‘खुल्द-आबाद’ म्हणजे ज्याचा निवास अनंतकाळ आहे असे त्या गावाचे वर्णन मोगल बादशहा औरंगजेब करत, ते गाव ज्याचा ‘रौजा’ स्वर्गातील बाग असे वर्णील्या जात अशा खुल्ताबादच्या सांस्कृतिक वारसाबद्दलच्या अभ्यासपूर्ण लेखांचा दस्ताऐवज ‘ऐतिहासिक सांस्कृतिक खुल्ताबाद’ प्रकाशित होतो, त्याबद्दल सर्वप्रथम मन:पूर्वक अभिनंदन !
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी औरंगाबादमधील ऐतिहासिक गाव जे एका बाजूला ‘दौलताबाद, देवगिरी’ अशा महत्त्वपूर्ण एकेकाळच्या राजधानीने तर दुसऱ्या बाजूला जागतिक वारसा प्राप्त वेरूळच्या लेण्यांनी वेढलेले, सांस्कृतिक अधिष्ठान असलेले खुल्ताबादची परंपरा, वारसा सर्वमान्य आहे.
सुफी संतांची, भद्रा मारूती, राजे-महाराजे यांची चिरनिद्रा आणि त्यासोबतच त्या-त्या रूढी परंपरांना जपणारे ‘खुल्ताबाद’ आजच्या या धकाधकीच्या काळात मन:शांतीची शिकवण देणारी जागा असल्याची जाणीव मर्यादित स्वरूपात आहे.
महाराष्ट्रातील पहिली कव्वाली ह्याच मातीत रुजली येथील हजरत ख्वाजा जरी-जरी मुन्तजीबुद्दीन बख्श (रह), हजरत शेख बुऱ्हानुद्दीन गरीब चिश्ती (रह) आणि हजरत शेख जैनुद्दीन शिराजी (रह) यांच्या दर्ग्यातील कव्वालीचा सूर हा सुफी परंपरेच्या सांस्कृतिकतेचा अविट नजराणा पिढ्यांपिढ्या जपत राहिला आहे.
वाचा : मलिक अंबर महाराष्ट्राचे सांस्कृतिक राजकारणाचे प्रतीक
वाचा : वेद आणि उपनिषदांचा अभ्यासक अल्-बेरुनी
मुहमंद तुघलकच्या राजधानी बदलाचा प्रयोग हा खुल्ताबादच्या सांस्कृतिक उन्नतीशी निगडीत आहे. खरंतर सांस्कृतिकतेच्या संबंध राजकारणाशी असतो आणि राजकारण सोडून जिथे वास्तव्य करण्यासाठी बादशाह आणि निजाम इथल्या मातीला आपलीशी केल्याचे पुरावे मोगल बादशहा औरंगजेबची कबर, हैदराबाद संस्थानचा संस्थापक पहिला निजाम मीर कमरुद्दीन आसिफ जहाँची कबर किंवा औरंगजेबचा मुलगा आज़मशहा यांची कबर याने मिळतात. शहराच्या वैभवात भर टाकण्याचे काम हे सांस्कृतिक वारश्यानेच टिकून राहते याची प्रचिती खुल्ताबादकडे पाहिल्यानंतर जाणवते.
वास्तुकलेचा उत्तम नमुना ‘खुल्ताबाद’मध्ये दिसतो. जसे औरंगाबादला ५२ दरवाज्यांनी आणि भिंतीनी वेढलेले होते तसेच सात दरवाज्यांनी आणि मोठमोठ्या भिंतीनी खुल्ताबादला वेढलेले होते. नगारखाना, लंगडा, पांगरा, मंगलपेठ, कुंबी, अली, हमदादा दरवाजे गावाची शान होते.
औरंगाबाद शहराला जाणारा बांधलेला रस्ता गावातून ते ३०० फूट अंतरापर्यंत तयार करण्यात आला होता. दक्षिण आणि उत्तर दरवाजाच्या मधोमध औरंगजेबची कबर आणि आजूबाजूला दर्ग्याचा परिसर मन:शांतीची परिचिती देतो.
संस्कृती ही भिंतीनी, गतवैभवानी जिवंत राहत नाही तर ती नैसर्गिक सौंदर्य आणि विविध अन्न पदार्थाने अनंतकाळापर्यंत टिकून राहते. खुल्ताबादच्या वैभवात ‘रव्वाजा’ नावाचा गोड पदार्थ आणि ‘नान खलिया’सारखा मांसाहारी अन्नपदार्थ भर टाकत जातो.
