काय आहे अयोध्या-बाबरी मस्जिदीचा वाद?

स्वतंत्र भारताच्या राजकारणाला आणीबाणीनंतर अयोध्या आंदोलनाने सर्वाधिक प्रभावित केले. रामजन्मभूमी आंदोलनानंतर देशाचे राजकारण पुर्णतः बदलले. राजकारणात भौतिक प्रश्न, सामाजिक समस्यांपेक्षा धार्मिक श्रद्धांना महत्त्वाचे स्थान मिळाले. कालांतराने या श्रद्धांना राष्ट्रीय अस्मितांचे स्वरुप देण्याचा प्रयत्न एका गटाकडून करण्यात आला. त्यातून निर्माण झालेल्या सांस्कृतिक राष्ट्रवादाने देशातील अनेक धर्म-समुदायांच्या अस्तित्वाला वेठीस धरले. त्यामुळे हा अयोध्या प्रश्न मुळापासून समजून घेण्याची गरज आहे.

अयोध्येतील बाबरी मस्जिद-रामजन्मभूमी वादाची सुरुवात ब्रिटिशांच्या सत्ताकाळात झाली. त्यापूर्वी या वादावरुन हिंदू-मुस्लिमांचा संघर्ष झाल्याचे इतिहासात नमुद नाही. ब्रिटिशांनी वसाहतिक सत्तेच्या गरजेपोटी अशा अनेक वादांना चालना दिली. त्याला पुरक असा इतिहास रचून त्या दिशेने समाजमन विकसित करण्याचा प्रयत्न केला.

मध्ययुगाचा इतिहास लिहिणाऱ्या जेम्स मिल, एलिएट, डाऊसन, किर्क पेट्रीक, कर्नल टॉड या इतिहासकारांनी इतिहासात सांप्रदायिक राजकारणाला पोषक असे संदर्भ निर्माण करुन ठेवले आहेत. अयोध्येत रामाचे मंदिर पाडून बाबरी मस्जिद बांधल्याचा उल्लेख मध्ययुगीन इतिहासाच्या साधनात कुठेच आढळत नाही.

परंतु ब्रिटिश कालीन आणि युरोपियन इतिहासकारांनी लिहिलेल्या ग्रंथात बाबरी मस्जिद संदर्भात असे आरोप ठेवणारे लिखाण करण्यात आले आहे. इंग्रजांच्या काळात झालेल्या सर्वेक्षणातून एडवर्ड बेलफोर या पुरातत्व अभ्यासकाने तीन हिंदू धर्मीय श्रद्धास्थानांच्या ठिकाणी मस्जिदी बांधण्यात आल्याचा उल्लेख केला आहे.

हा अहवाल त्याने साधारण १८५८मध्ये दिला आहे. त्यानंतर सन १८८१मध्ये फैजाबाद गॅझेटमध्ये इंग्रजांनी तशा नोंदी करुन ठेवल्या. इंग्रजांनी केलेल्या या सर्व नोंदी मुस्लिम सत्ताधिशांना बदनाम करण्याच्या ऐतिहासिक प्रयत्नांचा एक भाग होता.

मीर बाकीने इसवी सन १५२८मध्ये बाबरी मस्जिद बांधली. त्यावेळी झालेल्या कसल्याही संघर्षाची अथवा मंदिर पाडल्याची माहिती तत्कालीन साधनात आढळत नाही. वादग्रस्त जमिनीवर मस्जिदसमोर हिंदूनी अकबराच्या काळात चबुतरा बांधला. त्या चबुतऱ्यावर हिंदू धर्मियांचे नित्योपचार सुरू होते.

त्यानंतर जवळपास तीन शतकांपर्यंत या जमीनीविषयी कोणताही वाद निर्माण झाल्याचे संदर्भ आढळत नाहीत. प्राप्त माहितीनुसार अयोध्येचा हा वाद सन १८५५ पासून सुरू आहे. त्यावेळी काही हिंदू आणि मुस्लिमांमध्ये मंदिर वादावरुन थेट संघर्ष झाला. त्या संघर्षानंतर हिंदू आणि मुस्लिमांनी सामंजस्याने हा वाद मिटवला.

नमाजवेळी कोणतीही पूजा केली जाणार नाही. सेच पूजा सुरू असताना नमाज पठण केली जाणार नसल्याचे ठरवण्यात आले. त्यानंतर इसवी सन १८८३ मध्ये चबुतऱ्यावर मंदिर बांधण्याची परवानगी मागण्यात आली. पण फैजाबादच्या डेप्युटी कमिशनरने ही परवानगी नाकारली.

