स्मरणी आहेत पुण्यातील त्या मुहर्रमच्या मिरवणुकी !

ही त्या काळातील आठवण आहे, ज्या काळात मुहर्रम आमच्यासाठी हा एक ‘सण’ होता. तो मुस्लिमांचा सण असतो आणि तेच साजरा करतात, या बाबतीत आमचे मन अनभिज्ञ होते. आमच्यासाठी जसे गणपती तसे मुस्लिमांसाठी मुहर्रमचे ताबूत असतात हा तो समज होता.

तीसएक वर्षांपूर्वीची आठवण आहे. लहानपणी पुण्यातील कसबा पेठेत, कागदीपूरा आणि धाकटा शेख सलाहुद्दिन दर्गा येथे दहा दिवस ताबूत बसायचे. कागदी पुऱ्यातील ताबूत भला मोठा मांडव टाकून त्यात बसवला जायचा. साधारणपणे ताजमहालच्या स्वरूपाचा लखलखणाऱ्या चंदेरी रंगाच्या कागदाने अत्यंत नाजूक नक्षीकाम करून तो तयार केला जायचा.

तळाशी जाडजूड बांबूच्या उभ्या आडव्या वाशांची चौकोनी फ्रेम तयार करून त्यावरती वरचा दहा-बारा फूटांचा चौकोनी ताबूतचा मुख्य मनोरा रचला जात. उभ्या मनोऱ्यासाठी पण चारही कोपऱ्यात उभे आडवे वासे आणि बांबूच्या जाड, पातळ पट्ट्या काथ्या, सुतळीच्या साह्याने एकमेकांना बांधून आतील मुख्य लाकडी सांगाडा तयार व्हायचा.

सांगाड्याला पोटातून चारही कोपऱ्यांना एकमेकांना तिरपे क्रॉस बांबू बांधून भक्कम आधार दिला जात. हा बांबूचा सांगाडा बाहेरून चंदेरी कागदाची अत्यंत नाजूक व आकर्षण कलाकुसरयुक्त सजावट करून झाकला जायचा.

ताबूतच्या चारही बाजूंना एक सारखेच नक्षीकाम केलेले असायचे. या नक्षीकामात गोल, चौरस, पतंगाच्या आकाराच्या काचेचे बारिक आरश्यांचा मुबलक वापर केलेला असायचा. ठिकठिकाणी काचेचे चमचमणारे  गोलाकार, षटकोनी, अष्टकोनी, शंखाकृती लोलक बांधलेले असत.

ताबुतच्या चारही बाजूला केलेल्या नक्षीकामात महिरपीच्या आतून लाल, पिवळा, हिरव्या रंगाच्या जिलेटिनचा  पारदर्शक पेपर चिकटवून जाळीदार खिडक्या, गवाक्ष, कमानी, देवळ्या बनवलेल्या असायच्या. मनोऱ्याच्या चारही कोपऱ्यात वरच्या बाजूला रंगीत कागदाच्या झुरमुळ्या बांधलेल्या असत.

मोर, पोपट, पाने, फूले, वेलबुट्टीच्या चंदेरी कागदाची जाळीदार चित्रे चिटकवलेली असायची. काचेची तावदाने, अभ्रिकाचे तक्ते यांचादेखील भरपूर वापर केलेला असायचा.  ताबूतच्या चारही दिशांना मध्यभागी एकाच्या आत एक अशा क्रमाक्रमाने लहान होत जाणाऱ्या चंदेरी कागदाच्या चौकटी बनवलेल्या असायच्या. सर्वात शेवटी खोलवर नक्षीकाम केलेला बंद दरवाजा असायचा.

वाचा : ‘यौमे आशूरा’ स्मृतिदिनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी

वाचा : चिश्ती विद्रोहाचे मुलाधार ख्वाजा मैनुद्दीन अजमेरी

धूपाचा मंद सुवास

दरवाज्यावर चौरस जाळीदार नाजूक नक्षीकाम केलेले असायचे. मुख्य मनोऱ्याच्या बाहेरील बाजूला चारही कोपऱ्यात नाजूक नक्षीकाम केलेले उंच मिनार बनवलेले असायचे आणि त्यांच्या टोकावर घुमट बनवलेले असायचे. असाच एक मुख्य मनोऱ्यावर देखील गोलाकार घुमट तयार केलेला असायचा. या मुख्य घुमटावर चौरसाकार छत्री बनवलेली असे.  

