परिवर्तनवादी चळवळीत आत्मविश्‍वास भरणाऱ्या डॉ. गेल ऑम्वेट

डॉ. गेल ऑम्वेट या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या संशोधक-विचारवंत होत्या. पश्‍चिम भारतातील महात्मा फुले आणि ब्राह्मणेतर चळवळीचा अभ्यास करण्यासाठी त्या महाराष्ट्रात आल्या आणि भारतीय/मराठी समग्र जीवनाचा एक अविभाज्य भाग झाल्या. त्यांचा हा वैयक्तिक व वैचारिक प्रवास सोपा नव्हता. अमेरिकेत व युरोपमध्ये 1960-70च्या दशकांमध्ये चाललेल्या अनेक क्रांतिकारक राजकीय घडामोडींचा त्यांना वारसा होता.

दस्तुरखुद्द अमेरिकेमध्ये अमेरिकी साम्राज्यवादाने लादलेल्या व्हिएतनाम युद्धाला विरोध करणार्‍या चळवळीत, कृष्णवर्णियांच्या वंशभेदाविरोधातील लढ्यात आणि स्त्रीमुक्तीच्या आंदोलनांमध्ये गेल या सहभागी साक्षीदार होत्या. याच कालखंडामध्ये जागतिक पातळीवर मार्क्सवादाच्या नव्या अन्वयार्थाचे विचारमंथन चालू होते. कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले हे या सगळ्या घटनांचे केंद्रही होते. गेल ऑम्वेट यांनी समाजशास्त्रामध्ये याच विद्यापीठातून पीएच्.डी. संपादन केली होती.

भारतामध्येही 1970चा कालखंड हा संतप्त पिढीच्या आणि कामगार-कष्टकर्‍यांच्या रस्त्यावरच्या आंदोलनांचा होता. महाराष्ट्रातील साम्यवादी चळवळीची एक प्रमुख संघटना – लाल निशाण पक्षाच्या प्रमुख नेत्यांचा राजकीय सहवास हा येथील ग्रामीण कष्टकर्‍यांच्या समस्या समजावून घेण्यासाठी त्यांना एक मौलिक जीवनानुभव ठरला.

1973मध्ये त्यांचा पीएच्.डी.चा प्रबंध ‘वासाहतिक समाजातील सांस्कृतिक बंड : पश्‍चिम भारतातील ब्राह्मणेतर चळवळ’ हा त्यांच्याच संशोधन संस्थेने पुढाकार घेऊन प्रकाशित केला. महात्मा जोतिबा फुले यांच्या क्रांतिकारक सांस्कृतिक विचारांना आंतरराष्ट्रीय अभ्यासविश्‍वामध्ये पहिल्यांदा अधिष्ठित करणारे हे संशोधन आजपावेतो पथदर्शी मानले जाते.

वाचा : डॉ. गेल ऑम्वेट : भारतीय चर्चाविश्व समृद्ध करणाऱ्या लोकविचारवंत

वाचा : प्रा. फकरुद्दीन बेन्नूर : समन्वयाची संकल्पना प्रत्यक्षात राबवणारे सुधारक

सांस्कृतिक बंड

वासाहतिक समाजाच्या आकृतिबंधामध्ये ब्राह्मणेतर चळवळीचा अभ्यास करण्यासाठी वसाहतवादाचे मार्क्सवादी-लेनिनवादी सिद्धान्तन त्यांना उपयुक्त वाटले आणि जे. एस. फर्निवाल यांचा वसाहतींमधील बहुल समाजाचा अभ्यास साह्यभूत ठरला.

लेनिन यांच्या परिप्रेक्ष्यानुसार वासाहतिक समाजात तीन प्रकारच्या चळवळी अस्तित्वात असतात. एक, साम्राज्यवादविरोधी चळवळ, या राष्ट्रीय क्रांतिकारक चळवळीमध्ये समाजातील सगळे जनविभाग असतात. राष्ट्रीय बुर्ज्वा वर्गाबरोबर शेतकरी कामगार वर्गांचाही अंतर्भाव होतो. तसेच उर्वरित दोन प्रकारच्या सामाजिक क्रांतिकारक चळवळीही असतात.

