मुरुगन ते मुनव्वर : द्वेषाचा विजयोत्सव आणि कलावंताचा मृत्यू

लाकार असो वा लेखक, त्यांच्या जीवावर उठणारा सांस्कृतिक दहशतवाद हा फक्त सध्याचा ट्रेंड नाही. परंपरेशी जोडलेल्या भारतात तो शेकडो वर्षांपासून नीट रुजवलेला आहे. धर्म-श्रद्धेची कुठलीही चिकित्सा मान्य नसलेल्या धर्मप्रिय, कर्मकांडनिष्ठ, परंपराअभिमानी भारतात चिकित्सक विचार मरणासन्न अवस्थेत आहे.

इथे सामाजिक, राजकीय, पारंपरिक, कौटुंबिक परंपरेची दहशत इतकी खोल रुजलेली आहे की त्यांची चिकित्साच अशक्य वाटते. त्यात भर म्हणजे बहुतेक भारतीय कलाकार, लेखक परंपरेच्या चिकित्सेपेक्षा तिचं रोमँटिक वर्णन करत सुटतात. याचेच अनुकरण अनेक कलाकार आणि लेखक करतात. जे करत नाहीत, त्यांना मरणाच्या धमक्यांना तोंड द्यावं लागतं.

काहींवर सरळ बहिष्कार घातला जातो तर काहींना व्यवस्थेतून बेदखल करण्याचे प्रयत्न केले जातात. पेरुमल मुरुगनसारख्या तमीळ लेखकाला स्वतःचं मरण घोषित करावं लागतं; तर सफदर हाशमींसारख्या पथनाट्य करणाऱ्या नाट्यकर्मीला प्रत्यक्ष मरावं लागतं. ही यादी आता वाढतच चालली असून याता भर पडली आहे कलाकारांची. यावेळेस त्यांची नावं आहेत प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी आणि कुणाल कामरा यांची…

इनकी नफ़रत का बहाना बन गया हूँ

हसां कर कितनों का सहारा बन गया हूँ।

टूटने पर इनकी ख़्वाहिश होगी पूरी

सही कहते हैं, मैं सितारा बन गया हूँ।

हा कदाचित शेवट आहे, माझं नाव मुनव्वर फारूकी आहे. माझा प्रवास इथपर्यंतच होता.

या कवितेच्या ओळी मुनव्वर फारुकी यांनी सोशल मीडियावर लिहिल्या. मुनव्वरच्या कार्यक्रमाला त्याच्या चाहत्यांची अफाट पसंती मिळते. पण गेल्या दोन महिन्यात काही मुठभर समाजकंटकांनी दिलेल्या धमक्यांमुळे त्याचे तब्बल 12  कार्यक्रम रद्द झाले.

वाचा : भारतात धार्मिक स्वातंत्र्याची अवस्था बिकट का होतेय?

वाचा : पश्चिम बंगाल निवडणुकीत काँग्रेसची ‘मुस्लिममुक्त’ धोरणे

महिनाभर अटकेत

काही दिवसांपूर्वी देवी-देवतांचा तथाकथित अपमान केल्याच्या आरोपांमुळे मुनव्वरला अटक करण्यात आली होती. पण अशी कोणतेही आक्षेपार्ह विनोद त्या कार्यक्रमात केले नसल्याचं मुनव्वरचं म्हणणं होतं. तरीही यासाठी तो एक महिना अटकेत होता.

मुनव्वरचा 28 नोव्हेंबर रोजी बंगळूरू येथे कार्यक्रम होणार होता पण तो रद्द झाला. बंगळूरू पोलिसांनी ‘वादग्रस्त व्यक्ती’ ठरवून मुनव्वरच्या कार्यक्रमाची परवागनी रद्द केली. तर काही उजव्या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी टाळे टोकून, आग लावण्याचीही धमकी दिली.