या ताबूतला चारही बाजूने भाविक लोक नवस बोलून लाल, पिवळे गंडे बांधत. ताबूतच्या दर्शनी बाजूच्या दरवाज्याच्या दोन्ही बाजूला मोरपिसांचे झाडू लावलेले असत. याच मुख्य दरवाज्याला लाल गुलाबी चमकीच्या कागदाचे तुकडे आणि गुलछडीच्या फूलांचे बनवलेले एकावर एक कैक शेरे बांधलेले असत.

ताबूतच्या पुढ्यात एक मातीचे मोठे भांडे ठेवलेले असायचे. त्यात भाविकांनी वाहिलेल्या उदबत्त्या जळत असायच्या. याच भांड्यात लोबान, धूप जळत असायचा आणि या धूपाचा मंद सुवास सर्व मांडवात आणि सभोवताली पसरलेला असे.

एक मोठा ॲल्युमिनियमचा थाळा ठेवलेला असे त्यात भाविक बरेच सुटे पैसे, नोटा अर्पण करित असत. लोकांनी आणलेला नैवेद्य पेढे, बर्फी, लाडू, रंगीत बुंदी, खडीसाखर, खडी-फुटाणे, केळी, सफरचंद, नारळ इत्यादी प्रसाद म्हणून वाटला जाई. हा ताबूत आता बसवत नाहीत.

मुहर्रमच्या दिवशी शनिवार वाड्यापासून कसबापेठेतून  साततोटी, कडबाकुट्टी मार्गे संगम घाट येथपर्यंत ताबूतांची विसर्जन मिरवणूक निघायची. शहरातील बरेचसे ताबूत या मिरवणुकीत सहभागी व्हायचे व आम्हाला ते पाहायला मिळायचे.

मिरवणुकीच्या प्रारंभी बैलगाडीवर बसून चौघडा वादक चौघडा वाजवीत जायचे. त्यांच्या मागोमाग बहुरूपे राजपुत्राचे रूप आणि पोशाख परिधान करून सहभागी व्हायचे. या राजपुत्राने कंबरेभोवती घोड्याचा सांगाडा बांधलेला असायचा. हा राजपूत्र डोक्यावर फेटा बांधून चेहऱ्यावर मेकअप करून घोड्यावर बसल्यासारखा ऐटित चालत असायचा. वाद्यांच्या तालावरती लयबद्ध नृत्य करताना हा बहुरूपी आपल्या सह घोड्याला पण नाचवायचा.

डोळ्यांचे पारणे फेडणारे हे दृष्य पाहायला खूपच सुंदर असायचे. नृत्य करता करता लोकांजवळ जाऊन बहुरूपी पैसे पण गोळा करायचा. त्याच्या कामगिरीवर खूष होऊन लोक सढळ हाताने त्याला पैसे द्यायची. या बहुरूपीच्या मागे मानवी वाघ मिरवणुकीत सहभागी व्हायचे.

अंगावर फक्त ठिपक्यांची चड्डी घालून सर्वांगावर वाघासारखे काळया पिवळ्या रंगाचे पट्टे रंगवून घेतलेले असायचे. कंबरेभोवती पाठीमागे दोरीने वाघाची शेपटी बांधलेली असायची. ओठांभोवती वाघासारख्या मिशा रंगवलेल्या असायच्या. ओठांना व डोळ्यांभोवती काळा व नाकाला पांढरा रंग दिलेला असायचा.

नखांना पुढे वाघासारखी खोटी लांबलचक पिवळसर पांढरी नखे चिकटवलेली असायची. हे वाघ बनणे बहुतेक नवसपुर्तीचेच कार्य असावे. हे वाघ एखाद्या वीरासारखे चालायचे आणि यांच्या नृत्यात आवेग आणि शौर्य भरलेले असायचे. हुबेहूब वाघांसारखेच दिसत असल्यामुळे लहान मुले यांना घाबरायची.