भांडवलशाहीविरोधी चळवळींच्या आधार कामगार वर्ग आणि ग्रामीण कष्टकरी वर्ग असतो. ते देशी बुर्ज्वा वर्गाच्या विरोधात असतात. सरंजामशाहीविरोधी चळवळींचा आधार शेतकरी वर्ग असतो आणि तो देशी जमीनदारांच्या विरोधात असतो.

या चळवळी आधुनिकीकरण क्रांतीच्या स्वरूपाच्या असल्या तरी, त्यामध्ये राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक बंडाच्या चळवळी असतात. राष्ट्रीय चळवळ ही राजकीय बंड असते. परकीय वासाहतिक अभिजन वर्गांच्या सत्तेचा बिमोड करून देशी राज्यकर्त्या वर्गांकडे सत्तांतर करणे हे उद्दिष्ट असते.

अगदी याच्या विरोधामध्ये सामाजिक क्रांतिकारी शक्तींचे ध्येय हे देशी अभिजनांच्या वर्चस्वाला संपुष्टात आणणे हे असते. पण याचे दोन प्रकारचे स्वरूप असते. आर्थिक बंडाचा रोख हा अभिजनांच्या, आधुनिक संकल्पनेनुसार उगवत्या बुर्ज्वा वर्गाच्या विरोधी असतो आणि सांस्कृतिक बंड हे परंपरागत अभिजनवर्गाच्या विरोधात म्हणजे भारतात जातींमधील अभिजनांच्या विरोधात असते.

बहुतेक सगळ्या बिगर पाश्‍चिमात्य समाजांमधील शेतकरी चळवळी या सामाजिक आणि सांस्कृतिक बंड असतात. गेल ऑम्वेट यांच्या मते या सांस्कृतिक बंडांना सरंजामशाहीविरोधी चळवळी म्हणणे अयोग्य आहे. वासाहतिक समाजातील कृषी संरचना ही अर्ध भांडवली असते आणि तिचे सरंजामी अवशेष हे सांस्कृतिक पैलूंमध्ये तगून राहतात.

या प्रबंधामध्ये गेल ऑम्वेट यांनी दोन महत्त्वाचे मुद्दे मांडले. एक, वसाहतवादविरोधी राष्ट्रवाद हा निश्‍चितपणे लोकशाहीवादी होता मात्र भांडवलशाही वा वर्गरचनेचा बिमोड करणे हा काही त्याचा पैलू नव्हता. दोन, बहुलवादी समाजामध्ये वांशिक भेद हे वर्गीय विभाजनाशी एकरूप असतात. भारतामध्ये सामाजिक आंतरक्रिया मर्यादित होती.

एका समान स्तरावर वा वर्गीय स्थानावर असलेल्यांमध्ये ऐक्य आणि अस्मिता प्रतिबंधित झालेली होती. कारण भारतीय समाजाचे अनन्यसाधारण वैशिष्ट्य ही जातिव्यवस्था होती. सांस्कृतिक बंडामध्ये समानतेचा मुद्दा राजकीय स्वातंत्र्याच्या किंवा राष्ट्रवादापेक्षा मूलभूत असतो. पण भारतातल्या मार्क्सवाद्यांना सरंजामशाहीचा वा पारंपरिक भारतीय समाजाचा जात हा महत्त्वाचा पैलू आहे याचा विसर पडला.

वाचा : कार्ल मार्क्सवर होता धर्म आणि विज्ञानाचा मोठा प्रभाव

वाचा : सम्राट अशोक ‘महान’ होतो, मग टिपू सुलतान का नाही?

दलित दृष्टिकोन

डॉ. गेल ऑम्वेट यांनी भारतातील जातवास्तवाचा प्रश्‍न हा सातत्याने समाजशास्त्रीय विचारविश्‍वात आणि डाव्या चळवळींच्या कार्यक्रमात अग्रभागी आणला. हिंदू धर्म ही ओळख अलीकडची आहे, तो पूर्वी ब्राह्मणी/वैदिक/सनातन धर्म म्हणूनच परिचित होता. या ब्राह्मणी हिंदू धर्माचे वैशिष्ट्य कर्मठपणा, वेदप्रामाण्य, ब्राह्मणांच्या अधिकाराचा आणि वर्णाश्रमधर्माचा स्वीकार हे होते. या सामाजिक संरचनेचा आधार ही ग्रामीण भागातील जात, जजमानी (बलुतेदारी) व्यवस्था आणि अस्पृश्यता होती.

