बाबर : सुफी परंपरेवर अत्याधिक निष्ठा ठेवणारा राज्यकर्ता

बाबरला उदार सुफी विचारधारा त्याचा पिता शेख उमरकडून वारसा हक्कात मिळाली होती. उमर हा ख्वाजा बहाउद्दीनच्या नक्शबंदी परंपरेला मानणारा होता. ही पंरपरा सत्ता आणि राजकारणाला अध्यात्मातून वर्ज्य करत नाही. त्याउलट सत्तेच्या माध्यमातून मानवकल्याणाच्या उद्देशाला महत्त्व देते.

बाबरच्या पित्याने हयातभर या नक्शबंदी परंपरेची निष्ठेने सेवा केली. त्याच्यानंतर बाबरने ही परंपरा पुढे चालवली. उदार आणि सहिष्णू दृष्टिने सत्ता राबवली. त्याच्या धार्मिक दृष्टिकोनाची माहिती देताना राधेश्याम आपल्या ‘बाबर’ या ग्रंथामध्ये लिहितात,

“बाबरने आपल्या पूर्वजांकडून उदार धार्मिक दृष्टिकोन घेतला होता. आपल्या पुर्वजांप्रमाणे त्याला महान ईश्वराच्या शक्तिवर विश्वास होता.” बाबर कधीही धर्माच्या तत्त्वांना चिकटून बसला नाही. धर्मतत्त्वांच्या अंमलबजावणीसाठी त्याने बळाचाही वापर केला नाही.

उलट त्याने स्वतः धर्मनिष्ठाही बदलत ठेवल्या. राजकीय परिस्थितीनुसार त्यामध्ये त्याने लवचिकता आणली होती. परिस्थिती पूर्णतः विरोधात गेल्यानंतर त्याने  इराणच्या शाहची मदत घेतली. शाहच्या मर्जीप्रमाणे त्याने स्वतःला शिया पंथात परावर्तित केले.

वाचा : शेतकऱ्यांकडून अधिक कर वसुलीस बाबरची होती मनाई

वाचा : भारताच्या लोकजीवनाविषयी बाबरला होती आस्था

उदार धार्मिक दृष्टिकोन

आपल्या नाण्यांवर शिया धर्ममतांची मुल्ये लिहून घेतली. समरकंदची सत्ता हातातून जाऊ नये म्हणून त्याने शक्य ते सर्व प्रयत्न केले. त्यामध्ये धार्मिक मतांमधल्या परिवर्तनाचाही समावेश होता. पण त्याची ही सर्व प्रयत्न निष्फळ ठरली, समरकंद त्याला वाचवता आला नाही. तेव्हा तो पुन्हा त्याच्या पूर्वजांच्या मूळ सुन्नी पंथात परतला. पण त्याने शिया पंथीयांविरोधात कधीही सूड उगवला नाही.

भारतात आल्यानंतरही त्याचा हा उदार धार्मिक दृष्टिकोन कायम होता. पानिपतच्या युद्धातही त्याने अनेक सुफींशी संपर्क केला. त्यांच्या सान्निध्यात राहण्यात त्याला मोठा अभिमान वाटे. त्यांच्याकडून तो नेहमी मार्गदर्शन घेत असे. अनेक हिंदू सरदारांची त्याने पानिपतमध्ये मदत घेतली. हिंदूच्या मदतीवरच त्याला भारतात पाऊल ठेवता आले.

परिणामी पानिपतच्या लढाईत विजय मिळवल्यानंतर त्याने भारताची माहिती घेतली. तिथल्या समाजजीवनासह धर्मव्यवस्था समजून घेतली. हिंदूंच्या मदतीशिवाय आपण या देशावर राज्य करू शकत नाही, याची त्याला जाणीव होती.

म्हणून तो नेहमी हिंदू धर्ममतावलंबी सहकाऱ्यांशी आणि प्रजेशी सहिष्णुतेने वागत आला. त्याने अनेक मंदिरांना भेटी दिल्या. पण अपवाद वगळता मंदिरांना पाडण्याचे आदेश दिले नाहीत. राधेश्याम म्हणतात, “हिंदू राजा, जमीनदार, जहागिरदारांनी आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी त्याची मदत केली.

वाचा : बाबरने शब्दबद्ध केलेला भारत कसा होता?

वाचा : अहमदनगर : मध्ययुगीन भारतातील ऐतिहसिक शहर

धार्मिक स्थळे विध्वंसाचा (?) आरोप

मध्युयगातील धर्मांध विजेत्यांप्रमाणे त्याने हिंदूना मुसलमान बनवण्याचे प्रयत्न केले नाहीत. हिंदू संत तथा योगींवर कोणत्याही प्रकारचे प्रतिबंध लादले नाहीत. अथवा त्यांना मृत्युच्या खाईतही लोटले नाही. ना त्याने असे आदेश दिले ज्यामुळे त्याच्या धार्मिक विचारात असहिष्णुतेचा अंश सापडतो.

