गुगलने डूडल बनवून गौरव केलेल्या फातिमा शेख कोण आहेत?

ज गुगलने सत्यशोधक फातिमा शेख यांना जन्मदिनाचा शुभेच्छा देत आदंराजली वाहली आहे. गुगलच्या मते ९ जानेवारी १८३१ रोजी पुण्यात फातिमा शेख यांचा जन्म झाला होता. गुगलनं त्यांना भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका असं मानलं आहे.

त्यांची १९१वी जयंती आहे असं नोंदवून गुगलनं एक टिपण लिहून या संदर्भात माहिती दिली आहे. गुगलच्या मते समाजसुधारक जोतिराव आणि सावित्रीबाई फुले यांच्या त्या सहकारी होत्या. फातिमा शेख यांनी १८४८ मध्ये स्वदेशी ग्रंथालयाची सह-स्थापना केली, ही भारतातील मुलींसाठीची पहिली शाळा होती, असंही गुगल म्हणतो.

गुगलच्या या माहितीवरून देश आणि विदेशात फातिमा शेख यांच्याबद्दल आदर भाव व्यक्त होत आहे. फुले साहित्याच्या अभ्यासकांच्या मते प्रथमच अशा रीतीने फातिमा शेख यांची जयंती साजरी केली जात आहे.

२०१७ साली मिरज निवासी दिनकर काकडे यांनी फातिमा शेख यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेत  ‘भारतातील पहिली मुस्लिम शिक्षिका : फातिमा शेख’ शीर्षकाची एक कादबंरी लिहिली होती. त्याला सत्यशोधक परंपरेतील ज्येष्ठ लेखक एस. एम. मुश्रीफ यांनी प्रस्तावना लिहिली होती. आज गुगलच्या दाव्यानंतर सदरील प्रस्ताविक टिपण ‘डेक्कन क्वेस्ट’च्या वाचकांसाठी उपलब्ध करून देत आहोत.

फातिमा शेख या मुस्लिम महिलेने जोतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांना स्त्री शिक्षण, दलित शिक्षण वगैरे कामात मदत केली इतकीच तिच्याबद्दलची माहिती जनतेला आहे. पण तिचा पूर्वतिहास व ती व तिचा भाऊ उस्मान शेख यांचे फूले दांपत्याच्या सर्वच सामाजिक कामात किती महत्त्वाचे योगदान होते याची फारशी माहिती नाही. या पुस्तकाचे लेखक दिनकर विष्णू काकडे यांनी ती काहिशी पूर्ण केली आहे.

फातिमा शेख व उस्मान शेख हे मूळचे नाशिक जिल्ह्यातील मालेगांवचे. १८५७च्या बंडानंतर उत्तर प्रदेशातील जुलाहा (विणकर) समाजातील अनेक कुटुंबे महाराष्ट्रातील मालेगाव, धुळे, भिवंडी, मुंबई येथे येऊन स्थायिक झाली होती. फातिमा व शेख हे त्याच समाजातील. पण ते लहान असतानाच त्यांचे आई-वडिल देवाघरी गेले व ते पोरके झाले.

त्यातच मालेगांवमध्ये भयानक दुष्काळ पडला. विणकर समाजाने तयार केलेले कपडे कोणी विकत घेईनात. त्यामुळे मालेगांवमधील अनेक जुलाहा कुटुंबे मालेगांव सोडून पुण्याला आली. फातिमा व उस्मानही त्यांचेबरोवर आले. पुण्यातील गंजपेठेतील गफ्फार बेग नावाच्या सद्गृहस्थाने त्यांना आश्रय दिला. उस्मान आता शाळेत जाण्याइतका मोठा झाला होता. म्हणून गफार बेग यांनी त्याला एका शाळेत घातले. त्याच शाळेत जोतिराव फुले हे ही शिकत होते. ते उस्मानचे वर्गमित्र होते. पुढे त्यांचे मैत्रीत रूपांतर झाले.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जोतीराव फुले यांनी मुलींना व अस्पृश्यांना शिक्षण देण्यासाठी शाळा सुरू केली. त्यांची पत्नी सावित्रीही त्यांना मदत करीत होत्या. त्यांच्या कार्याची माहिती हळूहळू सर्वत्र पसरली.

फातिमाला जेव्हा फुले दांपत्याच्या कार्याबद्दल समजले तेव्हा तिने त्यांची भेट घडवून आणण्याबद्दल उस्मानकडे आग्रह धरला. उस्माननेही ते कबूल केले. ते त्यांचा हा विचार चालू असतानांच एके दिवशी अचानक गफ्फार बेग चाचा त्यांचेकडे आले.

त्यांचेबरोबर जोतीराव व सावित्री यांना पाहून फातिमा व उस्मानला आनंद झाला व आश्चर्यही वाटले. त्यावर बेग चाचांनी खुलासा केला की ब्राह्मण समाजाच्या दबावाला बळी पडून जोतीरावाचे वडील गोविंदराव यांनी या दोघांना घराबाहेर काढले आहे व त्यांना आश्रयाची गरज आहे. उस्मानने त्वरीत एक खोली त्यांना राहण्यास दिली. इतकेच नाही तर थोड्याच दिवसात उस्मानने त्यांचा संसार थाटून दिला.