गावाचे मोहल्ले आणि त्या गल्ल्या अनुभवत उर्दूच्या प्रसिद्ध शायर बशर नवाज साहेबांची ती ओळख प्रत्येक रसिकाला आठवत जाते. ‘गली के मोड पे सुनासा कोई दरवाजा’ भारतातील गावांच्या परंपरेत गावाबाहेर वेशीचं रक्षण हनुमान करत असतो. तसाच काहीसा अनुभव खुल्ताबाद बाबत जाणवतो.
वाचा : औरंगाबादच्या नामांतरास पर्याय ‘संभाजीनगर’ नव्हे ‘अंबराबाद’!
वाचा : प्रेषितांच्या स्मृती जपणारे बिजापूरचे आसार महाल
भद्रा मारूतीला दर शनिवारी आणि श्रावणातील सोमवारी दर्शनासाठी होणारी भाविकांची गर्दी या गावाचा भारताच्या गंगा-जमुनी तहजीबचा अतुर भाग बनवते. ‘बनी बाग’ असेल, ‘लाल बाग’ असेल वा ‘परियो का तालाब’ हा गावाच्या नैसर्गिक संपन्नतेत भर टाकतो.
श्रद्धा, भक्तीची विलोभनीय किनार लाभलेल्या या गावाचा सांस्कृतिक अभ्यास होणे अपेक्षित आहे. प्रसिद्धी माध्यमांनी तसं पाहता या गावाच्या सांस्कृतिक, धार्मिक, ऐतिहासिक आणि परंपरेची मांडणी केली आहे. विद्यापीठातील संशोधक या गावाच्या अनेक पैलूंचा अभ्यास करत असताना ‘ऐतिहासिक सांस्कृतिक खुल्ताबाद’ या पुस्तकाच्या रूपाने एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज आपल्या समोर येतो, हे संपादक प्रा गणी पटेल आणि इतर संशोधकाच्या प्रयत्नाची पराकाष्ठा असल्याचे जाणवते.
अशा संग्रही दस्तऐवजच पुस्तक हे खुल्ताबादला पुन्हा सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देण्यात सहकार्य करील असे वाटते. खुल्दाबादच्या सांस्कृतिकतेत येथील ‘चिठ्ठी’ लिहिण्याच्या परंपरेचा एक महत्त्वाचा भाग अद्यापही दुर्लक्षित आहे. गावाला लग्नाचे, बारश्याचे निमंत्रण हे पत्रिका छापून पोहोचविण्याची परंपरा सर्वज्ञात आहे. परंतु या गावामध्ये एक ‘चिठ्ठी’ वा पत्र लिहिल्या जाते आणि त्या पत्राचे वाचन गावातील एक व्यक्ती ती चिठ्ठी प्रत्येक दारावर जाऊन वाचून दाखवितो.
‘चिठ्ठी’ मिळाली म्हणजे प्रत्यक्ष निमंत्रण मिळाले असे आजही समजण्यात येते. ‘चिठ्ठी’ लिहिण्याच्या परंपरेला आजचा तंत्रयुगात तेवढे महत्त्व नसले तरीही या गावाने ती परंपरा काही अंशी जपल्याचे चित्र दिसते.
श्री. रहीमुद्दीन बुऱ्हानी खुल्दाबादच्या कव्वाली गायकांच्या परंपरेतील शेवटचे गायक आणि ‘चिठ्ठी वाचक’ त्यांच्यानंतर गावची ही साहित्यिक वैभवसंपन्नता कदाचित काळाच्या ओघात मिटून जाईल. अशा एक ना अनेक परंपरांनी भरलेल्या गावाची संपन्नता जपणे हेच माध्यम व संशोधकांची जबाबदारी असते आणि ती काही प्रमाणात का होईना ह्या पुस्तकाच्या माध्यमातून जपण्याचा यशस्वी प्रयत्न होतो याचा आनंद आहे.
भविष्यात अभ्यासकांना या पुस्तकाचा उपयोग होईल अशी अपेक्षा….
###
पुस्तकाचे नाव : ऐतिहासिक सांस्कृतिक खुल्ताबाद
भाषा : मराठी
संपादक : प्रा. गणी पटेल
प्रकाशक : चिन्मय प्रकाशन, औरंगाबाद
किंमत : २०० रुपये
जाता जाता :
लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील इंग्रजीचे प्राध्यापक व विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक आहेत.