या शिवाय मिरवणुकीत रेवड्या, लाल गाठी विकणाऱ्या हातगाड्या, हार, शेरे, लोबान धुपाच्या पुड्या, गुलाबपाणी विकणारे, अत्तर विकणारे, डोळ्यात काजळ सुरमा भरणारे, फोटोग्राफर, संत्रीच्या गोळ्या, शेंगदाणे, फुटाणे, खडीसाखरेच्या पुड्या विकणारे, सरबत वाले, बर्फाचे गोळे, उसाच्या गंडोऱ्या विकणारे, तळलेले पापड, खरवस विकणारे विक्रेते सहभागी असायचे. चोहिकडे पोलिसांचा खास बंदोबस्त असायचा.

उंच ताबूत लाइटच्या तारांना अडकू नयेत म्हणून या तारा वर ढकलण्यासाठी उंच बांबूच्या शेकोट्या हातात घेऊन काही कार्यकर्ते आपल्या ताबूताबरोबर उभे असायचे.

वाचा : गुरुविना घडलेले महान संगीतज्ज्ञ अमीर खुसरो

वाचा : प्रेषितांच्या स्मृती जपणारे बिजापूरचे आसार महाल

या हुसैन, या हुसैन

प्रत्येक गटांच्या मिरवणुकीत एक ताबूत असायचा. त्यापुढे कार्यकर्ते गोल रिंगण करून शोकगीत म्हणत असत. यांच्या हातात एक शस्त्र असे. लाकडी किंवा लोखंडी मूठ आणि तिला पुढे बारीक साखळ्या जोडलेल्या असायच्या. साखळ्यांना पुढील बाजूला पत्र्याची दोन्ही बाजूने तीक्ष्ण धार असलेली उभट  सरळ पाती जोडलेली  असायची.

शोकगीते म्हणता-म्हणता हे कार्यकर्ते हातीतील हे विशिष्ट शस्त्र स्वतःच्या उघड्या छातीवर आणि पाठीवर जोरजोरात आपटवून घेत. करबला येथे झालेल्या हजरत हुसैन यांच्या हौतात्म्याचे स्मपण करून शोक करून घेण्याची ही पद्धत. धारदार पत्र्याने छाती व पाठीवर जखमा होऊन त्या रक्तबंबाळ होत. अंगावरुन रक्ताच्या धारा वाहत असायच्या.

दुसऱ्या एका ताबूतापुढील कार्यकर्ते धार्मिक गाणी म्हणत तसेच ‘या हुसैन’, ‘या हुसैन’ या नावाचा शोकघोष करीत दोन्ही हाताचे तळवे उघड्या छातीवर दणादण आपटवून घेत असत. त्यांच्या छात्या हात आपटून-आपटून घेऊन अगदी लालबुंद होऊन जात.

म्हणतात, इस्लामचे चौथे खलिफा हजरत अली यांचे चिरंजीव इमाम हसन आणि इमाम हुसैन यांना कटाने मारण्यात आले होते. तत्कालीन जागतिक मुस्लिम समुदायात हजरत अली नंतर या दोघांना प्रेषितांनतरचा आदर, सन्मान मिळत होता. शिवाय दोघेही प्रेषितांचे नातू असल्याने त्यांच्याप्रति आदाराचा व सन्मानाचा भाव होता. परंतु राजकीय कारस्थानात प्रथम इमाम हसन यांना आणि नंतर इमाम हुसैन यांना शत्रू सैन्याने एक निर्जन ठिकाणी बोलावून त्यांच्या कुटुंबियासह संपवले होते. ज्या महिन्यात ही घटना घडली ती मुहर्रमची १० तारीख होती. या निर्घृण घटनेच्या स्मरणार्थ व घडलेल्या निंद्य कृत्याच्या दोषाचे प्रायश्चित्त म्हणून दुखवटा पाळण्याचा हा एखादा मार्ग असावा.

हसन आणि हुसैन यांच्या बलिदानाचे प्रतिक म्हणजे ‘मुहर्रम’ होय. मुहर्रम महिन्याची पहिली दहा दिवस हा स्मृती पाळल्या जातात. बलिदानाचे प्रतीक म्हणून ताबूत किंवा ताझिया बसवण्याची पद्धत आहे.

