वहीदुद्दीन खान – भूमिकांचे डोंगर माथ्यावर घेऊन फिरलेला म्हातारा

कापाठोपाठ एक धक्के बसत असताना मौलाना वहीदुद्दीन खान यांना कोरोनाने गाठल्याची बातमी आली. वयाच्या ९७व्या वर्षी गंभीर अवस्थेत ते अपोलो रुग्णालायात दाखल झाले. त्याच वेळी त्यांची रुग्णालयातून परतण्याची शक्यता धुसर होत गेली. एक शतक अनुभवलेला हा माणूस अनेकांच्या अनेक भूमिकांचा, नेतृत्वाचा साक्षीदार होता.

हमीदुद्दीन फराही यांनी सुरू केलेल्या इस्लामच्या काल-तर्कसंगत पुनर्व्याख्येच्या चळवळीचे त्यांच्यानंतर अमीन हसन इस्लाही यांनी नेतृत्व केले. अमीन हसन इस्लाही यांच्याशी सुरुवातीपासून जिव्हाळ्याचे संबंध असणारे वहीदुद्दीन खान यांनी भारतात त्यांच्या चळवळीची धुरा हाती घेतली. पण त्यांनी इस्लाही विचारविश्वाहून पुढे पावले टाकली.

त्यांच्या अनेक मर्यादांच्या पुढे जात, हमीदुद्दीन फराही यांच्या काल-तर्कसंगत राहण्याच्या नियमाला जागत वहीदुद्दीन खान यांनी स्वतःचे स्वतंत्र विचारविश्व विकसित केले. अनेक भूमिकांचे डोंगर माथ्यावर पेलत नव्या भूमिका मांडताना बेदरकार वृत्तीने त्याची प्रामाणिक पाठराखण करणारा हा बुजुर्ग भारतीय इस्लामच्या जडण-घडणीतील महत्वाच्या अशा विसाव्या शतकाचा साक्षीदार आणि त्याच्या ऐतिहासिकतेचा भाग होता.

या शतकात त्यांनी डॉ. इकबालपासून मौलाना आझाद यांच्यापर्यंत आणि देवबंदच्या चळवळीपासून नद् वतुल उलुमपर्यंतच्या अनेक विचारप्रवाहांचा जिवंत अनुभव घेतला आहे. काळानुसार विचारविश्वाच्या युक्त-अयुक्त अशा प्रत्येक कोनाड्याचा धांडोळा घेऊन त्यातील कालकथित भाग टाळून पुढे जाण्याची अचाट क्षमता वहीदुद्दीन खान यांच्याकडे होती.

राज्य आणि इस्लाम, जीवन आणि त्याच्या विविध शाखांसदर्भात इस्लामी सुत्रांनी मांडलेली बंधनकारक, गरजेच्या आणि सामान्य आचरणतत्त्वांच्या भूमिकांविषयी त्यांचा व्यासंग दांडगा होता. कालसंगतता, आधुनिक दृष्टी, विज्ञानवाद यांना सुसंगत केलेली तर्कव्युहाची रचना ही वहीदुद्दीन खान प्रणित विचारविश्वाची वैशिष्ट्ये होती.

त्यांनी संवादाच्या प्रत्येक माध्यमाला हाताळून, प्रत्येक गटाशी चर्चा करत भारतीय इस्लामच्या आधुनिक वळणावर त्याची पुनर्व्याख्या केली. वहीदुद्दीन खान यांना उर्दू माध्यमे गांधीवादी म्हणून काहीशा हिणकस स्वरात हेटाळत आली आहेत. त्यांनी गांधीवादाविषयी मांडलेली विस्तृत भूमिका उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांना एकजात गांधींच्या अनुयायी गोटात ढकलणे मला मान्य नाही.

पण शैलीच्या बाबतीत आणि भूमिका जगण्याच्या पद्धतीविषयी त्यांची तुलना गांधीशिवाय इतरांशी होऊ शकत नाही. भारतीय मुसलमानांच्या राजकीय स्थितीची जाणीव ठेवून त्यांच्या सांस्कृतिक भूमिकांची पुनर्रचना व्हायला हवी हे त्यांचे मत काही अंशी मान्य करावे लागेल. पण सांस्कृतिक भूमिकांच्या पुनर्रचनेसाठी राज्याच्या वळचणीला लागून भूमिकांचे हितरक्षण करणे वहीदुद्दीन खान यांच्यासारख्या स्वयंप्रज्ञ, स्वयंभू माणसाने टाळायला हवे होते, असे वाटते.