इसवी सन १८८५ मध्ये प्रथमच हे प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आले. न्यायालयात दाखल केलेल्या बांधकाम योजनेमध्ये मस्जिदीच्या ठिकाणी बांधकाम करण्याचे कोणतेही निर्देश नव्हते. महंत रघुवर दास यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर निर्णय देताना या प्रकरणाविषयी न्यायालयाने वस्तुस्थितीजन्य भूमिका स्पष्ट केली होती.

“जवळपास ३५० वर्षापूर्वी मीर बाकीने मंदिर पाडून मस्जिद बांधल्याची भावना सर्वत्र आहे. मात्र आता त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करणे शक्य नाही. कारण आता त्यासाठी खुप उशीर झाला आहे. परिस्थिती जशी आहे तशीच ठेवण्यात यावी. अशा प्रकारच्या बदलाचे फायद्यापेक्षा नुकसान अधिक  आहेत.” न्यायालयाच्या या निर्णयानंतर हे प्रकरण निकाली निघाले होते. पण तसे घडले नाही.

वाचा : पुस्तकातून उरलेला बाबरी-आयोध्यावाद

वाचा : इतिहासाच्या भगवेकरणाचा प्रयत्न

रामलल्ला प्रकटले?

२२ डिसेंबर १९४९ रोजी ५०-६० जणांच्या एका गटाने सकाळी ७ वाजता बाबरी मस्जिदीत राम-लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांच्या बालरुपातील मूर्ती आणून ठेवल्या. अयोध्या पोलीस ठाण्यात यासंदर्भात त्याचदिवशी सायंकाळी ७ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी दाखल एफआयआरमध्ये पोलिसांनी म्हटले आहे, “करीब ७ बजे सुबह के जब मैं जन्मभूमि पहुंचा तो मालूम हुआ कि तखमीनन ५०-६० आदमीयों का मजमा कुफल जो बाबरी मस्जिद के कंपाउंड में लगे थे, तोड कर व नीज दीवार द्वारा सीढी फाँद कर अन्दर मस्जिद मदाखिलत कर के मुरती श्री भगवान की स्थापित कर दिया और दीवारों पर अन्दर व बाहर सीता राम जी वगैरह गेरु व पीले रंग से लिख दिया।

का. नं. ७० हंसराज मामूरा डियुटी मना किया नहीं माने। पी.ए.सी. की गारद जो वाहँ मौजूद थी इमदाद के लिए बुलाया, लेकीन उस वक्त तक लोग अन्दर मस्जिद में दाखिल हो चुके थे अफसरान आला जिला मौका पर तशरीफ लाए और मसरुफ इन्तिजाम रहे। बादहू मजमां तखमीनन ५-६ हजार इकठ्ठा होकर मजहबी नारे व कीर्तन लगाकर अन्दर जाना चाहते थे।

लेकिन माकूल इन्तजाम होने की वजह से रामसकलदास, सुदर्शनदास व ५०-६० आदमी नाम नामालूम बलवा करके मस्जिद में मदाखलत कर के मूरति स्थापित कर के मस्जिद नापाक किया है। मुलजिमान मामूरा डियुटी के बहुत से आदमियों ने इस को देखा है।”

अनेक विचारवंत आणि पत्रकारांनी अयोध्येवर पुस्तके लिहिली आहे. त्यातील अनेकांनी या घटनेची नोंद पुस्तकात केली आहे. त्यातील बहुतांश जणांनी ‘अयोध्येत या घटनेनंतर प्रचंड तणाव निर्माण झाला होता.’ असे म्हटले आहे.

अर्थात त्यासाठी त्यांनी वरील एफआयरचा संदर्भ दिला आहे.  पण अक्षय ब्रम्हचारी हे त्यावेळी फैजाबादचे जिल्हाधिकारी के. के. नय्यर यांच्यासोबत त्याचदिवशी दुपारी १२ वाजता बाबरी मस्जिदीजवळ गेले होते. तेव्हा बोटावर मोजण्या इतके लोक तेथे होते.

ब्रम्हचारी यांच्या मते या मूर्ती सहज हटवता आल्या असत्या, मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी मूर्ती हटवण्यास नकार दिला. कालांतरांनी हिंदू संघटनांनी ‘रामलल्ला प्रकटीकरण’ असे गोंडस नाव या सर्व प्रकाराला दिले. आणि राम प्रकट्य महोत्सव आयोजित करण्यास सुरुवात केली.