वाचा : सम्राट अकबरला मूर्ख ठरवणाऱ्या बिरबल कथा

वाचा : शेतकऱ्यांकडून अधिक कर वसुलीस बाबरची होती मनाई

सलाहुद्दीन दर्ग्याचा ताबूत

शेख सलाहुद्दीन दर्ग्याचा ताबूत दुधी किंवा शुभ्र पांढऱ्या कागदाचा बनवलेला असायचा. या ताबूतला विशेष असे नक्षीकाम केलेले नसे. ताबूतच्या घुमटावर तीन एकास एक जोडलेली काळ्या रंगाची लाकडी शिंगे बसवलेली असत.

हा ताबूत मुहर्रमच्या दिवशी दुपारी बारा वाजता मंडई येथील श्रीनाथ टॉकीजजवळ बाणेकर या ताबूतशी डावी- उजवी करायला जात असे. ह्या डावी-उजवीच्या कार्यक्रमात दोन्ही ताबूत एकमेकांभोवती गोल फिरवून-फिरवून  भिडवले जात आणि एका ताबूतच्या घुमटावरील तीन शिंगांनी दुसऱ्या ताबूतच्या घुमटावरिल तीन शिंगे उपटून काढायची असा प्रकार असे.

एकूण फक्त तीन वेळा दोन्ही ताबूतांना एकमेकांना भिडवून एकमेकांची शिंगे उपसण्याची संधी दिली जायची. त्यानंतर हा कार्यक्रम पोलीस हस्तक्षेपानंतर बंद व्हायचा. कारण हा कार्यक्रम पहायला खूप गर्दी उसळलेली असे आणि नागरिकांची प्रचंड चेंगराचेंगरी, धावपळ, पडापडी, घबराट व्हायची.

ही डावी-उजवी सुरू असताना काळा बुक्का उधळला जायचा. त्यामुळे या डावी-उजवीच्या कार्यक्रमात डोक्यावर रुमाल बांधून सहभागी होणारे कार्यकर्ते काळ्या बुक्क्याने पूर्ण माखून गेलेले असायचे. त्यांना त्या अवस्थेत पाहून खूप भिती वाटायची.

डावी-उजवी झाली की ताबूत स्वयंसेवकाच्या प्रचंड गदारोळात आणि धक्काबुक्कीत विसर्जन मिरवणुकीत सहभागी व्हायचा. विसर्जन होण्यापूर्वीच या ताबूतची वाईट अवस्था झालेली असायचे. प्रचंड नासधूस झालेली असायची. बांबूच्या काटक्यांचा एक गोळा असे याचे स्वरूप व्हायचे.

मुखाने धुला-धुला असे म्हणत हवा तसा त्वेषाने पळवत-पळवत हा ताबूत कार्यकर्ते घेऊन निघत. कधी कोणाच्या अंगावर हा ताबूत येऊन कोसळेल याचा नेम नसायचा. कधी-कधी धावपळ होऊन खाली पडलेल्या लोकांना तुडवत हा ताबूत पुढे पळवत न्यायचे.

त्यामुळे हा ताबूत येताना दिसला की मिरवणुकीतील पुढील सर्व ताबूत एका बाजूला उभे राहून याला पुढे जाण्यासाठी रस्ता मोकळा करून देत असत. हा ताबूत पुढे जाईपर्यंत मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांचा जीवात जीव नसायचा.

काही घडू नये म्हणून पोलिसांनी या ताबूताभोवती अक्षरक्ष: गोल कडे केलेले असायचे. नंतरच्या काळात हा ताबूत पोलीस शिवाजी पुलावरतीच विसर्जित करायला भाग पाडू लागले. हा ताबूत पुढे मार्गस्थ झाला की बाकी मिरवणूक शांततेत यथासांग निर्विघ्नपणे पार पडायची. बहुतेक ताबूत कार्यकर्ते खांद्यावर वाहून न्यायचे.

जे आणि जसे आठवले किंवा उमगले तसे.

जाता जाता :