाद विधानसभेची निवडणूक लढविली व १९६२ साली महाराष्ट्र विधानसभेत प्रवेश केला. त्यांनी महाराष्ट्रात कॅबिनेट मंत्री म्हणून तब्बल १७ वर्षे विभिन्न महत्त्वपूर्ण खाती सांभाळली.
१९७८ साली ते संसद सदस्य बनले आणि काँग्रेस (आय)चे उपनेते म्हणून त्यांची निवड झाली. ते राज्यसभेचे उपाध्यक्षही राहिले. आंतरराष्ट्रीय स्तरावर झकारियांची भारतीय राजकारण व इस्लाम धर्माचे विद्वान म्हणून ख्याती राहिली आहे. धर्मकारणाच्या विषाक्त वातावरणातही राष्ट्रवाद आणि बुद्धिनिष्ठ राजकारणावर ठाम श्रद्धा असलेल्या या नेत्याला स्वातंत्र्योत्तर काळातील एक प्रभावी भाष्यकार म्हणून मान्यता मिळाली.
वाचा : संघ-परिवाराने राज्यघटनेला विरोध का केला होता?
वाचा : सेक्युलॅरिझम धर्मीय की राजकीय विचारधारा?
आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाची विशेषतः नेहरू नीतीची जी मांडणी केली त्यामुळे सारे विश्व अचंबित झाले. त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघात भारताचे तीन वेळा (१९६५, १९९० आणि १९९६) प्रतिनिधित्व केले. संयुक्त राष्ट्रसंघात काश्मीर प्रश्नी भारताची बाजू मांडणारे त्यांचे प्रभावी वक्तव्य आणि प्रतिनिधित्व कायमचा ठसा उमटवून गेले.
९ जुलै २००५ रोजी सकाळी झकारिया यांचे त्यांच्या दक्षिण मुंबई येथील निवासस्थानी निधन झाले. ११ जुलै रोजी सायंकाळी औरंगाबाद येथील मौलाना आझाद महाविद्यालयाच्या परिसरात दफनविधी करण्यात आला. औरंगाबादच्या विकासाच्या या आधुनिक शिल्पकाराला अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांनी स्थापन केलेल्या मौलाना आझाद महाविद्यालयाच्या परिसरात मोठा जनसागर उसळला होता.
झकारियांवरील प्रभाव झकारिया यांचा जन्म स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात झाला होता. त्यांच्या विचारावर स्वातंत्र्य आंदोलनाचा, गांधी-नेहरूंच्या विचारांचा, धर्मनिरपेक्ष राजकारणाचा फार मोठा प्रभाव होता. गांधी, नेहरू प्रमाणेच सर्व मोठ्या नेत्यांशी त्यांचा थोडा बहुत संबंध आला. झकारियांवर पंडित नेहरूंचा विशेष प्रभाव पडला. त्यांच्याकडून त्यांनी उदार राष्ट्रवादाची प्रेरणा घेतली.
झकारियांना नेहरूंच्या निकट संपर्कात येण्याची पहिल्यांदा संधी मिळाली तेव्हा नेहरू काँग्रेसचे अध्यक्ष होते. झकारिया इस्माईल यूसुफ कॉलेजच्या विद्यार्थीपरिषदेच्या कार्यकारिणीचे सदस्य असताना नेहरूंनी त्यांच्या महाविद्यालयात व्याख्यान देण्याचे कबूल केले होते. नेहरूंना मुंबईस्थित त्यांच्या भगिनी कृष्णा हाथीसिंग यांच्या निवासस्थानाहून महाविद्यालयात आणण्याची जबाबदारी झकारियांवर सोपविण्यात आली.