१६ जानेवरी १९५० रोजी गोपालसिंह विशारद यांनी फैजाबाद दिवाणी न्यायालयात मूर्तींच्या पूजेची परवानगी मागणारी याचिका दाखल केली. त्यामध्ये जहूर अहमद आणि अन्य पाच लोकांना प्रतिवादी करण्यात आले.

न्यायालयाने या प्रकरणात दुसरा मोठा निकाल दिला. ३ मार्च १९५१ रोजी हिंदूना पूजेचा अधिकार प्रदान करण्यात आला. आणि मुस्लिमांना मस्जिदीच्या आवारात येण्यास मनाई केली. त्यानंतर १९८६ मध्ये मस्जिदीचे दार उघडण्यात आले. पुढे ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मस्जिद पाडण्यात आली.

बाबरी मस्जिद पाडण्यार्यंत त्याच्याशी संबधित असणारे अनेक आधिकारी पुढे भाजप मध्ये गेले. मूर्ती हटवण्यास नकार देणाऱ्या के. के. नय्यर हे बहराईच लोकसभा निवडणूक लढवून खासदार बनले. ज्यावेळी बाबरी मस्जिद पाडण्यात आली तेव्हा डी. बी. राय हे फैजाबादचे पोलीस अधिक्षक होते. नंतर ते भाजपमध्ये सामिल झाले.

पुढे त्यांनी सुलतानपूर लोकसभा निवडणुकीत पक्षाकडून दोन विजय मिळवला. अनेक पत्रकारांनी त्यावेळी केलेल्या वार्तांकनात ६ डिसेंबर १९९२ला अयोध्येत तैनात अनेक पोलीस अधिकारी कारसेवकाच्याच भूमिकेत होते, असा आरोप केला आहे.

वाचा : शेतकऱ्यांकडून अधिक कर वसुलीस बाबरची होती मनाई

वाचा :  बाबर : सुफी परंपरेवर अत्याधिक निष्ठा ठेवणारा राज्यकर्ता

बाबरी मस्जिदीचे बांधकाम

आर. एस. शर्मा आणि काही हिंदुत्ववादी इतिहासकार वगळता देशातील बहुतांश इतिहासकारांनी बाबरनेच स्वतः बाबरी मस्जिद बांधली अथवा मस्जिदीच्या बांधकामाचा आदेश दिल्याचे मान्य करत नाहीत.

बाबरी मस्जिदीवर जे दोन शिलालेख सापडले आहेत. त्यावर मीर बाकीने बाबरचे नाव एक बादशाह म्हणून तत्कालीन पद्धतीनुसार घातले होते, असेही बहुतांश इतिहासकारांचे मत आहे. ते दोन्ही शिलालेख पुढीलप्रमाणे –

शिलालेख एक

“ब फरमूदये शाह बाबर कि अबदलश,

बिनायेस्ता ता काबे गर्दू मुलाकी,

बिना कर्द ई मुहब्बते कुदसियां,

अमीरे सआदत निशान मीर बाकी ।

बुवद खैरे बकी । चो सलि विनायश,

अयाँ शुद कि गुत्फम बुवद खैर बाकी।।”

(शाह बाबरच्या आदेशानुसार ज्याचा न्याय एक अशी इमारत आहे ज्याची उंची आकाशापर्यंत आहे. देवदूतांच्या उतरण्याच्या या ठिकाणाचे निर्माण केले. सौभाग्यशाली सरदार मीर बाकीने उभारलेले हे गुंबद अनंत काळापर्यंत रहावे.)

शिलालेख दोन

“बनाम आंकी दाना हस्त अकबर,

किखालिके जुमला आलम ला मकानी,

दरुदे मुस्तफा बाद अज सताईश,

कि सरवरे अम्बियाये वो जहानी।।

फसाना दर जहां बाबर कलन्दर

कि शुद दर दौरे गेती कामरानी।।”

(जो महान ज्ञानी आहे त्याच्या नावे, जो सृष्टीचा निर्माता आणि कोणत्याही घरात नाही. त्याच्या स्तुतीनंतर मुस्तफा (प्रेषितांवर) दुरुद जे दोन्ही लोकाच्या प्रेषितांचे सरदार आहेत. जगात चर्चा आहे की बाबर कलंदर याला कालचक्रात यश मिळाले.)

