‘यौमे आशूरा’ स्मृतिदिनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी

साधारणपणे नववर्ष दिन आनंदोत्सव म्हणून साजरे करण्यात येतो. परंतु याला अपवाद इस्लाम धर्माचे नववर्ष आहे. इस्लामनुसार ‘मुहर्रम’ हा वर्षारंभ आहे. जगातील दुसर्‍या क्रमांकाची लोकसंख्या असलेला मुस्लिम समुदाय इस्लामिक कॅलेंडरचा नवीन वर्ष आनंदोत्सव म्हणून साजरा करत नाही.

कारण इस्लाम हा एक साधा धर्म आहे. इस्लाममध्ये आनंदाच्या निमित्ताने मौजमजा आणि भोगवादाचे प्रदर्शन करण्यापेक्षा उपासना आणि साधेपणाला अधिक महत्त्व दिले जाते. हेच कारण आहे की प्रत्येक आनंदी व दु:खाच्या प्रसंगी उपासनेची तरतूद आहे.

ऐतिहासिकदृष्ट्या, इस्लाममध्ये वर्षाचा पहिला महिना खूप महत्त्वाचा मानला जातो. ‘यौम-ए-आशुरा’ म्हणजेच १०व्या मुहर्रमला इस्लाममध्ये बरेच महत्त्व आहे. इस्लामिक इतिहासानुसार, या दिवशी हजरत इब्राहिमचा जन्म झाला. या दिवशी फॅरोह (इजिप्तचा रक्तपिपासू शासक) दरिया-ए-नीलमध्ये बुडाला आणि प्रेषित मोझेस यांना विजय मिळाला.

मुहर्रमची तपशीलवार माहिती पाहण्यापूर्वी त्या स्मृतिदिनाशी संबंधित जागतिक आणि इस्लामी इतिहासातील काही वस्तुनिष्ठ बाबी आणि विशिष्ट अशा पार्श्वभूमीचा आढावा घेणे आवश्यक ठरते. जेणेकरून त्या कालखंडात घडलेल्या इस्लामी इतिहासातील घटनांचा जागतिक इतिहासावर झालेल्या परिणामांची व्यावहारिकदृष्ट्या कारणमीमांसा करणे शक्य होईल.

शांतता, सत्य, न्याय आणि स्वातंत्र्य ह्या बाबींचा पुरस्कार करणारा इस्लाम धर्म अशा ठिकाणी आणि अशा काळात आला जेव्हा दडपशाही हा नित्यनियम, गुलामगिरी दुबळ्या लोकांना अपमानित करण्याचे साधन होते आणि केवळ हत्या हेच समस्या सोडवण्याचा मार्ग होता.

त्याकाळी हिंदू, बुद्ध, जैन, ज्यू आणि ख्रिस्ती धर्मियांना सांस्कृतिक मूल्यांची जाणीव झालेली होती. परंतु टोळ्यांमध्ये राहणाऱ्या अरब लोकांना कोणतेही ईश्वरीय मार्गदर्शन प्राप्त झालेले नव्हते. त्यामुळे त्या काळात अरब हा सर्वात मागासलेला समाज म्हणून गणला जात होता.

इस्लामपूर्व अरबात स्रीला क पदार्थ आणि भोग वस्तू समजले जात. क्षुल्लक बाबींवरून वर्षानुवर्षे चालणारे टोळीयुद्ध, भांडखोर वृत्ती, परस्पर द्वेष आणि कलहांमुळे घडणारा हिंसाचार, आपापल्या टोळी बाबत असलेला अहंभाव आणि केवळ दुबळ्या कुटुंबात जन्मलेल्या व्यक्तिला शाश्वत गुलामगिरी, अत्याचार आणि सर्व हक्कांपासून वंचित करण्याची प्रवृत्ती अरब समाजात सर्वदूर पसरलेली होती.

