“कोकणातील मुस्लिम हे बाबरचे वंशज नाहीत, बाबर तर आला आणि गेला, परकीय सत्तेच्या आक्रमणामुळे येथील दाते, गोडसे, गाडगीळ हे मुस्लिम झाले. त्यामुळे येथील मुस्लिम बाबरचे नाहीत तर दाते, गोडसे, गाडगीळ यांचे वंशज आहेत.”
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोकणी मुसलमान संदर्भात एक विधान केलं आहे, त्यामध्ये दाते, गाडगीळ हे कोकणी मुसलमानांचे पूर्वज होते, असा एक वाक्प्रचार आहे. या विधानावरून ब्राह्मण महासंघाने आक्रमक पवित्रा घेतला असून या संदर्भात पाटील यांनी तात्काळ माफी मागावी, अशी भूमिका घेतली आहे.
यासंदर्भात मला झी24 तास या वृत्तवाहिनीवर चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. या ऑनलाइन मुलाखतीत कोकणी मुसलमानांच्या उगम व पूर्वजांना संदर्भात प्रश्न विचारला.
कोकणी मुसलमानांचा भारतातील प्रवेश आणि कोकणातील त्यांचे वास्तव्य आणि संस्कृती याविषयी चर्चा सुरू होती.
याला उत्तर देताना कोकणी मुसलमानांचे भारतातील येणं कधी झालं? त्यांचे सांस्कृतिक वैशिष्ट्य काय? याविषयी
मी मांडणी केली. परंतु माझ्या विधानाला आनंद दवे यांनी खोटारडे म्हणत आक्षेप नोंदवला.
बोलताना मी असे म्हणालो, उत्तरेत इस्लामी आला तो आक्रमकांच्या द्वारे आला; पण कोकणातील परिस्थिती यापेक्षा वेगळी होती. कोकणात इस्लाम आला तो अरब व्यापारी वर्गाच्या मार्फत आणि समुद्रमार्गे आला. समुद्रमार्गाने आलेले अरब व्यापारी चौल (जिल्हा रायगड), बाणकोट, दाभोळ आणि कल्याण, ठाणे या शहरात उतरले आणि तिथेच स्थायिक झाले.
व्यापार हे त्यांचे इप्सित होते. त्या दृष्टीने त्यांनी आपला जम बसवण्यास सुरुवात केली. हळूहळू त्यांचा व्यापार वाढत गेला. हा व्यापार आयात-निर्यात स्वरूपाचा असल्यामुळे त्याकाळी कोकणावर राज्य करीत असलेल्या शिलहार राजाची अर्थव्यवस्था खूपच प्रगत झाली. त्यामुळे त्याने या मुस्लिम किंवा अरबी व्यापाऱ्यांना भरपूर व्यापारी सवलती दिल्या.
वाचा : कोरोना : मुस्लिम समाज, आर्थिक विवंचना ते सेवाभाव!
वाचा : वाजपेयींच्या काळात झाला होता राज्यघटना बदलण्याचा प्रयत्न
कोकणी भाषा
कोकणातील मुस्लीम अरबांचा हा प्रवेश ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचा आहे. कारण या भूमीवर पाय ठेवल्यापासून त्यांनी कधीही राजकारण केले नाही. ते आले तेव्हा सहकुटुंब आले नव्हते. त्यामुळे येथे स्थिर झाल्यानंतर त्यांनी स्थानिक स्त्रीयांशी विवाह केले, हे नाकारता न येणारे वास्तव आहे.
या विवाह संबंधातून संतती निर्माण झाली तीच आज कोकणी मुस्लीम म्हणून ओळखली जाते.व्यापार करायचा असल्यामुळे त्यांनी स्थानिक भाषा देखील आत्मसात केली होती त्यातुनच मुसलमानांची अशी कोकणी बोलीभाषा निर्माण झाली. आजही कोकणातील मुसलमान हीच भाषा बोलतात. या कोकणी भाषेचे सरळ-सरळ नातं मराठी भाषेशी आहे. या भाषेबरोबरच अनेक सामाजिक व्यवहार आतूनही या मिश्र संस्कृतीचे दर्शन घडते.
उदाहरण म्हणून सांगायचे झाल्यास कोकणी मुस्लिम महिला कुंकू लावत नाहीत किंवा पायात जोडवी घालत नाही पण घरात मंगळसूत्र घालतात आणि हातात हिरवा चुडा घालतात. अशी ही एक नवी संस्कृती कोकणामध्ये निर्माण झाली होती.
समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून असं निश्चितपणे सांगता येतं की जेव्हा जुलमाने किंवा जबरदस्तीने धर्मांतर होत नाही तेव्हाच अशी मिश्र संस्कृती निर्माण होते.
कोकणातील या अशा धर्मांतराला आणखी एक पैलू आहे, या अरब व्यापार बरोबर काही सुफी संतही कोकणात आले होते. आजही कोकणातील परिसरामध्ये कोणा ना कोणा एका सुफी- संताची दरगाह असल्याचे आढळते. या सोपी संतांच्या मानवतावादी तत्त्वज्ञानाने प्रभावित होऊन कोकणात अनेक ब्राह्मणांनी इस्लामचा स्वीकार केलेला आढळतो. त्या काळी म्हणजे आठव्या-नवव्या शतकामध्ये सुफी संत परंपरेतील अध्यात्मिक तत्वज्ञान समजणारा फक्त ब्राह्मण वर्ग होता कारण इतर कुठल्याही जातीच्या लोकांना शिक्षणाचा अधिकारच नव्हता. या ब्राह्मण समाजातून धर्मांतरीत झालेल्यांची पाटणकर, दिवेकर, उपाध्ये, तांबे, करंबेकर अशी आडनावे लावणारी अनेक कुटुंबे आजही कोकणी मुसलमानात आढळतात.
झी24तास चैनल वर माझ्या प्रश्नाचे उत्तर देताना मी अशा अशा तऱ्हेने कोकणी मुसलमानांच्या भारतातील प्रवेश आणि त्यांचे वास्तव्य याबद्दल आणि त्यातून निर्माण झाली त्यांची एक स्वतंत्र संस्कृती थोडक्यात विशद केली. परंतु आपल्याकडे एक असा वर्ग आहे इस्लाम किंवा मुसलमानांच्या विषयी कोणीही चांगलं बोललेलं त्यांना आवडत नाही. म्हणून मग ते सगळंच खोटं कसं आहे असं ते सांगत बसतात.
या चर्चेमध्ये श्री. केशव उपाध्ये आणि श्री. आनंद दवे सहभागी झाले होते. मी या चर्चेत ऑनलाइन सहभागी झालो होतो, त्यामुळे त्याच्या मर्यादा होत्या. केशवराव काय म्हणत होते, मला नीट ऐकू आलं नाही, त्यामुळे त्यांच्या बाबतीत मी काही बोलू शकत नाही. परंतु आनंद दवे यांनी माझ्यावर सरळ-सरळ खोटेपणाचा आरोप केला.
त्यांनी कुठलेही पुरावे देण्याचाही त्रास घेतला नाही. अर्थात ही हिंदुत्ववाद्यांची चर्चेची नेहमीची पद्धत असते. परंतु माझ्या गुरुजनांनी मला एक गुरुमंत्रपन्नास वर्षांपूर्वीच दिला आहे तो म्हणजे ‘फॅक्ट आर सॅक्रेड कमेंट आर फ्री.’ याचे मराठीत भाषांतर करायचं झाल्यास आपण असे म्हणू शकतो की वास्तव पवित्र असते आणि त्याविषयीची चर्चा मात्र मुक्त असते.
हे वास्तवाचं पावित्र्य जर आपण स्वीकारलं नाही तर ती चर्चा निष्फळ होते. आनंद दवेच्या बाबतीत नेमकं हेच झालं. साधारणपणे आठव्या व दहाव्या शतकाच्या काळात हे व्यापारी अरबस्तानातून भारतात आले त्याविषयी समकालीन प्रवाशांनी भरपूर लिखाण करून ठेवले आहे. त्यातील फरिश्ता हा एक महत्वाचा प्रवासी होता. तो चौलला आला असताना तिथे मुसलमानांची खूप मोठी वस्ती असल्याचे आणि ते आर्थिक दृष्ट्या समृद्ध स्थितीत असल्याचे लिहून ठेवले आहे.
त्यांच्या व्यापाराविषयीही त्याने लिहून ठेवले आहे. याच्या सारख्या आणखी एक प्रवास याचा उल्लेख करायचा झाल्यास तर अल् बेरुनी याचा करावा लागेल. तो दहा वर्ष भारतात राहिला होता. परंतु तो या काळात उत्तरेतच राहिला. त्यामुळे त्याच्या लिखाणात कोकणाविषयीचे उल्लेख आढळत नाहीत. पण उत्तरेतील आपल्या दहा वर्षाच्या कालखंडात त्याने केलेला प्रवास वृत्तांत लिहून ठेवला आहे. त्याचे इंग्रजी भाषांतर ‘अल बेरुनीज इंडिया’ या नावाने प्रसिद्ध आहे. या सातशे-आठश पानांच्या ग्रंथातील अनुक्रमणिकेवर ओझरती नजर टाकली तरी त्याला किती विषयात रस होता याची कल्पना येऊ शकते.