जोतिरावाच्या आईंचे निधन त्यांच्या लहानपणी झाले होते. त्यानंतर त्यांचे पालन-पोषण सगुणाबाई या महिलेनं केले होते व त्यांना आईचे प्रेम दिले होते. जोतीराव व सावित्री यांना गोविंदरावांनी घराबाहेर काढले हे समजल्यानंतर सगुणाबाई त्यांचा शोध घेत-घेत उस्मानच्या घरी आल्या त्यांनी जोतीराव व सावित्री यांची भेट घेतली झालेल्या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले व त्यांच्याबरोबरच काम करू लागल्या.

फातिमा ही जोतिरावांच्या कुटुंबाचाच भाग बनली होती व त्यांना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कामात मदत करत होती. सावित्रीबाई सगुणा व इतर महिलांबरोबर ती घरोघर जाऊन शिक्षणाचा विशेषतः स्त्री शिक्षणाचा प्रसार करू लागली. इतकेच नव्हे तर सावित्रीबाई उदरनिवार्हासाठी गोधड्या शिवण्याचे काम करीत होत्या. त्यातही त्यांना ती मदत करू लागली.

वाचा : भारतीय अल्पसंख्याक समुदायांचे हक्क आणि आव्हाने

वाचा : भीमा कोरेगावमधील जयस्तंभ – राजकारण, जात आणि ब्रिटिशसत्तेची स्मृती

वाचा : मुरुगन ते मुनव्वर : द्वेषाचा विजयोत्सव आणि कलावंताचा मृत्यू

फातिमा अशिक्षित होती, पण तिला शिकण्याचं व शिकविण्याची आवड होती. म्हणून प्रथम तिनं जोतिराव सावित्रीच्या प्रौढ शाळेत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ती ट्रेन्ड (प्रशिक्षित) शिक्षिका झाली व तिने जोतीराव, सावित्रीबाई, गफ्फार मुन्शी बेग, वाळवेकर, गोवंडे, परांजपे, तात्यासाहेब भिडे, लहुजी वस्ताद व सावित्रीबाईंच्या महिला सहकारी यांचेबरोबर शिक्षण प्रसाराचे काम चालू ठेवले.

मुस्लिमांचा विशेषतः मुल्ला-मौलवीचा स्त्री शिक्षणाला विरोध असताना सुद्धा तो न जुमानता मुस्लिम मोहल्ल्यात घरोघरी जाऊन शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगू लागली व मुलां-मुलींना शाळेत पाठविण्याचे आवाहन करू लागली. त्यात ती बऱ्याच प्रमाणात यशस्वी झाली.

जोतिरावांनी प्रथम मुलींची शाळा काढली, त्यानंतर रात्रीची प्रौढ शिक्षण शाळा, ट्रेन्ड शिक्षकाची शाळा, विधवा महिलाचा आश्रम असे अनेक उपक्रम सुरू केले. या सर्व कामात फातिमा जोतीराव व सावित्रीबाईंना मदत करत होती व त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत होती. सावित्रीबाईबरोबर तिनेही सनातन्यांचे दगड, गोटे, शेण, शिव्या शाप यांचा मारा सहन केला होता. पण ती मागे हटली नाही.

२६ जानेवारी १८५३ रोजी जोतीराव व सावित्रीबाई यांनी विधवा महिलांच्या बाळंतपणासाठी बालहत्या प्रतिबंधक गृह उस्मान शेख यांच्या वाड्यात स्थापन केले. सावित्रीबाईंनी त्यासाठी खास बाळंतपणाचे ट्रेनिंग घेतले. फातिमानेही सुईनींचे ट्रेनिंग घेतले व ती त्यांना मदत करू लागली.

फुले दांपत्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करण्यासाठी १६ नोव्हेंबर १८५२ रोजी ब्रिटिश सरकारकडून त्यांचा भव्य-दिव्य सत्कार करण्यात आला. जोतीरावांच्या विनंतीवरून त्यांचेबरोबर काम करणाऱ्या शिक्षक शिक्षिकांचाही सत्कार सरकारने केला.

पुन्हा १२ फेब्रुवारी १८५३ रोजी ब्रिटिश सरकारने त्यांच्या अलौकीक शिक्षण व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांचा सत्कार केला. त्याचवेळी जोतीरावांचे हितचिंतक, मित्र परिवार, शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व पालक यांचेमार्फत जोतीरावांचा सत्कार करणेत आला.

तसेच शाळेतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव व बक्षिस समारंभ झाला. या सर्व कार्यक्रमाचे सूत्र संचालन फातिमा शेख हीने अत्यंत समर्थपणे केले. त्यांत तिच्या बुद्धिमतेची, हुशारीची, समय सूचकतेची व संयमी वृत्तीची चुणूक दिसून आली व तिला मुख्याध्यापकाचे प्रमोशन द्यावे अशी मागणी होऊ लागली.