वाचा : बाबरने शब्दबद्ध केलेला भारत कसा होता?

वाचा : अहमदनगर : मध्ययुगीन भारतातील ऐतिहसिक शहर

बाबरी मस्जिदीची निर्मिती

या दोन्ही शिलालेखावरुन एक बाब स्पष्ट होते की, बाबरचा सरदार मीर बाकी याने ही मस्जिद बांधली होती. पण ही मस्जिद बांधताना मंदिर पाडून बांधली असल्याचे कोणतेच समकालीन पुरावे उपलब्ध नाहीत. बाबरनेही तशी कोणतीच माहिती ‘बाबरनामात’ दिली नाही.

बाबरच्या नंतर जन्मलेल्या रामभक्त तुलसीदास यांनी देखील मंदिर मस्जिद वादाचा कसलाच उल्लेख केला नाही. गोपालसिंह विशारद यांनी लिहिलेल्या ‘रामजन्मभूमी रक्त रंजित इतिहास’ या पुस्तकात बाबर, हुमायुं, अकबरच्या काळात या मस्जिदीविरोधात हिंदूनी रक्तरंजित संघर्ष केल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र त्यासाठी कोणताच पुरावा त्यांनाही देता आला नाही. 

दरम्यान बाबरी मस्जिद-राम जन्मभूमीच्या वादाच्या अनुषंगाने उत्खनन करण्यात आले. पुराततत्वीय संशोधकांनी केलेल्या उत्खननाच्या अहवालास निर्मोही आखाड्याशिवाय अन्य हिंदू पक्षांनी स्वीकारले आहे.

युगलकिशोर रामशरण शास्त्री यांनी मुळ पुरातत्वीय अहवालातील काही महत्त्वाचे मुद्दे त्यांच्या लेखात दिले आहेत. ते म्हणतात, “खोदकामात चमकदार टाईल्स सापडल्या. ज्या मुस्लिम काळाचा निर्देश करतात. रिपोर्टमध्ये वादग्रस्त भवनासाठी या टाईल्स वापरल्याचा अंदाज मांडला आहे. मात्र जमिनीच्या खाली त्या  टाईल्स कशा गेल्या यावर मात्र अहवालात कोणतेही भाष्य केलेले नाही.

१८२ अनामिलीज पैकी ३४ तथ्य सत्य माणण्यात आले. त्यापैकी १६ तथ्यात बाबरी मस्जिदीच्या भिंती असल्याचे आढळून आल्या आहेत. खांबाचे चिन्ह (पिलर बेस) सापडले आहेत. मात्र त्यावरुन येथे पूर्वी कोणत्याही प्रकारचे बांधकाम असल्याचा निष्कर्ष काढता येत नाही.

कसोटीच्या खांबाचा खूप प्रचार करण्यात आला. मात्र खोदकामात कुठेही कसोटीचे अवशेष आढळून आले नाहीत. रिपोर्टमध्ये ग्लेज टाईल्स, ग्लेज वेयर व हाडांचे उल्लेख आढळत नाहीत. मात्र उत्खननाच्या दैनंदिनीत त्याची नोंद आहे. काही ठिकाणी खड्ड्यांचे खोदकाम ४० फुटांपर्यंत करण्यात आले. मात्र मंदिराचे अवशेष कुठेच आढळले नाहीत.”

या उत्खननापुर्वी २२ नोव्हेंबर १९८९ रोजी रोमिला थापर, सर्वपल्ली गोपाल, बिपिनचंद्र यांनी एक निवेदन नवभारत टाईम्समध्ये प्रसिद्धीस दिले. त्यामध्ये या तीन प्रमुख इतिहासकारांनी म्हटले आहे. ‘अयोध्या ज्या ठिकाणी आज वसलेली आहे, त्या ठिकाणी हजारो वर्षापुर्वी लोकवस्ती असल्याचा दावा करता येईल असे कोणतेच पुरातत्वीय प्रमाण मिळाले नाहीत.

या भागात लोकवस्तीचे प्राचीन पुरावे ८०० इसवीसनपूर्व पर्यंतचे मान्य करण्यात आले आहे. ही वस्ती चित्रित घूमर माण्ड संस्कृतीची होती. अर्थात जिथल्या नागरिकाचे राहणीमान अत्यंत साधे होते. रामायणात  वर्णन केलेल्या भौतिक जीवनाशी याचे कसल्याही प्रकारचे साम्य आढळत नाही. रामायणानुसार अयोध्या विशाल भवन आणि राजप्रसादांनी सुशोभित अशी होती. पण ८०० इसवीसनपूर्वचे कोणतेही तसे पुरावे आढळत नाहीत.

