मुस्लिमांच्या माणुसकीची मोडतोड सांगणारा ‘वर्तमानाचा वतनदार’

झोपलेल्या माणसाला जागे करणे सोपे असते पण झोपेचे सोंग करणाऱ्या माणसाला जागे करणे कठीण असते.  सोंग करणारी मानसिकता ही परिवर्तनाला नेहमी शत्रू मानते. परिवर्तनाला शत्रू मानणारी मानसिकता ही समाजाचे मानसिक आणि बौद्धिक खच्चीकरण करून समाजाला चौकटीत बंदिस्त करीत असते. ही मानसिकता समाजाला चौकटी बाहेर जाऊच देत नाही. या मानसिकतेचे मानवी जीवनाच्या संवेदनेशी काही देणेघेणे नसते.

या मानसशास्त्राच्या गुलामीत असणारी माणसे डोळे मिटवून या मानसशास्त्राचे पारायण करीत असतात. या लोकांना शहानिशा करणे परम अप्रिय वाटते. अशी माणसे परावलंबनाचे दास होतात. अशी माणसे प्रकृतीतः परिवर्तनाच्या विरोधातच असतात. ती माणसे माणुसकीला कुरूप करणाऱ्या प्रवृत्तीशी संग्राम करीत असतात, परिवर्तनाच्या उजेडाला थांबवणाऱ्या अंधाराच्या टिकऱ्या उडवित असतात, ती माणसे अंधाराला खाली मान घालायला लावतात याचा प्रत्यय अजीम नवाज राही यांच्या ‘वर्तमानाचा वतनदार’ या कवितासंग्रहामधून येतो.

‘वर्तमानाचा वतनदार’ हा कवितासंग्रह लोकवाङ्मय गृह मुंबई ने २०१७ला प्रकाशित केला आहे. यापूर्वी अजीम नवाज राही यांचे ‘व्यवहाराचा काळा घोडा’ २००४ आणि ‘कल्लोळातला एकांत’ २०१२ हे दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. अजीम नवाज राही हे नव्वदोत्तरी मराठी कवितेतील सर्जनशील कवी आहेत.

अजीम नवाज राही हे आपल्या कवितेमधून अवतीभोवतीच्या दुःखाशी चर्चा करणारे कवी आहेत. ते अवतीभोवतीच्या दुःखाशी केवळ चर्चाच करीत नाही तर त्या दुःखांना पराभूत करण्याचे सूत्र आपल्या कवितेमधून मांडतात. या दुःखांना पराभूत करण्याची अजिंक्य शक्ती त्यांना त्यांची कविता देते.

वाचा : शासनाच्या मराठी मंडळावर मुस्लिम का नाहीत?

वाचा : साहित्य-संस्कृती व्यवहारातील पालखीवाहू ‘मुस्लिम’

बोलक्या वेदना

अजीम नवाज राही यांच्या कवितासंग्रहांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले आहेत. इतरही अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या काही कवितांचा समावेश माध्यमिक व उच्च माध्यमिक अभ्यासक्रमात आहे. शिवाय महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठांमध्ये त्यांचे कवितासंग्रह विद्यापीठस्तरीय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट आहेत.

अजीम नवाज राही हे बुलंद आवाजाचे धनी आहेत. मराठी बरोबरच उर्दू साहित्याचा त्यांचा दांडगा अभ्यास आहे. ते कवी बरोबरच उत्तम सूत्रसंचालक, निवेदन आहेत. सूत्रसंचालनातून त्यांनी महाराष्ट्राबाहेरील लोकांवरही भूरळ घातली आहे. राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या अनेक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्यांनी केले आहे.

‘वर्तमानाचा वतनदार’ या कवितासंग्रहातील दार उघडणारी कविताच ‘सूत्रसंचालकाची रोजनिशी’ या शीर्षकाची आहे. या कवितेमधून कवी अजीम नवाज राही यांनी सूत्रसंचालकाची व्यथा आणि वेदना बोलक्या शब्दांत मांडली आहे.