या दहशतीला घाबरून आयोजकांनी ‘डोंगरी टू नोव्हेयर’ हा कार्यक्रम रद्द केला. यानंतर मुनव्वरने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली. या पोस्टला त्याने कॅप्शन दिले, ‘द्वेष करणाऱ्यांचा विजय झाला. कलाकार हरला. अलविदा.’ “नफ़रत जीत गई, आर्टिस्ट हार गया। मेरा काम पूरा हुआ। गुड बाय। नाइंसाफ़ी..”

तो पुढे लिहितो, “आज बैंगलोर शो कैंसल हो गया (आयोजन स्थल को नुक़सान पहुंचाने के ख़तरे के चलते।) हमने 600 से अधिक टिकट बेचे थे।”

पोस्टमध्ये त्याने पुढे लिहिले की, नुकतचं अभिनेते पुनीत राजकुमार यांचं निधन झालं होतं. त्यांच्या स्वयंसेवी संस्थेला मदत मिळवून देण्यासाठी आम्ही या शोचं आयोजन केलं होतं. मी कधीही न केलेल्या विनोदांवरून मला तुरुंगात डांबण्यात आलं. काहीही आक्षेपार्ह नसलेले माझे शो रद्द करण्यात आले आहेत. हे चुकीचं आहे. या शोला देशातील सर्वधर्मीय नागरिकांकडून प्रेम मिळालं होतं.”

आपल्यासोबत अन्याय झाल्याचं म्हणत त्यानं लिहलंय, “वो जोक जो मैंने आज तक नहीं किया उस पर मुझे जेल भेजा गया उस शो को रद्द किया गया जिसमें कोई समस्या नहीं थी। यह बहुत ग़लत है। इस शो को भारत में बिना किसी धर्म के लोगों को बहुत प्यार मिला है। यह बहुत ग़लत है।”

हे प्रकरणं ताजं असतानाच कुणाल कामरा याचा बंगळुरू येथे होणारा कार्यक्रमदेखील रद्द करण्यात आला. पोलिसांनी परवानगी नाकारताना कोरोना प्रोटोकॉलचे कारण पुढे केले. तर काही संघटनांनी कार्यक्रमाच्या आयोजकांना धमक्या दिल्या, त्यामुळे नाइलाजास्तव हा कार्यक्रमही रद्द करण्यात आला.

यानंतर कुणाल कामरा यांनी ट्विटरवर एक उपहासात्मक पोस्ट लिहिली आहे, त्यात कुणाल म्हणतो, “हैलो बैंगलुरु, मैं आपको ये बताते हुए खुश हूं कि 20 दिन बाद प्रस्तावित मेरा शो रद्द कर दिया गया है। मैं कोरोना के नए व्हेरिएंट जैसे दिखता हूं।”

वाचा : कार्ल मार्क्सवर होता धर्म आणि विज्ञानाचा मोठा प्रभाव

वाचा : सम्राट अशोक ‘महान’ होतो, मग टिपू सुलतान का नाही?

भारतीय परंपरेत विनोद

व्यंगचित्रकार गजू तायडे या प्रकरणाचा निषेध व्यक्त करताना सांगतात की, “तुम्ही कोणत्या धर्माचे, विचारसरणीचे आहात हे महत्त्वाचे नसतं. कोणताही कलाकार हा व्यवस्थेच्या विरोधातच बोलत असतो. मुनव्वर काहीतरी करेल या भीतीपोटी त्याला बोलूच न देणं यापेक्षा अधिक भयावह कोणतीच गोष्ट नाही. व्यवस्था ही सत्य ऐकायला नेहमीच घाबरत असते म्हणून आवाज दाबून टाकणे हा मार्ग स्वीकारते.

यात राजकीय व्यवस्था ही अधिक भित्री असते कारण त्यांना सत्ता जाण्याची भीती वाटत असते. त्यामुळेच मुंबईत होणारे मुनव्वर यांचे शो देखील रद्द करण्यात आले. कलाकाराला त्याची कला सादर करू न देणे हे अमानुष आहे. यापुढेही हे सगळं वाढत जाण्याची भीती आहे.

