रमज़ानचे रोजे – वंचितांप्रति संवेदनशीलतेचे धडे

यंदाच्या रमज़ानमध्ये आयुष्यात प्रथमच मी रोजे करायला सुरुवात केली. भौतिकतेऐवजी आंतरिकतेवर भर देण्याचा हा प्रयोग होता. आफ्रिका, अरबस्तान आणि आशियातील अनेक रोजेदारांशी नाते जोडण्याची ही खूण होती.

कित्येक वर्षे माझ्या मनात एक कुतूहल होते. कोणताही धर्म आपल्या अनुयायांना असे उपवास धरून कष्ट सोसायला का म्हणून भाग पाडत असेल? रमज़ानचा एक पूर्वापार चालत आलेला भाग म्हणून मी इतेकाफ़ केला. इतेकाफ़ म्हणजे भौतिक जगाकडे पाठ फिरवून आध्यात्मिकतेचा शोध घेणे.

माझ्या मते हे एक प्रकारचे भावनात्मक अलगीकरण (Qurantinisation) होते. या काळात मी इस्लामी परिभाषेत ज्याला ‘दीन’ आणि ‘उम्मा’ म्हणतात, त्याचा  म्हणजे धर्म आणि समाज यांचा अभ्यास करायला सुरुवात केली.

पहिला रोजा संपता संपतानाच माझ्या प्रश्नाचे निःसंदिग्ध उत्तर मला सापडले. इस्लामच्या केंद्रस्थानी असलेली ‘नम्रता’ आणि ‘कृतज्ञता’ हा उपवास आपल्याला शिकवतो. कारेन आर्मस्ट्रॉंग (Karen Armstrong) नावाच्या धर्मशास्त्रांचा तुलनात्मक अभ्यास करणाऱ्या एक इतिहासकार आहेत. धर्मशास्त्रीय आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून इस्लामी चालीरीतींचे मर्मग्राही आकलन त्यांनी आपल्यासमोर मांडले आहे.

इस्लाम या शब्दाचा अर्थच मुळी संपूर्ण आत्मसमर्पण असा आहे, याकडे त्या आपले लक्ष वेधतात. निर्माता, पोषणकर्ता आणि सर्वविनाशी असलेल्या त्या एकमेवद्वितीय अशा अल्लाहप्रती असीम आत्मसमर्पण. आपण ईश्वरी कृपेवर अवलंबून आहोत याचे भान येऊन मानवाने प्रार्थनेचे महत्त्व जाणले पाहिजे.

आपला अहंकार सोडून देऊन माथा जमिनीवर टेकत प्रार्थना करत ईश्वराला शरण जायला प्रत्येकाने शिकले पाहिजे. पण नुसती प्रार्थना करून ईश्वरभक्तीची परिपूर्ती होत नाही. स्त्री-पुरुषांनी या पृथ्वीतलावर ईश्वराचे अनुसरण केले पाहिजे. तो आपल्याला देतो तद्वत आपणही विशेषतः वंचितांसाठी करुणा बाळगत हात सैल सोडून भरभरून दान दिले पाहिजे.

वाचा : ज्ञान साधनेची महती सांगणारा रमज़ान

वाचा : ‘इस्लाम ज्ञात आणि अज्ञाता’चा शोध

मक्केतील एक साधा व्यापारी असलेल्या मुहमंद (स) यांना  इ.स. ६१२ साली अल्लाहचा पहिला संदेश आला, तेव्हा अरबस्तानाला भेडसावणाऱ्या समस्यांचे ते चिंतन  करत होते. जमाती-जमातींमधील टोळी युद्धे आणि रक्तपात यांना त्यावेळी ऊत आला होता. धर्माच्या नावे नुसते कर्मकांड माजले होते.

प्रतीकांनाच अनाठायी महत्त्व प्राप्त झाले होते. एक आध्यात्मिक पोकळी तयार होऊन लोक अस्वस्थ बनले होते. स्वतः मुहंमद (स) कुरैश जमातीचे होते. मक्केवर याच बलाढ्य जमातीची सत्ता होती. या लोकांनी बाजारी अर्थव्यवस्था स्वीकारली होती.