‘सळसळत्या पिंपळासारखे राहावे लागते

सूत्रसंचालकाला सदा हरीत

आतल्याआत लपवाव्या लागतात

व्यावहारिक अडीअडचणींच्या पानगळी

एखाद्या शुष्क वाक्याची फांदी

चुकून वाणीतून डोकावली

की समयसूचकतेच्या इंद्रधनुष्यातून

कल्पक गुलालाची उधळावी लागते मूठ’ (पृ.क्र.८,9)

वरील ओळींमधील आशय हा सूत्रसंचालकाला वटवावी लागणाऱ्या भूमिकेतील रेखीवपणा स्पष्ट करणारा आहे. सूत्रसंचालक कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी कोणकोणती आयुधे वापरतो, कार्यक्रमाला वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी सूत्रसंचालक आपल्या निवेदनातून कार्यक्रमाचा विश्वासार्ह आशय फुलविण्यासाठी आपली बौद्धिक शक्ती पणाला कशी लावतो हे सूचित केले आहे.

अजीम नवाज राही यांच्या देहबोलीत सूत्रसंचालनाचे पद्धतीशास्त्र चांगलेच मुरलेले आहे. या पद्धतीशास्त्रामुळे त्यांनी प्रत्येक कार्यक्रमाला वेगळ्या उंचीवर नेले आहे. सूत्रसंचालनात बेजबाबदारपणाला, उथळपणाला अजिबात स्थान नसते. हेच कवीने सूचविले आहे.

‘माझ्या निवेदनाला गोचिडसारखी चिकटलेली जात.

समारंभातही सोडत नाही पिच्छा

म्हणणारे म्हणतात

याची वाणी विणते

श्रवणसौख्याच्या गाठी

मुसलमान असूनही

बोलतात अस्खलित मराठी

देण्याची इच्छा झाली तरी

औदार्याचा पान्हा चोरून

जात्यंध दानशूर आखडता हात घेतात

कलेलाही धर्माच्या चौकटीत नेतात

एक बिच्चारी भाषा आहे

की दिली नाही तिने सापत्न वागणूक कधी’ (पृ.क्र.११)

वाचा : मुस्लिमविषयक पुस्तकांचा वानवा का आहे?

वाचा : उर्दू इतिहासलेखनात शिवकालीन ग्रंथांचे महत्त्व

जातिव्यवस्थेवर प्रहार

वरील ओळींतील आशय कवीला उज्ज्वलतेकडे जाण्याची ऊर्जा पुरविणारा आहे. कवी आपल्या निवेदनातून कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आपली पूर्ण शक्ती पणाला लावतो. त्यामुळे कार्यक्रमाला वेगळी झळाळी येते हे अगदी खरे असले तरी येथील मानसिकता सूत्रसंचालकाची शैली न पाहता सूत्रसंचालकाची जात पाहते. येथील धर्मांध व्यवस्था कवीच्या प्रतिभेचे स्वागत करण्याऐवजी आपल्या द्वेषाच्या जात्यात त्याला भरडू पाहते. सूत्रसंचालक मुस्लिम असल्यामुळे कौतुकाचे संदर्भ बदलतात. धर्मांध मानसिकतेला सूत्रसंचालकाच्या प्रतिभेत स्वारस्य नसते.

‘बिरादरीच्या ताकदीवर मूठभर अडाणी

मोहल्ल्यात गुणवत्ता पायदळी तुडवतात

लायकाला बैठकीत मिळतो कोपरा

मध्यभागी बसून न्यायनिवाडा करतो

मनगटाने शेंबुड पुसणारा छोकरा’ (पृ.क्र. १5)

वरील ओळींमधून कवीने बिरादरीची मजबूत व्यूह संरचना कशी असते याचे विश्लेषण मांडले आहे. बिरादरी ही आपल्या हितासाठी लायक लोकांना डावलते आणि नालायक लोकांच्या मार्फत आपल्या हिताचा आशय सर्वांवर लादते. कवी अजीम नवाज राही यांनी वरील ओळींमधून मोहल्ल्याचे मानसशास्त्र मांडले आहे.