अभिव्यक्तीचा संकोच होत चाललेल्या काळातच चांगले साहित्य किंवा कलाकृती निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. वेगवेगळे फॉर्म मोडून-तोडून कलाकार, लेखक आपल्या अमर्याद ताकदीने व्यक्त होण्याचा प्रयत्न करत असतो. पण जर समाजात कलाकार आणि लेखकांनाच व्यक्त होण्याची भीती निर्माण होऊ लागली तर हे मृत समाजाचे लक्षण आहे..”

साहित्यिक आणि कवियत्री डॉ. प्रज्ञा दया पवार या घटनेवरक व्यक्त होताना सांगतात, “कोणताही कलावंत हा समाजात दूही माजवण्याचा प्रयत्न करू शकत नाही. समाजात वैर निर्माण करण्याचे काम करू शकत नाही. शिवाय भारताची लोककला परंपरा पाहिली तर भारतातल्या प्रत्येक मौखिक परंपरेत देवाधर्मावर चिकित्सा केली आहे पण त्यामागे अपमान करण्याचा हेतू अजिबात नसतो तर आपल्या भोवतालच्या वास्तवातील विसंगतीवर कलाकार भाष्य करत असतो. समाजाला आरसा दाखवण्याचा प्रयत्न करत असतो.

विनोदी कलाप्रकाराची पायमुळं ही भारतीय परंपरेशी जोडलेली आहेत. सध्याच्या परिस्थिती आम्ही जे बोलतो किंवा आम्हाला जे ऐकायचं आहे तेच तुम्ही बोललं पाहिजे ही मानसिकता निर्माण झाली आहे. सांस्कृतिक राष्ट्रवाद थोपवण्याचा हा प्रकार आहे आणि याचा बळी मुनव्वर फारुक आहे.

अशा सर्जनशील आत्महत्या आपल्या सांस्कृतिक प्रवाहात होत असतील तर आपल्याला नेमकं काय हवं आहे, हा प्रश्न आपण सर्वांनीच विचारला पाहिजे. यावर समाजातील संवेदनशील वर्गाने, युवकांनी एकत्र यायला हवं आणि घटनेने दिलेल्या अधिकारांचा वापर करून आम्हाला कोणता आवाज ऐकायचा आहे, काय वाचायचं आहे, काय पहायचं आहे याबद्दल सामुहिकरित्या आवाज उठवला पाहिजे.

मुन्नवरचं मुस्लिम असणं हेही विसरुन चालणार नाही. एक विशिष्ट विचारसरणी ही मुसलमानांना भारतीय नागरिक म्हणून स्वीकार करण्याचा सातत्याने विरोध करते. त्यामुळे साहित्य संमेलनात जावेद अख्तर यांना होणारा विरोध असो किंवा मुनव्वरला होणारा विरोध यातून नव्याने कोणी फारुक निर्माण होऊ नये, तो बोलू नये यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. हे वेळीच थांबवलं नाही तर भविष्यात सांस्कृतिक सर्जनशील आत्महत्येची परंपरा भारतात सुरू होईल.” अशी भीतीही प्रज्ञा पवार यांनी या निमित्ताने व्यक्त केली.

वाचा : ‘ऑक्सफॅम अहवाल २०२१’ म्हणजे विषमतेचा विषाणू

वाचा : कोरोना : मुस्लिम समाज, आर्थिक विवंचना ते सेवाभाव!

मुरुगन ते मुनव्वर

बदललेल्या राजकीय वातावरणात दहशतीने सांस्कृतिक वर्चस्व निर्माण करणाऱ्यांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आलयं हे आता मान्यचं करावं लागेल. मुरुगन ते मुनव्वर प्रकरणाने हे सिद्ध केलय. जो समाज आपल्या राजकीय,धार्मिक, ऐतिहासिक आणि परंपरेची निर्भय चिकित्सा करत नाही, तो गोठून जातो.