सारी संपत्ती जमातीतील सर्वांनी सारख्या प्रमाणात उपभोगली पाहिजे, या प्राचीन अरबी नीतिनियमाचा त्यांना विसर पडला होता. ईसवी सनाच्या सातव्या शतकात संपन्न कुटुंबांनी शहराच्या मध्यभागी असलेल्या बाजारपेठेने गजबजलेल्या काबाभोवतालच्या जमिनीवर कब्जा केला होता.

गरीबांची वस्ती दूर शहराबाहेर होती. दुबळे, अनाथ आणि विधवा यांचे शोषण केले जाई. त्यांचे असेल, नसेल ते लुटले जात असे. दुबळ्यांना तुच्छतेची वागणूक मिळे. प्रतिष्ठेच्या कल्पना अवाजवी फुगलेल्या होत्या. कोणत्याही खऱ्याखोट्या क्षुल्लक अपमानापोटी रक्ताचे पाट वाहत.

वाचा : पॉलिटिकल इस्लामप्रणित समाजपरिवर्तनाचा दस्तऐवज

वाचा : मुहमंद पैगंबरांचे श्रमावर आधारित बाजारांचे व्यवस्थापन

अज्ञानी माणसाला उर्दूत आपण ‘जाहिल’ म्हणतो. या शब्दातून मुस्लिमांना इस्लामपूर्व ‘जाहिलिया’ किंवा अज्ञानयुगाचा बोध होतो. परंतु जाहिलिया हा काही असा कालनिदर्शक शब्द नसून सातव्या शतकातील हिंसा आणि दहशतीला कारणीभूत ठरलेली ती एक प्रवृत्ती आहे. आजही ही प्रवृत्ती भारतात, अमेरिकेत, इस्राएलमध्ये, सौदी अरेबियात थोडक्यात जगभर सर्वत्र पोसली जात आहे.

प्रेषित मुहंमद (स) यांच्या नव्या धर्माने आपल्या अनुयायांना ‘जिल्म’ हा प्राचीन अरबी सदाचार अनुसरावा असे आवाहन केले. जिल्म म्हणजे आपले जीवन संयमाने व्यतित करणे, प्रत्येक प्रसंगी संयमपूर्वक शांत प्रतिसाद देणे. विवाद करतानाही आपले म्हणणे विचारपूर्वक समंजसपणे मांडणे.

जीवनातील सर्वात मोठा संघर्ष म्हणजे ‘जिहाद’. हा जिहाद स्वतःशीच करायचा असतो. आपल्या व्यक्तित्वात दडलेल्या अहंकाराशी आणि क्रोधाशी हा लढा प्रत्येकाला स्वतःलाच लढावा लागतो.

(मक्केच्या) कुरैश कबिल्याबरोबर झालेली एक चकमक जिंकल्यावर प्रेषितांनी घोषित केले होते, “आपण छोटा जिहाद पार करून आता मोठा जिहाद करायला निघालो आहोत.”

त्यांचा हा निर्देश आपला स्वतःचा समाज आणि आपलीच मने सुधारण्याच्या सर्वाधिक कठीण संघर्षाकडे होता. अंतःपरिवर्तनाच्या या विचाराचे नाते महात्मा गांधींच्या संयम, करुणा आणि आत्मक्लेशाद्वारा विरोधकांना जिंकण्याच्या  सत्याग्रह कल्पनेशी मिळतेजुळते होते.

आत्मक्लेश हा समर्पणाचा अविभाज्य भाग आहे. रमज़ानच्या पवित्र महिन्यात अन्नपाण्याशिवाय अख्खा दिवस कंठला जात असताना आपली अगदी दारुण अवस्था होते. प्रत्येक गोष्ट स्वच्छ दिसू लागते. पाण्याचा एक पेला सुवर्णराशींपेक्षा अधिक मोलाचा वाटू लागतो.