१८५६मध्ये सावित्रीबाई काही दिवसाकाठी सातारा जिल्ह्यातील त्यांचे गांव नायगांव येथे गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मुख्याध्यापकाची जबाबदारी फातिमावर सोपविली होती. पण नायगांव येथे सावित्रीबाई आजारी पडल्यामुळे त्यांचा मुक्काम बरेच दिवस वाढला.

पण या काळात फातिमाने मुख्याध्यापकाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. फातिमाच्या कामाची ब्रिटिश अधिकारी व शिक्षण तज्ज्ञांनी प्रशंसा केली. फातिमा ही मुख्याध्यापक पदासाठी योग्य आहे, असे सर्वांचेच मत होते. त्यामुळे जोतीराव व सावित्रीबाई यांनी तिला मुख्याध्यापक केले.

आता फातिमाचे लग्नाचे वय झाले होते. म्हणून जोतीराव व उस्मान यांनी योग्य वराची निवड करून तिचे आलिशान लग्न लाऊन दिले. पण लग्नात हुंड्यांच्या विषयाला बगल दिली व लग्नाचा खर्च दोन्ही बाजूंनी समान केला.

वाचा : ‘अ’धर्मसंसदेत द्वेषपूर्ण भाषणांना कोणाचे अभय?

वाचा : इतिहासाच्या भगवेकरणाचा प्रयत्न

वाचा : सावरकरांच्या हिंदुराष्ट्रात वंचितांचे स्थान काय असेल?

जोतीराव व सावित्रीबाईंच्या प्रत्येक क्रांतिच्या यशात फातिमाचा महत्वाचा वाटा होता. फातिमाचा भाऊ उस्मान याचेही योगदान तितकेच महत्त्वाचे आहे. जोतीरावांच्या वडिलांनी त्यांना बाहेर काढल्यानंतर उस्मानने फक्त त्यांना खोली दिली नाही तर त्यांचा संसार थाटून दिला.

इतकेच नव्हे तर सावित्रीबाईंना गोधड्या शिवण्याचे मशिन घेण्यासाठी आर्थिक मदत केली. शिवाय प्रौढ शाळा, ट्रेन्ड शिक्षकांच्या नॉर्मल शाळा, बालहत्या प्रतिबंधक गृह वगैरे कामासाठी आपल्या वाड्यात जागा उपलब्ध करून दिली.

लेखकांनी (दिनकर विष्णू काकडे) फातिमा व उस्मान यांचे जोतीरावांच्या सामाजिक व शैक्षणिक क्रांतीत किती महत्त्वाचे योगदान आहे हे अत्यंत परिणामकारकपणे मांडले आहे.

“इथल्या भट-ब्राह्मणांनी वर्ण व्यवस्था परंपरेने स्त्रिला भोगदासी बनविले आहे, तर अतिशूद्राना पशूपेक्षाही दिनवाने जीवन कंठायला लावले आहे, निर्मिक हा एकच आहे. आणि आपण सारे त्याची एक जात लेकरे आहोत; सद्या समाज अंधारात चाचपडत आहे; त्याचा मेंदू गुलामगिरीने मंद झाला आहे. तो चेतनाहीन झाला असून त्याच्यात चेतना ओतली पाहिजे. या सर्वांवर एकच रामबाण उपाय आहे, तो म्हणजे शिक्षण, ज्ञान, विद्या आज ब्रिटिश सरकार आहे म्हणून आपण हे काम करू शकतो. त्याचा फायदा घेऊन शिक्षणाचा अधिकाधिक प्रचार-प्रसार केला पाहिजे, तरच हा समाज आणि राष्ट्र बलवान बनेल.”

ही जोतीराव फुलेंची महत्वाची मांडणी. अत्यंत परिणामकारकपणे ठसविण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. त्यासाठी मुक्ता साळवेच्या निबंधाचा केलेला प्रयत्न स्तुत्य आहे.

ईश्वर अल्लाह एकच आहे, मानवता धर्म हाच श्रेष्ठ धर्म आहे. समाज सेवा हीच ईश सेवा आहे, ज्ञानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे विचार ठसविण्यासाठी व ब्राह्मणवाद, जातीयवाद अनिष्ठ रूढी, परंपरा यांना विरोध करण्यासाठी कबीराचे दोहे, तुकाराम महाराजांचे अभंग, वगैरेंचा लेखकांनी अत्यंत खुबीने उपयोग केला आहे.

तसेच १८५७च्या बंडाचा खरा इतिहास व १ जानेवारी १८१८मध्ये शूर महार सैनिकांनी पेशव्याच्या बलाढ्य सेनेचा केलेला पराभव यांचा इतिहास जोतीराव फुले यांच्या तोंडी घालून त्याची योग्य प्रकारे गुंफन केली आहे. पुस्तक माहितीपूर्ण व वाचनीय आहे.

एस. एम. मुश्रीफ, पुणे

###

पुस्तकाचे नाव : भारतातील पहिली मुस्लिम शिक्षिका : फातिमा शेख

लेखक : दिनकर विष्णू काकडे

प्रकार : कादंबरी

प्रकाशक :

पृष्ठ : ११२

किमंत : १५० रुपये

जाता जाता: