सावरकरांच्या हिंदुराष्ट्रात वंचितांचे स्थान काय असेल ?

सावरकर, त्यांची हिंदुत्ववादी विचारप्रणाली आणि हिंदुराष्ट्राची त्यांची संकल्पना, हे विषय गेल्या काही दिवसांत सतत चर्चेत आले. त्यांच्याबद्दलच्या श्रद्धेला आणि निव्वळ विरोधालाही मुरड घालून चिकित्सा केल्यास काय दिसते?

गेल्या काही दिवसांपासून सावरकर, त्यांची हिंदुत्ववादी विचारप्रणाली आणि हिंदुराष्ट्राची त्यांची संकल्पना, हे विषय सतत चर्चेत असलेले दिसतात. नेमकेपणाने सांगायचे झाले, तर सावरकरांना ‘भारतरत्न’ किताब/पुरस्कार द्यावा, ही मागणी सुरू झाल्यापासून ही चर्चा खूपच गतिशील झाली आहे.

ही सारी चर्चा या देशातील शंभर कोटी हिंदू, त्यांचा सर्वंकष विकास, त्यांच्या प्राचीन संस्कृतीची वृद्धी आणि संरक्षण आदी मुद्दय़ांना धरून व्हायला पाहिजे होती; पण तसे झालेले दिसत नाही. उलट हिंदुराष्ट्राची व्याख्या, तिच्या कक्षेत येणारे हिंदू आणि कक्षेबाहेरील हेतुपुरस्सर ठेवण्यात आलेले मुस्लीम, ख्रिश्चनादी धार्मिक अल्पसंख्य यांच्याशी संबंधित असलेल्या विषयासंदर्भातच राहिली.

वास्तविक सावरकरांचा हिंदुराष्ट्राविषयीचा आग्रह, त्याला पूरक अशी हिंदुत्ववादी विचारप्रणाली पाहता, या मुद्दय़ांसंदर्भात व्यावहारिक आणि वस्तुदर्शी चिकित्सा व्हावयास हवी होती. कारण अशा चिकित्सक चर्चेतूनच सावरकरांचे राजकीय तत्त्वज्ञान आणि राष्ट्रवादाची संज्ञा यांच्या योग्यअयोग्यतेची आणि यशापयशाचे यथायोग्य मूल्यमापन करता येणे शक्य झाले असते.

वाचा : संघ-परिवाराने राज्यघटनेला विरोध का केला होता?

वाचा : सेक्युलॅरिझम धर्मीय की राजकीय विचारधारा?

‘पितृभू’ आणि ‘पुण्यभू’

सावरकरांचे समर्थक आणि विरोधक या दोन्ही पक्षांनी सावरकरांविषयी आदर राखून वास्तव आणि तर्कशुद्धता या निकषांच्या आधारे सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि विचारांचे यथायोग्य मूल्यमापन करायला हवे होते. मात्र, तसे न करता या दोन्ही पक्षांनी ही चर्चा भावनिकतेच्या वर्तुळातच फिरत ठेवली.

काँग्रेस, समाजवादी पक्षांसारख्या पुरोगामी आणि धर्मनिरपेक्षतावादी राजकीय पक्षांनीही निर्भेळ ‘सेक्युलर’ भूमिका घेण्याऐवजी सौम्य हिंदुत्ववादी भूमिका घेतली. परिणामत: ‘तेल गेले, तूपही गेले, हाती धुपाटणे आले’ अशी त्यांची अवस्था झाली आहे.

दुसरीकडे सर्वसामान्य हिंदू समाजाच्या मानसिकतेवर हिंदुत्ववादी विचारप्रणालीचा प्रभाव दिवसागणिक वाढत चालला आहे. असे असूनही हिंदू समाजातील कष्टकरी, कामकरी, शोषित, वंचित विकासापासून वंचितच राहिले आहेत आणि जोपर्यंत आपण आपल्याच प्रथा-परंपरांची आणि राजकीय विचारांची चिकित्सा करत नाही, तोपर्यंत शोषित-वंचितांचा विकास गतिशील होऊच शकणार नाही.

आपल्या सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरांतील कालबाह्य़ आणि कालातीत भाग कोणता, याचा आपण विवेकवादी विचार करू शकतो आणि पर्यायाने विकासासाठी नवे मार्ग शोधण्याचा प्रयत्न करू शकतो. पण असे प्रयत्न तेव्हाच शक्य होतात, जेव्हा आपण आपल्या श्रद्धांना आणि भावनांना मुरड घालून चिकित्सेचा मार्ग अवलंबू शकतो.

सावरकरांनी १९२३ साली ‘हिंदुत्व’ हा ग्रंथ लिहून हिंदुत्व विचारप्रणाली आणि हिंदुराष्ट्राच्या संकल्पनेची सविस्तर मांडणी केली. त्यांच्या व्याख्येप्रमाणे, उत्तरेस सिंधू नदीपासून दक्षिणेस सिंधू सागरापर्यंत हिंदुस्थानची भूमी ज्यांची पितृभू आणि पुण्यभू आहे, तीच व्यक्ती हिंदुराष्ट्राची नागरिक होऊ शकते.

