विजयापूर (बिजापूर) शहरातल्या शेकडो इमारतींपैकी ‘आसार महाल’ ही अत्यंत महत्त्वाची इमारत आहे. शहरातील किल्ल्याच्या पश्चिम बाजूला ही वास्तू उभी आहे. बिजापूरात आता किल्ल्याच्या प्रवेशद्वारांशिवाय किल्ल्याचे अन्य अवशेष शिल्लक नाहीत. काही ठिकाणी संरक्षक भिंतीचा थोडासा भाग आढळून येतो. या किल्ल्यातील काही इमारतींपैकी आसार महाल ही एक वास्तू आहे.
इमारतीत प्रेषित मुहंमद (स) यांच्या दाढीचे पवित्र केस ठेवण्यात आले आहेत. ते सत्य असल्याच्या अनेक सनदा आसार महालमध्ये उपलब्ध आहेत. मीर सालेह हमदानी यांच्याकडे असणारे प्रेषितांच्या दाढीची ही केसं बिजापूरात आणण्यासाठी दुसऱ्या इब्राहिम आदिलशाहने खूप रक्कम खर्ची घातली. ते मिळाल्यानंतर त्याने आसार महालमध्ये ते आणून ठेवले. त्याच्या देखभालीसाठी त्याने चोख व्यवस्था देखील ठेवली होती.
महालमध्ये कार्यरत असणाऱ्या सेवकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी एक लंगर त्याने सुरू केले होते. प्रेषितांच्या नातलगांकडून त्यांच्या काही वस्तू आणून दुसऱ्या इब्राहिम आदिलशाहने या वास्तूत ठेवल्या होत्या. त्याची ही पद्धत त्याचा मुलगा मुहंमद आदिलशाह याने पुढे सुरू ठेवली. त्याने अशा काही वस्तू शोधून आणल्याचे मत काही इतिहासकारांनी मांडले आहे.
वाचा : कशी होती तुघलक काळातील ईद?
वाचा : बाबरने शब्दबद्ध केलेला भारत कसा होता?
अखेरचा आदिलशाही राज्यकर्ता सिकंदर आदिलशाह याच्यापर्यंत या इमारतीच्या देखभालीसाठी विशेष रकमेची तरतूद केली जात असे. ईद ए मिलाद म्हणजे प्रेषितांच्या जन्मदिनाच्या पार्श्वभूमीवर याठिकाणी काही कार्यक्रमांचे आयोजन केले जात असे. त्यावेळी ७५ हजार ते १ लाख रुपयांचा निधी खर्च केला जात असे. मोहर्रममध्ये ५० हजार रुपयांपर्यंतची रक्कम खर्ची घातली जायची.
सुरुवातीला गगन महालमध्ये प्रेषितांच्या या वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. मुहंमद आदिलशाहच्या काळात गगन महालला आग लागली होती. या इमारतीत आदिलशाही राजवटीच्या लाखो रुपयांच्या वस्तू ठेवलेल्या होत्या. त्या सर्व आगीच्या भक्ष्य ठरल्या. बादशाहला आगीची माहिती मिळाल्यानंतर तो तात्काळ या ठिकाणी आला.
आगीने रौद्र रुप धारण केले होते. कुणालाही त्या इमारतीच्या जवळ जाता येत नव्हते. बादशाहच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. बादशाहच्या मागे अली खान नावाचा एक व्यक्ती उभा होता. बादशाहच्या डोळ्यातील अश्रू पाहून तो तडक आगीत लपेटलेल्या इमारतीत घुसला. आणि पाहता पाहता तो प्रेषितांच्या पवित्र वस्तू ठेवलेली पेटी डोक्यावर घेऊन बाहेर आला.
अली खानमुळे प्रेषितांच्या त्या मौल्यवान वस्तू आगीच्या भक्ष्य ठरण्यापासून वाचल्या. गगन महाल काही तासातच आगीत पुर्णतः नष्ट झाले. त्यानंतर प्रेषितांच्या या वस्तू दाद महाल – ज्याला अदालत महाल म्हणून देखील ओळखले जाते, तेथे त्या वस्तू ठेवण्यात आल्या. अदालत महालचे बांधकाम इसवी सन १६६४मध्ये मुहंमद आदिलशाह याने केले होते. या अदालत महलालाच पुढे ‘आसार महाल’ हे नाव मिळाले. आसार महाल आणि प्रेषितांच्या वस्तूंसंदर्भात अनेक दंतकथा सांगितल्या जातात.