दक्षिण मुंबई ते जोगेश्वरीचा प्रवास त्यांनी कारने केला. या प्रवासात नेहरूंचा सहवास त्यांना आनंदमय व स्नेहपूर्ण वाटला. नेहरूंनी यावेळी तरुण झकारियांना सांगितले होते की, त्यांच्यासारख्या मुस्लिम तरुणांनी सांप्रदायिकतेच्या राजकारणाच्या लाटेत वाहात जाऊ नये, तर त्यांनी स्वतःमध्ये राष्ट्रवादी मनोवृत्ती विकसित करावी. महाविद्यालयातील नेहरूंचे भाषण ह्याच धर्तीचे होते. नेहरूंच्या भाषणामुळे केवळ झकारियाच नव्हे तर अनेक मुस्लिम विद्यार्थी राष्ट्रवादी विचारांनी प्रेरित झाले.
वाचा : पुस्तकातून उरलेला बाबरी-आयोध्यावाद
वाचा : इतिहासाच्या भगवेकरणाचा प्रयत्न
मौलाना आझादांचा प्रभाव
डॉ. झकारियांवर सर्वाधिक प्रभाव जर कोणाचा पडला असेल तर तो मौलाना आझादांच्या व्यक्तित्व व कर्तृत्वाचा असे म्हणता येईल. आझाद हे संमिश्र राष्ट्रवादाचे पुरस्कर्ते होते. झकारियादेखील संमिश्र राष्ट्रवादाचे खंदे समर्थक राहिले आहेत. मौलाना आझाद इस्लाम धर्माचे गाढे अभ्यासक व विद्वान होते. पुढे स्वतः झकारियांनी इस्लाम धर्माचे अध्ययन केले व स्वातंत्र्योत्तर भारतातील इस्लामचे भाष्यकार म्हणून नावलौकिक प्राप्त केला. अर्थात त्यामागे मौलाना आझाद यांच्या व्यक्तित्वाची प्रेरणा होती हे निश्चित.
झकारिया स्वतंत्र भारतातील मौलाना आझाद यांच्या विचार व कार्याचा वसा वाहणारे नेते होते. झकारियांच्या एक व्यक्ती, नेता व विचारवंत म्हणून झालेल्या जडणघडणीत अनेक नेत्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. न. चिं. केळकर यांपासूने सरोजिनी नायडू, डॉ. एम.ए. अन्सारी ते हुमायून कबीर इ. उदारमतवादी व धर्मनिरपेक्ष नेत्यांची त्यांच्या व्यक्तित्वावर छाप दिसून येते.
महात्मा गांधीकडून त्यांनी हिंदु-मुस्लिम एकतेची प्रेरणा घेतली व त्यांच्या जीवनाचे ते एक प्रमुख उद्दिष्ट बनले. नेहरूंकडून त्यांनी धर्मनिरपेक्षता व उदार राष्ट्रवादाची प्रेरणा घेतली. मौलाना आझाद तर आध्यात्मिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे गुरूच होते. झकारिया यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, विचारांचा व त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेतल्यास ते नि:स्सीम राष्ट्रवादी, हिंदू-मुस्लिम एकतेचे पुरस्कर्ते राहिल्याचे दिसतात.
सांप्रदायिक राजकारणाच्या विरोधी ते कायम संघर्षरत राहिले. सांप्रदायिक राजकारणामुळे हिंदू व मुस्लिम या दोन्ही समुदायाचे व एकूणच भारतीय राष्ट्रीयतेचे नुकसान झाले आहे या निष्कर्षापर्यंत ते आले होते. महात्मा गांधी व मौलाना आझाद हे तर त्यांचे आदर्श होते. त्यांच्याकडूनच त्यांनी प्रेरणा घेतली. हिंदू-मुस्लिम एकतेचे व्रत जे त्यांनी तारुण्यावस्थेत स्वीकारले ते आयुष्याच्या अखेरपर्यंत जोपासले.