हिंदू धर्माचे अत्याचारी स्वरूप आणि त्याची जातीय विचारसरणी यांची समीक्षा पर्यायी विचारपरंपरा निर्माण करण्यासाठी प्रबुद्ध भारताचा दलित दृष्टिकोन विकसित करण्याची आवश्यकता त्यांच्या जातविरोधी सिद्धान्तनामध्ये प्रकर्षाने आढळते. त्यांच्या जातिविषयक विविध लेखनामध्ये जातवर्चस्व/जातशोषण/आणि पितृसत्ता एकत्रच येतात.

जातिधिष्ठित श्रेणीरचना आणि जातवर्चस्व यांचे नकारात्मक स्वरूप उघडकीला आणताना जोतिबा फुले, ताराबाई शिंदे, डॉ. आंबेडकर, पेरियार इत्यादींनी भारतीय संस्कृती आणि इतिहासाची केवळ सांस्कृतिक समीक्षा केली नाही तर कनिष्ठ जातींनी केलेले उठाव आणि नैमित्तिक विषयांचा त्यांनी शोध घेतला, हे डॉ. ऑम्वेट यांनी आवर्जून सांगितले. कारण दलित चळवळींचा मुद्दा हा आत्मविश्‍वास आणि आकांक्षांनी प्रेरित राहिला पाहिजे.

भारतातील स्त्री अभ्यासामध्ये दलित स्त्रियांच्या अस्तित्वाची प्रारंभिक नोंद डॉ. ऑम्वेट यांनी ठळक केली. जात, वर्ग, लिंगभाव, पितृसत्ता आणि जमीन यांचा स्त्रीशोषणाशी निकटचा संबंध आहे. कनिष्ठ जात-वर्गीय स्त्रियांना सामाजिक पितृसत्तेच्या अत्याचारांना (विनयभंग, बलात्कार, शारीरिक हिंसा, भ्रूणहत्या, सती, हुंडाबळी इत्यादी) सहन करावे लागतात.

हिंसा, शोषण आणि लैंगिकता यांचा आंतरसंबंध स्त्रीहिंसाचारामागे आहे. हिंसाचारामागे राज्यसंस्थेची भूमिका, भांडवलशाहीमधील अरिष्ट, धार्मिक मूलतत्त्ववादाचा विकास, जातीय-धार्मिक दंगली यांचाही कार्यभाग तपासला पाहिजे असे डॉ. ऑम्वेट यांचे प्रतिपादन होते.

वेगवेगळ्या जाती, वर्ग आणि समाजातील स्त्रियांच्या शोषणाचे – हिंसाचाराचे स्वरूप हा तर एक सामूहिक लढा उभा करता येईल हा त्यांचा आशावाद होता. भारतीय परंपरेतील स्त्रीशक्ती-प्रकृती, जातिसंस्था आणि परंपरा यांचा स्त्रीहिंसाचाराशी संबंध असेल तर त्याचा धांडोळा घेतला पाहिजे हे मत वर्तमानकालीन नवहिंदुत्ववादी राजकारणाबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणारे होते.

जात आणि पितृसत्ता, पर्यावरण आणि स्त्रीवाद याचा कार्यक्रमाच्या पातळीवर संयोग घडवून आणणे कठीण असले तरी जुने सिद्धान्तन, ठरावीक विचार आणि पारंपरिक पद्धती शेतकरी, दलित आणि आदिवासी स्त्रियांच्या चळवळीसमोरील आव्हान आहे म्हणून स्त्रीहिंसाचाराच्या विरोधामध्ये भारतामध्ये नव्या चळवळी आणि नवे सिद्धान्तन निर्माण केले पाहिजे हा त्यांचा आग्रह होता.

(सदरील लेख परिवर्तनाचा वाटसरूचे सप्टेंबर 2021चे संपादकीय आहे.)

जाता जाता :