वाचा : अहमदनगर : मध्ययुगीन भारतातील ऐतिहसिक शहर
वाचा : सम्राट अशोक ‘महान’ होतो, मग टिपू सुलतान का नाही?
इस्लामी दिनदर्शिकेच्या रबिउल अव्वल महिन्याच्या १२ तारखेला प्रेषित मुहंमद (स) यांचा जन्म झाला असल्याचे मानले जाते. या तारखेच्या आदल्यादिवशी म्हणजे ११ रब्बिउल अव्वलच्या पूर्वसंध्येला प्रेषितांच्या काही वस्तू व त्यांच्या दाढीचे केस ठेवलेली पेटी लोकांना दर्शनासाठी खुल्या केली जाते.
मुघल शासक औरंगजेबने ज्यावेळी बिजापूर जिंकले त्यावेळी सिकंदर आदिलशाहला स्वतःच्या जीविताची काळजी वाटू लागली. त्यावेळी सिकंदरच्या काही सरदारांनी प्रेषितांच्या दाढीचे केस ठेवलेली ही पेटी डोक्यावर घेऊन औरंगजेबकडे जाण्याची सूचना केली. त्याने आपल्या सेवकाला ही पेटी औरंगजेबला भेट देण्यासाठी आणण्याचे आदेश दिले.
त्यावेळी सेवकाने ही पेटी बिजापूरमधून दुसरीकडे जाऊ नये यासाठी पवित्र पेटी बदलून त्याठिकाणी दुसरी पेटी ठेवली. ती दुसरी पेटी डोक्यावर घेऊन सिकंदर औरंगजेबकडे गेला. त्यावेळी औरंगजेबने त्याचा प्रचंड आदर सत्कार केला. त्याच्याकडची ही पेटी त्याने दिल्लीला पाठवून दिली. अशा प्रकारे प्रेषितांच्या दाढीचे केस असणारी मुळ पेटी बिजापूरात राहिली.
पण या प्रकरणानंतर अनेक ठिकाणी प्रेषितांच्या दाढीचे पवित्र केस असल्याचा दावा करण्यात आला. त्यापैकी रायचूर, लिंगसूर, आलमपूर, मुदगल, जलदुर्ग, अन्नासुर, सालगुंडा, गुलबर्गा, बिदर, निलंगा, हैदराबाद, औरंगाबाद, खुलताबाद याठिकाणच्या लोकांनी देखील आपल्याकडे प्रेषितांच्या दाढीचे केस असल्याचा दावा केला. मात्र त्यातील किती जणांचा दावा खरा अथवा कुणाचा खोटा हे काहीच सांगता येत नाही.
हेन्री कोजनीज नावाच्या एका इंग्रजी ग्रंथकाराने आसार महालमध्ये झालेल्या चोरीच्या प्रकरणाची माहिती दिली आहे. आसार महालात एके रात्री काही चोर शिरले होते. त्यांनी काही वस्तू चोरल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण प्रेषितांच्या दाढीचे केस असणारी ती पेटी मात्र अद्याप तशीच आहे.
अनेक आघात पचवून आसार महाल प्रेषितांच्या पवित्र वस्तूंसह त्यांच्या स्मृती जपत आजही उभा आहे. प्रेषितांच्या स्मृतींसह आसार महालची ही इमारत आदिलशाहीच्या चार-पाच पिढ्यांच्या इतिहासाची साक्षीदार आहे. ही इमारत दोन मजली असून त्यामध्ये मोठ मोठ्या खोल्या आहेत.
दोन्ही बाजूने मोठे सभागृह आहेत. मधल्या बाजूला असणारा दिवाणखाना ८१ फुट लांब व २७ फुट रुंद आहे. बाजूने असलेल्या जिन्यावरुन गॅलरीत गेल्यानंतर पूर्ण दिवाणखाना दृष्टीस पडतो. आसार महालमध्ये एक प्रचंड मोठे ग्रंथालय होते. ग्रंथ ठेवण्यासाठी मोठी कपाटेही होती. बिजापूर जिंकल्यानंतर औरंगजेबने हे ग्रंथ आपल्यासोबत नेले.
जाता जाता :