वाचा : मलिक अंबर महाराष्ट्राचे सांस्कृतिक राजकारणाचे प्रतीक
वाचा : वेद आणि उपनिषदांचा अभ्यासक अल्-बेरुनी
राष्ट्रीय एकतेचे प्रतिनिधी
झकारियांच्या उमेदीच्या काळात व संस्कारक्षम वयात त्यांना महात्मा गांधीच्या भेटीचा व त्यांच्याशी बोलण्याचा योग जुळून आला. या भेटीने त्यांच्या जीवनाला एक उद्देश व दिशा मिळाली. १९३६ साली झकारिया पुणे रेल्वे स्टेशनवर महात्मा गांधींना भेटले तेव्हा महात्मा गांधी आपल्या अनुयायांसह मुंबईच्या ट्रेनची वाट पाहत होते. झकारियांना स्थानिक वृत्तपत्रातून महात्मा गांधीच्या पुणे भेटीविषयी कळले व ते धावतच पुणे स्टेशनवर पोहोचले. त्यांनी महात्मा गांधींना नमस्कार केला.
गांधीजीनी मान हलवून नमस्काराचा स्वीकार केला व त्यांचे नाव विचारले. नाव ऐकल्यावर गांधीजींनी झकारियांची आस्थापूर्वक चौकशी केली. ते कुठे राहतात? कोणत्या शाळेत व कोणत्या वर्गात शिकतात? झकारिया गांधीजींच्या व्यक्तिमत्वाने भारावून गेले. या भेटीत त्यांनी काहीसे चाचपडत परंतु थेट असा एक प्रश्न गांधीजींना विचारला. तो म्हणजे, “तुम्ही हिंदू-मुस्लिम एकतेसाठीचे कार्य का सोडून दिले?”
महात्मा गांधींनी त्यांना खंबीरपणे उत्तर दिले, “मी हे कार्य कदापिही सोडणार नाही. मी त्यासाठी जगतो आहे आणि गरज भासल्यास त्यासाठी मृत्यू पत्करायलाही तयार आहे.” गांधीजींचे उत्तर ऐकूण झकारियांचा संशय दूर झाला व महात्मा गांधी आणि काँग्रेस पक्षावरील त्यांची निष्ठा अधिक दृढ झाली.
झकारिया यांची हिंदू-मुस्लिम एकतेमध्ये प्रगाढ आस्था होती. हिंदू मुस्लिमांमधील गैरसमज दूर करण्यासाठी, त्यांच्यातील संबंध बळकट करण्यासाठी, हिंदू-मुस्लिम विषयक समस्यांच्या निराकरणासाठी त्यांनी विपुल लेखन केले. या विषयावर अनेक वृत्तपत्रात लेख लिहिले, असंख्य व्याख्याने दिली व त्यांनी लिहिलेल्या अनेक ग्रंथांमध्ये हा विषय हाताळला. यासंदर्भात त्यांचा ‘Widening Divide’ हा ग्रंथ एक महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे.
झकारिया हिंदू-मुस्लिम एकतेचा आधार स्पष्ट करताना या दोन्ही समुदायातील भेदांपेक्षा समानतेकडे लक्ष वेधतात. त्यांच्या मते इतिहासकाळात हजारो वर्षे एकत्र सानिध्यात राहिल्याने या दोन्ही समुदायांनी परस्परांकडून सांस्कृतिक देवाण-घेवाण केली आहे. त्यातून त्यांच्यात एकता प्रस्थापित होण्यास मदत झाली आहे. हिंदू-मुस्लिम एकता ही ऐतिहासिक वास्तविकता राहिली आहे. या दोन्ही समुदायात विवाह विषयक रिती, विधी उदा. साखरपुडा, वधूचा पोशाख, वधूचा निरोप, वरात इत्यादी बाबतीत समानता दिसून येते.