मोहल्यातील मानसशास्त्र हे सर्वसामान्य माणसाच्या संवेदनाविश्वाला घायाळ करणारे कसे आहे, तसेच समाजातील नव्या साहसांचे पंख कापणारे कसे आहे याचे मार्मिक विश्लेषण मोठ्या ताकदीने मांडले आहे. खरं पाहता काळ झपाट्याने बदलत आहे. बिरादरींनी ही आता आपल्या जुन्या मानसिकतेला निरोप द्यायला हवे. बिरादरींनी आपल्या चौकटींमधून बाहेर निघायला हवे.

‘अक्षरहीनतेच्या चिखलात धसलेल्यांची उभी हयात

तिथे तग धरणार कशा रसिकतेच्या वेली

उगवणाऱ्या दिवसाच्या पाठीवर

प्रापंचिक गरजांची पखाल’ (पृ.क्र. १9)

वरील ओळींमधून मुस्लिम भावजीवनातील स्वप्न कसे कोमजून जाते यांच्या नोंदी कवीने टिपल्या आहेत. मुस्लिम समाज वास्तवापासून लांब आहे की परिस्थितीने या समाजाला लांब ठेवले आहे. याचे प्रभावी चित्रण कवीने वरील ओळींमधून केले आहे. कवी मुस्लिम समाजाचे आक्रंदन मांडत असताना व्याकूळ होतो.

कारण मुस्लिम समाजाच्या प्रगतीला मारक ठरणारे संदर्भ कवीला चांगल्याप्रकारे माहीत आहे. मुस्लिम समाजजीवनाच्या सुंदर स्वप्नाचा गर्भपात रोजच होतो. शिक्षण हे मुस्लिम समाजाला अज्ञानाच्या जबड्यातून बाहेर काढू शकतो. शिक्षण हे मुस्लिम समाजाला त्याच्या समृद्धीच्या असंख्य वाटा उघडून देईल. अशी तर्कसंगत मांडणी कवी अजीम नवाज राही यांनी वरील ओळींमधून केली आहे.

‘माणसांवर जनावरासारखी तुटून पडतात माणसं

मनसोक्त भाजतात हेव्यादाव्याची कणसं

मोहल्यात नसते सगळे कुशलमंगल

किरकोळ करणावरून उसळलेल्या हाणामारीला

मी संबोधू कोणती दंगल’ (पृ.क्र. २२,२3)

एकीकडे सामाजिक आणि आर्थिक विषमतेमुळे मोहल्ल्याचे जीवन करपलेले आहे तर दुसरीकडे मोहल्ल्यातील माणसांनी परस्परांतील प्रमोचा दोर स्वतःच्याच हातांनी कापलेला आहे. मोहल्ल्यातील माणसांनी माणुसकीची मोडतोड केली आहे.

खरं पाहता मोहल्ल्यातील माणसे परस्परांसाठी हितकारक ठरायला हवी होती. पण परस्परांशी भांडून स्वतःच परस्परांच्या दुःखांची कारणे ठरलीत. या लोकांनी परस्परांच्या जीवनात कलहाचे आणि असुरक्षिततेचे जहर स्वतःच पसरविले आहे. मग दुसऱ्यांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही.

मोहल्ल्याच्या अवनतीला इतरांना जबाबदार धरता येणार नाही ही कवीने स्पष्ट भूमिका मांडली आहे. कवीची ही भूमिका स्पष्टपणाची आहे. त्याचबरोबर मोहल्ल्याच्या वाटचालीत सुधारणा व्हायला हवी. मोहल्ल्यातील माणसांनी परस्परांचा सन्मान करणे, परस्परांच्या भावभावनांचे संवर्धन करायला हवे.

वाचा : मराठीतील ‘कोहिनूर-ए-गझल’ इलाही जमादार

वाचा : डॉ. दाऊद दळवी : एक व्यासंगी इतिहासकार

रोजीरोटीचा प्रश्न रोजचाच आहे. रोजीरोटीच्या प्रश्नांबरोबरच नव्या पिढीला शिक्षित करणेही गरजेचे आहे. आपसात भांडण करण्यापेक्षा संघटीत होऊन मोहल्ल्यापुढील आव्हानांशी मुकाबला करायला हवा. मोहल्ल्यापुढील आव्हान मोठे आहे हे खरे आहे. पण संघटीत होऊन आव्हानांना तुडविता येते हेही खरे आहे.