रामायणात वर्णित अयोध्या कुठे वसलेली होती ही बाब देखील विवादास्पद आहे. प्राचीन बौद्ध ग्रंथांमध्ये कोशल देशातील प्रमुख नगरांच्या रुपात श्रावस्ती आणि साकेत चा उल्लेख आहे. अयोध्येचा नाही. जैन ग्रंथ देखील साकेतलाच कोशलची राजधानी मानतात. अयोध्येचा खूप कमी उल्लेख आहे. त्याला गंगेच्या किनारी असल्याचे म्हटले गेले आहे. मात्र वर्तमान अयोध्या सरयूच्या किनाऱ्यावर आहे.”

वाचा : औरंगाबादच्या नामांतरास पर्याय ‘संभाजीनगर’ नव्हे ‘अंबराबाद’!

वाचा : प्रेषितांच्या स्मृती जपणारे बिजापूरचे आसार महाल

याशिवाय प्रा. शेखर सोनाळकर यांनी ‘अयोध्या विवाद एक सत्यशोधन’ हा ग्रंथ लिहिला आहे. त्यामध्ये त्यांनी अयोध्येतील रामजन्मभूमीचा दावा अमान्य केला आहे. ते म्हणतात, “दहाव्या शतकापुर्वीचे एकही राममंदिर भारतात नाही. बाराव्या शतकापर्यंत संपूर्ण भारतात रामाची फक्त ३ मंदिरे अस्तित्वात होती. सोळाव्या शतकाच्या अंतापर्यंत संपूर्ण उत्तर प्रदेशामध्ये रामाचे स्वतंत्र असे एकही मंदिर नव्हते.

अयोध्येतील रामाशी संबधित पहिले मंदिर सीतेचे होते. बाबरने  रामजन्मभूमी पाडल्याचा दावा केला जातो. पण बाबरच्या समकालीन गुरुनानक, गोस्वामी, तुलसीदास, शीख गुरु आणि इतर धार्मिक संत यांच्या लिखाणात कोठेही मंदिर उद्ध्वस्त केल्याचा उल्लेख आढळत नाही.

‘अयोध्यामहात्त्म्य’ या सतराव्या शतकातील ग्रंथातील रामजन्म जागा कौसल्याभुवन ठरते. रामजन्मभूमी मंदिरासाठी हिंदूनी ७६ संघर्ष केले असा दावा केला जातो. ‘बाबरनामा’, ‘ऐन ए अकबरी’, ‘अलमगीरनामा’ या मोगल बादशहांच्या (ऐतिहासिक साधनात) ग्रंथात उल्लेख आहेत. असा दावा केला जातो. पण ह्याच ग्रंथात नव्हे तर मोगलकालीन कोणत्याही फारसी ग्रंथात या तथाकथित संघर्षाचे उल्लेख आढळत नाहीत.”

सामंजस्याने तोडगा शक्य…

राजकीय गरजांपोटी ऐतिहासिक वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करुन इतिहासाचे आकलन केले जाते. वर्तमान सामाजिक व राजकीय परिस्थितीत बाबरी मस्जिदीचा निकाल मुस्लिमांच्या बाजूने लागला असता तरी तेथे पुन्हा बाबरीचे निर्माण शक्य नाही. त्यामुळे या प्रकरणातील मुस्लिम प्रतिवादींपैकी बहुतांश प्रतिवादींनी राममंदिरासाठी बाबरीची जमीन देण्याची तयारी दर्शवली आहे.

पण त्यांनी अयोध्येतील इतर मस्जिदींचे जिर्णोद्धार, इतर ठिकाणी मस्जिदीच्या बांधकामासाठी परवानगी वगैरेसारख्या घातलेल्या अत्यंत क्षुल्लक अटींवरुन हे प्रकरण ताणले जात आहे.

एनडीटिव्हीने केलेल्या एका रिपोर्टमध्ये मुस्लिम पक्षांनी घातलेल्या अटींची माहिती दिली आहे. त्यावरुन मुस्लिम पक्ष समझोत्यास तयार असल्याचे दिसून आले. पण त्या दिशेने प्रयत्न होणे गरजेचे होते.

जाता जाता :