अशा परिस्थीतीत प्रेषित मुहंमद (त्यांच्यावर अल्लाहची कृपा असो) त्या अन्यायकारी मार्गांचा जाहीर निषेध करून स्वातंत्र्य, न्याय, समता आणि बंधुता प्रस्थापित करणारे युगपुरुष म्हणून उदयास आले. (पैगंबर म्हणजे इस्लामचा ‘पैगाम’ म्हणजे संदेश माणसापर्यंत पोचवणारे प्रेषित.)

मुस्लिम ज्या व्यक्तींना परमपवित्र मानतात (म्हणजे प्रेषित मुहंमद, त्यांची मुलगी फातिमा, जावई अली आणि हसन व हुसैन हे दोन नातू), त्यातील शेवटच्या दोन व्यक्तिंच्या, म्हणजे हजरत हसन व हजरत हुसैन यांच्या तो त्यांच्या कुटुंबीयांच्या हौतात्म्याप्रित्यर्थ शोक करण्याचा हा दिवस आहे.

वाचा : स्मरणी आहेत पुण्यातील त्या मुहर्रमच्या मिरवणुकी!

वाचा : मुहमंद पैगंबरांचे श्रमावर आधारित बाजारांचे व्यवस्थापन

काय आहे इतिहास?

प्रेषित मुहंमद (स) यांच्या महानिर्वाणानंतर राज्यकारभार चालविण्यासाठी खलिफा (प्रमुख) निवडला गेला. हजरत अबू बकर हे पहिले खलिफा होत. त्यांच्यानंतर हजरत उमर आणि हजरत उस्मान खलिफा झाले. इस्लामच्या प्रथम तीन खलिफांनी यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली. हजरत उस्मान यांच्या मृत्युनंतर चतुर्थ खलिफा म्हणून त्यांचे जावई हजरत अली व त्यानंतर त्यांचे नातू हजरत हसन हे खलिफा झाले.

हजरत हसन खलिफा असताना ‘मुआविया’ नावाचे एक सरदार सिरीयाचे सुभेदार म्हणून काम पाहत होते. हजरत अली शहीद झाल्यानंतर, ४०,००० कुफा शहरवासीयांनी त्यांचे पुत्र हजरत इमाम हसन यांची बएत (दीक्षा) घेतली आणि त्यांना मुस्लिमांचे खलिफा म्हणून मानले, या पदावर ते  ६ महिने विराजमान होते.

पंरतु मुआविया यांच्या समर्थक गटाने इमाम हसन यांना खलिफा मानन्यास नकार दिला. शेवटी रक्तपात होऊ नये म्हणून इमाम हसन यांनी ३ अटींसह मुआवियाना खिलाफत सोपवली. त्यातील एक अट अशी होती की, सध्या मुअवियाह हे खलिफा आहेत, परंतु त्यांच्या मृत्यूनंतर हजरत इमाम हसन खलिफा होतील.

अटी मान्य झाल्या, परंतु त्यामुळे काही राजकीय संघर्ष थांबला नाही. या संघर्षातच हिजरी ५ रबीउल अव्वल ४९ रोजी हजरत हसन शहीद झाले. पुढे माहे रजब ६० हिजरीमध्ये मुअविया यांचेही देहावसान झाले. प्रेषित आणि त्यांच्या कुटुंबीयांची अतोनात प्रेम करणाऱ्या मुअविया यांनी मृत्यूपूर्वी मुलगा यजीदला खालील अटींच्या अधीन राहून आपला उत्तराधिकारी घोषित केले.

“इमाम हुसैनच्या सल्ल्याशिवाय कोणतेही काम करू नकोस, त्यांना खाऊ घातल्याशिवाय जेवू नकोस, त्यांना पाजल्याशिवाय पिऊ नकोस, सर्वात आधी त्यांच्यावर खर्च कर मग दुसऱ्यांवर, प्रथम त्यांना नेसव मग स्वतः नेस, मी तुला हजरत हुसैन, त्यांचा परिवार आणि त्यांच्या संपूर्ण घराण्याशीच नव्हे तर अखिल बनी हाशिम (प्रेषित संबंधित असेलला घराणा) घराण्याच्या प्रत्येक व्यक्तीशी चांगल्या वागणुकीचा मला वचन दे.

