तुर्कस्थानच्या कोण्या एका शहरात, मौलाना जलालुद्दीन लोकांना तत्त्वज्ञान सांगत. मस्जिदमध्ये भाषण देत. दिवसभर पुस्तकं वाचत बसत. मौलाना असूनही त्यांच्या विद्वत्तेपुढे भले भेले झुकत. तेथील सुलतान देखील त्यांचा आदर करीत, त्यांची भेट घेण्यापूर्वी त्यांना विचारात घेत.
तर असे हे मौलाना एकदा पाण्याच्या हौदाच्या शेजारी भली मोठी पुस्तके घेऊन वाचत बसले होते. तिथे एक फाटका फकीर आला त्याने मौलानाना विचारले, “तुम्ही काय करत आहात?” तेव्हा मौलाना म्हणाले, “तुला नाही समजणार!”
हे वाक्य ऐकल्यावर त्या फकिराने मौलाना जवळची सगळी पुस्तक पाण्यात टाकली. मौलाना चिडले म्हणाले, “जगभरातून ही पुस्तके मी मागवली होती आणि तू ती पाण्यात टाकलीस? तुला काही समजत नाही का?”
मौलानाचा राग बघून त्या फकिराने पाण्यात टाकलेली पुस्तके वर काढली आणि मौलानाना दिली. हे बघून आश्चर्यचकित झालेले मौलाना म्हणाले, “हे तू कसे केले?” तेव्हा तो फकीर म्हणाला, “मी जेव्हा तुम्हाला विचारले तुम्ही काय करत आहात? तेव्हा तुम्ही मला म्हणाला की, मला नाही समजणार. मी आता असे काही तरी करून दाखवले आहे जे तुम्हाला समजणार नाही.”
त्याच क्षणी मौलाना त्या फकिरासमोर झुकले आणि उठून उभा राहिले तो हाच क्षण ज्याने मौलाना जलालुद्दीनला कवी रुमी बनवण्यास भाग पाडले. रुमी यांच्या आयुष्यात दार्शनिक बनून आलेला फकीर दुसरा कोणी नाही तर ‘शम्स तब्रेजी’ होते.
या प्रसंगानंतर जलालुद्दीन रुमी यांनी लोकांना प्रवचन देणे, तत्त्वज्ञान सांगणे, बंद केले. मौलाना आता शम्सला घेऊन एके ठिकाणी बंद खोलीत राहू लागले. शम्सनी रुमीला ध्यान, साधना करायला शिकवले. त्यांनी रुमींना पुस्तकांच्या जगातून बाहेर काढून अनुभूतीच्या जोरावरच ज्ञान प्राप्त कसे करता येईल ते शिकवले. याचमुळे रुमी मस्जिदमध्ये जात नव्हते.
वाचा : वेद आणि उपनिषदांचा अभ्यासक अल्-बेरुनी
वाचा : गुरुविना घडलेले महान संगीतज्ज्ञ अमीर खुसरो
वाचा : प्रेषितांच्या स्मृती जपणारे बिजापूरचे आसार महाल
लोकांना हळूहळू शम्सचा राग येऊ लागला आणि ते त्यांच्या संबंधाबद्दल बोलू लागले. शम्सला जेव्हा हे समजले तेव्हा शम्स रुमीला सोडून दूर निघून गेले. रुमींना विरह सहन होईना, काही सुचेना, ते दरवाजा बंद करून शम्सची वाट बघत. एके दिवशी शम्सचे पत्रे आले ते सुखरूप आहेत.
रुमी प्रचंड खुष झाले आणि त्यांनी पत्रे व्यवहार सुरू करून शम्सना बोलावून घेतले. शम्स आले तेव्हा त्यांनी मौलाना रुमींना म्हटले की, “मला माहिती नव्हते की तुम्ही एवढे कमजोर आहात की, मी गेल्यावर तुम्हाला विरह सहन होणार नाही. माझ्या वियोगाने तुम्ही पवित्र झाला आहात खरे पण तुम्हाला दृढतेचा अभ्यास करायला हवा.”
पुन्हा दोघे एकत्रित राहू लागले आणि लोक पुन्हा बोलू लागली. एके रात्री रुमीच्या मुलाने शम्सला बाहेर बोलावून मारून टाकले. आणि प्रेत विहिरीत फेकून दिले. पुन्हा एकदा रुमी एकटे पडले. पण रुमीला वाटू लागले की, मागच्यावेळे सारखेच शम्स मला सोडून गेलेत तेव्हा ते येतील परत. याच कालखंडात जलालुद्दीन रुमींनी मानवी मनाचा ठाव घेणाऱ्या अन् प्रेमावर आधारित कविता केल्या.
शम्स रुमीच्या आयुष्यातून गेले ते लोकांनी त्यांच्या प्रेमाबद्दलचे चुकीचे अर्थ काढत गेल्यामुळे. शम्स गेल्यामुळे रुमी एकटे पडले होते पण त्यांनी त्यांच्या एकांताचा योग्य वापर केला, प्रेम आणि अध्यात्माची जोड त्यांनी त्यांचा एकांत घालवण्यासाठी केली. एकांतात तुम्हाला प्रेमच तारू शकते!
