ज्ञान साधनेची महती सांगणारा रमज़ान

स्लामी श्रद्धेचे पाच स्तंभ आहेत. कलमा, पाच वेळेची नमाज, हज यात्रा, दानधर्म आणि रमज़ानचे रोजे असे हे स्तंभ मानले जातात. रमज़ान महिन्याचे रोजे म्हणजे निर्जळी उपवास महिन्याच्या एक तारखेपासून ते महिना अखेरीपर्यंत केले जातात. काहीवेळा चंद्रदर्शनाप्रमाणे २९ रोजे होतात, काही वेळा ३० होतात. दरवर्षी होतील तेवढे ते पूर्ण करावयाचे असतात.

पहाटे लवकर उठून काहीतरी खाण्याचा कार्यक्रम करण्यात येतो. त्याला ‘सहरी’ म्हणतात. संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर रोजा सोडायचा असतो, त्याला ‘अफ्तारी’ म्हणतात. इफ्तारी अनेक तर्‍हने साजरी होते. प्रत्येक कुटुंबात ती खाजगी रीतीने साजरी होते, तर इतरत्र विशेषत: मस्जिदमध्ये सामुदायिक रीतीने साजरी करण्यात येते.

मस्जिद असो किंवा घरात इतरांना आपल्याबरोबर इफ्तारीकरिता आमंत्रित करण्यात येते. एका तऱ्हेने सामाजिक एकात्मता साधण्याचा हा प्रकार असतो. हा अर्थ ठेवूनच गेल्या काही दशकांपासून इफ्तारीला राजकीय अर्थही प्राप्त झालेला आहे. कार्यक्रमात राजकीय मंत्री किंवा इतर कोणी अनेक मित्रमंडळींना आमंत्रित करून इफ्तारीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

रमज़ान महिन्यात काटेकोरपणे रोजे ठेवणे हा इस्लामी श्रद्धेचा अपरिहार्य घटक आहे. या संपूर्ण महिनाभर सकाळी आणि संध्याकाळी नेहमीच्या नमाज बरोबर ‘खास नमाज’ अदा करण्यात येते. त्याला ‘तराविह’ची नमाज म्हणतात. इशामधील या वाढीव नमाजमध्ये पहिल्या दिवसापासून कुरआन पठण केले जाते. दररोज एक अध्याय घेतला जातो. महिनाअखेरपर्यंत संपूर्ण कुरआन पूर्ण होते.

वाचा : ‘इस्लाम ज्ञात आणि अज्ञाता’चा शोध

वाचा : स्मरणी आहेत पुण्यातील त्या मुहर्रमच्या मिरवणुकी!

इंद्रियांवर नियंत्रणाचे नाव रोजा

रोजा याचा अर्थ नुसते उपाशी राहणे नव्हे. त्यात एक आध्यात्मिक अर्थही अनुस्यूत आहे. सहरी करणे, रोजा ठेवणे व संध्याकाळी विधिवत इफ्तारी करणे, अल्लाहचे स्मरण करून प्रार्थना करीत राहणे, नामजप करीत राहणे, त्याच बरोबर आपले तन-मन ही शुद्ध असले पाहिजे, हाही त्याचा एक घटक आहे.

आपल्या डोळ्याने वाईट पाहू नये, वाणीने वाईट बोलू नये, कानाने अपवित्र किंवा गलिच्छ ऐकू नये, असाही एक पारंपरिक अर्थ रमज़ानच्या महिन्याला प्राप्त झालेला आहे.

रमज़ानच्या महिन्यात उपवास ठेवणे हा इस्लामच्या पाच स्तंभापैकी एक असल्यामुळे सर्वांसाठी हे बंधनकारक आहेत.

लहान मुलांनी बारा वर्षांपर्यंत एकदा तरी संपूर्ण महिन्याचे रोजे ठेवणे आवश्यक मानले जाते. लहान मुलांनी आयुष्यातील पहिला रोजा ठेवल्यास त्याला नवीन कपडे करणे, फुलांचा हार घालणे, मिरवणूक काढणे, आप्तांना जेवणावळी देणे असे विविध समारंभ केले जातात.

रोजेदाराला घरातून आई-वडिल बक्कळ भेटी मिळातात. रोजेदार नातेवाईक, मित्र परिवार व शेजाऱ्यांना जाऊन सलामी देतो. ही सलामी रोजेदारासाठी आनंददायी असते. कारण त्याला भेटवस्तू, पैशाच्या रुपात नजराना मिळतो. आमच्या कोकणात रोजेदार मुलांना सहलीला, फिरायला, शॉपिंगला घेऊन जातात.