तसेच मृत्यूनंतरचा श्राद्धविधी व लहान मुलांना शाळेत पाठवण्याचा विधी इत्यादी बाबतीत हिंदु परंपरांचा प्रभाव मुस्लिमांच्या जीवन पद्धतीवर पडल्याचे आपणास दिसून येते. तसेच दुसऱ्या बाजूला भारतीय कला, संगीत व स्थापत्याच्या क्षेत्रात मुस्लिमांचे योगदान कोणीही नाकारू शकणार नाही. परंतु हिंदू व मुस्लिम यांच्या संबंधातील समान गोष्टीकडे व त्यांनी परस्परांवर टाकलेल्या प्रभावाकडे डोळेझाक करून त्यांच्यातील भेदभावावर अधिक प्रकाशझोत टाकला जातो असे त्यांना वाटते. त्यामुळे त्यांनी मुहंमद अली जीनाप्रणित सांप्रदायिक राजकारण व त्यांच्या द्विराष्ट्रवादाचा जोरदार प्रतिकार केला.
या संदर्भात झकारिया म्हणतात, “नि:संशयपणे वास्तविकता ही आहे, की हिंदू व मुस्लिमांना विभक्त करणाऱ्या भेदापेक्षा त्यांच्यात समानता अधिक आहेत. जीनांनी आपल्या राजकीय उद्दिष्टपूर्तीसाठी भेदावर अधिक भर दिला, परंतु त्यांच्यातील एकतेचे बंध अधिक मजबूत आहेत. त्यामुळे धर्म हा राष्ट्रवादाचा आधार आहे हा त्यांचा सिद्धांत मोडीत निघतो.”
कोणत्याही प्रकारचा संप्रदायवाद देशासाठी हानिकारक आहे असे त्यांचे ठाम मत होते. परंतु बहुसंख्यांक हिंदू समुदायाने मुस्लिमांप्रति उदारवादी दृष्टिकोण स्वीकारण्याची अपेक्षा ते व्यक्त करतात. त्यामुळे भारताची शक्ती द्विगुणित होईल व दोन्ही समुदायाचे भवितव्य सुरक्षित होईल अशी त्यांची धारणा होती. या संदर्भात झकारियांनी भारताचे माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या निरोप भाषणातील अंश उद्धृत केला आहे.
नारायणन यांनी त्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी दिलेल्या भाषणात बहुसंख्यांक हिंदू समुदायाला आवाहन करताना म्हटले होते की, “आपणाशी निरोप घेताना माझे आपणास आवाहन आहे की, आपल्या सहिष्णू परंपरेचे तुम्ही रक्षण केले पाहिजे, जे की आमच्या संस्कृती व सभ्यतेचा आत्मा आहे. आमच्या संविधानाची मूळ प्रेरणा आहे आणि लोकशाहीच्या यशस्वितेचे गमकदेखील आहे. तसेच या विशाल राष्ट्राच्या एकसंधतेचे रहस्य आहे.”
राजकीय विचारवंत रफीक झकारिया हे आधुनिक भारतातील प्रज्ञावंत राजकारणी, धर्माचे गाढे अभ्यासक, हिंदू-मुस्लिम प्रश्नांचे विश्लेषक, थोर शिक्षण तज्ज्ञ, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पत्रकार, स्वातंत्र्य चळवळीतील स्वतंत्रता सेनानी, अभ्यासू वक्ते, संसदपटू असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते.
भारतीय मुस्लिम नेत्यांमध्ये मौलाना आझाद यांचा अपवाद वगळता दुसरा असा मुस्लिम राजकीय नेता झाला नाही, की ज्याने मुस्लिमांच्या दयनीय स्थितीचे विश्लेषण करण्यासाठी इतिहासाचा गांभीर्यपूर्वक अन्वयार्थ लावला. झकारिया हे असे नेते आहेत की ज्यांनी विसाव्या शतकातील भारतीय मुस्लिम राजकीय विचारास मोलाचे योगदान दिले. तसेच इतिहास व धर्माचा असा अन्वयार्थ लावला, की ज्यामुळे भारतीय राजकारण व मुस्लिमांच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त होईल.
वाचा : औरंगाबादच्या नामांतरास पर्याय ‘संभाजीनगर’ नव्हे ‘अंबराबाद’!