शम्स तब्रेजी आणि रुमी १२४४ पासून ते १२४८ पर्यंत एकत्रित होते. हाच कालखंड रुमी यांचा महत्त्वाचा कालखंड मानला जातो. याच कालखंडात रुमींनी ज्ञान आणि तत्त्वज्ञान सोडून प्रेमावर कविता करणे सुरू केले होते. हाच तो कालखंड ज्यावेळेस रुमींनी प्रेम आणि अध्यात्मसारख्या गोष्टीना एका उंचीवर नेऊन ठेवले होते. या चार वर्षात शम्स तब्रेजी यांनी रुमीला सांगितले की,
“तुम्ही जे काही शोधत आहात ते बाहेर शोधू नका, तुमच्या आत शोधा कारण तुम्ही ज्याला शोधता आहात तो तुम्हाला शोधत आहे.”
शम्स तब्रेजीच्या विरहात रुमी कविता करत. शम्स तब्रेजीला आठवत रुमी गोल-गोल फिरत नाचत असत. हेच गोल-गोल फिरत नाचणे ‘रख्से समा’ म्हणून उदयास आल. यानंतर बऱ्याच कविता त्यांनी याच पद्धतीने नाचत लिहिल्या.
एक दिवस रुमी सलाहुद्दीन सोनाराच्या दारावरून जात होते. सलाहुद्दीन सोन्याचे वर्क बनविण्यासाठी जोर जोरात सोने कुटत होते. सोने कुटत असताना त्याच्या हातोड्याची जी लय होती, त्या हातोड्याच्या कुटण्याने जे संगीत निर्माण होत होते, ते ऐकून त्या संगीताच्या तालावर रुमींनी फेर धरला. ते रस्त्यावरच गोल-गोल फिरून नाचू लागले. हतोड्याच्या लयीमुळे रुमींच्या मनातल संगीत जागृत झाले होते आणि ते नृत्य करू लागले होते, म्हणून त्यांनी त्या नृत्याला नाव दिलं ‘समा’. ‘समा’ म्हणजे ऐकणे, रख्स ए समा म्हणजे ऐकण्यातून निर्माण झालेले संगीत.
त्यामुळे सुफी संतांच्या आयुष्यात ऐकण्याला खूप महत्त्व आहे, संगीत ऐकण, गाणे ऐकणे आणि त्याचबरोबर अंतर्मनाचा आवाज ऐकणे !
असे म्हणले जाते की, रुमी एकदा नाचू लागले की सलग सलग तीन तीन दिवस नाचत राहत! बाराव्या शतकातील ‘रुमी’ने १२ वर्षे गोल फिरत नृत्य करत, ‘मसनवी’ नावाचं ६ खंडात्मक महाकाव्य लिहिले. याच पुस्तकात एक कथा आहे, ती अशी,
एकदा रुमी त्याच्या प्रेयसीला भेटायला तिच्या घरी जातात. अन तिच्या दारावर टक-टक करतात. आतून आवाज येतो, ‘कोण आहे?’ रुमी म्हणतात, ‘मी आहे.’
आतून आवाज येतो “माझं घर एवढं मोठं नाहीये ज्यात ‘मी’ अन ‘तू’ दोघेही राहू शकू, जा परत जा.” हे ऐकून रुमी निघून जातात, काही वर्षे साधना, ध्यान करून ते पुन्हा प्रेयसीकडे येतात, दार वाजवतात,
पुन्हा आतून आवाज येतो, ‘कोण आहे?’
यावेळी रुमी उत्तर देतात, ‘बाहेर पण तूच आहेस’, हे उत्तर ऐकून दरवाजा उघडला जातो.
वाचा : सम्राट अकबरला मूर्ख ठरवणाऱ्या बिरबल कथा
वाचा : शेतकऱ्यांकडून अधिक कर वसुलीस बाबरची होती मनाई
वाचा : बाबर : सुफी परंपरेवर अत्याधिक निष्ठा ठेवणारा राज्यकर्ता
रुमींनी पहिल्यांदा दार वाजवले होते तेव्हा त्यांनी ‘मी’ला संपवले नव्हते, म्हणून दार उघडले नव्हते. खरे तर ‘मी’/ माझे असे म्हणून आपण कुणावरही प्रेम नाही करू शकत. प्रेम करायचे असेल तर सर्व प्रथम ‘मी/माझे’चा त्याग करावा लागेल. कुणावरही प्रेम करताना आपला अहंकार पहिल्यांदा त्यागावा लागेल. नंतर आपल्याला त्याच्यात एकरूप व्हावे लागेल तरच बाहेर अन आत फक्त तूच असशील, असे रुमी म्हणायचे!
गरम तव्यावर जेव्हा पाण्याचे चार थेंब पडतात तेव्हा चर-चर असा आवाज येतो आणि थेंब नष्ट होतात म्हणजेच फनाह होतात. त्यानंतर फनाह होण्याची प्रक्रिया संपून जेव्हा त्या पाण्याच्या थेंबाचे वाफेत रूपांतर होत तेव्हा ते बखा होतात, म्हणजेच आसमंतात विलीन होतात.