वाचा : कशी होती तुघलक काळातील ईद?

वाचा : बाबरने शब्दबद्ध केलेला भारत कसा होता?

स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत, नोकर-मालक सर्वांच्याच अनुभवाला भुकेची जीवघेणी आग येते. सारख्याच अनुभवातून जाताना सर्वांच्याच अहंकाराच्या चिंधड्या उडतात. स्वतः तहान-भुकेने व्याकुळ झालो असल्यामुळे ज्यांना अन्नच मिळत नाही, अशा गरिबांचा आपण विचार  करु लागतो.

आपल्याला सुदैवाने लाभलेल्या गोष्टींचा काही वाटा त्यांना देणे मग आपल्याला बंधनकारक वाटू लागते. म्हणूनच आपण ‘जकात’ देतो.

इस्लामच्या आगमनापूर्वीही अरब लोक आतिथ्यशील म्हणून प्रसिद्ध होते. करीम म्हणजे दानशूर लोक आपल्या जमातिसाठी भल्यामोठ्या मेजवान्या आयोजित करीत. त्यांत आपली सगळी संपत्ती एका दिवसात उधळत. परिणामी त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती पुढे हलाखीची होई. अशा बेसुमार उधळपट्टीवर इस्लामने कोरडे ओढलेत.

जकात वाजवी प्रमाणात टप्प्याटप्प्याने वर्षानूवर्षे देत राहिले पाहिजे. त्याचा गाजावाजा करता कामा नये. कुटुंबावर जकात देणे बंधनकारक असल्याचा अर्थ आधुनिक काळात आपल्याला कसा घेता येईल? लोकांना केवळ खायला अन्न देणे आज पुरेसे ठरेल?

अरबस्तानात अन्नधान्याचा तुटवडा होता आणि तगून राहणे हीच मोठी कठिण गोष्ट होती तेव्हा जकात म्हणून केवळ  अन्न देणे पुरेसे होते. पण आता आधुनिक भारतीय म्हणून आपण गरीबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत करू शकतो. किंवा तळागाळातील लोकांच्या – केवळ मुस्लिमच नव्हे तर सर्वधर्मीय गरिबांच्या – जीवनाचा स्तर पिढी दर पिढीगणिक उंचावावा यासाठी साहाय्यभूत ठरू शकणाऱ्या प्रकल्पांना अर्थसाहाय्य करू शकतो.

प्रेषित मुहंमद (स) यांनी ‘काफिर’ हा शब्द ‘नास्तिक’ किंवा मुस्लिमेतरांसाठी वापरलेला नव्हता हे ऐकून बऱ्याच लोकांना खूप आश्चर्य वाटेल. पूर्वीचे प्रेषित मोझेस, अब्राहम आणि येशू यांना तर पैगंबर आपले भाऊ म्हणत. आपापला धर्म आचरत असले, वेगवेगळ्या पद्धतीने भक्तिसाधना करत असले तरी ते सारे प्रेषितच होते.

सगळे अब्राहमी धर्म म्हणजे मुख्यतः ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम हे धर्म परस्परांशी वांशिकदृष्ट्या बांधलेले आहेत. त्यांच्या श्रद्धेत साम्य आ,हे याची जाणीव प्रेषितांना होती. मदिना येथे स्थलांतर केले तेव्हा त्यांना आधार दिला तो ज्यू लोकांनी.

वाचा : ‘यौमे आशूरा’ स्मृतिदिनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी

वाचा : चिश्ती विद्रोहाचे मुलाधार ख्वाजा मैनुद्दीन अजमेरी

अॅबिसीनियाच्या ख्रिश्चन महापौरांनी मक्केत छळ सोसाव्या लागलेल्या मुस्लिमांना आसरा दिला होता. मग काफिर कुणाला म्हटले गेले? इथे ‘कुफ्र’ या शब्दाचा अर्थ बेदरकारी कृतघ्नता, अविश्वास असा आहे.