वाचा : शासनाच्या मराठी मंडळावर मुस्लिम का नाहीत?
वाचा : साहित्य-संस्कृती व्यवहारातील पालखीवाहू ‘मुस्लिम’
बेरुनीने वेदांतापासून गीतापर्यंत सगळ्याच हिंदू धर्मग्रंथांचा अभ्यास करून ते अरबी भाषेत अनुवादित केली आहेत. त्याकाळी भारतात ज्ञानसाधना किती विकसित झाली होती, याचा मनमोकळेपणाने त्याने उल्लेख केला आहे. पण आनंद दवे सारख्यांना इस्लाम किंवा मुस्लिम समाजात किंवा इस्लामी संस्कृतीत काही चांगले, भव्यदिव्य असू शकते, ही कल्पनाच सहन होऊ शकत नाही. म्हणून मग अशा तऱ्हेची मांडणी करणाऱ्या व्यक्तीला बेंबीच्या देठापासून खोटे ठरवण्याचा प्रयत्न ते सतत करत आले आहेत.
हे आपल्याकडेच होतं असं नाही, तर पाश्चात्त्य जगतातही इस्लाम आणि मुसलमान विषयी प्रचंड गैरसमज आहेत. सीआयए या अमेरिकन गुप्तहेर संघटनेच्या इंटरनॅशनल इंटेलिजन्स काऊन्सिल या त्यांच्या उपशाखेचे व्हाइस चेअरमन ग्रहम फुल्लर याने निवृत्त झाल्यानंतर ‘द वर्ल्ड विदाऊट इस्लाम’ या नावाचा ग्रंथ लिहिला आहे.
त्यात त्यांनी लिहिले आहे, “इस्लामविषयी जितके गैरसमज जगभर पसरलेले आहे तितके इतर कुठल्याही धर्माविषयी नाहीत.” पुढे त्याने असेही लिहिले आहे की, “इस्लाम जगतात आलाच नसता तर हिंसाचार झाला नसता का?”
याच नाण्याची दुसरी बाजू आपल्याला असेही सांगता येईल की, इस्लामपूर्व काळातही जगभर हिंसाचार होत होता. ख्रिश्चनिटी, बौद्ध धर्माचा प्रसार करणाऱ्या संस्कृतीतही भरपूर हिंसाचार झाल्याचा इतिहास सांगतो.
भारताच्या संदर्भात सांगायचे झाल्यास सम्राट अशोक हे उदाहरण आहे. कलिंगाच्या युद्धामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तपात झाला होता. या घटनेने व्यथित झाल्यामुळे सम्राट अशोकने बौद्ध धर्माचा स्वीकार केला. मौर्य, गुप्त आणि इतर अनेक घराण्यांच्या काळात भरपूर हिंसाचार झालेला आहे. पण केवळ राजेरजवाड्यांच्या पातळीवरच हिंसाचार होत होता, असे नाही.
सामाजिक पातळीवर सुद्धा सिंधू समाजरचनेतील चातुर्वर्ण्या सारखी उच्च-नीचतेवर आधारित समाजरचनेत सुद्धा गुलामगिरी आणि हिंसाचार फार मोठ्या प्रमाणात होत होता. जाणकारांनी नरहर कुरुंदकरांचे शिवरात्र, मनुस्मृति ही पुस्तके वाचावीत. अजून जास्त खोलात जाऊन वाचायचं झाल्यास डीडी कोसंबी देखील वाचावा.
हे सगळे सांगण्याचा हेतू हाच की एकाच समाज गटाला लक्ष्य करून त्यावर हिंसाचाराचे, असहिष्णुतेचे आणि इतर कसलेही गलिच्छ आरोप करणे सत्याला व न्यायाला धरून होणार नाही.
गेल्या काही वर्षात मुस्लिम द्वेशा संदर्भात सुरू असलेल्या प्रचारातून मुस्लिम समाजाला सतत लक्ष्य करण्यात येत आहे, हा त्याचाच परिणाम आहे.
जाता जाता :
- भारतात धार्मिक स्वातंत्र्याची अवस्था बिकट का होतेय?
- पश्चिम बंगाल निवडणुकीत काँग्रेसची ‘मुस्लिममुक्त’ धोरणे
लेखक मुंबई स्थित मुस्लिम विषयाचे चिंतक आहेत. सामाजिक राजकीय विशियावर ते सातत्याने लेखन करतात.