सुफीजममध्ये ‘फनाह’ होणे म्हणजे स्वतःला नष्ट करणे. स्वतःला नष्ट करून परमात्म्याशी तादात्म्य पावणे तिच्याशी एकरूप होणे म्हणजे बखा होणे. रुमीच्या प्रेयसीन पहिल्यांदा दार उघडले नव्हते कारण ते स्वतःला, स्वतःच अस्तित्व नष्ट करू शकले नव्हते (फनाह) आणि त्यामुळेच ते तिच्याशी एकरूपही होऊ शकले नाही (बखा). पण दुसऱ्या वेळेस मात्र ते स्वतःच अस्तित्त्व नष्ट करून तिच्याशी एकरूप झाले होते.
सख्य प्रेम करणे आणि त्या व्यक्तीत एकरूप होणे हे जमायला हवे, अगदी प्रयत्नपूर्वक ते जमायला हवे. एखाद्याची सखी बनणे, मानसनिवरा बनणे इतके सोप्प नसते. सखी स्वतःत शोधायला भाग पाडते. तिच्या प्रकाशात आपण स्वतःला उजळून टाकावे.
रुमी म्हणतात, From the Distance You only see my Light. Come closer and you will know that I am you. जवळ गेल्याखेरीज आपल्याला कळत नाही की आपण किती एकरूप झालो आहोत.
जवळ जाण्याने तिच्यातील प्रकाश दिसतो. ज्यात आपण स्वतःला प्रकाशित करत जातो. त्याच प्रकाशात आपण आपल्यातली स्व नाहीसा करायचा असतो. ती अन तुम्ही एकच होता, ते त्याच प्रकाशात.
शम्सच्या विरहात रुमी बेभान होऊन नाचत राहायचे ते त्याच प्रकाशात. स्वतःसहित इतराना उजळवून टाकण्याचे कसब त्याच प्रकाशात होत अन् आहे. रुमीचा फक्त देह नाचत नव्हता तर त्यांचे मन नाचत होते. तो शम्समध्ये एवढे एकरूप झाले होते की, देह जरी रुमीचा असला तरी आत्मा मात्र शम्सचा होता. बुल्ले शाह म्हणतात, “जब कोई नाचता है तो उसकी देह नही नाचती, उसकी रुह नाचती है।”
प्रेमात असणाऱ्या व्यक्तीच नाचण असेच असते. नाचत तर देह असतो पण तुम्ही जिच्या प्रेमात असता त्या व्यक्तीच प्रेम तुम्हाला नाचवत असते.
वाचा : कशी होती तुघलक काळातील ईद?
वाचा : बाबरने शब्दबद्ध केलेला भारत कसा होता?
वाचा : अहमदनगर : मध्ययुगीन भारतातील ऐतिहसिक शहर
मानवाच्या प्रेमाचे दोन पैलू आहेत एक व्यक्त आणि दुसरा अव्यक्त प्रेम. आपण प्रेमात असतो तेव्हा आपल्या प्रेमिकेसाठी रुमीसारखे नेहनृत्य करून व्यक्त होतो. पण बऱ्याच वेळा आपण अव्यक्तही राहतो. खरे तर जगभरातील अनेक लोक कुणाना कुणावर तरी प्रेम करत असतात. पण ते व्यक्त होतातच असे नाही. बऱ्याच वेळा ते अव्यक्त राहून प्रेम करत राहतात.
तुमच्या आतील प्रेम हे बऱ्याच वेळा अव्यक्तच असते कारण कधी ते समाजमान्य होणार नाही म्हणून तर कधी कधी मन मारून. पण असे का त्याचा शोध मात्र आपण घेत नाही. हेच अव्यक्त प्रेम, दोघांच्यात असणार प्रेम वाढविण्याचे काम करत राहत. तुम्हाला वयाच्या कोणत्याही टप्प्यावर, कोणावरही प्रेम होऊ शकते. प्रेम ही अनुभूती असते. ती अनुभूती तुमची स्वतःची असती अन अनुभूतीच्या आधारावर केले जाणारे प्रेम हे नितांत देखणे असते!
तुम्हारी रोशनी में मैने प्यार करना सिखा
तुम्हारे सौंदर्य से मैने कविता लिखना सिखा
मेरे सिने के भीतर सिर्फ तुम्ही नृत्य करते हो
और तुम्हे कोई देख नही पाता।
कभी-कभार मैं तुम्हे नाचते हुए देखता हु
और वह दृश्य कला में तब्दील हो जाता है।
-मौलाना रुमी
जाता जाता :
- भिक मागून सर सय्यद यांनी जमा केला होता विद्यापीठासाठी निधी
- मौलाना आजाद यांनी भारतरत्न का नाकारला?
- ‘स्वातंत्र्य आंदोलनातील मुसलमान’ बेदखल का झाले?