फक्त आपल्यासमोरील आव्हानांना तुडविण्याचा निर्धार हवा. आपसातील मारामारीला सोडचिठ्ठी देण्याची इच्छा हवी, आधुनिक शिक्षण घेण्याची लालसा हवी. भोवतीच्या पर्यावरणाचे स्पंदने ऐकण्याची सवय लावायला हवी. स्वतःतील अहंकार सोडण्याची सवय लावायला हवी. हे झाले तर मोहल्ल्यात माणुसकीचा बहर येईल. हा अजीम नवाज राही यांचा सल्ला मोहल्ल्याने आपल्या काळजात कोरून ठेवायला हवा.

अजीम नवाज राही यांची कविता तडजोडीची भाषा शिकवित नाही. ती संघर्षाची भाषा शिकविते. ती जीवनातील असमतोलपणावर भाष्य करते. ती जीवनातील ज्वलंत वास्तवावर भाष्य करते. ती माणसांभोवती लादलेल्या चौकटींचे सीमोल्लंघन करण्याचे प्रशिक्षण देते.

‘एक दयाळू कविता आहे बिच्चारी

की शोषून घेते माझी दुःखं सारी

अन् चुकूनही करत नाही

कंठ निळा झाल्याचा आकांडतांडव’ (पृ.क्र. ७२)

कवितेने कवीला नेहमी सजग केले आहे. कविता कवीला काय नाकारावे आणि काय स्वीकारावे हे शिकविते. जीवनातील समस्यांशी कसा मुकाबला करावा याचे प्रशिक्षण देते. कवितेने कवीला लढण्याचे बळ दिले आहे. जेव्हा अवतीभोवतीची परिस्थिती कवीला लाचार करण्याचा प्रयत्न करते, कवीचे पंख कापण्याचे षडयंत्र रचते, कवीला वास्तवापासून तोडण्याचा प्रयत्न करते तेव्हा कविताच कवीला अवसानघातकी परिस्थितीशी लढण्याचे बळ देते.

अजीम नवाज राही यांची कविता त्यांना आपल्या उरात मानवीसौंदर्य वागविण्याचे बळ देते. अजीम नवाज राही यांची कविता त्यांना कधी विझू देत नाही. त्यांना कधी आपल्या बौद्धिकतेशी बेईमानी करू देत नाही. हेच अजीम नवाज राही यांच्या कवितेचे

मर्मशास्त्र आहे.

‘माझी कविता एकवटून आहे

गरिबीच्या अलीकडची, गरिबीच्या पलीकडची विव्हळणे’ (पृ.क्र. ८१)

वाचा : नवीन लेखकांसाठी पुस्तके प्रकाशित करण्याची सोपी प्रक्रिया

वाचा : मराठी ज्ञान, रोजगाराची आणि अभिजात होण्याची त्रिसूत्री!

वरील ओळींमधील आशय अंतर्मुख करणारा आहे. कवी आपल्या कवितेद्वारे शोषित, पीडित, गरीब माणसांसाठी आंदोलन सुरू करतो. तो गरिबीचे अत्यंत प्रत्ययकारी चित्रण करतो कारण गरिबी माणसाला खूप छळते. गरिबी माणसाच्या स्वाभिमानाची हत्या करते. म्हणून कवी गरीब माणसांचे माणूसपण टिकविण्यासाठी आपल्या कवितेमधून आकांत मांडतो. पण कवीचा आकांत व्यवस्थेला दिसत नाही.