पण आपल्या कार्याचे वर्तुळ त्यांनी ठरवून घेतले होते, त्यामुळे त्यांची मरणोत्तर समीक्षा करताना आपल्या अपेक्षांचे ओझे आपण त्यांच्या भूमिकांवर टाकू शकत नाही.

भारतीय समाजात जगताना मुसलमानांसमोर जमातवादाचे आव्हान मोठे आहे. वाढत्या जमातवादाची कारणमीमांसा करताना हिंदू आणि मुस्लिम समाजातील त्याच्या उगमाच्या मुळाशी जाऊन वहीदुद्दीन खान यांनी त्याला आव्हान दिले होते.

वाचा : ज्ञान साधनेची महती सांगणारा रमज़ान

वाचा : ‘इस्लाम ज्ञात आणि अज्ञाता’चा शोध

जमातवादाविषयी वस्तुनिष्ठ भूमिका

जमातवादाविषयी त्यांची भूमिका अतिशय प्रामाणिक होती. त्यांनी मुसलमान समाजातील जमातवादाच्या अनेक प्रेरणा शोधल्या. त्या नाकारुन मुस्लिमांनी हिंदूशी संवादाला पुढे यायला हवे असे त्यांना वाटत होते. त्यांनी मुसलमानांच्या औरंगजेब प्रेमावर जोरदार टीका केली.

मौलाना म्हणाले, “एक मंदिर, एक मस्जिद उद्ध्वस्त करुन त्या बदल्यात तुम्ही शंभर मंदिर, मस्जिद बनवून त्याची भरपाई करू शकत नाही. प्रश्न हा आहे की औरंगजेबने मंदिरे पाडलीच कशासाठी? माझी विनंती आहे की, तुम्ही इस्लाम आणि औरंगजेब यांना एक करू नका. माझा आधार इस्लाम आहे औरंगजेब नाही. तुम्ही औरंगजेबला नकार द्या. जेणेकरुन इस्लाम सुरक्षित राहू शकेल. औरंगजेब मोठा आहे की इस्लाम?

दुसरे खलिफा उमर फारुख हे आमचे आदर्श आहेत. उमर फारुख आणि ख्रिश्चनांमध्ये पॅलेस्टीन येथे एक करार झाला होता. त्या करारातील एक मुद्दा महत्वाचा आहे, ‘ला तुहदम कनायसोहुम- (खिश्चनांचे चर्च उद्ध्वस्त केले जाणार नाहीत.) उमर फारुख मोठे आहेत की औरंगजेब?

हा कोणता न्याय आहे की, तुम्ही चार मंदिरांना देणग्या देऊन एक मंदिर उद्ध्वस्त करत आहात. तुम्हाला एकही मंदिर पाडण्याचा अधिकार नाही. आज जर मुसलमान औरंगजेबला विसरत असतील, त्याला नाकारत असतील तर या शर्तीवर हिंदूंचा मुसलमानांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल. हा माझा दावा आहे. जर असे घडले नाही तर माझे कार्यालय जाळून टाका.” मौलाना वहीदुद्दीन खान यांचे हे धाडस अतिशय महत्त्वाचे होते.

भूमिका घेताना त्यातील तथ्य, वर्तमान वास्तवाच्या पातळीवरची वस्तुनिष्ठता तपासून, उपयुक्तता पाहून समाजाच्या भल्यासाठी ती पुढे रेटण्याचे कसब जे त्यांच्या समकालीनांत नव्हते, त्यांच्यात मात्र ठासून भरले होते. संवाद हा सर्व प्रकारच्या जमातवादी हिंसाचारावरचा अखेरचा उपाय असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

त्यांच्या ‘रिसाला’ या मासिकात या विषयीचे शेकडो लेख त्यांनी प्रकाशित केले आहेत. दंगली झालेल्या अनेक शहरांना भेटी देऊन वहीदुद्दीन खान यांनी त्याचा अभ्यास केला. पाकिस्तानच्या सिंध प्रांताला त्यांनी भेट दिली होती. तेथून परतल्यानंतर पाकिस्तानात हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराच्या बातम्या अतिरंजीत असल्याचे म्हटले. इतिहास हा दोन्ही बाजूला वादाचा विषय असल्याचे त्यांचे मत होते.

