कार्ल मार्क्सवर होता धर्म आणि विज्ञानाचा मोठा प्रभाव

पाच मे १८१८ साली कार्ल मार्क्स यांचा ट्रायर येथे जन्म झाला. त्यांची लाडकी कन्या एलेनॉर यांनी १८८३ साली त्यांचे आयुष्य व कामाबाबत काही गोष्टी लिहून ठेवल्यात त्यातील काही अंश –

कार्ल मार्क्स यांचा ५ मे १८१८ साली ज्यू धर्मिय कुटुंबात जन्म झाला. त्यांचे वडिल हे निष्णांत वकील होते. वडलांवर १८व्या शतकातील धर्म, विज्ञान, कलेबाबतीतील फ्रेंच विचारांचा मोठा प्रभाव होता. त्यांची आई ही हंगेरीयन ज्यू कुटुंबातील होती जे कुटुंब नंतर हॉलंडमध्ये स्थायिक झालं होतं. त्याच्या सुरुवातीच्या मित्रमंडळींमध्ये जेनी (ज्या त्यांच्या नंतर पत्नी झाल्या) आणि एडगर व्हॉन वेस्टफॅलेन यांची नावं घ्यावी लागतील.

अर्धे स्कॉटिश असलेले त्यांचे वडिल बॅरन व्हॉन वेस्टफॅलन यांच्यामुळे मार्क्स यांना रोमॅन्टिक गोष्टींची आवड निर्माण झाली. मार्क्स यांचे वडिल त्यांना वोल्तेयर आणि रसिनबाबतचे धडे त्यांना देत तर वेस्टफॅलन त्यांना होमर आणि शेक्सपियर वाचून दाखवत असत. शेवटपर्यंत हे त्यांचे आवडते लेखक होते. शाळेतही कार्ल यांच्याभोवती त्यांच्या प्रचंड खोडकर स्वभावामुळे त्यांच्यावर प्रचंड प्रेम करणारे व त्यांच्यातील प्रचंड उपहासात्मक, व्यंगात्मक कोट्या करत लिहिण्याच्या क्षमतेमुळे त्यांना प्रचंड घाबरणारा असा गोतावळा असे.

वाचा : हिटलरच्या आत्महत्येचा तो शेवटचा क्षण!

वाचा : डॉ. मुंहमद इकबाल यांच्या तत्त्वज्ञानाचे चिंतन

शालेय शिक्षणानंतर त्यांनी बॉन आणि बर्लिन विद्यापीठात प्रवेश घेतला. तिथे वडलांच्या समाधानासाठी त्यांनी कायद्याचे तर स्वतःच्या समाधानासाठी इतिहास आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. १८४२ साली बॉन विद्यापीठातच प्राध्यापक म्हणून रूजू होण्याची शक्यता त्यांच्या आयुष्यात तयार झाली होती. मात्र १८४० साली फ्रेड्रिक विल्यम (तिसरा) याच्या मृत्यूनंतर जर्मनीत सुरू झालेल्या राजकीय आंदोलनामुळे त्यांच्या आयुष्याला संपूर्णपणे वेगळी दिशा मिळाली.

ऱ्हायनिश परगण्यातील उदारमतवादी नेते कॅम्फॉजेन आणि हेन्समॅन यांनी त्याच दरम्यान ‘ऱ्हाइनीश गॅझेट’ नावाचे वर्तमानपत्र कोलोन शहरात सुरू केले होते. मार्क्स यांनी स्थानिक विधिमंडळावर केलेल्या उत्कृष्ट तर्कसंगत टीकेची चर्चा तेव्हा सर्वत्र झाली होती. त्यांच्या या टीकेमुळेच त्यांना या वर्तमानपत्राचे अवघ्या २४व्या वर्षीच संपादकपद मिळाले. यानंतर त्यांच्या आयुष्यातील हुकुमशाहीच्या व विशेषतः प्रशियन हुकुमूशाहीच्या विरोधातील सर्वात मोठा संघर्ष सुरू झाला.

हे वर्तमानपत्र सरकारच्या सेन्सॉरशीपखालीच मोडत असे. मात्र मार्क्स कायम त्यात सरकारविरोधी महत्त्वाच्या बातम्या व लेख प्रकाशित करत असूनही बिचाऱ्या सेन्सॉर सदस्यांना काहीही करता येत नसे. त्यामुळे सरकारने बर्लिनहून आणखी एका अधिकाऱ्याला सेन्सॉरवर पाठवले मात्र या दुहेरी सेन्सॉरशीपनेही मार्क्स यांनी सरकारला जुमानले नाही.