हे माझ्या मुला, खिलाफत आपला हक्क नाही. तो इमाम हुसैन यांचे वडील हजरत अली आणि त्यांचे आप्तेष्ट अहले बैत यांचा हक्क आहे. तू काही दिवस खलिफा म्हणून राहा मग जेव्हा हजरत इमाम हुसैन पूर्णत्वास पोहोचतील तेव्हा तेच खलिफा राहतील. अथवा ते ज्यांना सांगतील ते खलिफा राहतील, जेणेकरून खिलाफत इच्छितस्थळी पोहोचावी. आम्ही सर्व हुसैन आणि त्यांच्या आजोबांचे गुलाम आहोत, त्यांना नाराज करू नकोस. अन्यथा तुझ्यावर अल्लाह आणि प्रेषित नाराज होतील.”

यावरून हे स्पष्ट होते की मुआविया यांनी कायमस्वरूपी नव्हे तर हंगामी व्यवस्था म्हणून यजीदला खलिफा बनवले होते, जो त्यावेळेस दुष्कर्मी नव्हता पण नंतर पथभ्रष्ट झाला. असो.

अशा रीतीने मुआविया वारल्यानंतर त्यांचा मुलगा यजीद हा त्या प्रांताचा सुभेदार झाला. इस्लाममध्ये प्रमुख नेता अर्थात खलिफा निवडण्याचा रिवाज आहे. प्रेषितानंतर असे चार खलिफा निवडले गेले. परंतु, मुआविया स्वघोषित प्रमुख होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा यजीदने स्वत:ला खलिफा अर्थात समस्त इस्लामी राजवटीचा प्रमुख घोषित केले.

वाचा : पॉलिटिकल इस्लामप्रणित समाजपरिवर्तनाचा दस्तऐवज

वाचा : चिश्ती विद्रोहाचे मुलाधार ख्वाजा मैनुद्दीन अजमेरी

नेतृत्वाला विरोध

इस्लाममध्ये ‘बादशाही’ची संकल्पना नव्हती. शिवाय यजीद एक क्रूर शासकही होता. त्याची प्रतिमा समाजात चांगली नव्हती. त्यामुळे त्याला खलिफा मानण्यास पैगंबरांच्या नातवडांसह अनेकांनी नकार दिला. हजरत हुसैनने आपल्याला खलिफा मानण्यास नकार दिल्यास त्याचे शीर कलम करण्याचे फरमान यजीदने सोडले. एका रात्री हुसैनला राजभवनात बोलावून यजीदचे हे फरमान सुनावण्यात आलं. परंतु, हे फरमान हुसैन यांनी लाथाडले.

हुसैन इस्लामचे चतुर्थ खलिफा हजरत अली यांचे पुत्र आणि प्रेषितांचे नातू होते. ऐन तारुण्यात ते खूप धार्मिक, हुशार आणि अत्यंत देखणे होते. इतिहासकारांनी वर्णन केल्यानुसार त्यांची छबी प्रेषितासारखी होती. किंबहुना प्रेषितही त्यांच्यावर मनस्वी प्रेम करत होते.

इस्लामच्या इतिहासात स्थान मिळालेल्या प्रथितयश व्यक्तींमध्ये हजरत हुसैन यांचे व्यक्तिमत्व आणि त्यांचे योगदान प्रकर्षाने उठून दिसणारे आहे. प्रेषितांच्या अत्यंत प्रसिद्ध हदीस (प्रेषित कथन)चा मथितार्थ असा आहे की हुसैनचा संदेश, हा प्रेषितांचा संदेश आहे. हुसैन यांनी माझ्याद्वारे अस्तित्वप्राप्ती केली आहे आणि ते माझ्या धर्माच्या अस्तित्त्वाचे साधन आहेत.