वाचा : मलिक अंबर महाराष्ट्राचे सांस्कृतिक राजकारणाचे प्रतीक
एक कुशल राजकीय प्रशासक
१९३० पासूनच्या स्वातंत्र्य आंदोलनातील संघर्षमय घडामोडी, काँग्रेसी आणि मुस्लिम लीगी नेत्यांचे राजकारण, परंपरांबद्दलचे समज-गैरसमज, ते करीत असलेल्या धर्माचा गैरवापर, गांधी जीनांमधील नेतृत्वाचा संघर्ष त्यांनी पाहिला होता व जवळून अनुभवला होता. जीनांच्या फुटीर, धर्मद्वेषी राजकारणामुळे हिंदूचे केले जाणारे शत्रुकरण आणि यामुळे हिंदुच्या मनात मुसलमानांबद्दल निर्माण होणारा संताप त्यांनी अनुभवला होता.
पत्रकाराच्या चिकित्सक दृष्टिकोनातून राजकारणाचे आणि कायद्याचे अभ्यासक म्हणून आणि त्या संघर्षमय काळातील विवेकी मुसलमान म्हणून त्यांचे विचारविश्व विकसित झाले आहे. फाळणीचा भयंकर संहार, भारतीय समाज दुभंगत असतानाच्या जीवघेण्या वेदना, फाळणी नंतरची मुसलमानांची सामाजिक, राजकीय व साहित्याने भारतीय राजकीय विचारांत मोलाची भर टाकली आहे.
भारतीय सामाजिक व राजकीय जीवनाच्या विभिन्न अंगांना स्पर्शून जाणाऱ्या विषयावर त्यांनी मांडलेले विचार भारतीयांसाठी दिशादर्शक व प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यास सहाय्यभूत ठरणारे आहेत.
झकारिया स्वातंत्र्योत्तर भारतातील मुस्लिम राजकीय नेते व राजकीय विचारवंत म्हणून आणि भारतीय राजकारण व राजकीय विचारांच्या इतिहासात महत्त्वपूर्ण योगदान देणारी व्यक्ती म्हणून कायम स्मरणात राहतील. स्वातंत्र्योत्तर काळात फाळणीच्या वेदनांनी ग्रस्त असलेल्या हिंदू व मुस्लिम या दोन्ही समुदायांच्या वेदनांवर फुंकर घालण्याचे व फाळणीच्या दुष्परिणामांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक असणारा वेळ आणि शक्ती देण्याचे कार्य झकारियांनी केले.
एक पत्रकार, लेखक, एक विद्वान, एक कुशल राजकीय प्रशासक, राजकीय विचारवंत व इतिहासकार अशा विभिन्न भूमिकांद्वारे त्यांनी आपले राष्ट्र, आपला समाज व आपला धर्म या सर्वांशी एकनिष्ठ राहून एक यथोचित संतुलन निर्माण केले.
झकारिया हिंदू मुस्लिम एकता, संमिश्र राष्ट्रवाद व धर्मनिरपेक्षता इ.च्या आधारे भारताच्या विकासाचे उद्दिष्ट घेऊन सामाजिक व राजकीय क्षेत्रात आजीवन सक्रिय राहिले. वरील उद्दिष्टासाठी आपले जीवन समर्पित करणारा प्रज्ञावंत राजकारणी म्हणून भारताच्या इतिहासात त्यांची नोंद झाली आहे.
“जसे जगात स्वार्थी राजकारणी असतात जगात, तसच अवघं आयुष्य समर्पित करणारे नेतेही असतात” हे अब्राहम लिंकनचे कथन स्वतः अब्राहम लिंकन यांना जेवढे लागू पडते तेवढेच रफिक झकारियांनाही लागू पडते.
जाता जाता :
लेखक उस्मानाबादच्या तेरणा महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख असून त्यांनी डॉ. रफिक झकारिया यांच्यावर पीएच.डी.चा शोधप्रबंध लिहिला आहे.