वाचा : ‘यौमे आशूरा’ स्मृतिदिनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी

वाचा : चिश्ती विद्रोहाचे मुलाधार ख्वाजा मैनुद्दीन अजमेरी

मध्यकालीन आक्रमकांचा वारसा लादू नका

“काही मध्यकालीन आक्रमकांनी हिंदूंच्या काही श्रद्धाकेंद्रांना उद्ध्वस्त केले आहे. त्यांनी ही कृती मुसलमान म्हणून नाही तर राज्यकर्ता म्हणून केली आहे. त्यांचा वारसा मुसलमानांवर लादणे चुकीचे आहे.

इथला मुसलमान मध्यकालीन आक्रमकांपेक्षा वेगळा आहे. तो सहिष्णू आहे. त्याला जमातवादाकडे ढकलण्यासाठी, भारतीय समाजापासून अलग उभे करणे योग्य नाही.”

इतिहासाकडे वस्तुनिष्ठ पद्धतीने पाहायला हवे. त्यातील आदर्श शोधताना, क्लेषदायी घटनांची जबाबदारी वर्तमानातील घटकांवर लादून भूतकाळातला क्लेष, हिंसा वर्तमानात करणारा समाज प्रगतिशील असू शकत नाही. इतिहास वर्तमानाकडे डोळसपणे पाहण्याचे मूल्यभान देणारा विचार आहे, विघातकता, उद्रेक देणारे तत्त्वज्ञान नाही, ही त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची होती.

मुसलमानांना सामान्य हिंदूविषयी वस्तूनिष्ठ समज देण्यात मुसलमानांचे धार्मिक, सामाजिक आणि राजकीय नेते कमी पडले आहेत. मुस्लिम पत्रकार देखील त्यांच्याच वळचणीतले आहेत. हे दोघेही ‘पित श्रेणीतले’ आहेत. मुसलमानांना आधी त्यांच्या जोखडातून मुक्त व्हावे लागेल. आपले नवे नेतृत्व, नवे प्रवक्ते जन्माला घालावे लागतील.

वर्तमानाची व्याख्या करताना वर्तमानाच्याच कसोट्या वापराव्या लागतील. ज्या राष्ट्रात जगायचे तेथील आपली पाळेमुळे मजबूत करण्यासाठी त्याच राष्ट्रातील आदर्श शोधून जमीनी वास्तवात जगावे लागेल, अन्यथा उपरेपणा हे मुसलमानांचे स्थायी भविष्य ठरेल. सुफींनी दिलेले वास्तवाचे भान घेऊन मुसलमान ज्यावेळेस संवादी, सुफींप्रमाणे समाजहितैषी भूमिकेत घेतील, त्यावेळी त्यांच्या सर्व समस्यांना सार्वकालिक उत्तर मिळेल. मौलाना वहीदुद्दीन खान यांनी सुरू केलेल्या चळवळीचा हा सार होता.

वाचा : मुहमंद पैगंबरांचे श्रमावर आधारित बाजारांचे व्यवस्थापन

वाचा : मदीनेत इस्लामी सभ्यतेचे आगमन कसे झाले?

इस्लाम जीवनाचे तत्त्वज्ञान

इस्लामचा अभ्यास धर्म म्हणून करणाऱ्या सर्वच विद्वानांनी त्याच्या जन्माच्या मुळाशी असणाऱ्या आर्थिक कारणांची चर्चा अपवादनेच केली आहे. मक्का शहरातील उत्पादन व्यवस्थेत इस्लामोत्तर झालेले बदल हा विषय धर्मवादी अभ्यासकांना आकर्षित करू शकला नाही.