भारतीय उपखंडात नव्या रोजेदारासाठी अशाच तऱ्हा आहेत. रोजेदाराला मनपसंत खरेदी करवून दिली जाते. शिवाय ‘नन्हा रोजेदार’ म्हणून वृत्तपत्रात फोटो छापले जातात, टीव्हीवर दाखवले जातात. आता गल्लीत मोठा बॅनर लावून त्याचे कौतुक केले जाते. अशा प्रकारातून लहान मुलांना खूप आनंद मिळतो.

ईद म्हणजे लहान मुलांसाठी कौतुकसोहळा असतो. बच्चे कंपनीला बड्या मंडळीकडून ‘ईदी’ (पैसा) मिळते. एकंदरीतच रमज़ान ईद सर्वांना आनंद देणारी आहे, असे आपण म्हणू शकतो.

वाचा : चिश्ती विद्रोहाचे मुलाधार ख्वाजा मैनुद्दीन अजमेरी

वाचा : पॉलिटिकल इस्लामप्रणित समाजपरिवर्तनाचा दस्तऐवज

दानधर्माला अनन्यसाधारण महत्त्व

इस्लामी परंपरेत चंद्रदर्शनानंतर नवीन महिना सुरू झाला, असे मानण्याचा प्रघात आहे. त्यानंतरच्या महिन्याच्या पहिल्या तारखेला ‘ईद’ साजरी करण्यात येते. प्रत्येक मुस्लिम व्यक्तीने कर्तव्यभावनेने या सगळ्या रोजेंचे पालन केले असल्यामुळे या कर्तव्यपूर्तीचा आनंद म्हणजेच रमज़ानची ईद असते. या दिवशी कुटुंबात आनंदाचे वातावरण असते लहान मुलांना नवे कपडे घातले जातात, शिवले जातात. घरात पंचपक्वान्न, गोड-धोड जेवणाचा आस्वाद उपभोगला जातो.

इस्लामी श्रद्धेचा एक अविभाज्य घटक म्हणून जसे रमज़ानचे रोजे पूर्ण करावयाचे असतात, त्याच बरोबर गावात किंवा इतरत्र कुठे गरीबीमुळे जर कोणाला आनंद साजरा करता येत नसेल, तर तो करता यावा म्हणून त्यांनाही काही ना काही आर्थिक मदत करणे, हाही इस्लामी परंपरेमध्ये प्रघात झालेला आहे.

इस्लामी परंपरेत दानधर्मालाही असेच महत्त्व आहे. रमज़ानमध्ये सढळ हाताने, उपकृत भावना बाजूला ठेवून, कृतज्ञता म्हणून दान दिला पाहिजे. आपल्या आनंदात इतरांना सामावून घेणे, ही गोष्ट सर्वांचा आनंद द्विगुणित करणारी आहे. ही सामुदायिकता इस्लामी संस्कृतीचे एक वैशिष्ट्य आहे.

आनंद आणि दुःख सर्वांनी एकत्रित वाटून घ्यावी, असा इस्लामचा संकेत आहे. इस्लामी परंपरेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे दानधर्म करताना आपण काही मोठे काम करीत आहोत, असा स्वतःचा समज करून घेऊ नये, असा नियम आहे. कारण अशा प्रकारच्या मानसिकतेमुळे आपला अहंकार वाढत जातो. आपण कुणाला देतो म्हणजे त्याच्यावर उपकार करत आहोत, अशी ही एक मानसिकता कळत-नकळत तयार होत राहते. इस्लाममध्ये अशा वृत्तीला पूर्णतः निषेधार्य मानले गेले आहे.

वाचा : मुहमंद पैगंबरांचे श्रमावर आधारित बाजारांचे व्यवस्थापन

वाचा : मदीनेत इस्लामी सभ्यतेचे आगमन कसे झाले?

दानधर्माचा इव्हेट कशाला !

नुकतेच मध्यप्रदेशमध्ये एका राजकीय पक्षाच्या पुढाऱ्याने कोरोनामृतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी काही वाहने उपलब्ध करून दिली. ती लोकार्पित करताना त्याने वेगवेगळ्या मुद्रा देत अनेक फोटो काढले. योगायोगाने हे फोटो सोशल मीडियावरुन वायरल झाले. मृतकांचा इव्हेंट साजरा होतोय, अशी त्या फोटोवर व त्या राजकीय पुढाऱ्यावर टीका झाली. दानधर्म करताना ते सांगून, दाखवून व निदर्शनास आणून करू नये, असे उगीच म्हटले गेलेले नाही.

गेल्यावर्षी देखील लॉकडाऊन काळात गरजवंतांना मदत करतानाचे अनेक फोटो वायरल होत होते. त्यातही मदत कमी पण देणारे हात अधिक असेच चित्र दिसत होते. इस्लाम अशा प्रवृत्तींना कठोरपणे ताकिद करतो. आपण दानधर्म करतो हे उपकार नसून आपले कर्तव्य पार पाडत आहोत. आपण जे काही कमवतो त्यामध्ये समाजातील दुर्बल घटकांचा एक वाटा असतो, तो त्याच भावनेने दिला पाहिजे, अशी ही इस्लामची शिकवण आहे.

ज्या व्यक्तीला आपण आर्थिक वा इतर काही प्रकारे दानधर्म करीत आहोत, त्यावेळेस समोरच्या व्यक्तीची प्रतिष्ठा जपणे, त्याच्या आत्मभानाला धक्का लागणार नाही, याची काळजी घेणे हाही या दानधर्माचा अविभाज्य भाग आहे.

रमज़ान ईदच्या दिवशी जकातीच्या स्वरूपात धान्य दान करण्यात येते, त्याला ‘फितरा’ म्हणतात आणि म्हणून रमज़ानच्या ईदीला ‘ईद-उल-फित्र’ असे म्हणतात. हा फितरा गरजू व्यक्तींना मुख्य नमाजपूर्वी वितरित करणे बंधनकारक आहे. स्थळ, काळ पाहाता वेळोवेळी फितराच्या मोजामापात बदल होतो.

शिवाय जकात दखील रमज़ानचा अविभाज्य भाग आहे. वर्षातून एकदा आपल्या मिळकतीतून, स्थावर व जंगम मालमत्तेतून एक ठरावीक निधी काढून तो गरीब, निराश्रित व गरजवंताना वाटणे, गरजेचे असते. समाजामध्ये आर्थिक संतुलन कायम राहावे, असा त्यामागचा उद्देश आहे.

ईदीच्या दिवशी सामुदायिक नमाज पठण केली जाते. एकमेकांना भेटून शुभेच्छा, मुबारकबाद दिली जाते. गेल्या वर्षभरात ज्यांच्या घरी काही दुःखद घटना घडलेली असेल, तर ईदीचे नमाज पूर्ण झाल्यानंतर अशा व्यक्तींच्या घरी जाऊन सामुदायिकरीत्या सांत्वन करण्याचा प्रघात आहे. कब्रिस्तानमध्ये जाऊन मयतांना इसाले सवाब, आदरांजली पोहोचवली जाते. वर्षांतून किमान एकदा का होईना मृत होऊन गेलेल्या नातेवाईंकाचे स्मरण केले जाते.

वाचा : जेव्हा मौलाना रुमी आपल्यातील ‘मी’ला नष्ट करतात!

वाचा : रोगराईतील ‘अस्थायी वास्तविकते’च्या कालखंडातील ‘ईद’

शब ए कद्र

रमज़ान महिन्याच्या २७व्या तारखेला कुरआनचा पहिला शब्द प्रेषितांच्या मुखातून बाहेर पडला. त्यामुळे रमज़ान महिन्यातील ही रात्र महत्त्वाची मानली जाते. प्रेषितांच्या मुखातून कुरआनचा बाहेर पडलेला संदेश हा ज्ञान साधनेचा होता. कुरआनच्या ९६व्या आध्यायात एक ते पाच आयातीमध्ये पैगंबरांना झालेल्या पहिल्या साक्षात्काराचे वर्णन आलेले आहे. ज्या आयाती प्रकट झाल्या त्या खालील प्रमाणे –

“वाच, आपल्या पालनकर्ताच्या नावाने आरंभ करून ज्याने सर्वांना निर्माण केले. ज्याने मानवाला गोठलेल्या रक्ताच्या बिंदूपासून निर्माण केले. वाच, तुझ्या पालनकर्ताच्या नावाने जो फार उदार आहे. ज्याने मानवाला लेखणीचा उपयोग करायचे शिकवून त्या मार्गाने ज्ञानसाधना करावयास प्रवृत्त केले. मानवाला जे माहीत नव्हते ते सर्व ज्ञान त्याला शिकवले.” (सूरह अल अलक).

मुहंमद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि व सल्लम निरक्षर होते, हे सर्वज्ञात आहे. असे असतानाही त्यांच्या मुखातून कुरआनचा जो पहिला संदेश प्रकट झाला, तो ज्ञान साधनेचा होता, हेच एक आश्चर्य आहे. हा क्षण इस्लामच्या जन्माचाही मानला जातो. या कुरआनच्या ज्ञान साधनेच्या या संदेशापासून प्रेरणा घेऊन अरबस्थानातील अनेक विद्वानांनी एक प्रचंड अशी ज्ञान परंपरा निर्माण केली.

रमज़ान महिन्याच्या काही रात्री विशेषतः १ ते २८ विशेष महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यात ‘शब ए कद्र’ म्हणजेच सामर्थ्याची रात्रही एक आहे. तथापि रमज़ान महिन्यातील १ ते २८ रात्री पैकी ‘शब ए कद्र’ची रात्र नेमकी कुठली? याची निश्चिती झालेली नाही. वर म्हटल्याप्रमाणे कुरआनच्या ९६व्या अध्यायातील एक ते पाच आयतीत ज्ञानसाधनेचा संदेश प्रकट झालेला आहे. ‘ज्ञान’ हे सामर्थ्य आहे, हेही कुरआनातून सूचित केले असल्यामुळे रमज़ान महिन्याची सत्ताविसावी रात्र ही ‘शब ए कद्र’ म्हणता येईल.

वाचा : कार्ल मार्क्सवर होता धर्म आणि विज्ञानाचा मोठा प्रभाव

वाचा : मुस्लिम असो की इस्लाम, त्याला कुणाचाच धोका नाही!

ज्ञान साधनेचा रमज़ान

उपरोक्त अध्यायातील ज्ञान साधनेचा संदेश विचारात घेता, इस्लामच्या जन्माचा क्षण मानला जातो. या क्षणापासून पाच ते सहा शतकांपर्यंत अरब विचारवंत, संशोधकांनी या आदेशाप्रमाणे एक फार मोठी किंवा प्रचंड अशी ज्ञानपरंपरा निर्माण केली. या संदर्भात प्रामुख्याने उल्लेख करावयाचा झाल्यास ग्रीक भाषेतील ज्ञान भंडाराचा करता येईल.

ज्या वेळी अरब सैन्याने ग्रीक जिंकले त्यावेळेस त्या देशातील मठाच्या तळघरात वेगवेगळ्या विषयांवरील हस्तलिखित ग्रंथ आढळून आली. अनेक वर्ष त्यांची कोणी विशेष काळजी घेतली नसल्यामुळे त्यांचा नाश होत आलेला होता. परंतु अब्बासी खलिफाच्या सैन्याने आणि त्यांच्या सेनापतींनी त्या ग्रंथाचे महत्त्व जाणले.

ही सर्व हस्तलिखित ग्रंथे काळजीपूर्वक आपल्याबरोबर आणले आणि ग्रीक भाषेतून अरबी भाषेत अनुवाद केले. त्या नंतरच्या काळात ही हस्तलिखिते पूर्णपणे नष्ट झाली. पण तोपर्यंत अरबी भाषेत त्याचा अनुवाद झालेला होता. म्हणून ग्रीकांनी निर्माण केलेले हे ज्ञान टिकून राहिले आणि या अरबी अनुवादाच्या मार्गानेच ते युरोपमध्ये गेले. अशा रीतीने अरबांनी जतन, संवर्धन व अनुवाद केलेले हे ज्ञान भांडार पाश्चात्त्य जगापुढे आले.

अब्बासी काळातील विद्वानामुळे सगळ्या पाश्चात्य जगाला या ज्ञानाचा महत्त्व पटले. अब्बासी खलिफा ज्ञानाचे व ज्ञानभांडाराचे जाणकार होते, त्याचे महत्त्व ते जाणत होते. म्हणून असे आणखी काही हस्तलिखित ग्रंथ कुठे असले तर ते आणून काळजीपूर्वक जतन करण्याची व्यवस्था त्यांनी केली.

या सर्वांसाठी त्यांनी एका वेगळ्या डिपार्टमेंटची निर्मिती केली होती. रमज़ान महिन्याचा सत्ताविसाव्या रात्री पैगंबरांना झालेल्या साक्षात्कारातून इस्लामी ज्ञान भांडाराची परंपरा सुरू झाली, त्या रात्रीची ज्ञानाची ही प्रेरणा कितीतरी शतकांपर्यंत टिकली होती व आहे.

नवव्या व दहाव्या शतकात भारतात अनेक अररब विचारवंत, पर्यटक आले. या सगळ्या विद्वानांनी हीच ज्ञान परंपरा विकसित केली होती. हाही रमज़ान महिन्याचा वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे असे आपण म्हणू शकतो.

जाता जाता :