अखेर सरकारने १८४३ साली या वर्तमानपत्रावर गदा आणली आणि ते बंद करायला भाग पाडले. नेमक्या याच वर्षी आपल्या लहानपणच्या मैत्रिणीशी ज्यांच्याशी त्यांचा सात वर्षांआधीच वाङ्निश्चय झाला होता त्या जेनी व्हॉन वेस्टफॅलन यांच्याशी त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर पती-पत्नी पॅरिस येथे गेले.

पॅरिस इथे त्यांनी अरनॉल्ड रूज यांच्यासोबत ‘डॉयचा फ्रान्सियजोशss यावूशss’ नावाचं नियतकालिक सुरू केलं ज्यात त्यांनी पहिल्यांदा सामाजिक मुद्द्यांवरील प्रदीर्घ मालिका त्यांनी लिहिली. यातील महत्त्वाचं योगदान म्हणजे हेगेलच्या रेक्तफिलोसोफीवर त्यांनी केलेली टीका होती.

दुसरा महत्त्वाचा लेख हा ज्यूईस क्वेश्चन (ज्यू प्रश्न) हा होता. जेव्हा यावूशss प्रकाशित होणं बंद झालं त्यांनी वॉटवाssट्ज नावाच्या नियतकालिकात लिहिण्यास सुरुवात केली. अनेकदा ते या नियतकालिकाचे संपादक असल्याचं म्हटलं जातं मात्र या नियतकालिकाचं संपादक पद हेने, एव्हरबेक, एंगेल्स आदींकडे होतं.

हे नियतकालिक खरंतर गंभीरपणे कधी चालवंलं गेलं नाही. यानंतर मार्क्स यांचं प्रकाशित झालेलं साहित्य म्हणजे हायलिके फमिलिया जे त्यांनी व एंगेल्स या द्वयीने लिहिलं होतं. यात ब्रूनो बावर आणि त्यांच्या हेगेलियन आदर्शवादी मंडळींवर टीका आहे. या संपूर्ण काळात त्यांनी आपलं लक्ष राजकीय अर्थशास्त्र आणि फ्रेंच क्रांती यांच्या अभ्यासावर केंद्रीत केलेलं होतं, सोबत प्रशियन सरकारसोबतचा संघर्षही सुरूच होता.

वाचा : अहमदनगर : मध्ययुगीन भारतातील ऐतिहसिक शहर

वाचा : सम्राट अशोक ‘महान’ होतो, मग टिपू सुलतान का नाही?

अखेर प्रशियन सरकारला मार्क्स यांच्यावर कुरघोडी करण्यात यश मिळालं आणि त्यांनी त्यांना फ्रान्समधूनही परागंदा होण्यास भाग पाडलं. त्यानंतर ते ब्रुसेल्स येथे गेले. तिथे त्यांनी मुक्त व्यापारावरचं त्यांचं टिपण प्रसिद्धं केलं. त्यानंतर त्याच वेळी प्रुधाँ यांचं ‘द फिलॉसॉफी ऑफ पॉव्हर्टी’ नावाचं पुस्तक प्रसिद्ध झालं होतं.

त्यांनी मार्क्सला या पुस्तकावरील आपल्या टोकदार टीकेची वाट पाहात असल्याचं पत्र पाठवलं. प्रुधाँ यांना फार वाट पाहावी लागली नाही. १८४७ सालीच प्रुधाँ यांच्या पुस्तकाला दुसऱ्या पुस्तकाने मार्क्स यांनी उत्तर दिलं, त्याचं शिर्षक होतं पॉव्हर्टी ऑफ फिलॉसॉफी!

याच वर्षी मार्क्स यांनी जर्मन वर्किंग मेन्स क्लबची ब्रुसेल्स येथे स्थापन केली. तसंच त्यांच्या मित्रांसोबत त्यांनी कम्युनिस्टिक लिग या संघटनेचे सदस्यत्वही स्वीकारले. त्यांच्या या संघटनेतील प्रवेशानंतर संघटना केवळ बडबड करणे व संघटनांतर्गत कुरघोड्यांच्या पलीकडे जाऊन कम्युनिस्ट तत्त्वांच्या प्रचाराच्या जोरदार कामाला लागली. तसेच सरकारच्या दडपशाहीचे संकट घेता संघटनेची कामं गुप्तपणे होऊ लागली.

जिथे जिथे जर्मन वर्किंग मेन्स क्लबचं अस्तित्व होतं तिथे तिथे लीगचं ही अस्तित्व वाढायला सुरुवात झाली. ती खऱ्या अर्थाने पहिली जागतिक पातळीवरची समाजवादी चळवळ होती, असं म्हणावं लागेल. त्यात इंग्लिश, बेल्जियन्स, हंगेरियन्स, पोल्स, स्कॅन्डेनेव्हियन्स सभासद होते. लोकशाही समाजवादी पक्षाचं ते पहिलं संघटन होतं.