या व्याख्येतील ‘पितृभू’ आणि ‘पुण्यभू’ हे दोन शब्द महत्त्वाचे आहेत. या शब्दांचा अन्वयार्थ स्पष्ट करताना सावरकरांनी म्हटले आहे की, ज्यांचे पूर्वज या भूमीत जन्मले, जगले आणि अंतिमत: तिच्यातच विलीन झाले, त्यांच्या वारसांना या पैतृक हक्काने वारसा प्राप्त होतो. म्हणून ती त्यांची पितृभू होऊ शकते; पण पुण्यभू होऊ शकत नाही.

कारण त्यांचे धर्म, धार्मिक परंपरा, संस्कृती, सणवार या भूमीत जन्मलेले आणि विकसित झालेले नसतात. या निकषांमुळे मुस्लीम, ख्रिश्चन, पारशी, ज्यू आदी आपोआपच या व्याख्येच्या कक्षेबाहेर फेकले गेले आहेत. अशा परिस्थितीत भारतीय मुसलमानांचे काय करायचे, असा प्रश्न उपस्थित होतोच. (हाही विषय तसा व्यापकच आहे. स्थलाभावी त्याचा इथे विचार करणे शक्य होणार नाही.)

वाचा : काय आहे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा इतिहास?

वाचा : धर्मवाद आणि सेक्युलर राष्ट्रवादात का होतोय संघर्ष?

जातिव्यवस्थेचे काय करायचे?

सावरकरांच्या उपरोक्त ग्रंथात हिंदू संस्कृतीचे उल्लेख अनेक ठिकाणी आले आहेत. त्यातील दोन प्रातिनिधिक मुद्दय़ांचा इथे विचार करता येईल. त्यात एके ठिकाणी ‘संस्कृती म्हणजे काय?’ असा प्रश्न उपस्थित करून सावरकरांनी म्हटले आहे की,

‘राष्ट्राच्या संस्कृतीचा इतिहास म्हणजे त्याच्या विचारांचा, आचारांचा आणि संपादितांचा विचार होय. वाङ्मय आणि कला यावरून राष्ट्राची वैचारिक उंची कळते. इतिहास आणि सामाजिक चालीरीती यांच्यायोगे रूढ आचारांची आणि त्याने साध्य केलेल्या पराक्रम – दिग्विजयाची माहिती होते आणि या साऱ्यामधून माणूस वेगळा असा राहत नाही.’

सावरकरांनी वरील काही ओळींतून समग्र संस्कृतीचे विश्लेषण केले आहे, यात शंका नाही आणि याबाबतीत कुणाचे मतभेदही होणार नाहीत. पण जगातील सर्वच संस्कृतींचा विचार आणखी एका दृष्टिकोनातून करता येतो आणि तसा तो होणेही आवश्यक असते.

जगातील बहुतेक संस्कृतींना काही हजार वर्षांचा इतिहास आहे. या प्रदीर्घ प्रवासात अशा संस्कृतीत काही हीन प्रथा-परंपरा निर्माण झाल्यात का? समता-न्यायासारखी उच्च मूल्ये पराभूत झालीत का? समाजातील शोषित-वंचितांवर होणारे अन्याय-अत्याचार कमी झाले का? असे अनेक प्रश्न या संदर्भात उपस्थित होतात आणि त्यांच्या अनुषंगानेही संस्कृतीचा शोध आणि बोध घेणे त्या समाजाच्या प्रगतीच्या दृष्टीने आवश्यक असते.

कारण अशा विवेकवादी अभ्यासातूनच आपल्याला आपल्याच संस्कृतीतील कालबाह्य़ गोष्टी कुठल्या व कालातीत कुठल्या, हे सारासार विचाराने समजून घेता येते. अशा काही विध्वंसक वृत्ती-प्रवृत्तींचा एखाद्या प्राचीन संस्कृतीत प्रवेश झाला असेल, तर त्या संस्कृतीच्या ऱ्हासाला सुरुवात झाली आहे, असे निश्चितपणे म्हणता येते.

आपल्या संस्कृतीबाबत सावरकरांनी असेही म्हटले आहे की, ‘आमचे सर्वाचे सण आणि उत्सव एकच आहेत. जिथे जिथे म्हणून हिंदू राहत आहेत, त्या त्या साऱ्यांना दसरा, दिवाळी, रक्षाबंधन, होळी हे सण अत्यानंदाचे वाटतात. शीख आणि जैन, ब्राह्मण आणि पंचम हे झाडून सारे हिंदू जगत् दिवाळीच्या आनंदोत्सवात बुडून गेलेले असतात.’

वाचा : दंगलीतून सहिष्णुता अंगीकारण्याचा बोध घ्यावा

वाचा : मनावर आणि जिभेवर लादलेली बंधने म्हणजे स्वातंत्र्यहरणच!

समाज एकात्म होईल?