मक्का शहरात प्रेषितांच्या जन्मापूर्वी आर्थिक विषमतेने सामाजव्यवस्थेला पोखरुन काढले होते. मक्का शहराचा हा प्रेषितपूर्व  इतिहास मांडताना धर्माचे अभ्यासक त्या काळाला ‘दौर ए जाहिली’ म्हणजे अज्ञानाचा काळ संबोधून पुढे जातात. त्यावर चर्चा केलीच तर ते अंधश्रद्धा, रुढी आणि कर्मकांडांची करतात. अरब समाज जीवनातील आर्थिक शोषणाच्या इतिहासाला त्यांच्या लिखाणात स्थान नसते.

मौलाना वहीदुद्दीन खान यांनी इस्लामी समाजक्रांतीची भौतिक, ऐतिहासीक वास्तवाच्या आधारावर कारणमीमांसा केली आहे. इस्लामी तत्त्वज्ञानाचा तुलनात्मक अभ्यास हा त्यांचा आवडता विषय होता. त्यामुळेच त्यांनी इस्लामच्या मुळाशी असलेल्या प्रेषितांच्या आर्थिक बदलाच्या भावनेला अधोरेखित केले.

मक्केतल्या आर्थिक हितसंबंध गुंतलेल्या भांडवली घटकांना अर्थव्यवस्थेविरोधातील आव्हान नको होते. त्यातून उद्भवलेले संघर्ष आणि त्या संघर्षाचे तत्त्वज्ञान म्हणून मौलाना वहीदुद्दीन खान इस्लामकडे पाहतात.  मौलाना म्हणतात, “कोणत्याही धर्माची सुरुवात विचारधारेच्या रुपात होते. जीवनाच्या दिशा बदलण्याचा आग्रह घेऊन ती विचारधारा सामाजिक चळवळीचा श्वास बनून कार्यरत होते.”

वहीदुद्दीन खान यांच्या या दृष्टिकोनाची पुष्टी एच. आर. गिब यांच्या विधानांवरुन होते. ते म्हणतात “मक्कावाल्यांचा विरोध त्यांच्या रुढींना (इस्लामने) आव्हान दिले म्हणून नव्हता. किंबहुना त्यांच्या धार्मिक अंधश्रद्धेमुळे देखील तो विरोध नव्हता. मात्र त्याच्या मुळाशी आर्थिक आणि राजकीय कारणे होती.

त्यांना भीती होती की, मुहंमद (स) प्रणित समाजक्रांती त्यांच्या आर्थिक समृद्धीला प्रभावित करण्याची शक्यता अधिक होती. प्रेषितांनी अर्थव्यवस्थेत सांगितलेले बदल अरबांच्या नफेखोरीला, शोषणाला रोखत होते. ते गरीबांचे अधिकार आणि सामान्य व्यापाऱ्यांच्या हितसंबंधांना जपण्याचे तत्त्व सांगत होते.

ज्या व्यापारी गटाचे हिंतसंबंध उच्चवर्गीयांच्या हितांशी बांधिल असणाऱ्या अर्थव्यवस्थेमुळे दुखावले होते. त्यांना इस्लामी अर्थव्यवस्थेची नवी तत्त्वे आकर्षक वाटत होती. धर्मप्रेरीत भांडवली सत्तेला इस्लाममुळे मिळालेले आव्हान मक्का शहरातील कनिष्ठ आणि मध्यमवर्गीयांना आकर्षित करत होते.”

मौलाना वहीदुद्दीन खान यांनी या ऐतिहासिक वास्तवाला चर्चेचे विश्व दिले. राज्य आणि अर्थकारण एका बाजूला तर मजूर, त्यांचे जीवन आणि त्यातल्या समस्या दुसऱ्या बाजूला या संघर्षावर उपाय म्हणून इस्लामने सांगितलेल्या राज्याच्या संकल्पनेची उपयुक्तता मौलाना वहीदुद्दीन यांनी लोकशाही, समाजवादी मुल्यांचा आधार घेऊन मांडली आहे.

इस्लामचा प्रसार श्रद्धेच्या आधारावर करण्यापेक्षा त्याची जीवनातील उपयुक्तता मांडण्यावर त्यांनी भर दिला होता. त्यामुळेच त्यांच्या इस्लामविषयीच्या इतिहासदृष्टीने प्रस्थापित उलेमावादी चर्चाविश्वाला आव्हान उभे राहिले. वर्तमानकाळ परिवर्तनवादी विचारवंताना त्यांच्या जीवनात समर्थकांच्या तुलनेत विरोधक अधिक संख्येमध्ये देतो.

मौलाना वहीदुद्दीन खान यांना उथळ विरोधकांच्या अनेक झुंडींचा सामना करावा लागला. त्यातून त्यांच्या हत्येसाठी बक्षिसाची घोषणा करण्यापर्यंत काहींनी मजल मारली होती. काळ पुढे जाईल त्याप्रमाणे त्यांच्या आणि विरोधकांच्या विचारविश्वाची युक्त-अयुक्तता सिद्ध होईल.

वाचा : रोगराईतील ‘अस्थायी वास्तविकते’च्या कालखंडातील ‘ईद’

वाचा : रमज़ानचे रोजे – वंचितांप्रति संवेदनशीलतेचे धडे

समिक्षा व्हायलाच हवी

वर्तमानाच्या प्रभावात भूमिका मांडण्यापेक्षा, वर्तमानाच्या वास्तवातून आकाराला येणाऱ्या भविष्याचे भान घेऊन इतिहासापासून धडे घेत मार्ग शोधणाऱ्या वहीदुद्दीन खान यांच्यावर विखारी टीका होणे स्वाभाविक होते. कारण काळापेक्षा कितीतरी मागच्या विचारवविश्वाला तडाखे देऊन त्यात बदल करायचे म्हटले की, हा धोका पत्कारावा लागतोच.

असा धोका मौलाना रुमी, इमाम गजाली यांच्यापासून मुहंमद इकबाल यांच्यापर्यंत सर्वांनीच पत्करला होता. उलट ही जोखीम पत्करण्याची त्यांची वृत्तीच त्यांना इस्लामी तत्त्वज्ञानाचा पारंपरिक पद्धतीने अभ्यास करणाऱ्यांच्या समुहापासून वेगळे आणि स्वतंत्र अस्तित्व देऊन जाते.

विरोधकांच्या टीकेमुळे वहीदुद्दीन खान यांच्या योगदानाविषयी सहानभूतीपुर्वक विचार करण्याची गरज नाही. त्यांच्या कार्याची समिक्षा जशी त्यांच्या ऐतिहासिकतेच्या प्रेमात होऊ शकत नाही तशी त्यांच्या टीकात्मक विश्लेषणातील विद्रोहातून उद्ध्वस्त झालेल्या मुल्यांच्या प्रेमातूनही ती होऊ शकत नाही.

जावेद अहमद गामिदी म्हणतात, “मुसलमान अत्यत दुर्दैवी समाज आहे. त्याचे सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणवून घेणारे लोक परिवर्तनवादी विचारवंताच्या कार्याची समिक्षा करताना त्याची व्यक्तिगत उपयुक्तता आणि मतभेदातून त्याचे  महत्त्व तपासतात. त्यातून ते थेट त्याला कुचकामीच ठरवतात. वहीदुद्दीन खान यांनी रिसाला या मासिकातून केलेल्या कार्यास एक क्लासिकल महत्त्व आहे.’

त्यासाठीच तत्त्वज्ञान आणि समाजशास्त्राच्या अभ्यासकांनी पुढे येऊन त्यांची समिक्षा करायला हवी. त्यातून खऱ्या अर्थाने वहीदुद्दीन खान यांचे महत्त्व प्रतिपादीत होऊ शकेल.

विसाव्या शतकातील राजकीय चुकांमुळे निर्माण झालेल्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर समन्वय, शांती आणि धर्ममुल्यांच्या पुनर्व्याख्येची चळवळ मौलाना वहीदुद्दीन खान यांनी राबवली होती. भारतीय मुसलमानांच्या भवितव्यासाठी ती महत्त्वाची होती. विसाव्या शतकात भारतामध्ये इस्लामच्या पुनर्व्याख्येसाठी झालेल्या ऐतिहासिक प्रयत्नाचे साक्षीदार असलेले मौलाना वहीदुद्दीन खान हे आता त्याच इतिहासाचा भाग बनले आहेत. यापुढे जगभरात इस्लामी धर्ममुल्यांची पुनर्व्याख्या करणाऱ्या चळवळींच्या इतिहासात मौलाना वहीदुद्दीन खान यांचा उल्लेख सातत्याने होत राहील.

जाता जाता :