प्रेषितांच्या स्वतःच्या कुरैश जमातीतील जे लोक हट्टाने ‘जाहिलिया’ म्हणजे आपले अज्ञानी जिणेच जगू इच्छित होते, ज्यांनी आपल्या मनाची कवाडे पूर्ण बंद केलेली होती आणि नम्रतेचा नवा संदेश जे स्वतःपर्यंत पोहोचू देत नव्हते त्यांना ‘काफिर’ म्हटले गेले आहे.

ही ‘जाहिलीया’ आणि ‘काफिर’ (kafirun) वृत्ती आजही विद्यमान आहे. हिंसक मार्गाने दहशत माजवून आणि लोकांचा छळ करुन इस्लामी राज्य चालवणाऱ्यांपासून ते भपकेबाज इफ्तार पार्ट्या आयोजित करून आपल्या संपत्तीचे ओंगळ प्रदर्शन करणाऱ्यांपर्यंत सर्वांमध्ये आपल्याला ही वृत्ती दिसते.

या लोकांना या शब्दांनी आपण ओळखले जाणे मुळीच आवडणार नसले तरी त्यांच्या कृतीतून हीच वृत्ती दिसते हे सत्यच आहे. सर्वच धर्मातील, राष्ट्रातील आणि राजकीय पक्षातील अनेकांनी ‘समता’ आणि ‘न्याय’ यांच्या आवाहनासंदर्भात आपली मने घट्ट मिटून घेतलेली आपल्याला दिसतात.

मक्केमध्ये इस्लाम नावाचा हा नवा धर्म श्रीमंतांनी आणि धनिकांनी नाकारला तरी स्त्रिया, युवक, गुलाम आणि वंचितांच्या कबिल्यात तो खूप लोकप्रिय झाला. नवजात मुली मारण्याच्या ज्या दुष्ट प्रथेशी आपण आजही भारतात सामना करतोय, ही प्रथा अरबस्तानातही होती.

नव्याने इस्लाम धर्म स्वीकारणारे एक शपथ घेत. खोटे बोलणार नाही, चोरी करणार नाही आणि बालहत्या करणार नाही अशी ती पहिली शपथ असे. आपल्या गुलामांना या लोकांनी मुक्त केले. मदिना येथील पहिल्या मस्जिदीतील पहिल्या नमाजसाठीची अजान एका पूर्वाश्रमीच्या (हजरत बिलाल या) गुलामाने दिली होती. हे लोक (मुस्लिम) दीनदुबळ्यांना आणि कमकुवत लोकांना सन्मानाने वागवत आणि त्यांची काळजी घेत.

एक दिवस प्रेषित आपल्या अनुयायींबरोबर काही गंभीर चर्चा करत असताना एक अपंग वृद्ध त्यांच्याकडे आला. तणावाखाली असलेल्या प्रेषितांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले व ते अन्यत्र गेले. कुरआनमध्ये या वर्तनाची निर्भत्सना केली गेली. अल्लहाचे प्रेषित या नात्याने प्रत्येक व्यक्तिला सारखीच आदरपूर्वक वागणूक देणे त्यांचे आद्य कर्तव्य होते.

आज हिंदू आणि मुस्लिम माता माऊंट मेरीसमोर मेणबत्त्या लावताना आणि सर्व धर्माचे लोक हाजीअली समोर गुडघे टेकताना मी पाहते तेव्हा कार्ल मार्क्सचे ते वचन मला आठवते. “धर्म ही सर्वसामान्य लोकांसाठी अफूची गोळी आहे.” एव्हढेच नव्हता म्हणाला तो. तो पुढे असेही म्हणाला होता की “धर्म हा पीडितांचा निःश्वास आहे.”

(हा लेख इंडियन एक्सप्रेसच्या २७ एप्रिल २०२१च्या अंकात संपादित स्वरूपात आला होता. त्याचे मराठीत स्वैर भाषांतर अनंत घोटगाळकर यांनी केले आहे.)

जाता जाता :