मुळात अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही संकल्पनाच मोडून काढण्याचा पद्धतशीरपणे प्रयत्न सुरू आहे. इतकचं नाही तर भारतात तुम्हाला तुमच्या पद्धतीने जगण्याचं आणि काम करण्याचं स्वातंत्र मिळेल याची अपेक्षा यापुढे करू नका असा संदेश भारतीय मुसलमानांना देण्यासाठी मुनव्वर फारुकीसारखी उदाहरणं तयार केली जात आहेत.

मुस्लिमांना त्यांच्या कौशल्याचा वापर करून अर्थार्जन करू न देणं हा सध्या इथल्या व्यवस्थेचा महत्त्वाचा अजेंडा आहे. जसे की, फळ-भाजी विक्रेत्यांना हिंदू वस्ती असणाऱ्या भागात व्यवसाय करायला बंदी आणणं. मुस्लिम विक्रेत्यांकडून खरेदी न करणं, अनेक मांसाहारी खाद्य पदार्थांवर बंदी आणणं… ही यादी बरीच लांब आहे.

खरं तर भारतात मुस्लिमांचं सांस्कृतिक आणि साहित्यिक योगदान हे प्रचंड आहे. ते नाकारुन, मुस्लिमांचं आर्थिक स्वातंत्र्य संपुष्टात आणायचे, राजकीय अस्तित्व नष्ट करायचं, शिवाय पॉप्युलर कल्चरमधून मुस्लिमांना हळूहळू बेदखल करायचं हे काम अगदी पद्धशीरपणे सुरू झालय.

मग ‘फॅब इंडिया’ आणि ‘तनिष्क’च्या जाहिरातींना झालेला विरोध असो, गणेश चतुर्थीदिवशी ऊर्दूत शुभेच्छा देणाऱ्या सचिन पिळगावकर यांना ट्रोल करणं असो, चिन्मय मांडलेकरच्या मुलाचे नाव जहांगीर असण्यावरून ट्रोल करणं, कथित लव जिहादच्या नावाखालची प्रकरणं अशा स्थानिक ते राजकीय सांस्कृतिक पातळीच्या अनेक उदाहरणातून मुस्लिम किंवा इस्लामशी संबंधित गोष्टींना सातत्याने चुकीचं ठरवायचं आणि मेनस्ट्रीममधून त्यांना बेदखल करायचं शिस्तबद्ध कार्यक्रम राबवला जात आहे.

भारतासारख्या देशात केवळ माणूस म्हणून जगण्याचं स्वातंत्र्य मोठ्या लोकसंख्येला नाकारलं गेलं आहे. दलित, आदिवासी, भटक्या आणि विमुक्तांचे मानवी अधिकार जिथे नाकारले जातात तिथे कलाकाराच्या, लेखकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला किती महत्त्व द्यायचं, असाही प्रश्न पडतो.

एरवी कोणी अमर नाही. सगळी माणसं एक ना एक दिवस मरणारचं असतात, कलाकार आणि लेखकसुद्धा माणूस आहे म्हणून तोही मरेलच, पण जिवंतपणी असं मरण पत्करायला आपली व्यवस्था भाग पाडत असेल तर आपण खरंच माणूस आहोत का याचा विचार करावा लागेल.

हे असेच सुरू राहिले तर आपला समृद्ध  सांस्कृतिक ठेवा लोप पावत जाईल. खरे तर याची सुरुवात गेल्या सात वर्षांपासूनच झाली आहे. म्हणूनच सध्या माणूस म्हणून जगणाऱ्या प्रत्येकाचं आव्हान हे राजकीय नसून सांस्कृतिक आहे. हे वेळीच थांबवणं हे देखील प्रत्येक कलाकाराचं व त्याच्या कलेचंच काम आहे!

(सौजन्य : दिव्य मराठी)

जाता जाता :

* धर्मवाद आणि सेक्युलर राष्ट्रवादात का होतोय संघर्ष?

* सेक्युलॅरिझम धर्मीय की राजकीय विचारधारा?