वाचा : जेव्हा मौलाना रुमी आपल्यातील ‘मी’ला नष्ट करतात!

वाचा : रोगराईतील ‘अस्थायी वास्तविकते’च्या कालखंडातील ‘ईद’

ऐतिहासिक युद्ध

जेव्हा क्रूरकर्मा यजीदने स्वतःला खलिफा घोषित केले, त्यावेळेस तेथील काही लोकांनी हुसैन यांना असा संदेश पाठवला की आम्हाला यजीदची खिलाफत मान्य नाही. आम्ही त्याच्या विरोधात आहोत आणि आपल्या हातावर दीक्षा घेऊ इच्छितो आपण आमचे नेतृत्व स्वीकारून त्याला धडा शिकवावा. याबाबत कोणतीही शहानिशा न करता सद्हेतूने त्यांच्यावर विश्वास ठेवून हजरत हुसैन प्रवासासाठी निघाले.

संतप्त यजीदने आपले सैनिक हुसैनना मारण्यासाठी पाठवले. हुसैन आपले कुटुंब व मित्रांसमवेत इराकस्थित करबला इथे पोहोचले असताना त्यांना यजीदच्या सैन्याने गाठले. हुसैन यांनी शत्रू सैन्याला इस्लाममधील शांतताप्रिय सिद्धान्त समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, सत्तांध झालेल्या सैन्यावर त्याचा परिणाम झाला नाही. अखेर दोन्हींकडून करबलामध्ये युद्ध सुरू झाले.

करबला येथे इमाम हुसैनच्या छोट्या कौटुंबिक प्रवासी समूहाला, खिलाफतला जुमानणाऱ्या जुलमी यजीदच्या २०,०००हून अधिक सैन्याने घेरले. इमाम हुसैन यांनी त्याच्या प्रस्तावित राजेशाहीला आपली निष्ठा नाकारली आणि याचा परिणाम म्हणून, यजीदच्या माणसांनी त्या पापभीरू कुटुंबीयांवर अवर्णनीय अत्याचार केला. त्या समुहाचा जवळजवळ पूर्ण विनाश होईपर्यंत जुलूम जबरदस्ती केली.

सत्यधर्म, करुणा आणि न्याय यांचे प्रतीक इमाम हुसैन हे फरात नदीच्या एका बाजूला उभा होते. त्यांचे फक्त ७२ लोक होते, ज्यात त्यांचे भाऊ, पुतणे, पुतण्या, वृद्ध व काही तरुण होते. शिवाय हुसैन यांचे ८० वर्षीय दृढनिश्चयी मित्र हबीब इब्ने मजहीर सुद्धा होते.

त्यांच्या विरुद्ध, अनेक दिवसांपर्यंत पाण्यापर्यंत जाण्याचा मार्ग रोखत, हजारो सुसज्ज सैनिकांसह, यजीदचा सेनापती उमर इब्ने साद उभा राहिला. ईसवीं सन ६८०च्या ऑक्टोबरच्या भयंकर उष्ण दिवशी असरच्या प्रार्थनेपूर्वी म्हणजे सूर्यास्तापूर्वी करबलाची लढाई संपली.

इमाम हुसैन यांचा सहा महिन्यांचा मुलगा अली असगरसह ७२ पुरुष साथीदार शहीद झाले. हुसैन तहानलेल्या व्याकुळ बाळाच्या गळ्यात थोडेसे पाणी मिळण्याकरिता शत्रू सैन्याच्या निर्दयी आणि क्रूर अंत:करणात मानवतेचा काही लवलेश असेल, या भावनेने आवाहनासाठी तंबूतून बाहेर पडले.

तहानलेल्या आपल्या पुत्रासाठी हुसैनने सैन्याकडे पाण्याची मागणी केली परंतु, पाणी देण्याऐवजी त्या चिमुकल्याचा बाण मारून जीव घेण्यात आला. तितक्यात शत्रूच्या निष्णात धनुर्धर हरुमुल्ला इब्न कहिल अल असादी अलकोफीने वाळवंटात वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या तीन टोकाच्या बाणाने हजरत इमाम हुसैन यांना शहीद केले.

तथाकथित बेगडी ‘विजेत्यांनी’ त्यांच्या घोड्यांसह रणांगण सोडले, त्यांच्या  घमेंडीने  राक्षसी वृत्ती धारण करून,   शहीदांच्या मृतदेहांना घोड्यांच्या पायदळी तुडवले आणि त्यांना इतके विद्रूप केले की त्यांना ओळखता येण्यायोग्य देखील सोडले नाही.

क्रूर सैन्याने त्यांच्या स्वतःच्या फडातील मृत व्यक्तींना रीतसर दफन केले पण हुसैन आणि त्यांच्या शहीद साथीदारांना अनादरपूर्वक करबलाच्या जळत्या वाळूवर सोडले. त्यांनी हुसैनचे तंबू लुटले आणि जाळले आणि जिवंत स्त्रिया व मुले यांनाही लुटले.

जीव वाचलेल्यांना स्त्रिया व मुलांना बेड्या घालून जळत्या वाळवंटातील वाळूवर, करबलापासून कुफापर्यंत (७६ किमी) आणि कुफापासून सीरियाच्या दमास्कसपर्यंत (९१६ किमी) इतका प्रदीर्घ प्रवास पायी करण्यास  बाध्य केले.  संपूर्ण प्रवासात महिला व मुलांवर अनन्वित अत्याचार केले गेले.

वाचा : ज्ञान साधनेची महती सांगणारा रमज़ान

वाचा : ‘इस्लाम ज्ञात आणि अज्ञाता’चा शोध

मातम का महिना

इमाम हुसैन यांनी कर्तव्यपरायणतेच्या भावनेने लोकशाहीच्या मूल्यांची जोपासना करण्यासाठी आणि आपल्या आत्मसन्मानार्थ आणि सत्यधर्मरक्षणार्थ तत्त्वांशी तडजोड न करता मांडलिक बनून अपमानित जीवन जगण्याऐवजी स्वतःचा जीव धोक्यात टाकून संकटाचा मार्ग निवडला. त्यासाठी प्राणांची आहुती देऊन अखिल मानवजातीच्या इतिहासात अजरामर झाले.

पवित्र कुरआनच्या शिकवणीनुसार यशाचे गमक संख्येवर नव्हे तर  सत्य मार्गावर टिकून राहते. त्यासाठी सत्यावर दृढ निष्ठा आणि श्रद्धा असणाऱ्या, सत्यासाठी बलिदान देण्यास उत्सुक असणाऱ्या दृढ विश्वासू समूहाच्या त्याग आणि बलिदानात निहित असते.

करबलाच्या हुतात्म्यांनी हे सिद्ध केले की, सत्य आणि न्याय यांच्या पाईकांची संख्या कितीही लहान असली तरी सर्वात भयानकतम क्रूर शक्तींविरुद्ध विजय मिळवू शकते. म्हणूनच दृढ लोकांच्या एका छोट्या समूहाने घेतलेली अशक्यप्राय भूमिका आणि त्यांच्यावर करण्यात आलेला छळ हीच शेवटी अत्याचारी उमय्याद राजवंशाच्या मूळावर आघात करणारी बाब ठरली. इतिहास साक्षी आहे की केवळ सत्याचे पाईक विजयी ठरले

इस्लामी हिजरी वर्ष ६१मधील मुहर्रम महिन्याच्या १० तारखेला (ई.स.६८०) घराणेशाही प्रस्थापित करू इच्छिणाऱ्या जुलमी यजीदच्या सैन्याने हजरत इमाम हुसैन यांना शहीद केले. या शोकांतिकेमुळे इस्लामिक जग हादरले. 

या नरसंहारानंतर मुस्लिम बांधव या महिन्याकडे ‘मातम का महिना’ म्हणून पाहतात. हजरत इमाम हुसैन यांचे हौतात्म्य त्यांनी सत्य, न्याय आणि इस्लामच्या महानतेसाठी केलेला संघर्ष याची आठवण प्रेषित मुहंमद आणि त्यांच्या कुटुंबियांवर प्रेम करणाऱ्यांना मुहर्रम या सणानिमित्त ताजी होत राहते.

मुहर्रम हा आनंदाचा उत्सव नसून दु:खाचा स्मरणदिवस आहे. आशूराच्या दिवशी जगभर इमाम हुसैन आणि त्यांच्या आणि नातेवाईकांना आदरांजली वाहिली जाते.

या दिवशी हजरत हसन आणि हजरत हुसैन यांच्या बलिदानाचे स्मरण केले जाते. शिया समुदायातील लोक १० दिवस काळे कपडे घालतात. या बलिदानासाठी मातम जुलूस काढला जातो.

मुहर्रमचा पवित्र महिना लोकांना हे स्मरण करून देणारा आहे की त्यांनी अत्याचार व अत्याचाराविरूद्ध संघर्ष केला पाहिजे आणि पीडितांची मदत केली पाहिजे. सत्य, न्याय, समानता आणि स्वातंत्र्य ही मध्ययुगात उदयास आलेल्या इस्लामची दैदीप्यमान मौल्यवान मूल्ये आहेत, ज्यांना कायम राखण्यासाठी हौतात्म्याची गरज असते. त्यादृष्टीने हजरत इमाम हुसैन यांनी केलेल्या बलिदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

वाचा : वेद आणि उपनिषदांचा अभ्यासक अल्-बेरुनी

वाचा : गुरुविना घडलेले महान संगीतज्ज्ञ अमीर खुसरो

अन्यायाविरूद्ध संघर्षाचे प्रतीक

इमाम हुसैन यांचा कणखरपणा, अदम्य आत्मविश्वास, दृढ श्रद्धा आणि त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी त्यासाठी दिलेली प्राणाहुती प्रत्येक कालखंडात अत्याचाराच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या जगातील सर्व व्यक्तिंसाठी प्रेरणादायक ठरले.

करबला अन्यायाविरूद्धच्या संघर्षाचे प्रतीक आहे. अहिंसावादी प्रतिकार, आत्मसन्मानाने आणि परम दृढनिश्चयाने, कोणत्याही किंमतीत – एक जीव न घेता, परंतु इस्लामसाठी स्वतःचा त्याग करण्याचे एकमेवाद्वितीय प्रतीक.

आधुनिक युगात इमाम हुसैन यांचे स्मरण फक्त याच कारणासाठी करण्यात येते. बगदाद आणि करबला जवळ इराकमध्ये शहीद झालेल्यांसाठी एक महान समाधी स्थापन केली गेली आहे. आशूराच्या दिवशी लाखो लोक इमाम हुसेन आणि त्याच्या साथीदारांना आदरांजली वाहण्यासाठी जातात.

भारताचे राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांनी म्हटल्याप्रमाणे, “जरी इमाम हुसेन यांनी बऱ्याच वर्षांपूर्वी आपल्या प्राणाची आहुती दिली, परंतु त्याचा अविनाशी आत्मा आजही लोकांच्या हृदयांवर राज्य करतो.”

करबलामधील शहीद आणि इमाम हुसैन यांचा आत्मा प्रेरणा व मार्गदर्शन करण्यासाठी जिवंत आहे तर यजीदचे किल्ले सर्व संपत्तीसह नष्ट झाली आहेत. पृथ्वीवरील त्यांचे अस्तित्व नाहीसे झाले आहे. इमाम हुसैन आणि त्यांच्या नातलगांच्या करबलाच्या शहिदांच्या रक्ताची शक्तीच अशी आहे, की ती सदा सर्वकाळ कायम राहते, इस्लामच्या इतिहासातील एक निर्णायक क्षण, हुसैन आणि त्यांच्या माणसांवरील प्रेम सर्व मुस्लिमांच्या हृदयात ओतले आहे.

इमाम हुसैन यांनी सांसारिक साम्राज्य मिळविण्याचे उद्दीष्ट ठेवले असते तर त्यांनी मदीना ते करबला इतक्या लांब पल्ल्याचा प्रवास केला नसता. सत्याच्या रक्षणार्थ त्यांनी ऐश्वर्य लाथाडून स्वतःला रक्ताने आणि धूळीने माखून घेतले

करबलाची शोकांतिकेला वैश्विक आयाम आणि मान्यता आहे. त्यात सार्वभौमिक स्वरूपाची अपील आहे जी आजच्या हिंसाचार आणि अन्यायाच्या वातावरणामध्ये पूर्वीपेक्षा अधिक अनुषंगिक आहे.

वाचा : रोगराईतील ‘अस्थायी वास्तविकते’च्या कालखंडातील ‘ईद’

वाचा : रमज़ानचे रोजे – वंचितांप्रति संवेदनशीलतेचे धडे

अनेकांसाठी नौतिक सामर्थ्य

दक्षिण आशिया आणि विशेषतः भारतीय उपखंडात मुहर्रमबद्दल मुस्लिम आणि मुस्लिमेतर समाजांमध्ये आदर आणि भक्तीभावाची भावना प्रदर्शित होताना दिसते. त्यादृष्टीने या स्मृतिदिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत होण्यास मदत होते. करबलाची शोकांतिका आणि अहिंसक प्रतिकार आणि सर्वोच्च त्यागाची भावना महात्मा गांधींचे प्रेरणास्थान आहे.

गांधींनी सदर बाबतीत नमूद केले आहे की, “मी हुसैनकडून हे शिकलो की, आपणास चुकीची वागणूक दिली जात असताना सुद्धा आपण विजेता कसे व्हावे व आपला छळ होत असताना सुद्धा विजय कसे मिळवावे.” महात्मा गांधी पुढे म्हणतात, “जर हुसैनच्या ७२ सैनिकांसारखे सैन्य माझ्याजवळ असते तर मी भारताचे स्वातंत्र्य २४ तासात मिळवले असते.” त्यादृष्टीने भारताच्या स्वातंत्र्यप्राप्ती मागे हजरत हुसैन यांची शिकवण प्रेरणादायी ठरली, हे एक ऐतिहासिक सत्य आहे.

इतकेच नव्हे तर दक्षिण आफ्रिकेमधील वर्णभेदविरोधी चळवळीतील जगमान्य नेता नेल्सन मंडेला यांच्यासारख्या लोकांनीही इमाम हुसैन यांच्या शिकवणीचे पालन केले. एकदा मंडेला म्हणाले, “मी तुरुंगात २० वर्षांहून अधिक काळ व्यतीत केला, त्यानंतर एका रात्री मी सरकारच्या सर्व अटी व शर्तींवर सही करून आत्मसमर्पण करण्याचा विचार केला. पण अचानक मला इमाम हुसैन आणि करबला चळवळींची आठवण आली. इमाम हुसैन यांनी मला स्वातंत्र्य आणि मुक्तिच्या अधिकारासाठी उभे राहण्याचे सामर्थ्य दिले आणि मी ते केले.”

चार्ल्स डिकन्स यांच्या मते, “हुसैनने जर आपल्या ऐहिक इच्छा आकांक्षांच्या पूर्ततेसाठी लढा दिला असता तर … मग त्यांची बहिण, पत्नी आणि मुले त्यांच्यासोबत का आली हे मला समजत नाही. म्हणूनच त्यांनी इस्लामसाठी पूर्णपणे बलिदान दिले.”

करबलाच्या शोकांतिकेबाबत मत प्रदर्शन करताना डॉ. के शेलड्रेक म्हणतात, “त्या  सभ्य सुसंस्कृत समुहापैकी, प्रत्येक स्त्री आणि पुरुषांना हे माहित होते की आजूबाजूच्या शत्रू सैन्य दुराराध्य आणि क्षमा न करणारा आहे आणि ते फक्त लढायलाच तत्पर नव्हते, तर ठार मारण्यासाठीही उतावीळ होते.

त्यांच्या मुलांसाठी पाणीदेखील नाकारले गेले, ते जळत्या उन्हात आणि जळत्या वाळूखाली उभे राहिले, तरीही एका क्षणासाठी सुद्धा ते अडखळले नाहीत. हुसैन आपल्या छोट्याश्या समूहाबरोबर वैभवासाठी नव्हे, संपत्तीच्या सामर्थ्यासाठी नव्हे तर सर्वोच्च बलिदानापसाठी कूच करीत होता आणि प्रत्येक सदस्याने निर्भयपणे निर्दयतेचा सामना केला.”

मानव जातीचा इतिहास लढायांनी भरलेला आहे हे सर्वश्रुत असताना करबलाच्या मैदानावर झालेल्या लढाईचे वर्णन करताना लेबनीज लेखक अँटोईन यांनी असे प्रतिपादन केले आहे की, “मानवजातीच्या आधुनिक आणि मागील इतिहासातील कोणत्याही लढाईने जास्त सहानुभूती आणि प्रशंसा प्राप्त केली नाही तद्वतच प्रभावी धडा शिकवला नाही जे करबलाच्या लढाईत हुसैनच्या हौतात्म्याने केले आहे.”

करबलाची कहाणी सार्वत्रिक आहे, सर्व शोषित लोकांसाठी संघर्ष सत्य आहे. थोर तत्त्वज्ञ डॉ. मुहंमद इकबाल म्हणतात, “मानवता जागृत होऊ द्या आणि प्रत्येक राष्ट्र हुसैनवर आपला स्वतःचा हक्क सांगू लागेल. इमाम हुसैनच्या हौतात्म्यात यजीदचा मृत्यू आहे, कारण प्रत्येक करबलानंतर इस्लामचे पुनरुत्थान होते.”

ख़्वाजा मुईनुद्दीन चिश्ती यांनी फारसी भाषेत हजरत इमाम हुसैन यांची महती वर्णन करताना म्हटले आहे की,

शाह अस्त हुसैन व बादशाह अस्त हुसैन

दीन अस्त हुसैन ओ दीन-ए-पनाह अस्त हुसैन

सर दाद-ओ-न-दाद दस्त दर दस्त-ए-यज़ीद

वल्लाह कि बिना-ए-लाइलाह अस्त हुसैन

अर्थात, हुसैन राजा आहे, हुसैन राजांचाही राजा आहे

विश्वास हुसैन आहे, आस्थेचा रक्षक हुसैन आहे

त्याने आपले शीर दिले, परंतु यजीदच्या हातात आपला हात नाही

खरंच, सत्य हुसैनशिवाय काही नाही.

नातू हुसैन यांच्या बाबतीत प्रेषित म्हणतात, “हुसैन यांनी माझ्याद्वारे अस्तित्वप्राप्ती केली आहे आणि ते माझ्या  अस्तित्त्वाचे साधन आहेत.” हे वक्तव्य हुसैन यांनी सत्यधर्म रक्षणार्थ केलेल्या बलिदानाने खरे ठरले.

अशाप्रकारे एका सत्य मार्गी व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबीयांना सत्याच्या रक्षणासाठी जो त्याग आणि बलिदान करावा लागला त्याची आठवण देणारा सण म्हणजे मुहर्रम. या सणाची पार्श्वभूमी जरी इस्लामी इतिहासाशी संबंधित असली तरीसुद्धा जगातील कोणत्याही देश आणि प्रदेशात सत्यासाठी लढणाऱ्या लोकांना नैतिक बळ आणि धाडस देणारा हा अध्याय आहे यात शंका नाही.

जाता जाता :