१८४७ साली लिगचं लंडन येथे अधिवेशन होतं. त्याला यशस्वी करण्यासाठी मार्क्स व एंगेल्स काम करत होते. त्यांच्यावर या अधिवेशनाच्या निमित्तानेच कम्युनिस्ट पक्षाचा जाहिरानामा लिहिण्याची जवाबदारी देण्यात आली. हा १८४८च्या क्रांतिच्या काही दिवस आधीच प्रसिद्ध झाला. त्यानंतर त्याची युरोपातील सर्वच भाषांमध्ये भाषांतरंही झाली.

वाचा : संघ-परिवाराने राज्यघटनेला विरोध का केला होता?

वाचा : सेक्युलॅरिझम धर्मीय की राजकीय विचारधारा?

कम्युनिस्ट जाहिरनाम्यात समाजाच्या परिस्थितीच्या आढाव्याने सुरुवात केली आहे. पुढे त्यात जुनी सरंजामी वर्ग व्यवस्था संपून त्या ठिकाणी केवळ दोनच वर्ग मालक आणि मजूर हे कसे तयार झाले कामगार जे सर्वहारा आहेत, जे लुटले जात आहेत लूटारूंकडून, भांडवलदार वर्ग जे काहीही उत्पादन करत नसूनही जगातील सारी संपत्ती साधन समृद्धता त्यांच्याकडे आहे आणि कामगार वर्ग जे सगळं उत्पादन करतात व त्यांच्याकडे काहीच नाही.

भांडवलदारांनी या सर्वहारांना त्यांच्या संरजामी व्यवस्थेशी असलेल्या लढाईत वापरून घेतलं व नंतर त्यांनाच गुलाम बनवलं. कम्युनिस्ट हे मालमत्ताच नष्ट करतात हा जो आरोप केला जात होता, त्याला या जाहिरनाम्यातून कम्युनिजम हा बुर्ज्वा मालमत्तेची व्यवस्था नष्ट करतो. ज्याद्वारे नऊ दशांश किंवा सामुहिक मालमत्ता नष्ट केली गेली आहे.

कम्युनिस्ट हे लग्न व कुटुंब व्यवस्था उद्‌ध्वस्त करायला निघाले आहेत असाही आरोप केला जातो. जाहिरनाम्यात म्हटले आहे की, कामगार वर्गाला कुठलं लग्न आणि कुठलं कुटुंब सांगता आहात? त्यांच्यासाठी या शब्दांचे काही अर्थच उरलेले नाहीत.

मातृभूमी आणि राष्ट्रीयत्व हेदेखील उद्‌ध्वस्त करण्याचा आरोप कम्युनिस्टांवर होतो पण सर्वहारांना यातून कधीच हद्दपार केलं गेलं आहे. धन्यवाद भांडवलदारांच्या उदयासाठी उद्योगाचा विकास झाल्याबद्दल!

भांडवली व्यवस्थेने इतिहासात अनेक क्रांत्यांना जन्म देण्यासाठी खूप परिश्रम घेतले, त्यांनी संपूर्ण उत्पादन प्रक्रियेत क्रांती घडवून आणली. त्यांच्यामुळे वाफेवर चालणारं इंजिन, स्वयंचलित खेचरं, स्वयंचलित हातोडे, रेल्वे, जहाजं विकसित झाली. पण त्यांचं सगळ्यात महान उत्पादन हे सर्वहारा वर्ग ज्याची अवस्था अशी आहे की तो संपूर्ण समाजालाच फेकून देण्यासाठी जन्मला आहे हेच म्हणावं लागेल…

कम्युनिस्ट जाहिरनाम्याचा शेवट पुढील वाक्यांनी केला गेला आहे…

“कम्युनिस्ट आपली भूमिका निर्भिडपणे समोर ठेवत आहेत. समाजातील सध्याची अन्यायग्रस्त परिस्थिती हिंसकपद्धतीने फेकून देणं हेच त्यांच्या चळवळीचं ध्येय आहे. सत्ताधारी वर्ग हा कम्युनिस्ट क्रांतीमुळे हादरून जाऊदेत. सर्वहारा वर्गाकडे त्यांच्या बेड्यांशिवाय गमावण्यासारखं काहीच नाही आणि जगण्यासाठी संपूर्ण जग आहे. जगातल्या कामगारांनो एक व्हा!”

(सदरील लेख लेखकाच्या फेसबुक वॉलवरून घेतला आहे.)

जाता जाता :