त्याच्या शासनकाळात हिंदू संत एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात स्वतंत्रतापूर्वक भ्रमण करू शकत होते. पंजाबवर त्याचे पूर्ण रुपात अधिपत्त्य होते. गुरुनानकांना आपल्या उपदेशांचा प्रचार करण्याची स्वतंत्रता होती.”

मंदिरा बाबतीतही त्याचे हेच धोरण होते. त्याने मंदिराने लुटली नाहीत. अथवा त्यावर धार्मिक प्रत्याक्रमण केले नाही.  मात्र त्याच्या काळात काही मंदिरांचा विध्वंस झाला, हे वास्तव आहे. यापैकी दोन ठिकाणची मंदिरे त्याच्या सरदारांनी पाडली आहेत. त्या सरदारांना बाबरने मंदिरांना तोडण्याचे आदेश दिले नव्हते. त्यामुळे त्या मंदिरांच्या विध्वंसाची जबाबदारी बाबरवर लादता येणार नाही.

मात्र उरवाच्या मूर्ती स्वतः बाबरने तोडल्या होत्या. इतिहासकार अतहर अब्बास रिजवी यांनी संपादित केलेल्या बाबरनाम्यात याचे सविस्तर विश्लेषण आलेले आहे. बाबरने या बद्दल स्वतः बाबरनाम्यात माहिती दिली आहे. तो लिहितो,

“उरवाच्या तिन्ही बाजुला मोठ्या डोंगररांगा आहे. या डोंगरावर लोकांनी मूर्ती कोरल्या आहेत. लहान मोठ्या सर्वप्रकारच्या मूर्ती आहेत. एक मोठी मूर्ती जी दक्षिणेच्या बाजुला आहे. २० गज उंच असेल. ही मूर्ती पूर्णतः नग्न आहे. आणि गुप्त अंग देखील झाकलेले नाहीत. नग्न मूर्तीच या ठिकाणाचा मोठा दोष आहे. मी त्याला नष्ट करण्याचा आदेश दिला.”

बाबरने उरवाच्या डोंगरावरील मूर्ती नष्ट करण्यासाठी दिलेला आदेश हा धर्मद्वेशावर आधारित नव्हता. त्याच्या मागे मूर्तीविरोधी प्रेरणाही नव्हत्या. नग्नतेचा एक दोष त्या मूर्तीमध्ये होता, त्यामुळे मी त्या हटवल्याचे त्याचे म्हणणे त्याने स्पष्टपणे बाबरनामात मांडले आहे.

वाचा : पुस्तकातून उरलेला बाबरी-आयोध्यावाद

वाचा : काय आहे अयोध्या-बाबरी मस्जिदीचा वाद?

सुफी परंपरेवर निष्ठा

बाबरने पानिपत जिंकल्यानंतर अनेक मंदिरे पाहिली. ज्या कुतुहलाने बाबरने भारताच्या विविध प्रदेशाची, वातावरणाची माहिती बाबरनाम्यात दिली आहे. त्याच कुतुहलाने त्याने मंदिरे पाहिल्यानंतर लिहिले आहे.

त्यामुळे बाबरवर मंदिरांच्या विध्वंसाचा अथवा धर्मांधतेचा आरोप लावता येणार नाही. मात्र बाबरच्या काही अधिकाऱ्यांनी मंदिरे तोडल्याचे वास्तव आपण नाकारू शकत नाही. तरीही मंदिर तोडल्याच्या या एकदोन घटना वगळता बाबरची राजवट ही अत्यंत सहिष्णू होती.

त्याच्या धार्मिक दृष्टिकोनातही संकुचितता नव्हती. अथवा त्याने कोणत्याही प्रसंगात अमानवीयता दाखवल्याचेही आढळत नाही. बाबर आणि बाबरी मस्जिदीच्या प्रकरणावरुन त्याच्यावर अनेकदा धर्मांधतेचा आरोप केला जातो. पण त्या बाबरी मस्जिदीशीही त्याचा प्रत्यक्ष संबंध दिसत नाही.

त्याच्या मीर बांकी या अधिकाऱ्यांनी बाबरला न कळवता, स्वतःहून घेतेल्या अशा पद्धतीच्या निर्णयासाठी बाबरला जबाबदार धरता येणार नाही. एकुणच बाबर हा मध्ययुगीन राज्यकर्त्यांच्या तुलनेत सुफी परंपरेवर अत्याधिक निष्ठा ठेवणारा राज्यकर्ता होता.

त्याने राज्य कारभार राबवताना धर्माला खुप कमी स्थान दिले. त्याच्या धार्मिक निष्ठा त्याने राजकारणावर लादल्या नाहीत. राधेश्याम त्याच्या व्यक्तित्वाची प्रशंसा करताना लिहितात, “तर बाबरचे व्यक्तित्व असे होते. जरी आज तो नसला तरी त्याचे प्रेरणा देणारे कार्य, त्याचे साहसी जीवन, सैनिकी यश, उत्तम चरित्र, आणि साहित्यिक प्रेरणा, इतिहासाच्या पानांवर सदैव त्याचे नाव अंकित करत राहतील.”

जाता जाता :