प्राचीन भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेले सणवार-उत्सवांचे सावरकरांनी केलेले वरील विश्लेषणसुद्धा अर्धसत्य आहे. कारण या देशातील बहुसंख्य हिंदू हे ज्याला आपण ढोबळपणे ‘हिंदू धर्म’ म्हणतो त्याचेच अनुयायी असले आणि त्यांचे सणवार, उत्सव वरवर पाहता समान दिसत असले, तरी हिंदू समाज जन्मजात विषमता, शोषण व गुलामगिरी अंगभूत असलेला व अनेक जाती-जमातींत विभागला गेलेला आहे.

हा हिंदू समाज एकात्म असा कधीच नव्हता, अजूनही नाही. कारण अन्याय, शोषण, गुलामगिरी ही ज्या संस्कृतीची व्यवच्छेदक लक्षणे असतात, अशा समाजात उच्चवर्णीयांचे हितसंबंध गुंतलेले असतात. म्हणूनच त्यांना अशी ही संस्कृती टिकून राहावी असे वाटत असते; पण ज्या ८० टक्के लोकांच्या दारिद्रय़ व गुलामगिरीवर ही संस्कृती उभी आहे, त्या गुलामांनाही तिच्याविषयी अभिमान बाळगावा, असे म्हणण्याचा आपल्याला काय अधिकार आहे?

अन्याय, शोषण वा गुलामी ठासून भरलेल्या या प्राचीन भारतीय संस्कृतीवर नरहर कुरुंदकरांनी फार मार्मिक भाष्य केले आहे. ‘शिवरात्र’ या त्यांच्या ग्रंथात त्यांनी म्हटले आहे की,

‘या देशात इतिहासाचा पुरावा सापडतो तेव्हापासून एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत जनावरांचे आठवडी बाजार भरावेत तसे माणसांचे बाजार भरत असत आणि या बाजारातून राजरोस स्त्री-पुरुषांची खरेदी-विक्री होत असे.

राजेरजवाडे आणि जमीनदार यांना देव-देवळे आणि धर्म यांची गरज असे. या सर्व सरंजामदारांनी दासी, बटकी, कलावंतिणी, नर्तिका, वेश्या, देवदासी यांचा एक प्रचंड ताफाच्या ताफा राजवाडय़ातील राजे आणि देवळातील देव यांच्या मनोरंजनार्थ निर्माण केला होता.’

प्राचीन हिंदू संस्कृतीतील यांसारख्या हिणकस घटकांची दखल घेत असतानाच कुरुंदकरांनी त्यातील उच्च, उदात्त गोष्टींचीही दखल घेतली आहे. या संदर्भात त्यांनी म्हटले की, ‘प्राचीन भारतात कालिदास आहे. शंकराचार्य, कबीर, ज्ञानेश्वर आहेत. चंद्रगुप्त, शिवाजी, राणाप्रताप आहेत.

अजिंठा, वेरूळ, मीनाक्षीपुरम आहेत. या सगळ्यांविषयी माझ्या मनात आदर आणि अभिमान आहे. कारण ही माझ्याच संस्कृतीची विजयगाथा आहे. पण अभिमान असला म्हणजे जे सडके, गलिच्छ आणि गुलामगिरीचे जीवन त्या संस्कृतीने निर्माण केले होते, त्याहीविषयी अभिमान वाटावा याचे मला काहीच कारण दिसत नाही.’

कुरुंदकरांची ही चिकित्सा निश्चितच कठोर आहे; पण ती वस्तुदर्शी आहे म्हणून समतोल आहे, हे विसरता येत नाही. सावरकरांच्या लिखाणात मात्र अशा कठोर, तरी समतोल विश्लेषणाचा पूर्णपणे अभाव दिसतो.

परंपरांच्या जाळ्यात अडकून पडलेल्या समाजात प्रगती आणि विकास घडवून आणायचा असेल, तर अशा समाजात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्याशिवाय दुसरा मार्ग नसतो. पण अशा परंपरावादी समाजात ज्यांचे हितसंबंध गुंतलेले असतात, त्यांचा कुठल्याही परिवर्तनाला विरोध असतो. अशा परिस्थितीत सनातनी स्थितिप्रिय वृत्तीप्रवृत्तींशी परिवर्तनवाद्यांचा संघर्ष अटळ ठरतो.

महाराष्ट्र मात्र याबाबतीत नशीबवान म्हटला पाहिजे. कारण एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासूनच तिथे परिवर्तनवादी चळवळ सुरू झाली. महात्मा जोतीराव आणि सावित्रीबाई फुले या सुधारणावादी चळवळीचे आद्य प्रणेते होते, हे आज सर्वमान्य झाले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, गो. ग. आगरकर असे अनेक अतिरथी महारथी या चळवळीला लाभले. या चळवळीला शंभर टक्के यश मिळाले असे म्हणता येणार नाही; पण जे यश मिळाले ते निश्चितच दुर्लक्षिण्यासारखे नाही हे मान्य करावे लागेल.

जाता जाता :