‘जात्यंध खेळताहेत आजही धर्माचा खेळ

बिरादरी असणारे सजातीय

अत्यल्पांना छळताहेत खुलेआम

सुरक्षेची हमी देणाऱ्या कळपवादा

तुला नगण्यांचा मनोभावे सलाम’ (पृ.क्र. ८७)

धर्मांध मानसिकतेने मुस्लिम समाजाच्या मानवी प्रतिष्ठेची राखरांगोळी केली आहे. मुस्लिम समाजाला परकीय ठरविण्यात, देशद्रोही ठरविण्यात, दुय्यम ठरविण्यात कोणतीच कसर सोडली नाही. या मानसिकतेने मुस्लिम समाजाला त्यांच्या माणूसपणापासून तोडण्याची कोणतीच कसर सोडली नाही.

या मानसिकतेने मुस्लिम समाजात भीतीचे वातावरण विकसित केले आहे. हे जसे खरे आहे तसेच मुस्लिम समाजातील बिरादरींच्या ठेकेदारांनीही मुस्लिम समाजाची गळचेपी केली आहे. ही वेदना कवीने मोठ्या प्रभावीपणे मांडली आहे. कवी म्हणतो की, येथील धर्मांध शक्ती आणि बिरादरीवादी शक्तीने आपल्या अहंकाराने सर्वसामान्य मुस्लिम समाजाला वेठीस धरले आहे. कवी अजीम नवाज राही यांनी येथील एकूणच कळपवादाच्या विरोधात संग्राम पुकारला आहे. कवीचा संग्राम हा येथील समंजस सहजीवनासाठी आहे.

‘सुपाएवढं अंतःकरण ठेवलं शाबूत

घेतली नाही भूमिका बोटचेपी

बसलो नाही आळीमिळी गुपचिळी

दाबणाऱ्यांनी दाबले

दाबून दाबून धपापले’ (पृ.क्र. 9८)

वरील ओळींमधील आशय हा उत्कट स्वरूपाचा आहे. सुपाएवढं अंतःकरण शाबूत ठेवणे म्हणजे इतरांविषयी ममत्व भाव आपल्या हृदयात जपणे होय. कवीने बोटचेपी भूमिका घेणाऱ्या माणसांपुढे विधायकतेचा पर्याय उभा केला आहे. कवी कधीही आपल्या मनाला असुंदराचा हवाली करीत नाही. त्यामुळेच कवीला आपल्या विशाल हृदयात माणुसकीचे असीम सौंदर्य जपता आले आहे. हे सौंदर्यच कवीला अद्ययावत होण्यासाठी बळ देते.

अजीम नवाज राही यांच्या ‘वर्तमानाचा वतनदार’ या कविता संग्रहातील प्रतिमासृष्टीने मराठी कवितेची मौलिकता वाढविली आहे. नवनव्या प्रतिमांमुळे कवितेतील आशयाला चिंतशीलता प्राप्त झाली आहे.

कवी अजीम नवाज राही यांची कविता ही प्रयोगशील आहे. त्यांनी बदलत्या भावजीवनाचे अत्यंत तरल चित्रण आपल्या कवितेमधून केले आहे. अजीम नवाज राही यांच्या कवितेचे वेगळेपण हे त्यांच्या प्रयोगशील शब्दरचनेत, शैलीत, अभिव्यक्तीत आहे. त्यामुळे त्यांची कविता ही अधिक आशयसंपन्न झाली आहे.

राही यांची कविता अवतीभोवतीच्या नकाराला नाकारत पुढे जाते. त्याचप्रमाणे मोहल्ल्यातील नकारांनाही ती नाकारते. त्यांच्या कवितेमुळे मोहल्यातील पतझडीचा वीण शैल झाला आहे. त्यांची कविता मोहल्ल्यातील असुंदराशी मूलगामी संग्राम करते. हा संग्राम मोहल्ल्यातील चांगुलपणा वाचविण्यासाठी जसा आहे तसाच तो एकूणच मानवी जीवनाच्या सर्वकल्याणासाठीही आहे.

###

पुस्तकाचे नाव : ‘वर्तमानाचा वतनदार’

भाषा : मराठी

प्रकार : कवितासंग्रह

प्रकाशक : लोकवाङ्मय गृह, मुंबई

किंमत : १६०

पृष्ठे : १०३

जाता जाता :